।। श्री नवनाथ भक्तिसार ।।
अध्याय:-१५
कानिफनाथ व मारुती यांची भेट
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपश्चर्या झाल्यावर कानिफ उत्तरेकडे गेला. गोरक्ष दक्षिणेकडे गेला. दोघे आपल्या गुरूंचा शोध करू लागले. गोरक्षाला मच्छिंद्रनाथांच्या भेटीची फार उत्कंठा होती. तो जाईल तेथे मच्छिंद्राबद्दल चौकशी करीत होता. जाता जाता तो गौड देशात हेलापट्टण नगरात गेला. तेथे द्वारपाल होते. त्यांना गोरक्षाने विचारले, “या नगरात मच्छिंद्रनाथ आले होते का ?" तेव्हा द्वारपाल म्हणाले, “येथे मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी साधू आला नव्हता, पण जालंदर नावाचा एक साधू पूर्वी आला होता. काय हो त्याचे आश्चर्य ! तो डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाई व माना गवत घाली. तो गवताचा भारा अधांतरीच झोक्यावर रहात असे." गोरक्षाला मोठे नवल वाटते. त्याने द्वारपालांना पुन्हा विचारले, “किती दिवस झाले? कुठे गेला तो ?" द्वारपाल म्हणाले, "दहा वर्षे झाली असतील. पुष्कळ दिवस तो उकिरड्यावर पडून राही.
एकाएकी कुठे गेला कुणास ठाऊक! मच्छिंद्राने आपले नाव बदलले असावे असे गोरक्षाला वाटले, मग गोरक्ष हेलापन रात भिक्षा मागू लागला तेथे एका रिकाम्या घरासमोर उभा राहून त्याने 'अलख निरंजन' अशी हाक दिली पण त्या घरात कोणीच नव्हते. मात्र तो उभा होता त्याच्या जवळून जमिनीतून 'जय अलख निरंजन' अशी आरोळी त्याला ऐकू आली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, "कोठे आहात तुम्ही?" आतून उत्तर आले. "मी जमिनीच्या पोटात आहे." गोरक्षाने विचारले, “आपले नाव काय?" आतून उत्तर आले, "जालंदर" गोरक्ष म्हणाला, “माझे नाव गोरक्षनाथ. माझे गुरू मच्छिंद्रनाथ. पण तुम्ही असे जमिनीत का गाडलेले आहात ?" तेव्हा आतून जालंदराने मैनावती व गोपीचंद यांची सगळी कथा सांगितली. ती ऐकून गोरक्षाला फार राग आला तो म्हणाला, “महाराज, तुमची अशी स्थिती केली त्या राजाचे भस्म करून टाकतो. तुम्ही फक्त आज्ञा द्यावी!" जालंदर म्हणाला, "नको नको, तुम्ही आत्ता काही करू नका जे झाले आहे ते नाथपंथाच्या हिताचेच ठरणार आहे.
तुम्ही कोठेही ही गोष्ट बोलू नका. तुम्ही येथून पुढे जा. मग तुम्हांला कानिफनाथ भेटेल. त्याला हे सगळे सांगा तो युक्ती करून राजाचे कल्याण करील. पंथाचा महिमा वाढवेल आणि मला पण वर काढेल." त्यांचे ते सांगणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथपुरीला गेला. इकडे कानिफनाथानेही प्रवास सुरू केला. त्याने अनेक ठिकाणी लोकांना उपदेश करून पुष्कळ शिष्य गोळा केले. हळूहळू त्यांच्या शिष्यांची संख्या सातशेवर गेली. तो पुढे पूर्वदिशेने दूरपर्यंत गेला. कानिफनाथाने सातशे शिष्यांसह तेथून पुढे स्त्रीराज्याच्या सीमेवर दुसरा तळ ठोकला. हनुमंत रामाच्या सेतूवरून भुभुःकार करण्यासाठी निघाला. तो या स्त्रीराज्याच्या सीमेवर आला. त्याचेही पाय स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटले. पण तो वज्रदेही त्याने काही त्या अस्त्राला जुमानले नाही. त्याला पुढे नाथपंथाचे शेकडो लोक तळ ठोकून बसलेले दिसले. ते पहाताच त्याच्या मनात विचार आला, "मी मच्छिंद्राला आत पाठवून काहीतरी करून गुंतवून ठेवला आहे. हे लोक जर आत गेले तर त्याला परत नेतील. मग मैनाकिनी बिचारी दुःखी होईल, तेव्हा इथूनच या लोकांना घाबरवून परत हाकलले पाहिजे." असे ठरवून हनुमंताने विशाल रूप धरले.
त्याचे रूप इतके भयंकर होते की कानिफाचे शिष्य घाबरून गुरूच्या मागे मागे लपू लागले. तो त्यांना अभय देऊन म्हणाला, "घाबरू नका! तुम्ही नुसती गंमत पहा." लगेच मारूतीने त्याचवेळी दगड व शिळा उचलून भिरकावण्यास सुरूवात केली. वज्रास्त्राने त्यांचे चूर्ण झाले. मग त्याने मुठीने वज्रास्त्र मोडून टाकले. त्यामुळे कानिफनाथ चिडला. त्याने कालिका, अग्नी, इंद्र व वायू ही अस्त्रे एकामागोमाग सोडली. त्या चारी अस्त्रांच्या तडाख्यात् मारुती सापडला आणि त्याची फारच वाईट स्थिती झाली.
इंद्र व कालिका ही अस्त्रे त्याच्या मागे व पुढे येऊन त्याचा घात करण्यासाठी झटू लागली. अग्नी व वायू ही अस्त्रे वरून त्याला त्रास देऊ लागली. त्याने वायूला “मी तुझा मुलगा आहे. मला त्रास देऊ नको." अशी प्रार्थना केली, तेव्हा ते अस्त्र क्षीण झाले. अग्नीला त्याने शेपटाला बांधून समुद्रात बुडविले, पण त्यामुळे समुद्राचे पाणी उकळू लागले. मग समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला. कारण उकळत्या पाण्यामुळे जलचर मरू लागले. पाहतो तो मारुती व कानिफ युद्ध करीत आहेत. अशावेळी वायूने मारूतीचा हात धरून त्याला आवरले व म्हटले, “बाबा रे, हे नाथ फार बलिष्ठ आहेत. यांच्याशी झगडा करू नको. तू मच्छिंद्राशी लढलास. त्याने तुला पर्वत डोक्यावर ठेवलेला असाच बद्ध करून ठेवला होता.
तसेच बळ या कानिफाजवळ आहे. तू याच्याजवळ मैत्री कर!" मग समुद्र व वायू मारूतीला घेऊन कानिफाजवळ आले व त्यांनी त्या दोघांची मैत्री करून दिली. मारूती म्हणाला, "यांना स्त्रीराज्यात जायचे तर जाऊ द्या, पण मच्छिंद्राजवळ कोणीही योगासंबंधी भाषण करायचे नाही व त्याला बाहेर न्यायचे नाही!" मारूतीची ही अट कबूल करून कानिफनाथ शिष्यांसह सकाळी स्त्रीराज्यात शिरला. शेकडो नाथपंथी लोक आणि त्यांचा पुढारी असा एक कोणीतरी मोठा योगी येत आहे, अशी वार्ता स्त्रीराज्यात पसरली. त्याचे कानिफ हे नाव कळले.
मच्छिंद्रालाही सर्व कळताच मच्छिंद्र मनातून दचकला. मैनाकिनीला आपण कसे सोडावे ? त्याने कानिफाला मोठ्या वैभवानिशी सामोरे जाऊन त्याची व जालंदरनाथाची इत्यादी सर्व माहिती काढली. त्या सर्वांना स्त्रीराज्यात मरण आले नाही यांचे कारणही त्याला कळले. मग त्याने कानिफाला व त्याच्या सातशे शिष्यांना स्त्रीराज्यातच महिनाभर ठेवून घेतले.
फलश्रुती:- घरातील भांडणे थांबून सुख-शांती लाभेल.
अध्याय समाप्त !

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.