Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय २२ ते २४ || shri ganesh puran kathasar adhyay 22 to 24

।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- २२ ते २४ 

१२. बल्लाळेश्वराची कथा, दक्षाची गणेश-आराधना


         सोमकांताने शंका उपस्थित केली. तिचे निरसन करताना भृगू म्हणाले, “राजा, तू खरोखरच जिज्ञासू आहेस. तुझा प्रश्न ऐकून मलाही आनंद झाला आहे. या संदर्भात भीम राजानेही विश्वामित्रांना दक्षाचे पूर्वजन्मवृत्त विचारले होते. त्या वेळी त्यांनी जे सांगितले, तेच मी तुला कथन करीत आहे.

         पश्चिम सागरतटावर सिंधू देश वसला आहे. तेथे पल्ली नावाचे एक नगर आहे. तेथे कल्याण नावाचा एक दानशील, धर्मशील वैश्य राहत असे. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. या वैश्य दंपतीस बल्लाळ नावाचा पुत्र होता. त्याला बालपणापासूनच देवादिकांची खूप आवड होती. तो व त्याचे सवंगडी दगडाचे देव मांडून त्यांची पूजा करायचे, आरती म्हणायचे व नैवेद्य दाखवायचे. हा त्यांचा नित्याचाच खेळ होता. एके दिवशी बल्लाळ व त्याचे मित्र गावाबाहेर हिंडावयास गेले होते. तेथे बल्लाळाने एका मोठ्या गोट्याची गणपती म्हणून स्थापना केली. दूर्वा, रानफुले व पत्रींनी त्याची पूजा केली. मग आपापल्या बालबुद्धीला अनुसरून त्यांच्यापैकी कोणी ध्यानस्थ बसले, कोणी जप करू लागले, तर कोणी देवाची गाणी म्हणून नाचू लागले. त्या खेळात ते सर्व जण इतके दंग झाले होते की, त्यांना आपल्या घराचीही आठवण राहिली नाही."

              इकडे बराच वेळ झाला तरी मुले परतली नाहीत म्हणून त्यांच्या पालकांना मोठी काळजी वाटू लागली. बल्लाळच आपल्या मुलांना भलते वेड लावत आहे म्हणून ते आधीच संतापलेले होते. त्यांनी तावातावाने कल्याणाचे घर गाठले आणि त्याची कानउघाडणी करू लागले. ते म्हणाले, "तुझ्या मुलाने हे काय चालविले आहे? तो आमच्या मुलांना गोळा करतो, त्यांना खेळण्यासाठी गावाबाहेर नेतो. मग त्यांना घरची आठवण राहत नाही, तहानभूकही लागत नाही. आम्ही त्यांची वाट बघत तिष्ठत राहतो. हे असे किती दिवस चालायचे? तू बल्लाळाला वेळीच आवर घाल. त्याच्या नादाने आमची मुले बिघडली तर आम्ही गप्प बसणार नाही, ग्रामाधिकाऱ्याकडे तक्रार करू. मग आम्हांला दोष देऊ' नकोस." 

             लोकांची तक्रार ऐकून कल्याणाला बल्लाळाचा खूपच राग आला. त्याने एक काठी घेतली आणि मुलांना शोधायला निघाला. वेशीजवळच मुले दृष्टीस पडली. त्यांनी दगडगोटे रचून एक मंदिर तयार केले होते. देवाची पूजा करून तो बालचमू गणपतीच्या कथा ऐकत होता. त्यांना कसलेच भान नव्हते. ते दृश्य पाहून कल्याणाच्या रागाचा पारा चढला. तो ताडताड पावले टाकीत त्यांच्यापाशी गेला. त्याने काठीच्या फटकाऱ्यांनी ते देऊळ तोडून मोडून पार उद्ध्वस्त करून टाकले. त्याची क्रोधित मुद्रा पाहून मुलांनी घराकडे धूम ठोकली. बल्लाळ गणेशध्यानात इतका मग्न झाला होता की, त्याला काय चालले आहे याची गंधवार्ताही नव्हती. कल्याणाच्या हाती तो आयताच सापडला. त्याने रागाच्या भरात बल्लाळाला इतके मारले की, त्याच्या अंगातून रक्तस्राव होऊ लागला, काळे-निळे वळ उमटले. त्याने बल्लाळास एका झाडाला बांधले. त्याने गणपती मानलेला दगड दूर भिरकावून दिला व म्हणाला, “कार्य्या! हे तू काय मांडले आहेस? तू आम्हांला नगरात राहू देणार आहेस की नाही ? लोक तुला दूषणे देतात, तुझी निंदा करतात. आज त्यांनी घरी येऊन माझी कानउघाडणी केली आहे. हे सर्व मी कशासाठी सहन करायचे? ते काही नाही. तुला शिक्षा व्हायलाच हवी. आज कोणता देव तुला सोडवतो आणि कोण तुला खाऊ-पिऊ घालतो तेच मला बघायचे आहे." बल्लाळाला त्याच अवस्थेत सोडून तो निष्ठुरपणे निघून गेला.

              या घटनेने बल्लाळाच्या मनावर फार मोठा आघात झाला. पित्याने देऊळ उद्ध्वस्त केले, देव भिरकावून दिला याचे त्याला मनस्वी दुःख झाले. शारीरिक पीडेपेक्षा ही वेदना फार मोठी होती. तो प्रसंग आठवून बल्लाळाला एकसारखे रडू येत होते. तो गणपतीची आर्ततेने करुणा भाकू लागला, म्हणाला, “हे गणाधीशा ! तू विघ्नहर्ता आहेस. मग आज तुझ्या पूजेत हे विघ्न कसे आले? तू भक्तवत्सल आहेस ना? तू भक्तांना संकटातून तारणारा आहेस ना? मग आत्ता मी संकटात असताना तू का धावून येत नाहीस? तू माझी का उपेक्षा करतोस? देवा, वेदशास्त्रांनी आणि पुराणांनी जगाला तुझेच अर्चित्य माहात्म्य सांगितले. तू भक्तांचा प्रतिपाळ करतोस, भक्तांचे रक्षण हेच तुझे ब्रीद आहे असे त्या ग्रंथांमध्ये वारंवार सांगितले आहे. त्यामुळेच माझी तुझ्यावर दृढ निष्ठा बसली. आज अशा रक्तबंबाळ अवस्थेत मी या वृक्षाला जखडलेला असताना तू माझ्या साह्यार्थ धावून आला नाहीस तर तुझ्या माहात्म्यावर, तुझ्या अगाध लीलाकर्तृत्वावर मी कसा विश्वास ठेवायचा? धाव घे गजानना, धाव घे!"

              बल्लाळ एकसारखा गणपतीचा धावा करीत होता. त्या अर्धवट ग्लानीतही त्याला पित्याकडून होत असलेली आपल्या आराध्य दैवताची विटंबना वारंवार दिसत होती. तो प्रसंग आठवून त्याला एकसारखे भडभडून येत होते. पित्याच्या या दुष्कृत्याबद्दल त्याच्या मनात इतकी घृणा उत्पन्न झाली की त्याने त्याला शापच दिला- 'ज्याने माझ्या गणपतीचे देऊळ उद्ध्वस्त केले, मी श्रद्धेने पूजलेला देव फेकून दिला; तो माझा पिता मुका व बहिरा होईल. त्याच्या पाठीस कुबड येईल. त्याच्या सर्वांगास असंख्य क्षते पडून त्यांतून रक्त आणि पू वाहील. त्याच्या सर्वांगास दुर्गंधी येईल. ही व्याधी उपचारांनीही बरी होणार नाही. लोक त्याची उपेक्षा करतील.' बोलता-बोलता तो थोडा वेळ थांबला. मग गणपतीला उद्देशून म्हणाला, "देवा, मी जडदेहाने बांधला गेलेला असलो तरी माझे मन मुक्तच आहे. त्या मनाने तुझे चिंतन करणे मला आत्ताही शक्य आहे. मला मरणाची भीती नाही पण मरण आलेच तर मी तुझ्या ध्यानात व नामस्मरणात मग्न असतानाच यावे एवढीच इच्छा आहे."

             रक्त बल्लाळाला शारीरिक पीडा असह्य होत होती. जखमांतून ओघळलेले सुकून गेले होते, तहानेने जीव व्याकूळ झाला होता, भुकेने पोटात थैमान घातले होते, त्याच्या पायाला बधिरता आली होती. त्याही अवस्थेत तो गणपतीचे नामस्मरण करीत होता. 

               कल्याण गावात जाऊन बराच वेळ लोटला होता. बल्लाळाच्या जवळपास कोणीही नव्हते. सूर्य मावळतीकडे झुकू लागला. अतीव ग्लानीने बल्लाळाची मान छातीवर झुकली. त्याची अवस्था पाहून गणपतीला कळवळा आला. 'आपल्या भक्ताची घेतली एवढी परीक्षा पुरे झाली,' असा विचार करून तो एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळासंनिध प्रकट झाला. त्याच्या कृपाकटाक्षाने बल्लाळाची बंधने गळून पडली. विप्ररूपी गजाननाने स्वतः पुढे जाऊन त्याला सावरले. त्याच्या पावन हस्तस्पशनेि त्या सद्भक्ताच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन त्याची कांतीही उजळली. त्याच्या सर्वांगातून नवचैतन्याचा संचारच झाला जणू! बल्लाळ शुद्धीवर आला. आपण पूर्ववत झालो आहोत हे त्याच्या लक्षात आले. आपल्या संमुख दिव्य विप्ररूपाने साक्षात गणपतीच उभा आहे अशी त्याच्या मनानेच ग्वाही दिली. त्याने भक्तिभावाने त्या ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला. त्याची अपार स्तुती केली. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला आलिंगन दिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला सर्वज्ञ केले. तो बल्लाळास म्हणाला, "बाळ, तुझ्या पित्याने माझा फार मोठा अपराध केला आहे. त्याने माझे मंदिर उद्ध्वस्त केले, माझ्या भक्ताला छळले. या प्रमादाबद्दल त्याला भयंकर नरकयातना भोगाव्या लागतील. तुझ्या शापाने पुढील जन्मात त्याला दारुण अवस्थेला तोंड द्यावे लागले, इतकेच नव्हे तर त्याचा पिता त्याला घरातून हाकलून देईल. बल्लाळा, आता मी काय सांगतो ते ऐक. माझ्या मनात तुला वरदान द्यावे असे आहे, तरी इष्ट वर मागून घे."

                  बल्लाळ म्हणाला, “देवा, तू माझ्यावर प्रसन्न आहेस हे ऐकून मी अगदी कृतकृत्य झालो आहे. तू दर्शन देऊन मला धन्य केलेस. मी तुझ्याकडे काय वर मागणार? तुझ्या मनात मला काही द्यायचेच असेल, तर तुझ्याठायी असलेली माझी भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी आणि याच क्षेत्री वास्तव्य करून तू लोकांची दुःख, संकटे दूर करावीस अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. "

                    बल्लाळाचे ते जनकल्याणप्रद मागणे ऐकून गणपतीला परम संतोष वाटला. 'तथाऽस्तु!' असा आशीर्वाद देऊन तो पुढे म्हणाला, "बाळ, तुझ्या इच्छेनुरूप मी अंशरूपाने येथे वास्तव्य करीन. लोकांचे रक्षण करीन. येथे येणारे भक्तजन माझ्या नावापूर्वी अत्यंत आदराने तुझे नाव घेतील. हे स्थान 'बल्लाळविनायक' अर्थात 'बल्लाळेश्वर' म्हणून प्रसिद्ध होईल.” विप्ररूपातील गणपतीने बल्लाळाला प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला आणि दुसऱ्याच क्षणी तो अदृश्य झाला. "

              विश्वामित्र ऋषी भीम राजास म्हणाले, "इकडे कल्याणाचे काय झाले ते ऐक. बल्लाळाने शाप दिल्यामुळे तो बहिरा व मुका झाला. त्याची दृष्टी अधू झाली, पाठीवर कुबड आले आणि त्याच्या सर्वांगास असंख्य क्षते पडून त्यांतून रक्त वाहू लागले. आपल्या देहात एकाएकी घडून आलेला हा बदल पाहून कल्याण कमालीचा घाबरला. तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याची विकलांग अवस्था पाहून इंदुमतीही शोकग्रस्त होऊन रडू लागली. तिला अनावर चिंतेने ग्रासले. काय करावे हेच तिला सुचेना.. पतीच्या बाबतीत हे अघटित कसे घडले असा तिला मोठा प्रश्न पडला. तेव्हा कोणीतरी तिला रानातील प्रकार सांगितला. लोकांच्या गाहाण्यांनी संतापलेल्या कल्याणाने बल्लाळाला वेदम मारून झाडाला बांधून ठेवले आहे हे कळताच त्या मातेचा जीव कासावीस झाला. दोघातिघांना बरोबर घेऊन ती लगबगीने अरण्यात गेली. तोपर्यंत श्रीगजाननाच्या कृपेने सर्वकाही व्यवस्थित झाले होते.

                  रानामध्ये इंदुमतीला एक सुंदर देवालय दिसले. तेथील मूर्तीची बल्लाळ पूजा करीत होता. त्याला सुखरूप पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने परिचिताला विचारले, “तुम्ही बल्लाळाबद्दल मला उलटसुलट का सांगितलेत?" तो म्हणाला, "बाई, मी खरं तेच बोललो आहे.. तुम्हांला खोटं सांगून मला काय मिळणार? मी पाहिलेली आधीची परिस्थिती व आत्ताची स्थिती यामुळे मी स्वतःच संभ्रमात पडलो आहे. तुम्ही बल्लाळालाच विचारून खात्री करून घ्या." तेव्हा कोठे इंदुमतीचा राग शांत झाला. तिने धावत जाऊन पुत्राला आलिंगन दिले. काय घडले हे त्याला विचारले. बल्लाळाने बालसुलभ प्रांजळपणे तिला सर्वकाही सांगून टाकले. तिनेही त्याला कल्याणाची अवस्था सांगितली. तेव्हा 'आपल्या शापामुळे पित्यासमवेत या प्रेमळ मातेलाही दुःख भोगावे लागणार,' या विचाराने बल्लाळाचा चेहरा उतरला. इंदुमती त्याला म्हणाली, "बाळ, तुझ्या वडिलांनी तुझ्यावर अत्याचार केला म्हणून तू रागावू नकोस. घरी चल. तुझ्या पित्याला शारीरिक व्यंग व दारुण व्यथेतून तूच मुक्त करू शकतोस."

                 श्रीगजाननाच्या कृपाप्रसादाने ज्ञानी झालेला बल्लाळ आईला म्हणाला, "माते, कुठलं घर ? कोण माता ? कोण पिता ? आता गणपतीच माझे सारसर्वस्व आहे. तोच माझी माता. तोच माझा पिता, तोच आप्त, मित्र, सखा. तोच माझा हितकर्ता. तोच माझा रक्षणकर्ता. तोच कर्ता करविता. तोच सर्वज्ञ शासनकर्ता. या विश्वातील प्रत्येक प्राण्याला आपापल्या कर्मानुसार सुखदुःखादी फलप्राप्ती होत असते. ज्याने माझ्या भक्तीची निंदा केली, माझ्या देवाची अवहेलना केली, त्याचे मंदिर उद्ध्वस्त केले; त्याला त्याचे फळ मिळाले आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी अंतःकरणपूर्वक श्रीगजाननाला शरण गेलो आहे. माझे काय करायचे ते तोच ठरवील. तू माझा मोह धरू नकोस. घरी जा आणि धर्माला अनुसरून पतीची सेवाशुश्रूषा कर!"

             बल्लाळाचे बोलणे ऐकून इंदुमतीचा जीव गलबलला. दुःखावेगाने तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ती खिन्नपणे म्हणाली, "बल्लाळा, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी एकटी काय करू? आत्ता तूच आमच्या उद्धाराचा मार्ग सांग." तिचे केविलवाणे बोलणे ऐकून बल्लाळाचे मन द्रवले. तो म्हणाला, "आई, जे घडायचे ते घडून गेले आहे. त्यावर व्यर्थ चर्चा नको. जो दुःखभोग भोगण्यासाठी नियतीने तुमच्यासमोर आणून ठेवला आहे, तो भोगल्याशिवाय तुम्हांला पर्याय नाही. या जन्मात तुमचा उद्धार होणे नाही. पुढील जन्मात तू राजवंशात जन्म घेशील. तुझे नाव कमला असेल. तू भीम राजाची पत्नी होशील. त्या वेळी या जन्मातला तुझा पती दक्ष नावाने तुझ्या पोटी जन्म घेईल. तो जन्मतःच मुका, बहिरा, कुबडा व क्षतिग्रस्त असेल, कोणत्याही उपचारांनी त्याला बरे वाटणार नाही. व्रतवैकल्ये, तपश्चर्या व औषधोपचार यांनीही बरे वाटत नाही म्हणून राजा हतबल होईल. तो तुम्हां दोघांचा रागाने त्याग करील. निराधार अवस्थेत भटकंती करीत तू आपल्या पुत्रासह एका गावी येशील. तेथे गणेशाची आराधना करणाऱ्या ऋषीच्या अंगवाताच्या स्पर्शानि चमत्कार होऊन तुझ्या पुत्राची व्याधी पूर्ण बरी होईल. मग तो मनोभावे गणेशाची उपासना करील. त्या वेळी या जन्मातील देवर्निदेसारखी दुष्कर्मे त्याच्याकडून पुन्हा घडणार नाहीत. तुम्हां दोघांना गणपतीचे दर्शन होईल. त्याच्या कृपेने तुमचा उद्धार होईल."

            ते ऐकून इंदुमती व्यथित झाली. आता दुःखभोग भोगणे एवढेच तिच्या हाती होते. लोकांनी तिचे सांत्वन केले. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि घरी परतली. पतीची सेवा करू लागली. असे काही दिवस लोटले. बल्लाळ उपासनेमध्येच काळ व्यतीत करू लागला. कालांतराने त्याला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले. त्यात बसून तो स्वर्गलोकी निघून गेला. "

              भृगू ऋषींनी सोमकांत राजाला दक्षाचा पूर्ववृत्तान्त सांगून त्याने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. मग ते राजाला दक्षाचा पुढील वृत्तान्त सांगू लागले. ते म्हणाले, "राजा, मृद्गल ऋषींनी दक्षाला 'ॐ' या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर त्याने आपल्या मातेसहित उन्मत्त होऊ नकोस. न्याय, नीती, धर्माने प्रजापालन कर. सदैव पुण्यकर्मरत राहा. लोककल्याणासाठी तुला जे जे काही करता येणे शक्य आहे, ते सर्व कर. गो-ब्राह्मणांचे पालन व संरक्षण कर. आपल्या कर्तव्य पालनात कधीही कंटाळा करू नकोस कारण कर्तव्यतत्पर असणाऱ्यांवर देवांची कृपा आपल्याआपण होते.  तुला उत्तम आयुरारोग्य प्राप्त होवो !" तुझ्यावर अखंड कृपा गणपतीची राहो !

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या