।। श्री गणेश पुराण कथासार ।।
अध्याय 2
( उपासना खंड )
२. सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी
श्रीगणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यै नमः ।। श्रीगुरुभ्यो नमः ।। श्रीकुलदेवाय नमः।। श्रीकुलस्वामिन्यै नमः || श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ।।
सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात, आनंदात राहत होती. पण या आनंदालाही ग्रहण लागले. प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही हेच खरे. मग राजाही त्याला कसा अपवाद असणार? त्यालाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले. त्याला कुष्ठरोग झाला. या दुर्धर व्याधीने त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या. त्यांतून रक्त व पू वाहू लागला, असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे सद्गुणांनी उदंड यश व अलोट कीर्ती मिळविलेल्या त्या राजाला परमावधीचे दुःख झाले. स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करीत तो दिवस कंठू लागला. हे गलितगात्र, परावलंबी जगणे त्याला कसे सहन होणार? तो अहोरात्र तळमळू लागला. प्रजेपासून तोंड लपवू लागला. त्याच्या अस्वस्थतेला अंतच नव्हता. जीवनाविषयी तो अत्यंत निराश झाला होता. त्याने राज्यत्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला. त्याने भोगावे लागत आपल्या पत्नीला, पुत्राला व पाचही विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले. तो त्यांना म्हणाला, "मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य आहे तेच कळत नाही. गलितकुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. असे तिळतिळ झिजून मरणाची वाट बघण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे केव्हाही योग्यच असे मला वाटते. म्हणून मी राज्याचे अधिकार हेमकंठाकडे सुपूर्द करून तुम्हां सर्वांचा निरोप घेण्याचे ठरविले आहे. उर्वरित काळ मी विजनवासात, एकांतात, ईश्वरचिंतनात घालविणार आहे. तुम्ही राजपुत्राला राज्यकारभारात योग्य ती मदत करा." बोलता बोलता राजा एकदम मूर्च्छित पडला. प्रधानांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले; सांत्वनपर बोलून त्याला धीर दिला.
आपल्या प्रिय पित्याचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाला. पितृसेवेसाठी तोही वनात जाण्याची भाषा करू लागला. राणीची अवस्थाही वेगळी नव्हती. पतिविना कालक्रमणा करणे हे तिला मान्यच नव्हते. एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे? ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते. अशा प्रकारे राजपुत्र, राणी व त्या प्रधानांनी सुखोपभोगांचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर बनात जाण्याचा हट्ट धरला.
अध्याय समाप्त !
shree , shri , ganesh , puran , purana , katha , kathasar , marathi , part 1 , adhyay 1 , shri ganesh puran katha , shri ganesh puran kathasar , shri ganesh puran katha marathi , shree ganesh puran kathasar , shree ganesh puran , ganesh puran in marathi , गणेश पुराण मराठी , श्री गणेश पुराण , श्री गणेश शिव पुराण , ganesh shiv puran marathi , ganesh jayanti 2022 , गणेश जयंती 2022 , ganesh jayanti , jayanti , पोथी , माघी गणेश , maghi ganesh

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.