।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:-१
१. श्रोत्यांची सूतांना विनंती
श्रीगणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यै नमः ।। श्रीगुरुभ्यो नमः ।। श्रीकुलदेवाय नमः।। श्रीकुलस्वामिन्यै नमः || श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ।।
प्राचीन काळी नैमिष्यारण्यात १२ वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. शौनकादी ऋषी त्याचे ऋत्विज होते. त्या यज्ञकार्यात मध्यांतरात महामुनी सूत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करीत होते. ते पुराणांचे ज्ञाते व चतुरस्र ज्ञानी होते. त्यांनी श्रोत्यांना एकूण अठरा पुराणे सांगितली. त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली.
एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषिमंडळींनी सूतांना एक विशेष विनंती केली. ते म्हणाले, “हे मुने, तुमच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे. तुमच्यासारखा बक्ता मिळाला हे आमचे परम भाग्यच होय. तुमच्या मुखातून पुराणांचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत. तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली. तुमच्यामुळेच आम्हांला वाङ्मयाचा मनमुराद आनंद उपभोगता आला. तुमच्या वचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो, आम्हांला आत्मपरीक्षण करता येते आणि सहजगत्या भगवर्द्धितनही घडते. तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत. तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही. म्हणून तुम्ही अजून एखादी सर्वपावक चरित्रकथा सांगून आम्हांला उपकृत करा अशी आम्हां सर्वांची तुम्हांला विनम्र प्रार्थना आहे.'
श्रोत्यांचे म्हणणे ऐकून सूतांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, "श्रोत्यांची जिज्ञासा वक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते. मीही त्याला अपवाद नाही. अठरा पुराणांचे श्रवण करून तुम्हांला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे मला वाटते. आता मी तुम्हांला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले 'गणेशपुराण' सांगणार आहे.'
ती सर्व ऋषिमंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या वटवृक्षाच्या गर्द छायेत निवांत बसली होती. वेदघोष आणि मंत्रोच्चारांमुळे पावित्र्याने भारलेले वातावरण, निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करीत होते. अशा वातावरणात व्यासशिष्य सूतांच्या मुखातून गणेशपुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला. ते सर्व जण सावध होऊन एकाग्र चित्ताने सूतांचे निरूपण ऐकू लागले.
सूतांनी गणपतीचे स्मरण केले. मग भगवान श्रीकृष्णांचे ध्यान केले. ते म्हणाले, “श्रोते हो! गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता `अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांना यं आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूते ज्याच्या अधीन आहेत; विधी, हरी आणि हर हे ज्याच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात त्या गणपतीचे माहात्म्य मी काय वर्णन करणार ? तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरांजनाने ओवाळू नये काय? सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने ओंजळभर अर्घ्य अर्पण करू नये काय? म्हणूनच गणपतीचे माहात्म्य कितीही अगाध असले तरी त्याची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हां सर्वांना विदित करणार आहे. गणेशाचे हे परम पवित्र चरित्र सर्वांत आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगूंना सांगितले, भृगूंनी ते सोमकांत राजाला आणि त्या राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले. सोमकांताच्या कथेने मी गणेशपुराणाचा आरंभ करीत आहे. त्याची कथा ऐका.
सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नामक राजा राज्य करीत होता. तो स्वधर्मपरायण, क्षमाशील, न्यायप्रिय, प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा, बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता. सुधर्मा ही त्याची पत्नी. तीही पतीप्रमाणेच धर्मानुगामी अशी पुण्यपरायण स्त्री होती. या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता. त्याचे नाव हेमकंठ. त्याची आपल्या मातापित्यावर विलक्षण भक्ती होती. त्याच्यासारखा सुपुत्र; विद्याधीश, रुद्रवान, क्षेमंकर, ज्ञानगम्य आणि सुबल यांच्यासारखे महाबुद्धिमान व रणधुरंधर प्रधान; आणि चतुरंग सेना यांच्या साह्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले. त्याने कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळविला.
अध्याय समाप्त !

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.