Subscribe Us

श्रीशिवलीलामृत अध्याय चौथा || शिवलीलामृत अध्याय ४ || श्रीशिवलीलामृत कथासार || shri shivlilamrut adhyay 4 || श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा

 ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

 अध्याय ४ 

विमर्शन राजाची कथा



          श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत. तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे. तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तासाठी कुठेही प्रकट होतो. त्याविषयीची एक कथा सुत आपल्या भक्तांना सांगत होते.


          पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता. राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत. कधीही रानत जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी. मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्याचा नेहमीच दैनंदिन कार्यक्रम असे, अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो. त्याला ती उपभोगण्यास हवी असे. विमर्शन राजात एक गुण मात्र होता. तो परम असा शिवभक्त होता. रोज श्रीशंकराची तो षोडशोपचारे पूजा न चुकता करीत असे. त्याच्या पट्टराणीचे नाव राणी कुमुद्धती असे होते. ती दिसण्यात अतिशय सुंदर होती. तसेच, चतुर होती. पतीवर तिचे जिवापाड प्रेम होते. राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे म्हणणे ऐकत असे. असाच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता. दोघं गप्पा मारत होती. एवढ्यात राणीने विचारले,

                   

               'नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का ? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे ! विचार ना? मी कधी तुझ्याशी खोटे बोलतो का ? राजा म्हणाला.

             "तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता, शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपवास श्रद्धेने करता, नित्यनेमाने भजन-कीर्तन करून त्या दिवशी जागरण करता, भक्तीभावाने शिवकथाही ऐकता..... 'पण असे असूनसुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकेही होतात, हत्या होतात, अधर्म होतो, हे कसं काय बरं ?


              तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, "देवी, मला पूर्वजन्मीची एक आठवण आहे. मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. आणि म्हणूनच तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो. तसाच पळतपळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर आलो आणि उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याची आशा मनातून जात नव्हती. शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोरच बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला होता त्यामुळे शंकराचे पिंडीकडे बघत बघत मी तिथेच प्राण सोडला. 

              "खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे; परंतु श्वानाचे काही गुण माझ्यात शिल्लक राहिले आहेत. मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळते; पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते.


                "बरं ते जाऊ दे. मी मागच्या जन्मी कोण होते सांग बरं ? राणीने लाडिकपणे राजाला विचारले. 'तू ना ? तू पूर्वी एक कबूतरी होतीस," राणी कुमुद्धतीकडे पडात राजा विमर्शन म्हणाला.


             असं ? मग मला हा जन्म कसा मिळाला ? तोंडात मांसाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मांसाची अपेक्षा धरून एक ससाणा तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून तीन प्रदक्षिणा घातल्यास; पण थोड्याच वेळ्यात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्यापुढे फारफार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत कलेवर तेथे शिवमंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याने तू या जन्मात राणी झालीस ! "


              राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुद्धती हे सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, "नाथ, ह्या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल ? आपल्याला भूत-भविष्य सर्व ज्ञात आहे म्हणून विचारते आहे. "


                "हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधु देशाचा राजा होणार आहे. तूसुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहेस आणि जया नावाची राजकन्या होणार आहेस.. आणि त्या जन्मातसुद्धा आपला दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन मलाच आपला पती म्हणून, पुन्हा एकदा माळ घालशील. चौथ्या जन्मात मी गंधार देशात जन्म घेईन. तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दाशार्ह राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. सहाव्या जन्मात मी आनर्ताधिपती होईन आणि तू ययाती अतिशय सुंदर, गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. तू ययाती राजाची अतिशय सुंदर, गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. त्या जन्मातसुद्धा आपला विवाह होईल. सातव्या जन्मात मी पांड्यराजा होईन आणि तू पद्मजकन्या वसुमती होशील आणि माझीच सहचारिणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूंचा पराभव करीन, नेहमी शिवभजनांत रंगून जाईन. मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून, पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपंथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी पावन असे स्थान मिळेल.


                 राणीला राजाने सांगितलेले हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्रीशंकराला मनोभावे नमस्कार केला. मनात प्रार्थना केली. शौनक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सुत म्हणाले, तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राप्य आणि अक्षय अशा शिवपदापाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रेसुद्ध त्या महिम्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाहीत.


               अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून ज्याचे ह्रदय भरून येत नाही, डोळ्यांतून आनंदाश्रू वहात नाहीत त्याचे जिणे खरोखरच व्यर्थ आहे. असा माणूस या मृत्युलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच. लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मे जगात नसलेलेच चांगले असो.


           'भगवान शिवाची अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा ऐका. पूर्वी उज्जयिनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. बारा ज्योतिर्लिंगापैकी उज्जैनला असलेल्या महांकाळेश्वराची तो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे, त्यामुळे त्याची तारी प्रजा आनंदात होती. 


              राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाकित असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते अर्थात पूर्वजन्माचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते.


             चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य फार मोठे होते म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्रा त्याला एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूंचा स्पर्श झाला, की लगेचच त्याचे बावनकशी सोने बनत असे साप, वाघ आणि चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राज्याच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले, की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे.


              चंद्रसेन राजाजवळ तो बहुमल्य, बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेले नव्हतेच. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने न्हात असे आणि कोठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत ते त्याचे चांगले मित्र बनत असत. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा पूर्वीपासूनच चौसष्ट विद्या आणि कला यांच्यात निपुण झालेला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला असे. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राजऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्यसरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता.


         आणि चंद्रसेन राजाचे हे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते. त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभमण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी, चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हांला दे.


               दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमूक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रणच दिल्यासारखे होते, हे त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रिती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे आहेत. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय बरे करावे ! दूताने सांतिल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलो असे होते. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडते. मग काय करावे ? राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महांकाळेश्वरावर घालायचे ठरवले. तो करुणेचा सागर, दीनांचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वतीदेवीचा प्राणसखा स्वामी महांकळेश्वर जे काय करील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत् पूजा करण्यासाठी पूजासाहित्य मागवले आणि तो महांकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडशोपचारे पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महांकळेश्वराच्या मंदिरात भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला.


                 “इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला राज्याला वेढा घातलेल्या राजांच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. 'हरहर महादेव' अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडाडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकींशी भिडणाऱ्या तलवारींचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज सर्व वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महांकाळेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता. महांकाळेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगल वाद्ये वाजत होती. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते.


               तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान सहा वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिलेली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता.


                  जरा वेळा थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपस्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भरभर आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मामासन घालून त्याच्यासमोर बसला. राजा कशी पूजा करीत होता ते नीट आठवून तो पूजा करु लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यांपैकी काहीच नव्हते. त्याऐवजी तो छोटे दगड त्याने स्थापिलेल्या शिवलिंगाला वहात होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन यांपैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते; पण तो जी शंकराची पूजा करीत होता ती अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले, "सांब सदाशिव, सांब सदाशिव तोंडाने सुरू केला. असा जप त्याने इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता. ती आता त्याला जेवायला हाक मारत होती; पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तो आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे.


                बाळ्या, तू हे काय नवीन खूळ काढले आहेस आज ? चल पाहू आधी जेवायला ! मला दुसरी खूपखूप कामे आहेत. चल ऊठ. " पण बाळ आपल्या बसल्याजागेवरून हलला नाही. तेव्हा त्या स्त्रीला खूपच राग आला व तिने त्याची मांडलेली पूजा उधळून टाकली, त्याला दोन रट्टे दिले आणि केस धरून त्याचे डोके हलवत ती म्हणाली, “ए वेड्या, आता आधी चल पाहू घरात!" बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्यासमोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उथळली गेली आहे, हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला.


              “हे सारे बाळाचे ढोंग आहे असेच आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवून घेतले आणि फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछान्यावर झोपली.


               इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मढवलेले 'सुंदर शिवमंदिर बनले होते. वर कळस हिऱ्यामाणकांच्या तेजाने झगमगत होता. मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकुसर केलेली होती. मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त दिसत होते.


            “बाळाने डोळे उघडून पाहिले त्याच्या समोर सुवर्णाच्या तबकात पूजेची जय्यत तयारी करून ठेवलेली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधीयुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला आणि 'ॐ नमः शिवाय' म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. 'त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले,


             'बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवा असेल तो वर माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागवू नकोस. तिला क्षमा कर. 'तथास्तु" शंकर म्हणाले.


               पण देवा, जरा थांबा, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो" असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला; पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती गोपस्त्री जागी होऊन पहाते तर तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहाल ! तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी पद्मिमिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगाखांद्यावर आता सुवर्णाचे, रत्नांचे, अनेक अलंकार झळकत होते. ती आर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, "आई, शंकराचे दर्शनाला चल ना ग!" बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपस्त्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीगत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी परसली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शस्त्रे खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला, ज्या गोपबाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला प्रत्यक्ष पहायची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले आहे आम्हांला आपले मित्र म्हणून आपल्या नगरीत येऊ द्या. "


               'राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजांचा हो निरोप समजला आणि स्वामी महांकाळेश्वराने आपले एक फार मोठे संकट निवारण केले आहे याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानाबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगरीच्या वेशीबाहेर आला. सर्वांचे क्षेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगल वाद्यांच्या गजरात नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जयनी नगरीचे वैभव, तिचा दिमाख आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजडित शिवमंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदराने, मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले.

    

                अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडीसुद्धा सुवर्णाचा महाल बनते. आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धिसारख्या आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात, अंगणातले साधे साधे वृक्षसुद्धा कल्पतरू बनतात, मुका माणूस पंडित बनतो, पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो, जन्मांध माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो, मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो, गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपण होऊन चालत येते, प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो, त्रिभुवनात कीर्ती पसरते, अत्यंत शक्तिशाली राजे आपले मांडलिक बनतात, जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात, कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते...... असा हा शिवमहिमा आहे. एकदा का शंकर प्रसन्न झाला, की मग कशालाच तोटा नाही, हे नक्की.


               तेथे जमलेले सर्व जण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोपाळाची स्तुती करीत होते. देवळापाशी फार मोठी यात्राच भरली होती. तेवढ्यात काय झाले! रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रगट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या सहा वर्षांच्या गोपबाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून त्याला उत्तम आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्ष मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकराने जणु काही स्वतःच गोपबाळाला मंत्र सांगितला. सोमवार, शिवरात्र या व्रताची संपूर्ण आणि साद्यंत म्हणजेच सविस्तर माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो गोपबाळ चौदा विद्यात आणि चौसष्ट कलात अतिशय पारंगत बनला. नंतर मग मारुतीने त्याचे नाव 'श्रीकर" असे ठेवले. सर्वांनी शंकराचा, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जयजयकार केला. देवांनी आकाशातून सर्वांवर पुष्पवृष्टी केली.


                  नंतर हनुमान श्रीकरला म्हणाले, “यानंतरच्या तुझ्या आठव्या पिढीत राजा नंद जन्मेल आणि त्याचा पुत्र म्हणून श्रीविष्णू कृष्ण-रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील. त्या अवतारात ते शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. ' असे बोलून हनुमान जसा अचानक प्रगटला तसाच गुप्त झाला. ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे! नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने तेथे आलेल्या राजांचा यथायोग्य सत्कार केला व सर्व राजे संतुष्ट होऊन, वैर विसरून परत आपापल्या राज्यात निघून गेले.


                सोमवार, प्रदोष हो बते सर्वजण मनोभावाने करू लागले शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले. घरोघर शिवलीलामृताचे वाचन होऊ लागले आणि शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोहोचले


                अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जे कोणी वाचतील त्यांना मनोवांछित संतती, भरपूर संपत्ती विनासायास मिळेल. वाचणारास उत्तम आरोग्य लाभेल, त्याचे आयुष्य वाटेल. शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती आहे त्याच्या संकटे वाऱ्यालाही उभी राहाणार नाहीत. जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम करतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे. तसेच, प्रत्येकाने सदोदित शिवचरणावर निष्ठा ठेवावी.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या