Subscribe Us

श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा || श्रीशिवलीलामृत कथासार || Shivlilamrut Adhyay 5 || श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा

 ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

 अध्याय ५ 

सत्यरथ राजाची कथा

 

           'सदाशिव' ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो. जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे, त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही. शिवनामाचा महिमा फार अगाध आहे. जो प्रदोषव्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही, ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. ज्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोषव्रत मनोभावे करावे. हे व्रत केले, की त्यांचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्यांच्या आत नाहीसे होते. एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले ज्ञान प्राप्त होते. बारा वर्षे प्रदोषव्रत आचारणाऱ्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते.

           व्यास महर्षीनीच हा महिमा सांगितला आहे. जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मीच फार दुःख प्राप्त होईल. फार क्लेश सहन करावे लागतील. हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो, तो निश्चित दांभिक आहे, असे समजावे. त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे, त्याचा गुरूसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे. आणि पार्वतीपरमेश्वराचे चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. 

            मृत्यूसारखी मोठमोठी संकटेसुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात. आता मी एक कथा सांगतो ती ऐका - असे म्हणून सुत शौनक आदि ऋषींना शिवमहिमा दाखविणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता; परंतु तो शिवाचे भजनपूजन मात्र कधी करीत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला.

         शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते; पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोरवाटेने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे बोचत होते. श्रमाने मूर्च्छा येऊन ती जागोजागी पडत होती. सावध झाली, की शत्रूच्या भीतीने मागे-पुढे पाहात पुन्हा पळत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदनालासुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम लावण्य होते; पण दैवाची गती गहन आहे. जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशा गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. नळाची दमयंती किंवा भिल्लिणीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती। पार्वतीच पुन्हा या वनात संचार पुन्हा एकदा करीत आहे असे वाटत होते. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसववेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळहातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे-पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायलासुद्धा कुणी नव्हते. ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडबडा लोळत पाण्यासाठी मोठमोठ्याने टाहो फोडत होती; पण ऐकणार कोण ? थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रसूत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला; पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजाण अर्भकाला तिथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले.

              बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्या कडेवर एक वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते. ह्या चिमण्या बाळाला पाहून तिला मनात फार दया आली. नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला ? तिला काहीच समजेना. हा कोणत्या बरे जातीचा असेल ? त्याला आपण उचलून घ्यावे का नाही ? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंस्र पशू याला मारून टाकतील! काय करावे बरे ? क्षणभर तिला काहीच सुचेनासे झाले. तेवढ्यात एका यतीच्या वेषात भगवान शंकर तेथे आले आणि त्यांनी सांगितले, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने. ह्याच्यामुळे लवकरच तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे. तरीपण स्वत:च्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दरिद्री माणसाला परीस सापडावा, चिंतामणी रत्न अशा दरिद्री माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपोआप अमृत पडावे तसा हा बाळ तुला आता सापडला आहे. त्याचे पालन नीट व जिवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले.

               मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने 'शुचिव्रत' ठेवले व राजपुत्राचे नाव 'धर्मगुप्त' असे ठेवले. दोघांना कडेखांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारलेच तर है। माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत, असे ती सर्व विचारणाऱ्यांना सांगत असे.

          अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एकचक्र नावाच्या नगरात आली. तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शांडिल्य ऋषींच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पहात तेथे उभी राहिली.

          धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पहात शांडिल्य ऋषी म्हणाले, 'अरेरे! दैवाची गती किती विचित्र आहे पहा. हा खरे तर राजपुत्र; पण आज दीन होऊन, गरीब होऊन. येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्यासमोर आला आहे. 

           उमेने शांडिल्य ऋषींचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हांला भूत, भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आईवडील कोण आहेत ? जिवंत आहेत का मेले आहेत ? हे मला सांगा. "

             तेव्हा तिला उठवत शांडिल्य ऋषी म्हणाले, “या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाचे वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणांगणात गेला त्याने शत्रूंना ठार मारले हे खरे; परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे तो विसरूनच गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुषी होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये. त्याच्या आईनेसुद्धा पटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त, याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता जन्मतःच हा आईवडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाचे वेळी मनापासून भक्तीने शंकराचे. पूजन करावे. कधीही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वतीसमोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात. आणि सरस्वती वीणा वाजवीत असते. पुरुहूत सुस्वर बासरी वाजवीत असतो. लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असते. शिवाचा परममित्र जो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नृत्य पहात असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. “मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दरिद्री का झाला हे सांगावे. म्हणाली. " उमा विनयाने

            'तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला. अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली; पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर परान्न चोरून खाल्ले तर जीभ जडावते. जर दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर घेणाराचा हात जळतो. जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाराचे डोळे जातात आणि अंधत्व येते, हे लक्षात ठेवायला हवे. " शांडिल्य ऋषी त्या स्त्रीला - उमेला म्हणाले.

               मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषींच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना 'पंचाक्षर मंत्र' दिला आणि प्रदोष व्रत करा, असे सांगितले. पक्षप्रदोष, शनिप्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. तीन घटका रात्र झाली, की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी. नंतर तेथे कर्दळी-केळीचा करावी. छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलांच्या माळा सोडाव्यात. आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे. पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्यासमोर श्रीशंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग, यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरांतकाची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्ट महासिद्धी, अष्ट भैरव यांचीही योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. आठ दिशांचेही पूजन करावे.

            पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे. कोटी चंद्रांच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे. अशा सनातन पूर्णब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते.

             उमेने समोर ठेवलेल्या धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघेजण काही दिवस एकचक्री नगरातच राहिले. दोघांनी चार महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले.

            शिवपूजेची चोरी करणे हे तर सर्वांत मोठे पाप आहे. आणि प्रसाद, तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. असो.

                अशा रीतीने ते दोघेजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मणपुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्यासमोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहोरांनी काठोकाठ भरलेला हंडा बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला; पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकरांच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालेले होते. ते रोज नियमितपणे शिवपूजनात रंगून जात होते.

              एकदा दोघेजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्वकन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पहात राहिला होता. “धर्मगुप्ता, परस्त्रीकडे असे पाहू नये. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित हरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे। शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. ” शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले.

             पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अंशुमती दिसली. तीही एकाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अंशुभतीही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पहात होती. तिला एकदम आठवले, तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजेच श्रीशंकराला विचारले होते- “माझी ही स्वरूपसुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ ? "

               तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, “धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. "

                   “महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल ? हा किती सुंदर दिसतो आहे ? क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणूकाही वर आला आहे असे वाटते आहे. " अंशुभती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथमदर्शनी त्याला पहाताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसरीकडे पाठवून दिले आणि अंशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलावले. त्याच्यासाठी तेथे मऊ मऊ पल्लवांचे तिने आसन तयार केले होते. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुषीत होता. इतक्या जवळ असूनही अंशुभती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर करून ती म्हणाली, "तुमच्या शृंगारसरोवरात पोहोण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसी आहे. आपला मुखचंद्रमा पहाताच माझे मन आनंदाने नृत्य करते आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुमच्या कमलाभोवती गुंजन करीत आहेत. प्रिया, मला आपली म्हणा..

                   मग अंशुभतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मौक्तिकांची माळ काढली आणि राजपुत्राचे चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, "हे सुंदर युवती, मला आईवडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतलेले आहे. मी दरिद्री आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी याच स्थळी आपल्या दोघांच्या विवाहासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे घेऊन येते. " असे बोलून तेथून अंशुभती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीगत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शांडिल्य ऋषींच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या तत्क्षणीच लक्षात   आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरू त्याचे रक्षण करतो. दोघा भावांनी ही सर्व हकीगत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली.

                 गंधर्वकन्या अंशुभतीने सांगितल्याप्रमाणे तिसरे दिवशी दोघेही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्वराजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणांची अधीरतेने वाट पहात होता. ते दोघे येताच आपला सर्वगुणसंपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्वराजा अतिशय खूष झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेचच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात धुमधडाक्यात आणि आनंदात विवाहसमारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विहिणीला अर्पण केले. एक लाख रथ, दहा हजार हत्ती, एक लाख सुंदर घोडे, एक लाख दासदासी, रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्या बरोबर दिला. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अंशुभती आता मोठ्या आनंदाने पतीच्याबरोबर चालली होती. त्याच्याबरोबर मंगल वाद्यांचा गजर होत होता. चतुरंग सेना सभोवताली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वांचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुर्मषण राजाला त्यांनी धरून आणले; पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्षे उत्तम प्रकारे राज्य केले.

            त्याने आपल्या नगरीत शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पद्म मोहरांची गुरुदक्षिणा त्यांच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्ने, अलंकार, वस्त्रेही सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरण हे सर्व त्याच्या राज्यांतून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृतनेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंदीआनंद भरलेला होता. अंशुभतीही सुखात होती. दहा हजार वर्षे राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सुरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. .

              भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्यदेह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अंशुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होताच सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांचा कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले.

                  असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकटप्रसंगी स्वत शंकर रक्षण करीत असतो. त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो. ते जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो. त्यांची सतत समृद्धी होते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय रहात नाही. ज्याच्या घरी 'शिवलीलामृत' हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणाशी जागा मिळते.

             हा ग्रंथ म्हणजे अत्तम असा विशाल आम्र वृक्ष आहे. ह्यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडास आलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरोग झालेला असेल म्हणजेच ज्यांचा पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल. त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत.

             सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसास्वाद घ्यावा व आपल्या जीवनाचे खरे खरे सार्थक करावे.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या