Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय १७ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 17

 ।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-१७ 

  गोपीचंद राजाला नाथदिक्षा 


॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

        दुसरा दिवस उजाडला. कानिफ गोपीचंदाला म्हणाला, "राजा, जालंदरनाथांना कोठे पुरले ती जागा दाखव." राजा म्हणाला "चला मी दाखवतो!" कानिफने राजाबरोबर आपल्या शिष्यांना पाठविले. ते ती जागा पाहून आले. कानिफ म्हणाला, "राजा, जालंदरांना बाहेर काढण्यापूर्वी तुझ्यासारखे दिसणारे पाच पुतळे करून आण. सोने, रूपे, तांबे, पितळ व लोखंडाचे पुतळे जनव." राजाने कारागिराकडून हुबेहूब पुतळे घडविले. ते पुतळे घेऊन राजासह कानिफ जालंदराला जेथे पुरले होते त्या जागी आला. 

               त्याने राजाला "एक कुदळ घेऊन त्या जागी जमिनीवर घाव घाल" असे सांगितले. पण त्या आधी सोन्याचा पुतळा त्या जागेच्या बरोबर वरती ठेवण्यास सांगितले. राजाने पहिला कुदळीचा घाव घातला तोच आतून जालंदराने रागाने ओरडून विचारले, "कोण खणतोय ?" राजा म्हणाला, "मी गोपीचंद राजा खपतोय." ते शब्द राजाने कावले सोच कूपावर ठेवलेला होता तो सोन्याचा पूतळा जळून गेला. राजा घाबरला. मग कानिफाने रुप्याचा पुतळा ठेवून खणायला सांगितले. तेव्हा पण त्या पुतळ्यावर जालंदराच्या रागाचा परिणाम झाला व तो जळून गेला. मग तांबे, पितळे व लोखंड यांचे पुतळेही क्रमाने जळून गेले. कानिफाने राजाला खुणेने जवळ बोलावले व म्हटले "आता जरा वेळ थांब. मग पुन्हा कुदळीचा घाव घाल. कोण म्हणून विचारले की मी सांगेन." राजाने जमीन उकरण्यासाठी पुन्हा जरा वेळाने कुदळ उचलली.

                तेवढ्या वेळात कूपात जालंदर विचार करू लागला, 'चार-पाच वेळा मी संतापाने गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला पण तो मेला नाही हे मोठे नवल आहे. आता तो जर असला तर, समोर दिसताच तो चिरंजीव होईल.' इकडे 'चिरंजीव' मंत्राने भस्म भारून कानिफानें राजाच्या कपाळाला फासले, मग तो म्हणाला, "घाल घाव !" राजाने कुदळ मारली. आतून जालंदराने विचारले, “अजून कोण हा कुदळ मारतोय ?" तेव्हा पटकन कानिफ म्हणाला, "गुरूजी, मी तुमचा बालक कानिफ गोपीचंद राजाला घेऊन आलोय. त्याला जमीन उकरायला सांगितली आहे. गुरूजी तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे." ते शब्द ऐकताच जालंदराचा राग कोठच्या कोठे मावळला. त्यालाही कानिफाला भेटायची उत्कंठा लागली. "गोपीचंद राजा चिरंजीव होतो" असा आशीर्वाद त्याने दिला.

                            सेवकांना बोलावून भराभर जमीन खणण्याचे काम चालू झाले कुदळीचे घाव वज्रास्त्रावर पडले व खणखण असा आवाज आला. तेव्हा आतून जालंदराने इंद्रास्त्र योजून वस्त्रास्त्र मोकळे केले व स्वत: जालंदर बाहेर आला. कानिफ व जालंदर अगदी प्रेमाने भेटले, गोपीचंदाने जालंदराला साष्टांग दंडवत घातले, तेव्हा जालंदर म्हणाला. "बाळा तू दैवयोगाने वाचला आहेत. आता तू सूर्यचंद्र असेपर्यंत अमर होशील " जालंदराने मैनावतीचे, गोपीचंदाचे व कानिफाचे सांत्वन केले. मग तो गोपीचंदाला म्हणाला, "राजा! आता तू ठरव. तुला हे नश्वर राज्य व भोग हवेत की विरागी व्हायचे आहे ? हे राज्य व ही संपत्ती क्षणिक आहेत. वैराग्यांचा मार्ग व भोगाचा मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत. तुझा तू विचार कर! गोपीचंद' विचार करू लागला. 

                       आज अकरा वर्षे खोल गर्तेत जालंदर जिवंत राहिला, याला याने नमविले आणि मला हा भस्म करून टाकणार होता. पाच पुतळे याच्या इच्छेमुळे जळाले. माझे राज्य वैभव म्हणजे याच्यापुढे सोधा याने देऊ केलेले याचे वैभव म्हणजे कायमची चिंता मिटवणारे आहे. गोपीचंद म्हणाला, “महाराजा आता मला इथले काहीच नको. आपण मला आपल्यासारखे करावे." जालंदर म्हणाला, "नीट विचार कर, ठाम वचन दे !" राजा म्हणाला, "अगदी निर्धाराने सांगतो, मला आपला म्हणावे. मी शरण आहे." तेव्हा जालंदराने आपला हात त्याच्या पाठीवर फिरवला व डोक्यावर ठेवला. मुखाने शाबासकी दिली. 

                  त्याचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्या कृपादृष्टीने राजा रोमांचित झाला. मग त्याच्या कानात जालंदराने मंत्रोच्चार केला. सर्व जग कसे नाशवंत आहे याची राजाला खात्री पटली. काया व दृश्य पदार्थ सर्व माया आहे असे दिसले. मोह नष्ट झाला. मन विनयशील झाले. मग जालंदराने वडाचा चीक लावून त्याच्या केसांच्या जटा वळल्या, त्याला कौपीन नेसविली. त्याच्या कानावर मुद्रा काढल्या. शैली, कथा, भस्माची झोळी हाती दिली. शिंगी, कुबडी, भिक्षेची झोळी हाती दिली. त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले. जालंदराचा हात हाती घेऊन तो प्रेमाने "नाथ नाथ!" असे म्हणू लागला.

                            ही बातमी अंत:पुरात गेली. त्यामुळे स्त्रीवर्गात एकच हाहा:कार उडाला. स्त्रिया शोक करू लागल्या. जालंदराने गोपीचंदाला प्रथम आपल्याच राज्यात, आपल्याच राजवाड्यासमोर, आपल्याच स्त्रियांकडे "माई, भिक्षा वाढा हो!" असे म्हणून भिक्षा मागण्यास सांगितले, वैराग्याची त्याची कसोटी घ्यायलाच हवी होती. ज्यांच्या मोहाने राजाने जालंदराला पुरले होते, त्यांच्या समोर बैरागी होऊन भिक्षा मागितली पाहिजे. गोपीचंदाने त्याचप्रमाणे भिक्षा मागण्यास प्रारंभ केला, तेव्हा मात्र त्याला पाहून स्त्रियांनी फारच दुःख केले. पाहाणारे लोक हवालदिल झाले पण, गोपीचंद अचल होता. गुरूची आज्ञा मानणे हेच त्याचे काम होते. लुमावंती आणि इतर स्त्रिया त्याच्या भोवती गोळा झाल्या. त्याला म्हणू लागल्या, "तुम्ही आमच्याजवळ संसार करणार नसलात तर आमचे काही म्हणणे नाही, पण आमच्या डोळ्यांसमोर तरी रहा. 

                        तुम्हाला एक पर्णकुटी बांधून देऊ. आम्हाला दर्शनसुख तरी मिळावे. आम्ही तुमची सेवा चाकरी करू. !" पण राजाचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. स्त्रिया सारख्या प्रश्न विचारीत होत्या व गोपीचंद योगातील गूढ उत्तरे देत होता. पुन्हा त्याने भिक्षा मागितली तर भिक्षा न घालता त्या रडत रडत जवळ येऊ लागल्या. तेवढ्यात मैनावतीने शिजवलेले अन्न आणले. संन्यासिनी आई व विरक्त राजा हाच भिक्षेकरी. अपूर्व दृश्य होते ते! ती भिक्षा घेऊन गोपीचंद, जालंदराकडे गेला व सर्व प्रकार सांगू लागला. तेवढ्यात मैनावती पण तिथे आली. तिनेही तेच सांगितले.

        जालंदर व कानिफ मैनावती व गोपीचंद यांनी त्यानंतर नाथपंथातील योगविद्येसंबंधी तीन दिवस खूप चर्चा केली. गोपीचंदाला जालंदराने सांगितले, "राजा, हा देश सोडून तू बद्रिकाश्रमाला जा. लोखंडाच्या काट्यांवर उभा राहून तेथे तू बारा वर्षे तप कर " राजा लगेच जायला निघाला. आपले सर्व राजवैभव सोडून गोपीचंद राजा खरोखरीच बद्रिकाश्रमाला जाणार हे ऐकताच सर्व प्रजाजन दुःखाने व्याकूळ होऊन त्याला निरोप देण्यासाठी हेलापट्टण नगराच्या सीमेपर्यंत गेले. लुमावंती राणीचा पुत्र मुक्तचंद याला मंत्र्यांनी त्यानंतर राजपद दिले. 

                    जालंदराने त्याचा राज्याभिषेक केला. राजाच्या सर्व सरदारांना व मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रे व भूषणे देऊन त्यांचा गौरव केला. 'मुक्तचंदाच्या आज्ञेत रहा" असे सर्व स्त्रियांना सांगितले. मैनावतीला गोपीचंदाप्रमाणेच मुक्तचंदाची काळजी घेण्यास सांगितले. नंतर जालंदर, कानिफ व त्याचे शेकडो शिष्य सहा महिने तेथे राहिले व त्याने राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.

अध्याय फलश्रुती :-  योगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या