।। श्री नवनाथ भक्तिसार ।।
अध्याय:-१६
गोरक्षनाथांनी अस्त्रांनी प्रेरणा फळे पाडली
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
कानिफनाथ आणि त्यांचे शिष्य यांपैकी एकही भुलला नाही. एक महिना झाला तरी कोणीच वश होईना. मच्छिंद्राला वाटले, धन्य आहे. या नाथपंथीयांची. मी मात्र मारूतीच्यासाठी येथे रमलो. त्याचा निरोप घेण्यासाठी कानिफनाथ आला, तेव्हा मच्छिंद्र काय बोलणार? त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला, खूप संपत्ती, हत्ती, घोडे, कनाती, तंबू, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती कितीतरी उपयोगी वस्तू दिल्या. एक कोसभर अंतरापर्यंत मच्छिंद्र त्याच्याबरोबर गेला. मग कानिफाने स्त्रीराज्य सोडले. देशोदेशी हिंडत तो गौडबंगालात सुद्धा गेला. जेथे जेथे तो व त्याचे शिष्य जात तेथे त्यांचे उत्तम स्वागत होई. सगळीकडे कानिफाची व त्याच्या शिष्यांची कीर्ती दुमदुमली. हेलापट्टण नगरात गोपीचंदाला सुद्धा कळले. त्याने दूत पाठविले.
कानिफनाथाचे वैभव, त्याच्या सिद्धी, त्याचा प्रभाव, त्याचे वैराग्य त्याचे तपस्वी शिष्य सर्वत्र झालेली कीर्ती राजाने ऐकली. इकडे काय झाले ? गोरक्षनाथही बंग देशातच आलेला होता. मार्गात एका अरण्यात त्याला कानिफ व त्याचा शिष्यमेळा दोघे भेटले. एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला. प्रेमाने गोष्टी चालल्या होत्या. कानिफला आपल्या विद्येची चुणूक दाखविली तर गंमत वाटेल. तेव्हा तो गोरक्षांला म्हणाला, ही आंबराई मधुर फळांनी भरली आहे. फळे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको उगाच कशाला त्रास? कानिफ म्हणाला, त्यात त्रास कसला? शिष्यांना सांगतो, ते आंबे तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला. एवढा त्रास त्यांना कशाला? आता शिष्य आहेत, नसले तर स्वतःच आणावे लागतील. तुमची इच्छाच असली तर माझ्यासाठी एवढेच करा. आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही येथे ती फळे आणून द्या. कोणी उठून जायचे नाही.
कानिफाला तेच हवे होते. त्याने भस्मावर विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र जप करून भस्म फेकले. त्यामुळे झाडावरचे पिकलेले आंबे सुटले व तरंगत समोर येऊन हातात पडले. कितीतरी आंबे आले, सर्व शिष्यमंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले. सर्वांनी हात धुतले. नंतर गोरक्षाला वाटले, आपली विद्याही याला दाखवावी. मग गोरक्षाने सुद्धा विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांचा प्रयोग करून आणखी दूरच्या आंबराईतली फळे आणली. ती पण खाऊन झाली. पुष्कळ फळे उरली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, ही उरलेली फळे पुन्हा वृक्षांना लावून ठेवावी. असे कधी झाले आहे ? गोरक्ष म्हणाला खरा गुरूभक्त असेल तर त्याला काय अशक्य आहे ? गुरूपुत्र पवित्र, कानिफ गडबडला. तो म्हणाला, अस श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेव सुद्धा उत्पन्न करील. इकडचे जग तिकडे करील. त्याला काय कठीण आहे? त्यावर कानिफ म्हणाला, "अरे हो हो ! माहित आहे, तू माहीत आहे, तुझा गुरू माहीत आहे. तुमची योगविद्या, योगाचे नाव, भोगाची हाव, सगळे स्त्रीराज्य तुझ्या गुरूने भोगले आहे. अजून भोगतोय.
कशाला उगाच वल्गना करतो." ते शब्द ऐकताच गोरक्ष खवळला, दुःखीत झाला, गोरक्ष म्हणाला, “तुझा गुरू पण केवढा प्रतापी आहे, माहीत आहे. दहाबारा वर्षे लिदाच्या कूपात पडलाय. प्रत्यक्ष नरकात, त्याला स्वत:चा उद्धार नाही करता येत तो तुला काय उध्दरणार? जरा चार सिध्दी मिळाल्या की झाले, शिष्यांचा तांडा फिरवितोस. हेलापट्टण नगरात बघ जाऊन. राजा गोपीचंद त्या जालंदराला चांगला वस्ताद भेटलाय. उकिरड्यात पुरून टाकलाय त्याला. माझा गुरू असा नाही. मारूतीसह सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने आता पहाच त्याचा प्रभाव! जय मच्छिंद्रनाथ ! जय अलख निरंजन! आता ही पडलेली फळे पुन्हा डहाळ्यांवर जाऊन चिकटतील." गोरक्षाने पुन्हा स्पर्शास्त्र म्हणून ते आंबे झाडांना चिकटविले. ते पाहून आणि जालंदराचे वर्तमान ऐकून कानिफ प्रांजळपणे गोरक्षाला शरण आला. गोरक्ष स्त्रीराज्याच्या दिशेने निघाला. मच्छिंद्र कोठे आहे, त्याचा पत्ता त्याला लागला होता. कानिफ हेलापट्टण नगराकडे निघाला. जालंदराची वार्ता त्याला कळली होती, त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहवेना.
कानिफनाथ येत आहे हे कळताच राजा गोपीचंद स्वतः मोठ्या वैभवासहित त्याचे स्वागत करायला आला. "जालंदर घाणेरडा होता. हा योगी कसा वैभवशाली आहे! माझ्यासारख्या राजाला असा श्रेष्ठ गुरूच शोभेल. आईला काय कळते?" असे विचार त्याच्या मनात होते. कानिफ संतापलेला होता. पण गुरुची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय राजावर राग करणे बरे नाही, असे त्याने ठरविले. राजा समोर आला. त्याने लोटांगण घातले. त्याची स्तुती केली. त्याला राजवाड्यात नेले. तरी कानिफ शांत होता. राजाने अनुग्रह मागितला, तेव्हा मात्र कानिफाने रागाने म्हटले, "राजा, ज्याचा खरा अनुग्रह तू घेतला पाहिजेस त्याला तू पुरून ठेवले आहेस घोड्याच्या लिदात, शेणात आणि माझ्यापुढे कशाला रे लोटांगण घालतोस?" राजा ते ऐकताच घाबरला. त्याने संतांची दयाळू वृत्ती वर्णन केली. वारंवार क्षमा मागितली. तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले.
इकडे त्यांचे भाषण ज्या दासींनी ऐकले, त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले. मैनावती दुःखाने व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार बोलली. राजाने तिची पण क्षमा मागितली. कानीफाचा राग शांत करण्याचे काम राजाने आईलाच करायला सांगितले. पुत्रासाठी आई काय करणार नाही? मैनावतीने कानिफाची भेट घेतली. आपण जालंदराची शिष्या आहोत असे सांगितले. कानिफ म्हणाला, "एवढा मोठेपणा सांगतेस तर त्यांना लिदात पुरून का ठेवले ? हीच का तुझी गुरूभक्ती ? खासा न्याय आहे!" ती म्हणाली, "गुरूबंधु, मी तुझी बहीण आहे. मी काय सांगते ते ऐक. मला ही गोष्ट मुळीच माहीत नव्हती. गोपीचंदाला मी त्यांच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी विनवीत होते; तेव्हा त्यानेच हे गुप्तपणे केले. मला आता दासीकडून तुमचे बोलणे कळले, म्हणून मी धावत आले.
जालंदरनाथ गोपीचंदावर कोप करतील, तर मी बुडालेच म्हणून समजेन. गुरूबंधु ! सर्वांना तूच वाचव," मैनावतीचे बोलणे ऐकून कानिफाचे मन द्रवले. त्याने तिला सांगितले "भिऊ नकोस, मी राजाचे अकल्याण करणार नाही." तेव्हा मैनावती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली. मैनावतीने गोपीचंदाला जेव्हा सर्व सांगितले तेव्हा, त्याची भीती कमी झाली. जालंदरनाथ जिवंत आहे की नाही याची गोपीचंदाला माहिती नव्हती. पण मैनावती मात्र योगीजनांचे तपोबल जाणून होती.
फलश्रुती:- वाईट स्वप्नांचा नाश होईल .
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.