अधिकमास माहात्म्य अध्याय ५
।। नृगराजाची गोष्ट ।।
अधिकमास माहात्म्य अध्याय ५ |
श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नम: || श्री गुरुभ्यो नमः
सुत पुराणिकांच्या रसाळ वाणीतून अधिक मासाचे महात्म श्रवण करताना ऋषिवरांचा श्रोतृवर्ग पूर्णपणे भारावून गेला होता. प्रत्येकाचे मन हे आनंदाने भरून येत होते. कथा निवेदनाचा प्रवास पुढे पुढे चालू होता. लक्ष्मीनारायणाच्या मधुर संवादातून कथा पुढे सरकत होती. गोमातेची पवित्रता, तिच्या उदरातला देवदेवतांचा निवास, गोपूजनाचे महत्त्व आणि त्यामुळे लाभणारा पुण्याचा ठेवा हे सारे सांगून झाल्यावर नारायण म्हणाले, “देवी, गोदानालाही मोठे महत्त्व आहे. नृगराजाच्या हातून नकळत गोदानाच्या कामात एक छोटीशी चूक घडली आणि त्याला खूप मोठी शिक्षाही भोगावी लागली.” भगवान विष्णूंच्या या बोलण्याने लक्ष्मीच्या मनात ती नृगराजाची कथा ऐकण्याचे उत्कट इच्छा निर्माण झाली. लक्ष्मीने आपल्या मनातील ती कथा श्रवणाची इच्छा बोलून दाखवताच विष्णू तिला ती कथा सांगू लागले.
नृग नावाच्या एका राजाने आपल्याला पुण्य मिळावं म्हणून अधिक मासात एक गाय एका ब्राह्मणाला दान केली. गोदानाचे पाणी हातावर घेताच तो बिचारा गरीब ब्राह्मण सुखावला. कारण त्याच्या लेकराबाळांना आता दूध मिळणार होते. राजाने दान दिलेली गाय घेऊन तो आनंदाने आपल्या घरी परत आला. त्याने ती गाय दारातच बांधून ठेवली आणि सुख स्वप्ने पाहत तो ब्राह्मण झोपी गेला. सकाळी उठून तो ब्राह्मण पाहतो तो काय, राजाने दान दिलेली ती काय दावे तोडून निघून गेली होती. ती दान मिळालेली आपली गाय कुठे गेली, याचा शोध घ्यायला तो ब्राह्मण निघाला. खरेतर ती गाय त्या ब्राह्मणाच्या दारातून दावं तोडून पळाली होती, ती सरळ गेली होती राज्याच्या गोशाळेत, आपल्या जुन्या घरात.
दुसऱ्या दिवशी नकळत राजाने आपल्या अधिकमास निमित्ताने रोज एक गाय ब्राह्मणाला दान देण्याच्या व्रतानुसार तीच गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान केली. तो ब्राह्मण राजाने दान दिलेली गाय घेऊन आपल्या घरी परतत असताना, त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाच्या हाती आपली गाय पाहिली. तो म्हणाला, “काय रे, तू तर ज्ञानी ब्राह्मण दिसतोस, अन हे असलं चोरीच कर्म करतोस? चोरून चोरलस तरी काय, तर मला दान मिळालेली गाय. चल, दे माझी गाय मला परत. कालच नृगराजाने मला ही गाय दान दिली होती. रात्री मी दारात बांधून झोपलो. तू रात्री येऊन ती चोरली, खरं ना?” असे म्हणून तो त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातातील ती गाय मागू लागला.
तेव्हा तो दुसरा ब्राह्मण म्हणाला, “अरे मित्रा, तू हे काय बोलतो आहेस? अरे, मला तर ही गाय नृगराजाने आज, आत्ता, सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर दान दिली आहे. ही गाय माझी आहे. मी तुला देणार नाही. चल दुर हो, माझी वाट सोड.” पण तो पहिला ब्राह्मण काही वाट ही सोडेना आणि गाय त्या दुसऱ्या ब्राह्मणाला घेऊन जाऊ देईना. एकाच गायीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये एकच भांडण जुंपले. दोघेही हमरीतुमरीवर आले. वाटेत ही गर्दी झाली.
एकाच गाईच्या मालकीवरून दोन ब्राम्हण भर रस्त्यात भांडत आहे, ही वार्ता राजाच्या कानावर गेली. राजाही त्या जागी आला अन समोर पहातो तो काय? काल आणि आज राजाने ज्या दोन ब्राह्मणांना गोदान दिले, तेच ते दोन ब्राह्मण होते आणि दोघांना दान दिलेली गाय मात्र एकच होती. त्या ब्राह्मणांना आणि त्या गायीला नीट ओळखल्यानंतर राजाच्या लक्षात ही गोष्ट आली, की चुकून आपण एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली आहे. तेव्हा नृगराजाने आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकीबद्दल या दोन्ही ब्राह्मणांची क्षमा मागितली. हात जोडले आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाने ती गाय पहिल्या ब्राह्मणाला द्यावी अशी विनंती केली. त्या बदल्यात राजा “मी तुला दोन गायी देतो” असेही म्हणाला. पण ते दोघेही एकाच गाईची मालकी सोडायला तयार होईनात. उलट जो-तो मीच ही गाय नेणार म्हणून हट्टाला पेटला. इतकेच नव्हे तर शक्तीच्या बळावर त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भररस्त्यात मारले आणि ती गाय तो आपल्याबरोबर घेऊन गेला. रागावलेल्या, अपमानित झालेल्या त्या दुसऱ्या ब्राह्मणाने नृगराजाला शाप दिला.
कालांतराने तो नृगराजा मरण पावला. यमराजाच्या पुढे जेव्हा त्या राजाचा पाप-पुण्याचा पाढा वाचला गेला, तेव्हा अधिक महिन्यात एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली, या चुकीबद्दल यमराजाने त्याला एका सरड्याचे रूप दिले आणि जंगलातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तो राजा त्या सरड्याच्या रूपात अनेक वर्ष दुःख भोगत त्या विहिरीत पडून राहिला.
“अरे बापरे! एका एवढ्याशा नकळत घडलेल्या चुकीबद्दल एवढी मोठी शिक्षा? स्वामी, त्या राजाची त्या सरड्याच्या जन्मातून सुटका झाली नाही का?” लक्ष्मीने कळवळून नारायणांना विचारले. “देवी! राजाच्या हातातून जी चूक झाली, त्याबद्दल राजाला शिक्षाही झाली. तो सरडा होऊन विहिरीत पडला. पण अधिक महिन्यात नृगराजा गोदान करत होता, त्या पुण्याईच्या जोरावर श्रीकृष्णाच्या हातूनच त्या राजाचा उद्धार झाला.”
“नृगराजा सरडा होऊन ज्या कोरड्या विहिरीत पडला, त्या विहिरीजवळ श्रीकृष्णाची सांब, प्रद्युम्न ही मुलं आणि त्यांचे कांही सवंगडी हे खेळ खेळत आले. त्यांच्यातील एकाने विहीरीत डोकावून पाहीले, तर त्याला तो भला मोठा सरडा दिसला. त्याने इतरांनाही तो सरडा दाखवला. मुलांना त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याबद्दल दया आली. त्यांनी त्या सरड्याला वर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही ते शक्य झालं नाही. मुलांमार्फत ती गोष्ट श्रीकृष्णाला समजताच, श्रीकृष्ण धावला आणि त्याने त्या सरड्याला आपल्या हाताने बाहेर काढलं. श्रीकृष्ण कृपेचा तो दयार्द्र स्पर्श घडला आणि एक नवल घडलं. बघता बघता त्या सरड्याचे रूप बदललं आणि त्या सरड्याच्या शरीरातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला.
आपल्या उद्धारकर्त्याचे आभार मानत तो म्हणाला, “भगवंता, मी गतजन्मीचा नृगराजा. मी अधिक महिन्यात गोदानाचे जे व्रत केले होते,त्यात चुकून माझ्या हातून एकच गाय दोन ब्राम्हणांना दान दिली गेली. ज्या ब्राह्मणाला त्या गोदानाला वंचित व्हावं लागलं, त्याच्या शापाने मला हा असा पुढील जन्म घ्यावा लागला. मात्र त्या पापाबरोबर माझ्या हातून, पुरुषोत्तम मासात हे गोदान पुण्य हि घडलं, त्यामुळेच मला आज तुमची भेट घडली, तुमचा स्पर्श घडला आणि माझा या सरड्याच्या जन्मातून उद्धार हि झाला. खरच देवा अधिक मासातील गोदानाची पुण्याई मोठी आहे, याची साक्ष पटली. धन्य आहेस तू भक्तवत्सला! धन्य आहे तो पुण्यवान अधिकमासही ! इतकं बोलून तो दिव्यपुरुष आकाश मार्गाने स्वर्गलोकी निघून गेला. देवी! आता तरी कळलं ना, या अधिक मासाचं आणि त्यातील पुण्यकर्माचे फळ!”
अध्याय पाचवा समाप्त!
।। श्रीकृष्णार्पणवस्तू ।।
➡️पुढील अध्याय
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.