श्री नवनाथ भक्तीसार अध्याय -१२
कनिफनाथांचा जन्म
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
जालंदराला त्याच्या जन्माची सर्वच कथा अग्नीने सांगितली. मग अग्नी म्हणाला, "बाळा, तुझी काय इच्छा आहे ती सांग. ती मी पूर्ण करतो!" तेव्हा जालंदर म्हणाला, "अग्निदेवा, खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही. पण आता हा जो मनुष्यदेह मी धारण केला आहे, त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करावे. नाहीतर कित्येक जन्मतात आणि मरतात तसे माझे होऊ नये. त्याचे बोलणे ऐकून अग्नीला फारच संतोष झाला. त्याने अरण्यातील आपले रुप आवरून घेतले. अग्निदेव जालंदराला आपल्या खांद्यावर घेऊन दत्तात्रेय जेथे होते, तेथे पोहोचले. त्यांना बघताच श्री दत्तगुरू म्हणाले, "अग्निदेवा, आज अचानक मजवर ही मोठी कृपाच केली म्हणायची, आणि हा बरोबर कोण ? बसा तरी तुमचे स्वागत असो!" अग्नी म्हणाला, "हा जालंदर नावाने अवतरलेला अंतरिक्ष ऋषीच आहे. मदनदहन झाले तरी मदन माझ्या ठिकाणी शिवतेजाने युक्त झालेला तसाच सूक्ष्म रुपाने राहिला होता. बृहद्रवा राजा सोमयाग करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून, अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह बाहेर टाकले. तोच हा बालक. उपनयन झाल्यावर तो राजाकडून पळून अरण्यात गेला. तेथे माझी व त्याची पुनर्भेट झाली. त्याला जगात सर्वत्र चिरंतर कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे, म्हणून मी त्याला आपल्या पायांशी आणले आहे!"
दत्तगुरू म्हणाले, "वा! फार उत्तम. मी त्याला सर्व विद्यासंपन्न करीन. बारा वर्षे त्याने माझ्याजवळ राहिले पाहिजे. जालंदर, राहशील का ?" अग्नी व जालंदर या दोघांनी त्याला मान्यता दिली. अग्नीने दत्तांचा निरोप घेतला व तो अदृश्य झाला. जालंदर दत्तांजवळ राहू लागला. दत्तांनी जालंदराला अद्वैताचा बोध केला आणि त्याला नित्य आपल्या बरोबरच ठेवले. सकाळी भागीरथीत स्नान करावे, विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, मग कोल्हापुरात भिक्षा मागावी, पांचालेश्वरी भोजन करावे व माहुरगडावर रेणुकामातेच्या मातापुरीत रात्री विश्रांती घ्यावी, असा श्रीदत्तात्रेयांचा दिनक्रम, त्यात जालिंदरासही त्यांनी बरोबर घेतले आणि बारा वर्षांच्या अवधीत शस्त्रास्त्रे, वेद, शास्त्रे, विद्या व कला यांचे संपूर्ण ज्ञान दिले. अशा रीतीने विद्यासंपन्न झाल्यावर त्यांनी सर्व दैवतांची त्याला दर्शने करविली आणि दैवतांकडून वरदाने देवविली. एवढे झाल्यावर त्यांनी अग्नीला बोलावून म्हटले, “हा तुझा पुत्र जालंदर आता याला सर्व विद्यांनी युक्त केले आहे. याचा स्वीकार कर!" अग्नी फार संतुष्ट झाला. मग त्याने जालंदराला घेऊन पूर्वी ज्याप्रमाणे मच्छिंद्राने सर्व देवता प्रसन्न करून व वश करून घेतल्या होत्या, त्याप्रमाणे त्याला वश करून दिल्या. पुढे अग्नीने त्याला बारा वर्षे बदरिकाश्रमी तप करावयास नेले. तेथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश व बद्रिनाथ यांनी त्याच्या तपाची परीपूर्ती झाल्याचे त्याला सांगून पूर्ण सिद्ध केले, मग अग्नी व जालंदर यांना बद्रिनाथाने एक कथा सांगितली.
बद्रिनाथ शिव त्यांना म्हणाला, "पूर्वी एकदा ब्रह्मदेवाचे तेज स्खलित झाले व ते हिमालयात एक दिग्गज (गज) निद्रिस्त होता त्याच्या कानात पडले. त्यात 'प्रबुद्ध' नारायणाने संचार करून मनुष्य देहधारण केला. जालंदरा त्याला तू बाहेर काढ. तो कानातून जन्मल्यामुळे त्याला कानिफनाथ असे म्हणतील. तू त्याला आपला शिष्य कर. त्याला आपल्यासारखाच कर!" शिवाचे हे बोलणे ऐकून जालंदर व अग्नी त्याला म्हणाले, 'तुम्ही वर्णन केले ते अपूर्व आहे, पण तो गज आम्हांला दाखवा." तेव्हा बद्रिनाथ त्या दोघांना घेऊन निघाले. ते हिमालयावर आले. दुरून दिग्गज दिसला. तो इकडे तिकडे संचार करीत होता.
शंकर म्हणाले, हा दिग्गज मोठा भयंकर आहे. चंचल आहे." तेव्हा जालंदराने दुरूनच त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्र टाकले. त्या दोन्ही अस्त्रांचा परिणाम होऊन तो हत्ती तत्काळ भूमीला खिळल्यासारखा मुकाट्याने एका जागी उभा राहिला. जालंदर, अग्नी व शंकर, संथपणे त्याच्याजवळ गेले. जालंदराने हत्तीच्या जवळ जाऊन हाका मारल्या, "अरे कानिफा, अरे प्रबुद्ध नारायणा, अरे ब्रह्मसुता, दीक्षादेह धारण करून तू या दिग्गजाच्या कानात येऊन राहिला आहेस ना? तू बाहेर ये. अग्निदेव, महादेव व मी अंतरिक्ष तुला जालंदररूपाने बोलावीत आहोत. तुझे कार्य तुझी वाट पहात आहे. ये, लवकर बाहेर ये! त्याच्या हाका ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्भागातून सोळा वर्षांचा एक तेज:पुंज तपस्वी तरूण डोकावून पाहू लागला. त्याला भगवान शंकर, अग्नी व जालंदर हे तिघे दिसले.
तेव्हा त्यांना तेथूनच हात जोडून त्याने नमस्कार केला. मग जालंदराने उंच हात करून त्याला खाली उतरून घेतले. कानिफनाथाने खाली उतरताच तिघांना प्रणाम केला. भगवान शंकर जालंदराला म्हणाले, "अग्निपुत्रा, या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहे." अग्निनेही शंकराच्या म्हणण्याला मान्यता दिली. तेव्हा जालंदराने कानिफनाथाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. तत्काळ कानिफनाथाच्या मनावरील अज्ञानपटल दूर होऊन, अद्वयब्रह्माचा साक्षात्कार होऊन त्याच्या अंगी अष्टसात्विक भाव प्रकट झाले. त्यानंतर भगवान शंकर, अग्नी, जालंदर व कानिफ असे चौघेही बद्रिकाश्रमाला आले. मग अग्नी जालंदरला म्हणाला, "अरे, श्रीदत्तात्रेयांनी जी विद्या परंपरेने दिली आहे तिची प्राप्ती कानिफाला करून दे! त्याप्रमाणे करण्याचे वचन जालंदराने दिले, तेव्हा अग्नी गुप्त झाला. पण बद्रिनाथ शंकर मात्र सहा महिने व्यक्त राहून कानिफाला दत्तप्रणित सर्व विद्यादान जालंदराकडून होते की नाही ते पहात होते. जालिंदराने कानिफाला सर्व अस्त्रे दिली. पण संजीवनी विद्या व वाताकर्षण मंत्र मात्र शिकविला नाही. त्याचा कानिफावर काही पूर्ण विश्वास नव्हता, त्या विद्यांचे पालन कानिफ नीट करणार नाही असे त्याला वाटले.
मग भगवान शंकर त्याला म्हणाले, “अरे जालंदरा, अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफाला वश करून दे." तेव्हा जालंदराने सप्तलोक व सप्तपाताळ यातील सर्व देवतांना आवाहन केले. सर्व देवता आल्या. त्यांनी कानिफाला सर्व वरदाने दिली, इतकेच नव्हे तर जालंदराने जेव्हा त्यांना शाबरीविद्येसाठी सहाय्य करण्यास सांगितले, तेव्हा तेही त्यांनी आनंदाने मान्य केले. त्यानंतर आपआपल्या विमानात बसून देव व इतर देवता आपल्या स्थानास गेल्या. हरि, हर, जालंदर व कानिफ असे चारीजण बद्रिकाश्रमात तीन दिवस राहिले.
फलश्रुती:- देवतांचा क्षोभ संपेल व देवता: अनुग्रह करतील. अध्याय समाप्त !
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.