Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय १४ (मराठी भाषांतर ) - krushnarekha

 ।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

अध्याय:-१४

मैनावतीचा गोपीचंदाला उपदेश



                 मैनावतीला आत्मज्ञान झाले तरी तिचे मन गोपीचंदात गुंतले होते. त्याला मोहातून मुक्त कसे करावे, याची काळजी ती करीत होती. माघाचा महिना होता. थंडीचे दिवस होते. राजवाड्याच्या वरच्या सज्जात मैनावती बसली होती. खाली सुंदर चौक होता. गोपीचंद तेथे स्नानासाठी आला होता. राजाचे दात घासणे चालले होते. बायका स्नानासाठी सुगंधित, उष्ण पाणी मोठमोठ्या धंगाळ्यातून आणून ठेवीत होत्या. सोन्याचा चौरंग होता. वस्त्रे, सुगंधी द्रव्ये, सर्वच मौल्यवान होते. त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले. त्याची भोगलोलुप स्थिती पाहून तिला एकदम रडू आले व पटकन तिच्या नेत्रावाटे अश्रू ओघळले. ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. तो चमकून वर पाहू लागला. कुठून अचानक हे कढत थेंब पडले ? अशी शंका त्याच्या मनात चमकून गेली. त्याला मैनावती दिसली. तीच रडते आहे, असे दिसताच तो लगबगीने जीना चढून वर गेला व आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला, “आई तू का रडतेस ? तुला कसले दुःख आहे ? तुझा कोणी अपमान केला का? माझ्यासारखा पुत्र असतांना दुःख कशाचे?"


                 गोपीचंदाचे बोलणे ऐकून मैनावतीचा शोक कमी झाला. ती म्हणाली, "मुला, तसे काही नाही रे तुझे तरुण, सुंदर रूप पाहून मला वाईट वाटले. तुझा पिता असाच सुंदर होता, पण शेवटी तो काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळाची मला भीती वाटली. तू त्या काळरुपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का ? तसे केलेस तरच मला दुःख होणार नाही. नारद, व्यास, शुक, याज्ञवल्क्य, रामानुज कितीतरी भगवद्भक्त या जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले, तसाच तू पण हो!" आईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला, "आई, तू अगदी खरे सांगितलेस, पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल ?" मैनावती म्हणाली, "मुला खरे तर तसे एक श्रेष्ठ योगी या नगरीतच आले आहेत त्यांचे नाव जालंदरनाथ. त्यांनाच तू शरण जा. तुझे वैभव मोठे आहे, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण त्यांतले काहीच टिकणारे नव्हे." तेव्हा गोपीचंद म्हणाला, "मी त्यांना शरण जाईन आणि कसून योगाभ्यास करीन. पण हे सर्व वैभव, सुख, संपत्ती कशी सोडू? आणखी बारा वर्षे मला हे सुख भोगू दे. मग मी त्याग करून योगमार्गाला लागेन !” मैनावती म्हणाली, "बाळा, बारा वर्षांची कोण खात्री देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही. काळ केव्हा झडप घालील ते सांगता येणार नाही." 

            

                   तिचे हे बोलणे लुमावंती ही पट्टराणी ऐकत होती. तिला वाटले, " ही मैनावती आई आहे की राक्षसीण ? राजाच्या मनात काहीतरी भरवून त्याला दूर करण्यास जणू टपलेली दिसते. कैकयीने रामाला वनवासात पाठवले. तशीच ही राजमाता!" लुमावंती तेथून निघून गेली. गोपीचंद आईला म्हणाला, "आई, तू सांगतेस तसेच करावे, असे जर तुझे म्हणणे असेल तर ती स्वतः त्या महात्म्याचा मोठेपणा पाहीन. तो पटला, तर मी सर्व सुखभोग सोडून देईन व त्यांच्या सांगण्याप्रमाणे करीन. तू आता वाईट वाटून घेऊन नकोस!" इकडे राणी लुमावंतीने पाच-सात राजस्त्रियांना एकीकडे बोलावले आणि म्हटले, "अग सखींनो, नगरात कोणीतरी जालंदर नावाचा जोगडा आलाय. राजाला त्याच्याकडून योगदीक्षा देववून त्यालाही जोगी बनविण्याचा दुष्ट बेत राजमातेने केलेला आहे. 


            आपण २८ जणी राजाच्या पट्टराण्या असून तरी काय उपयोग! आपण काहीही करून मैनावतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. त्या सर्व राण्या तर्क लढवू लागल्या. पण कुणालाही निश्चयाने कोणतीच युक्ती शोधून काढता येईना. शेवटी लुमावतीच म्हणाली, "मला तरी यावर एकच उपाय दिसतो तो म्हणजे, जालंदर कोण जोगा आला आहे, त्याला गाठून त्याचाच नायनाट करावा. 'जोगड्याकडून राजाला दीक्षा देववून त्याला तीर्थाटनाला जाऊ द्यावे. तो गेला की, जालंदराला मोठ्या सन्मानाने राजसिंहासनावर बसवावा व त्याच्यासह सुखोपभोग घ्यावेत', असा मैनावतीचा बेत आहे, असे राजाला सांगावे म्हणजे राजा त्याचा नाश करील.' त्यांचे बेत ठरले. सगळ्याजणी आपापल्या महालात गेल्या. रात्रीचे भोजन झाल्यावर राजा लुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली व राजा प्रेमात आला तेव्हा ती म्हणाली, "प्राणनाथ एक गोष्ट बोलू का?" राजा म्हणाला “भिऊ नको सांग काय ते?" ती म्हणाली, "मला तुमच्या रागाची भीती वाटते" राजाने न रागावण्याचे वचन दिले. 


            तेव्हा ती म्हणाली, "मैनावती मातेने तुम्हांला जालंदरनाथांकडे पाठवून जोगी करण्याचे ठरविले आहे. हे खरे का ? तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जालंदराला आणून भोगणार असाच तिचा गुप्त बेत असणार. आमचे कुकू बळकट म्हणून ही गुप्त ती बसविणार आणि त्याच्यासह भोग राज्यावर वार्ता आमच्या कानी आली. खरे खोटे, काय ते तुम्ही पहा !" लुमावंतीचे बोलणे कानी पडताच गोपीचंद संतप्त झाला. अगदी विश्वासातले मंत्री व सेवक घेऊन तो गुप्त ठिकाणी गेला. तडकाफडकी राजोरात त्याने जालंदराला शोधून काढले. तेथेच एक खोल कूप होता, त्यात त्याला ढकलले व घोड्यांची लीद, शेण, केरकचरा यांची रास त्या कूपात घालून जालंदराला त्यांनी पूर्णपणे गाडून टाकले. सर्वांना गुप्तपणाची शपथ घातली. राजासह सर्वजण मध्यरात्री परत आले..


             दुसऱ्या दिवशी सकाळी जालंदरनाथाच्या बसण्याच्या जागी जालंदर दिसेनात, तेव्हा लोक आपसात चर्चा करू लागले, "अरे, इथला गोसावडा कुठे आहे? आज इथे तर उद्या तिथे अशी वार्ता पसरत पसरत सगळीकडे झाली. मैनावतीच्या एका दासीने तिला ती वार्ता सांगितली. मैनावतीला मनातून फार वाईट वाटले, पण ते तिने बाहेर दाखविले नाही. राजस्त्रियांनासुद्धा ही वार्ता कळली. "जालंदरनाथ सकाळपासून कोठेही दिसत नाही. तो बहुतेक नगर सोडून दुसरीकडे गेला असावा." गोपीचंदाच्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. तिकडे जालंदराने विहीरीत पडताक्षणी वज्राखमंत्र म्हटला. त्यामुळे त्याला काहीच दुखापत झाली नाही. वरून लीद, केरकचरा पडू लागला तेव्हा त्याने आकाशास्त्र मंत्रून आपल्याभोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे सर्व केरकचरा अधांतरी राहून त्याच्या अंगावर काहीच पडले नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. राजाविरुद्ध त्याने कोणताही अस्त्रप्रयोग केला नाही.


 फलश्रुती:-  कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकांत राहता यईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या