।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:-५ ते ६
भृगू ऋषींची भेट
श्रीगणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यै नमः ।। श्रीगुरुभ्यो नमः ।। श्रीकुलदेवाय नमः।। श्रीकुलस्वामिन्यै नमः || श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ।।
देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजा आपली पत्नी व प्रधानांसमवेत एका अरण्यात प्रवेशला. राणी व प्रधान त्याची काळजी घेत होते. ते चौघे ठिकठिकाणी बस्ती करीत त्या निबिड वनप्रदेशातून पुढे जात राहिले. पुढे त्यांना एक विस्तीर्ण सरोवर दिसले. त्यात स्वच्छ पाणी होते, असंख्य कमळे उमललेली होती. त्याभोवतीचा सर्व परिसर अत्यंत रम्य व हिरव्यागार वनश्रीने नटलेला होता. ते सर्व पाहून त्यांना आपण एखाद्या नंदनवनातच आलेलो आहोत असे वाटले. वृक्षांच्या शीतल छायेने त्यांचा थकवा निघून गेला. सुगंधित वायूने मनाची मरगळही निघून गेली. राजा व राणीने त्या सरोवरात स्नान केले, पाणी पिऊन तहान भागविली. राजा एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागला. राणी त्याचे पाय चेपू लागली. श्रमलेला राजा बघता-बघता निद्राधीन झाला. त्याचे दोन्ही प्रधान फळे व कंदमुळे आणण्यास गेले.
थोड्या वेळाने एक सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार त्या सरोवरापाशी आला. बऱ्याच दिवसांनी एका तपस्व्याचे दर्शन झाले म्हणून सुधर्मा राणीला आनंद झाला. तिने त्याला हाक मारली, तो जवळ येताच त्याची विचारपूस केली. तो म्हणाला, "माझे नाव च्यवन. मी भृगू ऋषींचा पुत्र आहे. पुलोमा ही माझी माता. मी पाणी नेण्यासाठी नेहमी येथे येतो. आमचा आश्रम येथून जवळच आहे. पण तुम्ही कोण आहात? या घोर वनात कशासाठी आला आहात ? तू या पुरुषाची पत्नी असावीस असे वाटते. तुझा पती पूर्वी सुंदर असावा. मग याची अशी दुर्गती का झाली ? तूही सुंदर आहेस. तू याचा अंगीकार कसा केलास? तुझ्या मातापित्यांनी या विवाहास कशी मान्यता दिली ?"
च्यवनाचे प्रश्न ऐकून सुधर्मा राणीच्या डोळ्यांत शोकावेगाने अश्रू तरळले. तिने त्याला आपला सर्व पूर्ववृत्तान्त सांगितला. ती पुढे म्हणाली, "मला अहोरात्र माझ्या पतीचीच चिंता लागली आहे. त्याच्यासारख्या सद्गुणी राजावर हा जो दुःखभोग ओढवला आहे याचेच फार वाईट वाटत आहे. कोणीतरी यावे आणि माझ्या पतीला या व्याधीपासून सोडवावे असे सारखे वाटत राहते. निरुपाय होऊन आम्ही या अरण्यात आलेलो आहोत. येथे उर्वरित काळ ईश्वरचिंतनातच घालविणार आहोत. "
सुधर्मा राणीची ती दुःखद कथा ऐकून च्यवनास अतिशय वाईट वाटले. त्याने तिचा निरोप घेतला आणि पाण्याने भरलेला कलश घेऊन आश्रमात परतला. तो बराच वेळ कोणाशी काही बोललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता भृगू ऋषींच्या तत्काळ लक्षात आली. त्यांनी च्यवनाला हाक मारून प्रेमाने जवळ बोलाविले. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरविला व म्हणाले, "बाळ, आज तुझ्या मुखावर ही अस्वस्थता का?" च्यवनाने त्यांना सोमकांताचा सर्व वृत्तान्त सांगितला. ते ऐकून भृगूंचे अंतःकरणही गलबलले. ते म्हणाले, “च्यवना, तू त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये."
पित्याच्या आज्ञेने च्यवन धावतच सरोवरापाशी गेला. तेथे राजाचे प्रधानही दृष्टीस पडले. सोमकांतही उठून बसला होता. च्यवनाने राजाला भृगूंचा निरोप सांगितला. तेव्हा राजा-राणीला खूपच आनंद झाला. ती सर्व मंडळी आश्रमात प्रवेशली. तेथे टुमदार पर्णकुट्या होत्या. गायींचे गोठे होते. फुलझाडे होती. फळझाडे होती. हरीण, ससे व मोर होते. आश्रमशाळेतून वेदमंत्रांचा घोष ऐकू येत होता. तेथील वातावरणात पावित्र्य आणि मांगल्य नांदत होते. ते सर्व पाहून त्या चौघांना खूपच प्रसन्न वाटले. तेथील एका मध्यवर्ती कुटीत भृगू महर्षीची शांत, धीरगंभीर मूर्ती व्याघ्रचर्मावर बसली होती. त्यांच्या मुखावर तपश्चर्येचे तेज झळकत होते. त्यांच्या पावन दर्शनाने त्या चौघांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. त्यांनी ऋषींना विनम्रतेने नमस्कार केला. राजा सोमकांताने भृगू आपली व्यथा सांगितली. तो पुढे म्हणाला, "हे मुने! व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक उपचार केले. पण उपयोग झाला नाही. आज पूर्वपुण्याईने तुमचे दर्शन झाले. तुमच्या कृपेने माझी व्याधी बरी होईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे. मी तुम्हांला शरण आहे. तुम्ही माझे रक्षण करा."
सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगू म्हणाले, "राजा, पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुला या महाव्याधीने ग्रासले आहे. त्याविषयी मी सविस्तर सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही भोजन करून घ्या. आता काळजी करू नकोस. तू येथे आला आहेस त्याअर्थी तुझी या व्याधीतून सुटका होईल याची खात्री बाळग.' भृगू ऋषींचे भाषण त्या सर्वांना मोठा दिलासा देऊन गेले. ऋषींनी त्यांना उत्तम वस्त्रे दिली, प्रेमाने व आग्रहाने पोटभर खाऊ घातले, त्यांना विश्रांतीसाठी मृदू शय्या दिल्या. राजाच्या मनातील चिंता व उद्विग्नता निघून गेली होती. त्या निरामय शांत वातावरणात कधी झोप लागली ते त्याला कळलेदेखील नाही.
अध्याय समाप्त
➡️पुढील अध्याय

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.