Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय १३ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 13 || krushnarekha

 श्री नवनाथ भक्तीसार 

अध्याय -१३ 





















भुंग्याने मैनावतीची मांडी कोरली

॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

             हरिहरांच्या सांगण्याप्रमाणे कानिफ व जालंदर बारा वर्षे बद्रिकाश्रमात राहिले. चाळीस कोटी वीस लक्ष मंत्र त्यांनी रचले. मार्तंडपर्वतावर जाऊन सूर्यकुंडातील जलसिंचन करून सर्व दैवते व सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतले. मग जालंदराने कानिफाला गंगातीरी बारा वर्षांपर्यंत कठोर तप करण्यासाठी बसविले. बद्रिनाथाच्या साक्षीने कानिफाचे तप सुरू झाले आणि जालंदर तीर्थयात्रेला निघाला. जालंदर अनेक देशात गेला.

              कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन मग गावात शिरायचे व गायींना ते गवत खायला घालायचे असा जालंदराने परिपाठ ठेवला होता. ही त्याची रीत पाहून अग्निदेवाने वायूला सांगून जालंदराच्या डोक्याला शीण होऊ नये म्हणून गवताचा भारा अधांतरी तरंगत ठेवला. पुढे गौड देशात हेलापट्टण या गावात शिरतांना जालंदराने डोक्यावर भारा आणला होता, तो अधांतरीच तरंगतांना पाहून लोक त्याच्याकडे बोटे दाखवून बोलू लागले, "हा कोणीतरी मोठा योगी दिसतो!" मग लोक जास्तच त्याच्यामागे लागले. तेव्हा जालंदर गावोगाव ॐ साधेपणाने कुठेतरी पडून राहू लागला. त्याने आपली विद्या व योगसामर्थ्य कधी कोणाच्या प्रत्ययाला येणार नाही अशा रीतीने दुर्लक्षित जागी राहावे व भीक मागून पोट भरावे असे वागणे चालविले.


           गौड देशाचा राजा मोठा सुंदर होता. त्याचे नाव गोपीचंद. तो मोठा शूर, सद्गुणी व अफाट सैन्यबळ असलेला होता. तो पराक्रमीही होता. सोळाशे सुंदर स्त्रियांसह तो विलासाने जीवन घालवित होता. त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी होती. तिला राजा फार मान देत असे. जालंदर हेलापट्टणातील रस्त्याने जात असता त्याच्या डोक्यावर गवताचा भारा होता. तो अधांतरी होता. जालंदर दिसायला अग्नीसारखाच तेजस्वी होता. त्याने कितीही साधे राहून तेज लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नव्हते. मैनावती राजप्रासादाच्या सज्जात उभी होती. तिच्या समोरच राजरस्ता होता. 

           जालंदर तेथून जात असतांना तो तिच्या दृष्टीस पडला. तिला फार आश्चर्य वाटले, “हा कोण? एवढा तेजस्वी योगी? कोण असेल हा? याच्या डोक्यावर गवताचा भारा अधांतरी, हात सुद्धा न लावता कसा राहिला?" असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. जालंदर संथपणे सरळ दृष्टी ठेवून चालला होता. मैनावतीने आपल्या एका ज्येष्ठ आणि सूज्ञ दासीला बोलावले आणि तिला तो अधांतरी गवताचा भारा घेऊन चाललेला योगी दाखविला.


            दासी चतूर होती. तिने काय ते ओळखले. ती मैनावतीच्या कानात कुजबुजली, "मोठ्या राणी महाराज, हा खरोखरीच कुणीतरी महात्मा आहे." मैनावतीने तिला हलकेच सांगितले, "तो कोण, कोठे राहतो त्याचा तपास कर." मैनावतीच्या सूचनेप्रमाणे दासी गुप्तपणे प्रासादाबाहेर पडली व जालंदराचा पाठलाग करू लागली. तो आपल्याच तंद्रीत चालत होता. वाटेत गायींचा कळप त्याला दिसला. त्याने त्या गायींना गवत खायला घातले. मग तो तडक गल्ल्यामागून गल्ल्या ओलांडीत एका ओसाड जागी जाऊन निवांत बसला." दासीने गुप्तपणे जाऊन तो प्रकार पाहिला व परत येऊन मैनावतीला सर्व सांगितले. मैनावती तिला म्हणाली, "रात्री सर्वत्र सामसूम झाली की आपण दोघी कोणाच्या नकळत त्याच्याकडे जाऊ." ते बोलणे तितकेच थांबले. रात्र झाली. राजप्रासादात सर्वत्र निजानिज झाली. द्वारपालाशिवाय कोणीच जागे नव्हते. मैनावतीने एका तबकात फळे आणि षड्रस अन्न घेतले. दासीला बोलावले, काळ्या कांबळी दोघींनी पांघरल्या. मग राजप्रासादातून बाहेर पडून जेथे जालंदर होता. तेथे त्या गेल्या. त्यांनी पटकन पुढे जाऊन जालंदराच्या पायावर मस्तक ठेवले. मैनावतीने तबकावरचे आवरण काढून ते तबक त्याच्यापुढे ठेवले. जालंदराने मोठमोठे दगड घेऊन त्यांना मारले. पण त्यांचा मार खाऊनही मैनावती रेसभरही जागची हालली नाही. तिचे धैर्य पाहून मग मात्र त्याने विचारले, "तुम्ही कोण? माझ्यासारख्या वेड्याच्या मागे का लागलात ?" मैनावती म्हणाली, "महाराज, मला जीवन नकोसे झाले आहे. मला मोक्ष हवा. माझे पती त्रिलोचनमहाराज कालवश झाले. 

     

           मला वैधव्यातले जिणे नकोसे झाले आहे. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मला सोडवा!" जालंदर म्हणाला, "पण तू कोण?" मैनावती म्हणाली "या बंगदेशाचा राजा गोपीचंद याची मी आई. ही माझी दासी" तेव्हा जालंदर म्हणाला, "राजमाते, या अपरात्री तू येथे सापडलीस तर तुझी व राजाची किती दुष्कीत होईल? तू तत्काळ येथून परत जा, तू माझ्यामागे लागू नकोस, जन्म, मरण व प्रारब्ध कुणाला चुकले आहे का?" मैनावती घावरून म्हणाली, "योगीराज, तुम्ही मोक्षदाते तुम्ही माझा आहेर करू नका. मी आता जाते, मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करीन. मला ऐहिकातले काही नको. मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवा" मैनावती तबकातील पदार्थ अर्पण करून परत गेली..


              त्यानंतर रोज रात्री दासीसह ती त्याच्याकडे येऊन त्याचे पाय चेपणे वगैरे सेवा करीत राहिली. वृद्धावस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्षू, लोकोत्तर धैर्याची स्त्री होती. तिने सहा महिनेपर्यंत जालंदराची सेवा केली. तरी त्याने तिला कोणतेही ज्ञान दिले नाही. एका रात्री तिने स्वामींचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले होते व ते निद्रित झाले होते. स्वामी आपल्याला योगदीक्षा केव्हा देतील याच गोष्टीची चिंता मैनावतीला लागली होती. त्यावेळी जालंदराला वाटले हिची परीक्षा घ्यावी. त्याने निद्रेत असतांनाच मायाशक्तिने एक भुंगा उत्पन्न केला. तो तिच्या मांडीला दंश करू लागला. त्याने मांडी पोखरलीच. भळभळा रक्त वाहू लागले. पण मैनावती गप्प बसून राहिली. मग जागे झाल्यासारखे करून जालंदराने सर्व प्रकार पाहिला. तिच्यावर प्रसन्न होऊन कृपादृष्टीने तिजकडे पाहिले व अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योगदीक्षा तिला दिली, तिच्या मांडीला पडलेले क्षत बरे केले. मंत्रोपदेश देताच मैनावतीला अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली. मग ती त्याच्याच कृपेने पुन्हा भानावर आली. तिच्या मनात विचार आला. महात्मा जालंदरनाथ यांनी मला चिरंजीव केले, पण भोगात मग्न झालेला माझा मुलगा गोपीचंद याचा जर हे नाथ असाच उद्धार करतील तर? त्याच्यासाठी आपण नाथांना विनंती करावी.


अध्याय फलश्रुती : स्त्री-हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या