Subscribe Us

श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा || Shivlilamrut Adhyay 11 || शिवलीलामृत अध्याय ११ || कृष्णरेखा krushnarekha

 ।। श्रीशिवलीलामृत कथासार ।।

 अध्याय अकरावा 

भद्रसेन राजाची कथा



ॐ नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलांचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतान ते नरश्रेष्ठ होतात वशिवपूजनात रुद्राक्षाचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतःच शंकररूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तरतात. सोळा-सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 


बारा-बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती चोवीस व सहा-सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होतो. एकसे आठ रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षाची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुख सहामुख, आठमुख, चौदामुख असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मण्याने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान श्रीशंकरांच्या आवडत्या रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे.


सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मीचा पुण्यसंचय असेल तरच प्राप्त होतो. तसेच, सर्वज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार, गुरूवर अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्य आणि क्षमाशील असणारा पुढारी, हे सारे नेहमी पूर्वपुण्याईनेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन एकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन व श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडौल आणि आरोग्यसंपन्न शरीर पूर्वपुण्याईनेच प्राप्त होते, असो.


फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारात एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान अतिशय सद्गुणी होते. दोघांचीही भगवान शंकरावर निरअतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते 'सुधर्म' आणि प्रधानपुत्राचे नाव होते 'तारक. दोघेही बालपणापासूनच आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते. त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार पाच वर्षांचे. त्यांच्या माता आणि दासदासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत, अत्तर लावीत असत; पण हे दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत आणि आपल्या सर्वांगाला भस्म फासून, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे.


प्रधान आणि राजा हे दोघेही आपल्या असे हे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होत. त्यांना वस्त्रे, आभरणे का आवडत नाहीत हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळेबळेच नेसवली, अनेकानेक अत्तमोत्तम असे दागदागिने घातले तर हे कुमार ते सर्व आपल्या अंगावरून उतरवून ब्राह्मणांना दान करून टाकीत असत. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले; पण दोघे आपले व्रत सोडीत नसत. शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत.


राजा आणि प्रधान दोघेही अतिशय चिंतातुर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतावळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी हे ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते. त्रिकालज्ञानी असे होते. ते श्रेष्ठ अशा वसिष्ठमुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञकार्यात राक्षस अडथळे आणीत. त्यांनी राक्षससत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरत तसेच राक्षस वावरत होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व प्राणिमात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसांचा नाश केला. जनमेजय राजाने सर्पयज्ञ चालवला असताना, ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींनी मधे पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलस्तीमुनी पराशरऋर्षीच्या राक्षससत्राच्या मधे पडले म्हणून पराशरऋर्षीचा राक्षसयज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले.


ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशरऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला अतिशय जर्जर केले होते. असे हे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशरऋषींचा नातू शभयोगींद्र भद्रसेन राजाचा कुलगुरु होता. ऋषी आपल्या नगरीत आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींनी यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्रालंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, "मुनिराज, आमचे हे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरक्त झाले आहेत. त्यांना चांगले अलंकार आवडत नाहीत. रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. ते दोघे नेहमी एकांतात बसतात, दांडगाई अजिबात करीत नाहीत.


 राजविलास त्या दोघांनाही आवडत नाहीत. हत्तीवर सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने विरक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हांला फार फार काळजी पडली आहे. " तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशरऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले "हे दोघे असे विरक्त आणि शिवभक्त का आहेत ते तुला सांगतो ते तू ऐक.


'फार फार वर्षांपूर्वी या काश्मीर देशातच नंदिग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या रहात होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदनसुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया खूप नाजूक आणि अतिशय डौलदार होती. तिची आई आणि भाऊ असे दोघेजण तिच्याजवळ रहात असत. तिची हिरेमाणके लावून बनविलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणांसारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला, अशी सुंदर होती. तिचे गोठे गाईगुरांनी गच्च भरलेले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नरसुद्धा थक्क होऊन स्वस्थ बसत. तिची नृत्यकला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद 'देत असत. तिच्याशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडासा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठमोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत.


'महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला, की त्याचा तो एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप उदार होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष विल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणाकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावणमासात कोटी लिंगे करवून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यातसुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवीत असे. तिची जी नृत्यशाळा केलेली होती, त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोरच बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी हे दोघेजण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असे. आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नृत्य करीत असे आणि कुक्कुट-मर्कट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर, कपाळावर ती नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शिवभजन घडत होते.


एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्त्व बघण्यासाठी, तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी नंदिग्राम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेष करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंदा अगदी पार वेडावली. तिने सौदागराला घरात बोलावले. सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य व सुंदर असे रत्नकंकण होते. ते इतके तेजस्वी होते, की ही वस्तु पृथ्वीतलावर तयार झालेली नाही हे कोणाही पाहणाऱ्याच्या तत्क्षणीच लक्षात येत होते. 


महानंदा त्या कंकणाकडे पहात होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागररूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वीमोलाचे कंकण दिले आहे. मीही बत्तीस लक्षणी पद्मिनी आहे. मी तुमचा तीन दिवसांसाठी स्वीकार केला आहे. आता तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंतचे तीन दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष न देता पातिव्रत्य सांभाळीन. "सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्याजवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले व समोर ठेवले. ते लिंग पहाताच 'जय जय चंद्रमौळी' असे म्हणत महानंदा भजनात, पूजनात व स्मरणात रंगून गेली. या लिंगावरून अशी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले. 


सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू हे अतिशय सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तरी मी अग्निप्रवेश करीन. तेव्हा हे तू अतिशय नीट जपून ठेव."महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नृत्यशाळेत सौदागराचे दिव्य असे लिंग नेऊन ठेवले आणि ती अत्यंत लडिवाळपणे सौदागराला म्हणाली, स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी ह्या शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पाहा. माझ्या नृत्यशाळेत माझे रक्षक कुक्कुट व मर्कट आहेत ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर पहुडले. तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली.


नृत्यशाळेला आग लागली. सगळीकडे 'आग आग आग' अशी आरडाओरड सुरू झाली. एकच धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नृत्यशाळेजवळ येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाढ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो, तुझ्या घरात कुठे तरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तो आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहेत. तिने पाहिले, आपल्या नृत्यशाळेलाच आग लागली आहे, हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत ती नृत्यशाळेच्या आत शिरली, कोंबडा आणि माकडे यांचे दोर सोडले, त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नृत्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला.


सौदागराने महानंदेला विचारले, “महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना ? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना?" हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नृत्यशाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाले, 'आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जळून भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते, की जर या लिंगाला काही झाले तर मी अग्नीत प्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरिता मी प्राण देतो." असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटविली. धडधडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि 'ॐ नमः शिवाय' असे म्हणून सौदागररूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली.


महानंदा अतिशय व्यथित अंतःकरणाने सर्वत्र पाहात होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला, की "मी तीन दिवसांसाठी या सौदागराला स्वीकारले होते म्हणजे या तीन दिवसांसाठी मी त्याची पत्नीच होते. तेव्हा पति- निधनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर इ. सर्वांचेसुद्धा दान केले. मग स्नान करून महानंदाने आपल्या सर्वांगावर भस्म लावले. रुद्राक्षाच्या माळा हातात, गळ्यात घातल्या. 'हर हर सांब सदाशिव' या नावाचे ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागराबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रगट झाले. 


मस्तकावर धारण केलेला जटांचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लालबुंद होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेल्या अतिशय शीतल असे गंगेचे झुळझुळ वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी व शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोर, नीळकंठ, हातात नेहमीचाच त्रिशूळ, सर्वांगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरूण म्हणून घेतलेले, गळ्यात असंख्य नरमुंडांचे हार घातलेले, सर्वांगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हातांनी त्यांनी अग्नीत उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झेलले.


भगवान शंकर महानंदेला म्हणाले, “महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली. तू त्यात पूर्ण खरी उतरलीस. तुझे पातिव्रत्य आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा हवे ते माग. " तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदिग्राम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरानी तिला 'तथास्तु' म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपले शिवगणांनी युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणिमात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीग्राम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. 


जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तहानभूकसुद्धा लागत नाही. काम, क्रोध, द्वंद्व, दुःख यांचा जाच नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते. जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो अशा कधीही न पावणाऱ्या ठिकाणी सती पतिव्रता अशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदेची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, "हे मुनीवर, आपण मला महानंदेची गोष्ट सांगितली, हे चांगले झाले पण आमच्या या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशरऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कुट व मर्कड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले आहेत. हे पुढे न्यायाने खूप वर्षे राज्य करतील. प्रजेला शिवभजनास लावतील, तुमचा उद्धार करतील. "


हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशरऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, "गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्रांचे आम्ही जनक आहोत याचा आम्हांला आता खरोखरीच अभिमान वाटतो; पण आपण त्यांच्या मागील जन्मीची कथा आम्हांला ऐकवलीत. त्यांचा भविष्यकाळ काय आहे. हे पुढे किती वर्षे राज्य करतील ? त्यांचे आयुष्य किती आहे? हे कृपाकरून आम्हांला सांगावे. आम्हांला हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे.


मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर आपण शान्त का ? काय आहे आमच्या मुलांचे भविष्य ? जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे आमची" नंतर गंभीर आवाजात पराशरऋषी म्हणाले, 'राजा, मी सांगतो ते ऐकून तू व ही सर्व सभा लगेचच दुःखसागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे; पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल व माझ्या साधनेस दोष लागेल म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. " ऋषिवर्य, आपण आम्हांला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे, " भद्रसेन राजा म्हणाला. 'राजा, तुझ्या मुलाला आता बारा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशीच याच वेळी तो मरण पावेल. " पराशरऋषी उद्गारले.


हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांची अंतःकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. अंत:पुरात राणीवशात तर आकाशाला फाडून टाकील, असा आक्रोश सुरू झाला. पराशरऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, " ऋषीवर ह्यावर उपाय आहे का ? असेल तर मला सांगा, मी तो अवश्य करीन. " राजाचे रुदन, ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले “हे नृपश्रेष्ठा, अरे तूच धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे ? नृपश्रेष्ठा तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते ज्या वेळी नव्हती, ज्यावेळी चंद्रसूर्य नव्हते, ही सारी माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. त्याच्या हुंकारातून 'अहं ब्रह्म' म्हणून जागृतावस्था आली. हा ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच, या विश्वात आपणास दिसणारे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वांशाने विष्णू, रजांशाने ब्रह्मदेव व तमांशाने रुद्र निर्माण केला. 


नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, 'मला त्याचे काहीही ज्ञान नाही. मी अज्ञानी आहे. म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि त्या चारी वेदांचे सार म्हणजे हा 'रुद्राध्याय' आहे असे सांगितले. या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी श्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे नाही. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे. असे महेशांनी स्वतः सांगितले आहे. हा रुद्राध्याय जे कोणी मनापासून आणि पूर्ण भक्तिभावनेने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धरतात. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराच्याकडून घेतलेला आपल्या सात मानसुपत्रांना हा रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी, ज्ञानी व श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वीतलावर हा अध्याय आला. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थेही अधिकच पावन होतात. स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होतात, असा हा रुद्रमहिमा आहे.


हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला त्यामुळे यमपुरीसुद्धा पार ओस पडली. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरी ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही. कारण इथे भयंकर गर्दी होईल व त्यातून देवतांनाही आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवरील स्थिती आहे तशीच रहाण्यासाठी मग यमाने अभक्तीला, नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून ह्या अध्यायावर येथले काही कुतर्कवादी वाद घालून लागले. अभक्ती व नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि अंती महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, "जो कोणी शंकराचा थोडासुद्धा द्वेष करीत असतील त्याचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सतत खूप त्रास द्या.


जे कोणी शिव मोठा, विष्णु लहान आहे किंवा विष्णु मोठा व शंकर लहान आहे असा भेदाभेद करीत असतील त्यांनाही मागेपुढे न पहाता नरकात टाका. ज्यांना रुद्राध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभीपाकात फेका. मात्र या रुद्राध्यायाची मनापासून व भक्तिभावनेने पारायणे करणाऱ्यांचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, आता नियमितपणाने, तू रुद्राध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची संततधार धर म्हणजे हे जे येणारे संकट आहे ते टळेल. किंवा आपल्या इथेच शतघटांची स्थापना कर. दिव्य वृक्षांची पाने आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्राध्यायाची दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर. म्हणजे तुझे संकट एकदमच टळेल. 


भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशरऋषींचे पाय धरले आणि म्हणाला, “मुनिराज, आपण ऋषिश्रेष्ठ आहात. काळ, मृत्यु, भय आणि शोक यांपासून तुमच्यासारख्या गुरूशिवाय माझे कोण रक्षण करणार ? तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले आहे तेव्हा मी हे ताबडतोब करतो; पण आपणच आचार्य होऊन हा अभिषेक व दहा हजार आवर्तने करावीत ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषिमुनी आहेतच. सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेच प्रारंभ करावा.


मग राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलावले. हे सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन आणि परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे ते मुळीच नव्हते. आकाशातून भरधाव वेगाने जाणारा सूर्याचा रथसुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे तपःसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावरून खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता.


असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशरमुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्रीच्या अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक घटात घातली आणि सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर अहोरात्र सुरू होता. सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. सातव्या दिवशी पूर्वी वर्तविलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्युवेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदनही थांबले. एक घटिका संपली. राजा भद्रसेन पुत्राची ही अशी दारुण अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशरऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिंपडले. 


त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला तेव्हा पराशरमुनी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्युवेळ टळून गेली. पहा तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, 'काय घडले तुला आठवते आहे का ? "हो, चांगले आठवते आहे. नव्हे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यापुढे दिसते आहे. एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब सुळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या अगदी जवळ आला. मग त्याने माझ्या दंडाला धरले.


असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात चार अत्यंत तेजस्वी पुरुष तिथे धावत आले. त्यांनी व्याघ्रांबर नेसले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले.सुधर्म राजपुत्राने सांगितले. शंकराच्या रुद्रमाहात्म्याची प्रचीती सर्वांनी पाहिली व त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जयजयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनीही ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्ये वाजू लागली. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तमोत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांत उत्तम पंचपक्वान्नांचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले. त्याच वेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्या वेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले.


त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अम्मी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदमुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारदमुनींची षोडशोपचारे पूजा केली. नारदमुनी म्हणाले, " मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेतच शंकराचे चार दूत पाहिले. मृत्यूला बांधून ते आपल्या बरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले, की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्रानुष्ठाने करून तू फार फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठविले होते. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले “कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस ? त्याला तर आणखी दहा हजार वर्षांचे अयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होईल. 


शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना ? मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे का वागलास ? "तेव्हा मृत्यूने उत्तर दिले,मला महाराज; पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली भद्रसेनाची कुंडली तपासून पाहिली. त्यात स्पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गंडांतर होते, ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले आणि नकळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावी असे पुनः पुन्हा विनविले. नारदाचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेते व भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचा मृत्यू टळल्याच्या झालेल्या अतिशय आनंदाप्रीत्यर्थ आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला.


अशा तऱ्हेने शंभर रूद केले की, तो पुरुष शतायुषी होतो आणि हा रुद्रमाहात्म्याचा अध्याय वाचला, की तो माणूस शिवरूप होऊन जातो. तो तेथेच जन्ममरणाच्या फेऱ्यापासून मुक्त होतो. नंतर नारदमुनी अंतर्धान पावले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरूला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुषी, उत्तम व सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना हजार गाई दान केल्याचे मद्य पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल. महापापे चटकन नाहीशी होतील. हा अध्याय त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक गंडांतरे दूर होतील. या कलियुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्म पुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानासह राजा वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले. ते दोघे तेथे विष्णु, ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले.


हा अकरावा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्रच आहेत. हा अध्याय भक्तिभावनेने नेहमी ऐकला म्हणजे ते अकरा रुद्र प्रसन्न होतात आणि मनामध्ये इच्छिलेले फळ अल्पावधीत प्राप्त होते. मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठात जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाच्चपीडा, रोगपीडा कधीही बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे कुत्सितपणे म्हणेल तो अतिशय अल्पायुषी होईल. अशा माणसांची संगतही कधी धरू नये. त्याला कायमचे वाळीत टाकावे. जर विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणारालाही मृत्यू येणारच. म्हणून अशा नास्तिकाची संगत अजिबातच धरू नये. सर्व 'शिवलीलामृत' वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी हा एक रुद्राचा अध्याय तरी जरूर वाचावा. ह्या अध्यायाचे पारायण करणाराला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी नेहमी अत्यानंद भरून राहतो.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या