Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ३ ते ४ || shri ganesh puran kathasar adhyay 3 to 4

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:-३ ते ४ 

सोमकांताचा राजपुत्राला उपदेश


श्रीगणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यै नमः ।। श्रीगुरुभ्यो नमः ।। श्रीकुलदेवाय नमः।। श्रीकुलस्वामिन्यै नमः || श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ।।

         सूत म्हणाले, "ऋषिजन हो। अशा प्रकारे आपल्या स्वकीयांचे व सेवकांचे उत्कट प्रेम पाहून सोमकांताचे हृदय गहिवरून आले. काय निर्णय घ्यावा याविषयी त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याने विवेकाने स्वतःला सावरले. तो राजपुत्राची समजूत काढू लागला. तो म्हणाला, "हेमकंठा, पितृभक्ती याचा अर्थ पित्यामागून त्याच्या सेवेसाठी वनात जाणे असा होत नाही. पितृआज्ञेत वागणे हाच खरा पुत्रधर्म हे तू लक्षात घे. "



              राजाने हेमकंठास एकांतात नेले. शास्त्राला अनुसरून आज्ञाधारी पुत्रच कसा सर्वश्रेष्ठ असतो हे त्याला पटवून दिले. त्याला कर्तव्यनिष्ठा कशी हवी? न्याय, नीती व धर्माने राज्यकारभार कसा चालवावा ? तसेच देव, गुरू, ब्राह्मण, प्रजाजन, शासन, धर्म व शत्रू या सर्वांच्या संदर्भात राजाचे आचरण कसे हवे यासंबंधी विस्तारपूर्वक सूक्ष्म विवेचन केले. तेव्हा कोठे तो राज्यकारभार सांभाळण्यास तयार झाला.



           हेमकंठाची अनुमती मिळताच सोमकांताने एका शुभमुहूर्तावर त्याला राज्याभिषेक केला. त्याला देवनगरच्या सिंहासनावर बसविले. या मंगल प्रसंगी त्याने आपल्या सर्व प्रधानांचा सन्मान केला, कलावंतांचा व गुणिजनांचा सत्कार केला, ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म केला. या आनंद सोहळ्याला दुःखाची किनार होती, म्हणून राजाने प्रजाजनांनाही मुक्तहस्ते दानधर्म केला. काही लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. त्या सर्वांना 'मी वनवासात गेलो तरी तुम्ही शोक करू नका. निराधार वाटून घेऊ नका. तुमची काळजी घेण्यास राजपुत्र समर्थ आहे,' असे सांगून त्यांचे सांत्वन केले. त्याने विद्याधीश, रुद्रवान व  क्षेमंकर या आपल्या तीन प्रधानांना राजपुत्राची काळजी घेऊन त्याला राज्यकारभारात मदत करण्यास सांगितले.



             अशा प्रकारे राज्याची व्यवस्था लावून सोमकांत आपली पत्नी आणि सुबल व ज्ञानगम्य या दोन प्रधानांना बरोबर घेऊन अरण्याकडे निघाला. हेमकंठाने आपल्या जन्मदात्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तेव्हा सुधर्मा राणीने त्याला पतिव्रतेचा धर्म आणि पुत्राचे कर्तव्यधर्म याविषयी पुन्हा एकदा उपदेश केला. राजा व राणी अरण्यात गेल्यावर प्रजेचे सांत्वन करून तो प्रधानांच्या सहकार्याने राज्यकारभार पाहू लागला. 

अध्याय समाप्त

 

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या