Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय २५ ते २७ || shri ganesh puran kathasar adhyay 25 to 27

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- २५ ते २७ 

१३. दक्षाला राज्यप्राप्ती, भीम राजाला पुत्रप्राप्ती


         भृगू ऋषी सोमकांताला म्हणाले, "राजा, कौंडिण्यपुराजवळील अरण्यात एका जीर्ण देवालयात दक्ष बारा वर्षे राहत होता हे मी तुला आधीच सांगितले आहे. त्याला स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर काही दिवसांनी कौंडिण्यपुरचा राजा मरण पावला. तो निपुत्रिक होता. त्याच्या मृत्यूने राणी सुलभा, प्रधानद्वय सुमती व मनोरंजन, राजपरिवार व प्रजाजन शोकग्रस्त झाले. दुःखावेगाने सर्व नगरच रडत होते. मान्यवरांना 'आता पुढे काय करायचे?' असा प्रश्न पडला होता. तेव्हा राजपुरोहिताने सर्वांना एकत्र बोलाविले. तो म्हणाला, "महाराजांच्या निधनाने आपल्या सर्वांवरच मोठा आघात झाला आहे. 

                जो जन्माला येतो त्याचा मृत्यूही निश्चित असतो. मरणारा मनुष्य गुणवान, शीलवान व उपकारी असेल तर त्याच्या जाण्याने अधिक दुःख होते. त्यामुळे महाराजांच्या मृत्यूने आपणा सर्वांना किती शोक झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. अशा प्रसंगी नेमके काय करावे हेही बहुधा सुचत नाही. तथापि कुठेतरी दुःख आवरावेच लागते. तुम्ही असाच शोक करीत बसलात, तर महाराजांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यांच्या देहावर अग्निसंस्कार करणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे. तरी पुढील व्यवस्थेला लागावे. " राजपुरोहिताच्या विनंतीला मान देऊन मंडळींनी शोक आवरला.  अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली. राजा निपुत्रिक असल्यामुळे सुमती प्रधानाच्या हातूनच त्याचे उत्तरकार्य करण्यात आले. राजाला तिलांजली दिल्यावर सर्व मान्यवर राजवाड्यात आले. सुलभा राणीचे सांत्वन करून ते सर्व जण स्वगृही गेले.

                राजाने आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता, राजसिंहासन रिकामे ठेवणे हेही योग्य नव्हते. प्रजाही चिंतेत होती. गादीवर कोणाला बसवायचे असा राणीला व राजाच्या एकनिष्ठ सेवकांना प्रश्न पडला होता. योगायोगाने त्याच समयी मद्गल ऋषींचे कौंडिण्यपुरात आगमन झाले. प्रधानाने त्यांचे स्वागत केले. त्यांना आपली चिंता सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली. ते म्हणाले, "सुमंता, तुमच्या राजाचा 'महान' नामक एक हत्ती आहे. तू त्याच्या सोंडेत एक रत्नमाला दे. त्याला नगरातून फिरवून आण. तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला तुम्ही सन्मानाने राज्याभिषेक करा. त्याच्या अधिकारात राज्यकारभार चालवा. माझा तुम्हां सर्वांना आशीर्वाद आहे. "

                         मुगल ऋषींवर राजपरिवाराची श्रद्धा होती. म्हणून त्यांनी सुचविलेल्या पर्यायाला सुलभा राणीने व प्रधानांनी तत्काळ मान्यता दिली. मग एका शुभदिनी शुभमुहूर्तावर श्रृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत राणीने रत्नमाला दिली. हत्तीला उद्देशून ती म्हणाली, "महाराजांचे तुझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यानंतर कौंडिण्यपुराच्या राजसिंहासनावर जो पुरुष बसण्यास योग्य असेल त्याच्याच गळ्यात तू ही रत्नमाला घाल अशी माझी तुला विनंती आहे."

                          राजाची निवड होणार म्हणून लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्या दिवशी सर्व नगर शृंगारण्यात आले होते. रस्तोरस्ती, चौकाचौकांत लोकांची दाटी झाली होती. त्या हत्तीने आपल्यालाच माळ घालावी असे प्रत्येकाला वाटत होते. प्रधानांनी हत्तीला राजवाड्यातून समारंभपूर्वक बाहेर काढले. त्याला नगरातून फिरविले, पण त्याने कोणाच्याही गळ्यात रत्नमाला घातली नाही. मग तो अरण्यात प्रवेशला. दक्ष राहत असलेल्या देवालयापाशी गेला. तेथे दक्ष गणेशपूजनात मग्न होता. हत्तीने ती रत्नमाला त्याच्या गळ्यात घातली. ते पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या. मंगलवाद्यांनी एकच गजर केला.

             हा काय प्रकार आहे हेच दक्षाला कळेना. तो संभ्रमित झाला. प्रधानाने पुढे येऊन त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि राजसिंहासन स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा दक्षाला खूपच आनंद झाला. अशा प्रकारे त्याला स्वप्नदृष्टांताची प्रचिती आली. श्रीगजाननाच्या कृपेनेच हे सर्व घडून येत आहे म्हणून त्याने आपल्या आराध्य दैवताला कृतज्ञतेने नमस्कार केला. हा नवीन राजा तपस्वी आणि भाविक आहे हे पाहून प्रधानांना परम संतोष वाटला. लोकांनाही हा नवा राजा पसंत पडला. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचा जयजयकार केला. दक्षाला मंगलवाद्यांच्या निनादात मिरवणुकीने वाजत-गाजत राजप्रासादात नेण्यात आले. त्याचा उत्तम आदरसत्कार करण्यात आला. मग एका उत्तम मुहूर्तावर त्याला राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या पुत्रांचे ते कौतुक पाहून कमला राणीच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्या मंगल प्रसंगी दक्षाला आशीर्वाद देण्यासाठी मुद्गल ऋषी स्वतः उपस्थित होते. 

                   दक्षाने त्यांची पूजा केली. त्यांचा थोर सन्मान केला. त्यांना अगणित संपत्ती व अनेक गावे वतन म्हणून दिली. ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म करून संतुष्ट केले. नवीन राजा मिळाला म्हणून प्रजेनेही महोत्सव केला. हे वृत्त कर्णोपकर्णी दक्षाच्या पित्याला समजले. तोही लवाजम्यासह आपल्या पत्नीला व पुत्राला भेटण्यास आला. त्याने पूर्वकृत्यांबद्दल त्या दोघांची क्षमा मागितली. तेव्हा दक्ष हा राजपुत्र आहे या वृत्ताने प्रजाजनांना खूपच आनंद झाला. दक्षाला राज्यप्राप्ती झाल्यानंतर काही दिवसांनी गणपतीने वीरसेन राजाला स्वप्नदृष्टांत देऊन त्याच्या उपवर कन्येचा विवाह दक्षाशी करून देण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे दक्षाचा वीरसेनाच्या कन्येशी थाटात विवाह झाला. या दांपत्यास बृहद्वानू नावाचा पुत्र झाला. बृहद्भानूला हलधर, हलधराला सुशील, सुशीलास पद्माकर, पद्माकरास रिपुगर्दी व रियुमस चित्रसेन नावाचा पुत्र झाला. या वंशपरंपरेत चित्रसेनाचा पुत्र भीम हा तू आहेस."

                  विश्वामित्रांच्या मुखातून आपल्या पूर्वजांची कथा व वंशपरंपरा जाणून घेतल्याने भीम राजास खूपच आनंद झाला. विश्वामित्रांनी त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि राज्यात परत जाण्यास सांगितले.. त्यांच्या आज्ञेनुसार आपली पत्नी व प्रधानांसह तो नगरात परतला. त्याला सुखरूप पाहून प्रजाजन सुखावले. त्यांनी आपल्या राजाला व राणीला मिरवणुकीने वाजत-गाजत राजवाड्यात आणले. 

               पुढे एका शुभदिनी भीम राजाने विश्वामित्रांनी सांगितल्याप्रमाणे गणेश- अनुष्ठानास प्रारंभ केला. तो एकाग्र चित्ताने मंत्रजप करीत असे. या उपासनेच्या प्रभावाने त्याची चित्तवृत्ती गजाननमय झाली. त्याला सर्वांठायी गणपतीचेच दर्शन होऊ लागले. काही दिवसांनी गणपतीने त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले. राजाला आशीर्वाद देताना तो म्हणाला, "भीमा, तुझा भक्तिभाव आणि तपश्चर्या पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर लवकरच तुला एक विद्वान, पराक्रमी आणि सद्रणी पुत्र होईल." त्या वरदानाने भीम राजा धन्य धन्य झाला.

                 काही कालावधीनंतर राणी गर्भवती राहिली. तिने एका तेजस्वी आणि देखण्या पुत्रास जन्म दिला. राजाची इच्छा पूर्ण झाली. त्याने पुत्रजन्माप्रीत्यर्थ महोत्सव केला. अपार दानधर्म केला. बाराव्या दिवशी राजपुत्राचे थाटामाटात बारसे केले. त्याचे 'रुक्मांगद' असे नाव ठेवले.

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या