Subscribe Us

श्री शिवलीलामृत - अध्याय आठवा || Shivlilamrut Adhyay 8 || शिवलीलामृत अध्याय ८ || कृष्णरेखा krushnarekha

 श्रीशिवलीलामृत कथासार

अध्याय:-८ 

भद्रायूच्या लग्नाची कथा


                    हे अतिशय भोळ्या शंकरा, नीलकंठा, तू वेदांनाही अतिशय वंद्य आहेस. योगीरूप धारण करून या पृथ्वीवर तूच भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र सांगितलेस. तुझ्या शुभदायी अशा आशीर्वादानेच भद्रायूला माहिती देऊ शकला. 'शिवकवचा' बद्दल योगी विस्ताराने शौनक व इतर ऋषींना व्यासमुनी नंतर सांगू लागले गुरुने सांगिल्याप्रमाणे भद्रायू मृत्युंजय मंत्र. सतत जपत असे, अंगावर, गळ्यात, दंडात रुद्राक्ष धाण करीत असे. 


                     सर्वांगाला रोजच्या रोज भस्म चर्चित असे. शिवयोग्याने त्याला एक अतिशय सुंदर शंख दिला होता. त्या शंखाचा आवाजऐकून शत्रू तत्काळ मूर्च्छित पडत असे. तसेच, एक तलवारसुद्धा दिली होती. नुसती म्यानाच्या बाहेर ती तलवार उपसली व शत्रूला फक्त दाखविली, की शत्रू संपूर्ण जळून भस्म होत असे. भोळा शंकर प्रसन्न झाला म्हणजे त्याचे देणे अलौकिकच असे असते. "तुला उत्तम आरोग्य प्राप्त होवो, दीर्घायुष्य लाभो, अफाट ऐश्वर्य मिळो, सर्व राजांत तू श्रेष्ठ राजा हो, नेहमी जाशील तेथे विजयी हो, संतोषाने पृथ्वीवर हजारो वर्षे राज्य कर, फलाची अपेक्षा मनात न करता नेहमी दान कर. तुझ्या अशा वागण्याने तुझी कीर्ती दाही दिशात पसरेल, भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी वास्तव्यास राहील. प्राणिमात्राबद्दल दया तुझ्या हृदयात कायम भरलेली राहील. तुझ्या हातात नेहमी धनलक्ष्मी येऊन वास्तव्य करील, तुझ्या सर्वांगावर लक्ष्मी वास करील. तुझ्या बाहूत वीरलक्ष्मी सतत राहील. सर्वदूरपर्यंत दिगंतरात तुझी कीर्ती पोहोचेल. तुझ्या केवळ एका खड्गाच्या वाराने शत्रूचा पूर्णपणे नाश होईल. 

                     साम्राज्यलक्ष्मी तुझ्या घरात नांदात राहील. तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने नेहमी बहरेल. " असा भद्रायूला शुभ आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला. सुमती आणि भद्रायू गुरुचरणांची सेवा करायला आता नेहमी तत्पर असत. इकडे काय झाले, भद्रायूचा पिता दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू आतापर्यंत आपले राज्य संभाळीत होता. त्याच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने अचानक हल्ला केला आणि राजाची नगरातील सर्व संपत्ती पूर्णपणे हरण केली. सर्व धनधान्य नेले, सगळी गाईगुरे पळवली आणि नगरातील स्त्रिया आणि पुरुष सर्वांना पकडून आपल्या कैदेत टाकले. मुख्य राजधानीला त्याने जेव्हा वेढा घातला तेव्हा राजा वज्रबाहू युद्ध करण्यासाठी राजवाड्याबाहेर पडला. दोघांमध्ये दहा दिवस घनघोर युद्ध झाले; पण वज्रबाहू एकटा होता. त्याच्याबरोबर लढणारे शत्रू पुष्कळ होते. त्यामुळे वज्रबाहूचा अतिशय दारुण पराभव झाला. शत्रूने त्याला जिवंत पकडले व आपल्या रथाला बांधून आपल्यामागे चालवले. वज्रबाहूचा प्रधान, मंत्री सर्व कैदेत पडले.. वज्रबाहू असहाय्यतेपणे मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होता; पण कोठूनही सुटकेची आशा दिसत नव्हती. या दुःखसागरातून त्याला बाहेर काढील असा कोणीही त्राता आजुबाजूला, जवळपास दिसत नव्हता. त्यामुळे वज्रबाहू मनात अतिशय खिन्न झाला होता.


                   भद्रायूला ही गोष्ट त्याच्या नगरीत समजली. शत्रू आपल्या पित्याला धरून रथामागे बांधून चालवत नेत आहेत हे ऐकताच त्याला अतिशय राग आला. शिवयोगी गुरुचे स्मरण करून त्याने आपल्या अंगावर शिवकवच चढवले. तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला. शिवाचे स्मरण करून सर्वांगाला भस्म फासले, गळ्यात, दंडावर, जटेमत रुद्राक्ष माळा घातल्या. हातात शिवयोग्याने दिलेला शंख आणि शत्रूला दाखविताच शत्रू मरून पडणारी तलवार घेतली. भद्रायूने आपल्या मातेला नम्रपणे वंदन केले. आई, शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून त्याच्याशी लढायला चाललो आहे. गुरुचरणाचा दास असलेला हा तुझा पुत्र गुरुकृपेने प्राप्त झालेल्या अंगच्या पराक्रमाने त्या सर्व राजांचा पराभव करील आणि त्या राजांना जिवंत धरून आणून तुझ्या पायाशी वाकायला लावील, तेव्हा तू मला आशीर्वाद दे. "


                   एवढे आईला बोलून भद्रायू निघाला. पद्माकर राजाचा मुलगा सुनय हासुद्धा त्याच्याबरोबर होता. गरुड जसा दूरवरून सापाचा माग काढीत जातो तसा शत्रूचा माग काढीत काढीत भद्रायू चालला होता. चपलगती हरणाचा पाठलाग करीत दोघे सिंह जणू काही त्याच्या मागे पळत होते. त्यांना पाहून जणू काही जनकनंदिनीचे कैवारी लव आणि कुशच चालले आहेत असे पाहणारास मनात वाटत होते. दोघे वयाने तसे अगदी लहान होते. जाता जाता जेव्हा त्यांना पुढे आलेले शत्रुसैन्य एकदम समोर दिसले तेव्हा त्यांनी मोठ्याने आरोळ्या ठोकल्या, “अरे चोरांनो, तेथेच थांबा आणि जागेवरच उभे रहा. वज्रबाहूसारख्या राजाला तुम्ही आपल्या रथाला बांधून नेत आहात. तुम्हांला कितीही शिक्षा द्यावी तेवढी थोडी आहे. तुमचे नाक-कान, हात-पाय तोडावे असे मला मनातून वाटते आहे. "


                      त्या दोघा किशोरांची गर्जना ऐकून सर्वांनी एकदम मागे वळून पाहिले. विष्णु-शंकर, चंद्र-सूर्य, वसिष्ठ-विश्वामित्र, वासुकी-इंद्र यांच्यासारखे भद्रायू व सुनय हे दोघेही आपल्या तेजाने चमकत होते. या किशोरांनी पावसाची जशी सर पडावी तसे एकामागून एक असंख्य बाण एकदम सोडले. या आक्रमणाने शत्रू माघारी वळला आणि आपली रणवाद्ये वाजवीत, शस्त्रे परजीत या दोन्ही किशोरांवर त्वरेने आणि त्वेषाने चालून आला. त्याबरोबर भद्रायूने आपल्या हातातला शिवयोग्याने दिलेला शंख वाजवला. त्या आवाजाने पृथ्वीही डळमळली. दाही दिशा अगदी सुन्न झाल्या. शत्रू मूर्च्छित होऊन पडले. रिकामे रथ सैरावैरा पळू लागले. शत्रूच्या त्यातल्याच एका स्थात हे दोघे चढले आणि धनुष्याला बाण लावून भराभर शत्रूवर सोडू लागले.

              आपला कैवार घेणारा वीर आपल्या मदतीसाठी आला आहे असे कळताच वज्रबाहूच्या सैन्यात चैतन्य सळसळले आणि त्यांनी हेमरथाचे अनेक सैनिक आपल्या हातातील शस्त्रांनी ठार मारले. वज्रबाहू आणि त्याचा प्रधान रथाला बांधलेल्या अवस्थेतच या कुमारवयातील शौर्य गाजविणाऱ्या दोघांकडे पाहत होते. जणू शंकर- विष्णूच या कुमारांची रूपे धारण करून आपल्या मदतीला आले आहेत, असे त्यांना वाटले. दोघांचा गुरु एकच असावा. कारण दोघांची विद्या अगदी सारखीच तेजस्वी आहे. तरीही त्यातला जो सुंदर आणि बलदंड असा आहे त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेच राजतेज दिसते आहे. का कुणास ठाऊक; पण वज्रबाहू राजाला त्या कुमारांविषयी मनातून फार प्रेम वाटायला लागले.


                 वज्रबाहू स्वतःशीच मनातल्या मनात विचार करीत होता. ही दोन छोटी मुले कोण आहेत ? कुणाची आहेत, हे मला खरेच माहीत नाही, तरीही त्यांना आपल्या उराशी कवटाळावे आणि प्रेमाने त्यांचे चुंबन घ्यावे असे मनातून एकसारखे वाटते आहे. " वज्रबाहू असा स्वतःशीच विचार करीत होता. त्याच्या डोळ्यासमोर घनघोर युद्ध सुरू होते. रणांगणात रक्ताचे पाट वाहात होते. भद्रायू एखाद्या प्रखर विजेसारखा रणांगणात चमकत होता. प्रत्यक्ष भीम आणि हनुमानच या दोघांच्या रुपाने समरभूमीवर आले आहेत असा भास होत होता. शत्रू मनातून खूप खूप घाबरला होता. शेवटी भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खड्ग म्यानाबाहेर काढले. त्याबरोबर हजार सूर्य एकदम उगवावेत असा प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र पसरला. ते खड्ग म्हणजे प्रत्यक्षात प्रलयकालातील लवलवणारी वीज, किंवा समोर येईल त्याला क्षणात जाळू पहाणाऱ्या अग्नीची ज्वाला, अथवा एखाद्या काळसर्पाचे विष यासारखे भासत होते. ती तलवार बघताच सारी मगधसेना एकदम जळून भस्म झाली. 

        

               राजा हेमरथाने जेव्हा पाहिले तेव्हा उरलेले सैन्य घेऊन तो पळून जाऊ लागला. भद्रायूने ते पाहिले आणि अत्यंत चपळाईने पुढे झेप घेऊन हेमरथाला आपल्या सेनेकडून पकडून आणले. मग त्याला आपल्या रथाला बांधून ठेवले. त्याच्या प्रधानमंत्र्यांनाही पकडून आणले. मग त्यांची अर्धी मिशी भादरली. त्यांच्या डोक्यावर पाच पाट काढले आणि त्यांना आपल्या रथामागून चालवत नेण्याचा हुकूम दिला. त्या दोघांनी हेमरथ राजाचे सर्व धन, स्त्रिया, हिसकावून घेतले. वज्रबाहूच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू हेमरथ राजाने आपल्या सेनेकडून पळवल्या होत्या त्या सर्व वस्तू ज्याच्या त्याला देऊन टाकल्या. गाईगुरे परत माघारी वज्रबाहूच्या नगरीकडे वळवली. वज्रबाहूची व अमात्यांची हेमरथाच्या कैदेतून सुटका केली. भद्रायूने वज्रबाहूच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला. अत्यंत गहिवरल्या आवाजात वज्रबाहू भद्रायूला म्हणाला, 'बाळा तू आहेस तरी कोण ? मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलासनाथ धावून आले आहेत असे मला वाटते. मला संकटातून सोडवणारा तू आहेस तरी कोण ? "


                    मी तीन दिवसांनी परत आपल्या भेटीस येईन तेव्हा माझी हकीगत आपल्या अवश्य सांगेन," असे म्हणून भद्रायूने वज्रबाहूला पुन्हा त्याच्या सिंहासनावर बसवले. राजस्त्रियांनी भद्रायूभोवताली लिंबलोण ओवाळले. त्याला मनापासून शुभ आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन भद्रायू आणि सुनय आपल्या रथात बसून घरी आले. आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अत्यंत नम्रपणाने नमस्कार केला. पद्माकर राजालाही हे ऐकून फार फार आनंद झाला होता. इकडे शिवयोगी राजा चित्रांगद आणि सौंदर्यवती पतिव्रता सीमंतिनी यांना भेटायला गेला होता. भद्रायूची सर्व हकीगत शिवयोग्याने त्या दोघांना सांगितली. तो म्हणाला, आपल्या पित्याला अशा अत्यंत पराक्रमी, शूर वीर पुरूषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्या आणि शूर असा जामात मिळवा. ' बोलणे चित्रांगद आणि सीमंतिनीला मनापासून शिवयोग्याचे एकदम पटले. त्या दोघांनी अत्यंत आदराने व नम्रतेने शिवयोग्याचे पाय धरले आणि म्हटले, "तुमचे वचन आम्हांला अगदी आज्ञेसारखे आहे. तुम्ही त्वरित जाऊन वराला घेऊन या. आम्ही याच शुभघटिकेला कन्यादान करण्यास तयार आहोत.


                    शिवयोग्याने परत जाऊन राजा पद्माकर, सुमती यांनाही ही गोष्ट सांगितली. मग ती ऐकून राजा पद्माकर आपल्या लवाजम्यासह, मानलेल्या बहिणीला घेऊन भद्रायूच्या लग्नाला निघाला. वेशीपाशी वऱ्हाड येताच चित्रांगद राजाने आनंदाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि मंगलवाद्यांच्या गजरात मिरवत तो त्यांना घेऊन नगरात गेला. वर म्हणजे आपल्याला ज्याने महापराक्रमाने अपयशाच्या महासमुद्रातून वर काढले तोच वीर आहे हे पहाताच भद्रायूचे पाय धरण्याठी तो धावतच पुढे झाला; पण भद्रायूने त्याला उठवले आणि आपल्या छातीशी कवटाळून गाढ आलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यातून सारखे आनंदाश्रू वहात होते. वज्रबाहूने भद्रायूला विचारले, "तुझे नाव, देश, मातापिता यांची मला माहिती दे. तुझे गुरू कोण? तुझा गाव कुठला, सारे सारे काही मला सांग. 


                   तेवढ्यात चित्रांगद राजा तेथे आला. त्याने वज्रबाहूला सन्मानाने एका महालात नेले आणि शिवयोग्याने त्याला सांगितलेली सारी हकीगत त्याने वज्रबाहूला सांगितली. आणि म्हणाला, “भद्रायूचे पुण्य फार मोठे होते म्हणून त्याला शिवयोगी भेटला. हा तुझाच पुत्र आहे. " चित्रांगद राजा हे सांगत असताना राणी सुमती दाराचा पडदा दूर सारून त्या महालात आली. तसा चित्रांगद राजा बाहेर निघून गेला. हे ऐकून वज्रबाहूला आता फार पश्चात्ताप झाला होता. खाली मान घालून तो मूक मनाने गुपचूप अश्रू गाळीत होता. मागचे सारे दुःख आठवून सुमती राणीलाही आता रडू आवरत नव्हते. नंतर राजा वज्रबाहू तिला म्हणाला,


                     " देवी, तुझा मी फार मोठा अपराधी आहे. अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली. माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वीवर दुसरा कुणीही नसेल. सुमती राणी, खरोखरच तू धन्य आहेस. मी मात्र अभागी ! मला पुत्र नव्हता माझे राज्य हिरावले गेले होते; पण तू मात्र मला पुत्रासहित राज्य दिलेस. मला क्षमा कर. मागचे माझे सर्व अपराध विसरून जा राणी तेवढ्यात भद्रायू तेथे महालात आला आणि त्याने पित्याला नमस्कार केला. जणू शंकर आणि षडाननच एकमेकांना भेटले असे ती भेट पाहून वाटत होते. मग राजाने पुत्राला आणि कीर्तिमालिनीला आपल्या अंकावर बसवून घेतले. भद्रायूने आपल्या पित्याला पद्माकर राजा व सुनयकुमार यांचीही ओळख करून दिली.


                    मग मोठ्या थाटामाटाने भद्रायूचा लग्नसोहळा पार पडला. चित्रांगदाने आपल्याकडील हजारो हत्ती, खूप दासदासी, रत्ने,  अलंकार आणि अनेक पोती भरून अपार धन आदण म्हणून भद्रायूला दिले. सर्व सोहळा पार पडल्यावर मग मोठ्या आनंदाने वज्रबाहू आपल्या राणीसह लवाजमा घेऊन आपल्या आला. वज्रबाहू राणी सुमती आणि भद्रायू हे सर्वजण आता फार आनंदात होते. या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी सर्व शत्रूंची बंदिवासातून मुक्तता केली आणि त्यांना कारभार घेऊन आपल्या दरबारात हजर रहाण्याची आज्ञा दिली.


                        वज्रबाहू राजाने सुमतीला पट्टराणीचे पद पुन्हा दिले. आता तिचा सल्ला घेऊन राजा आपल्या राज्याचा कारभार करू लागला. भद्रायूसारखा अत्यंत सुंदर, शूर, वीर, नम्र आणि माता-पित्यांच्या आज्ञेत सतत असणारा पुत्र मिळायला जन्मोजन्मी शंकराची मनापासून भक्ती करायला हवी. अत्यंत पतिव्रता, सुंदर स्त्री, भाग्यवान, हुशार आणि नम्र असा पुत्र आणि सर्वज्ञ असणारा गुरु हे पूर्वजन्मीच्या पुण्यानेच प्राप्त होते. थोडे दिवसांनी भद्रायूला आपल्या जागी गादीवर बसवून राजा वज्रबाहू सुमती राणीसह वानप्रस्थाश्रम स्वीकारून केदारनाथाच्या परिसरात तप करायला निघून गेला.


                   भद्रायूने आनंदाने आणि सुखासमाधानाने खूप वर्षे राज्य केले. शिव आराधना कधीही सोडली नाही. आपल्या गुरूचा उपदेश तंतोतंत कायम आपल्या आचरणात आणला. असा गुरु आणि असा शिष्य दोघेही धन्य होत. पुढे काय झाले ते नीट लक्ष देऊन ऐका. एक दिवस भद्रायू राजा आपली राणी कीर्तिमालिनीसह एका वनात वनविहारासाठी गेला होता. वनात फिरताफिरता एक सुंदर जागा पाहून राजाने तेथे रथ थांबवला. त्या जागेत वृक्षांची अतिशय दाटी झालेली होती. वृक्षांच्या खाली छायेत बसल्यावर आकाशातला सूर्य दिसत नव्हता एवढी दाट झाडी होती. नारळी, केळी, पोफळी, चंदन, अशोक, कांचन, अंजन, आंबे, जांभूळ, वड, पिंपळ, लिंब, डाळींब, अंजीर, बेल आणि औदुंबर अशा अनेक वृक्षांनी ते स्थान अतिशय सुंदर व रम्य बनले होते. चाफा, मोगरा, तगर, निशिगंध, जाई, जुई, मालती, शेवंती, बकुळ अशी असंख्य फुले फुलली होती. सगळीकडे या फुलांचा सुवास दरवळत होता. 


                   वृक्षांना बिलगून हिरव्यागार लता वरवर चढत होत्या. जायफळ, द्राक्षे या वेली लगडलेल्या फळभाराने लवून आनंदाने डोलत होत्या. सर्वत्र मोर नाचत होते. झाडांच्या फांद्यांवर अनेक पक्षी कूजन करीत होते. समोर अतिशय रम्य असे सरोवर होते. त्यात बदके, मासे, राजहंस पोहत होते. तसेच, सुंदर अशी कमळे दिमाखात डोलत होती. या फुलांच्या भोवती भुंग्यांचे थवेच्या थवे गुंजारव करीत होते. अशा रम्य वातावरणात आपल्या लाडक्या राणीसह आनंदाने विहार करीत असताना भद्रायूने एकदम 'भीतीने कोणीतरी मदतीसाठी हाक मारते आहे' असा आवाज ऐकला. त्या बाजूला लक्ष देऊन भद्रायू नीट निरखून पहात होता. एक स्त्री आणि एक पुरूष असे दोघे वर हात करून मोठमोठ्याने हाक मारत त्या दिशेने पळत येत होते. त्यांच्या मागे एक भयंकर वाघ लागला होता. तो पुरूष भराभर पळत पुढे आला व भद्रायूला म्हणाला, 'राजा, माझी अत्यंत आवडती, पतिव्रता, अतिशय नाजुक स्त्री मागे राहिली आहे, तिला कृपा करून वाचव. 


                  भद्रायूने ताबडतोब आपल्या धनुष्याला बाण लावून त्वरेने वाघावर सोडला; पण तत्पूर्वीच वाघरूपी काळाने त्या स्त्रीला झडप घालून पकडले. भद्रायूने वाघाला एका मागोमाग एक असे अनेक बाण मारले; पण त्या बाणाकडे अजिबात लक्ष न देता समोरचा डोंगर ओलांडून तो वाघ स्त्रीला आपल् पाठीवर टाकून खूप दूर पळून गेला.


                    तो ब्राह्मण पुरुष हे पाहून ढसाढसा रडू लागला, शोक करू लागला. मग तो ब्राह्मण भद्रायूची अत्यंत निर्भर्त्सना करीत म्हणाला, " हे राजा, तुझी सगळी शस्त्रे फुकट आहेत. तुझ्या गुरूने तुला दिव्य अशी तलवार दिली आहे, तिच्यात आता काहीच अर्थ नाही. तुला बारा हजार नागांचे बळ मिळाले आहे असे ऐकतो आहे; पण ते खोटेच असावे. आपल्या शरणागताला जो वाचवू शकत नाही त्याची कसलीही उत्तमात उत्तम अशी शस्त्रे अस्त्रे-विद्या काय कामाची ?


                           'माझी सुकुमार पत्नी आपल्या सर्वांच्या डोळ्यादेखत तो वाघ घेऊन गेला, तिच्याशिवाय असलेले घर म्हणजे मला आता अरण्यासारखे वाटते आहे. मी आता काय करू ? राजा, तुला पहाताच माझ्या स्त्रीने आक्रोश करून तुला हाक मारली. 'पतिदेवा. पहा मी वाघाचे भक्ष्य झाले आहे. मला त्याच्यापासून वाचवा हो.' असे ती मला म्हणत होती. मी तुला शरण आलो होतो ते तिला वाचविण्यासाठी; पण राजा, तू काहीच केले नाहीस. माझी सुकुमार प्राणप्रिय पत्नी मरण पावली.


                      जेथे सज्जन लोक रहात नाहीत तो आश्रम किंवा गाव असला काय किंवा नसला काय दोन्ही सारखेच असते. जो  वक्ता किंवा श्रोता शिवकीर्तनात मनापासून दंग होत नाही तो फुकट आहे. शंकराला न भजणारा आणि ब्राह्मणांचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ जगतो, असे शास्त्रात सांगितले आहे. पातिव्रत्य न पाळणाऱ्या स्त्रीचा धिक्कार करावासा वाटतो. आपल्या आई-वडिलांना छळणारा पुत्र, म्हणजे पृथ्वीला नसता भार असतो. आपल्या गुरूवर श्रद्धा न ठेवणारा, किंवा गुरूचे श्रेष्ठत्व दुसऱ्यांना न सांगता आपलीच टिमकी वाजवणारा शिष्य जगला काय आणि मेला काय दोन्हीही सारखेच असते. त्याचप्रमाणे शरणागताला संकटातून न सोडवणारा राजाही व्यर्थ असतो. राजा तूसुद्धा तसाच आहेस रे !"


             अशा तऱ्हेने केलेला ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रायूलाही मनातून फार वाईट वाटले. तो दुःखी अंतःकरणाने ब्राह्मणाला म्हणाला, "हे विप्रा, तू मागशील ते सर्व मी तुला लगेच द्यायला तयार आहे. तू दुसरे लग्न करून सुखी हो. हवे असेल तर माझे राज्यसुद्धा मी तुला देतो. "


                      विप्र खेदाने म्हणाला, राजा, अरे दुसरे लग्न करून पहिली पत्नी मला पुन्हा मिळेल का ? आणि ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग आहे ? मूर्खाला वाचण्यासाठी ग्रंथ द्यावेत, तरूणाला संन्यास द्यावा, वृद्धाचा विवाह करावा, तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्याच्याऐवजी तूप पाजावे, भुकेने व्याकुळ झालेल्याला जेवायला न देता त्याची केवळ गंध-अक्षता वाहून पूजा करावी, चिंतेने अत्यंत ग्रस्त झालेल्यापुढे आनंदातिशयाने नृत्य-गायन करावे त्याप्रमाणे माझी स्त्री वाघाने मारल्यानंतर तू मला तुझे राज्य आणि धन देतो आहेस! आता मला त्याचा उपयोग काय? मला तू माझी पहिलीच पत्नी पुन्हा आणून दे. 

                     

                      " विप्रा, तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमा कर; पण माझी प्रिय आणि पतिव्रता पत्नी ही कीर्तिमालिनी मी तुला देतो. तिचा तू आता स्वीकार कर. भद्रायू म्हणाला. खरे तर तो ब्राह्मण भद्रायूची परीक्षाच पहात होता. तो म्हणाला, 'राजा, मी केलेले माझे तप मेरूपर्वताहून फार मोठे आहे. सागरात एखादे ढेकूळ पडले तर सागराला काय होणार आहे ? मी अशा लहान पापाला घाबरत नाही. तुझी स्त्री कीर्तिमालिनी मला दे. मी तिला अंगिकारितो. " भद्रायूने ठरवले, की आता कीर्तिमालिनीचे दान करावयाचे व आपल्या अपयशाचे प्रायश्चित्त म्हणून स्वत: अग्निकाष्ठे भक्षण करायची. आणि स्वतःचे जीवन संपवून टाकायचे.


                 नंतर विप्रापुढे संकल्प करून राजाने कीर्तिमालिनीचे त्याला दान केले. त्याबरोबर तो ब्राह्मण तेथेच गुप्त झाला. मग राजाने अग्नी पेटवला, स्नान केले, गळ्यात, बाहूत, जटेत रूद्राक्ष धारण केले. सर्वांगाला भस्म फासले. तोंडाने शिवमंत्राचा जप करीत, डोळ्यांसमोर गुरूचरण आठवीत राजाने अग्निभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि " हे शंकरा, विश्वव्यापका, आता मला लवकर तुझ्या चरणाशी ने" असे म्हणून त्याने अग्नीत उडी घेतली. त्याबरोबर त्या अग्नीच्या ज्वालांतून शंकरपार्वती बाहेर आले. भद्रायूला प्रेमाने हृदयाशी धरून शंकर म्हणाले, भक्ता, काय हवे ते माग, तुझ्या अतिशय उत्कट अशा भक्तीमुळे मी प्रगट झालो आहे.' 


                 शंकरापुढे अतिनम्रतेने हात जोडून 'देवाधिदेवा, त्या ब्राह्मणाची स्त्री परत आणून द्या. मला दुसरे काही नको " असे भद्रायू म्हणाला, त्याबरोबर हसत हसत शंकर म्हणाले, "अरे, वेड्या, मीच तो मघाचा ब्राह्मण झालो होतो. वाघ होऊन मीच भवानीला घेऊन गेलो. तुझे सत्त्व बघण्यासाठी खरे इथे मी आलो होतो. ही घे तुझी कीर्तिमालिनी तुला परत आणि आता माग तुला काय हवे आहे ते ?.


                 " हे शंकरा, माझा पिता वज्रबाहू, माता सुमती, रक्षणकर्ता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या पायाशी जागा दे. भद्रायू दीनपणे शंकराला विनवीत म्हणाला. 'तथास्तु! आता तू माग कीर्तिमालिनी, 'शंकर कीर्तिमालिनीकडे पाहून म्हणाले. माझी माता सीमंतिनी, पिता चित्रागंद नेहमी तुझ्याजवळ राहोत. " तिनेसुद्धा नम्रतेने हात जोडून शंकराला विनविले.


                तथास्तु! तुम्ही जे मला मागितले ते मी तुम्हांला दिले आहे. माझा जीव तुमच्यासारख्या भक्तांत नेहमीच गुंतलेला असतो. एवढे बोलून हरभवानी अदृश्य झाले. शंकराला मनोभावे वंदन करून नंतर भद्रायू आणि त्याची प्रिय राणी कीर्तिमालिनी आपल्या नगरात परत आले.  पुढे भद्रायूने हरिश्चंद्रराजासारखे अतिशय नीतीने राज्य केले, दहा हजार वर्षांनंतर दिव्य विमान त्याला पृथ्वीवरून नेण्यासाठी आले आणि मग सर्वांना शंकरांनी आपल्या स्वरूपात विलीन केले.


               असे भद्रायूने हे आख्यान ऐकण्याने ऐकणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य वाढते. त्याचे कल्याण होते. हा अध्याय पाठांतर करून जे सारखा म्हणतात त्यांना सगळीकडे विजय प्राप्त होतो. भद्रायू आख्यानाची ही बिल्वपत्रे श्रीधराने शंकराला भक्तिभावनेने वाहिलेली आहेत. हे आख्यान म्हणजे कैलास पर्वत आहे. याची पारायणे करून प्रदक्षिणेचे महापुण्य मिळवावे, असे कवी श्रीधर सांगतात.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या