।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-१९
कलिंग वेश्येसह गोरक्षनाथ सारथी बनून स्त्री राज्याकडे निघाले
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
कानिफाकडून गोरक्षाला कळाले होते की, मच्छिंद्रनाथ राज्यात आहे. हा तो देशामागून देश ओसीमेवर पोहोचला. तो त्याला काही नर्तिका आत जातांना दिसल्या. त्यातली मुख्य होती तिचे नाव होते कलिंगा. ती म्हणाली, "आम्ही स्त्री राज्यात जात आहोत. मैनाकिनी राणीसमोर नृत्यकला दाखवून आम्ही तिजकडून पुष्कळ धन मिळवून सुखी होऊ."
गोरक्ष म्हणाला, "मी तुमचा साथीदार होता" तुला काही कला येते का ? गोरक्ष म्हणाला. "मी गायन करीन, मृदुंग वाजवीन." ती म्हणाली, असे म्हणतोस तर येथेच दाखव तुझे कौशल्य." गोरक्षाने भस्म मंत्रून कपाळाला लावले, ओठांना लावले, दाही दिशांना फेकले व वाद्याला लावले. त्याने गंधर्वप्रयोग केला होता. त्यामुळे असा चमत्कार झाला की, वृक्ष व दगडसुद्धा गायन करू लागले, वाद्ये वाजवू लागले. तो वनभाग स्वरांनी भरून गेला. तो प्रकार पाहून कलिंगा चकित झाली. तिला त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला. तिने मनात विचार केला, आपण याच्याच संगतीत राहावे. आपले कल्याण होईल. गोरक्षाला नाव विचारले पण गोरक्षाने 'पूर्वडा' असे आपले खोटेच नाव सांगितले. आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचण येतील, असे त्याला वाटले. गोरक्ष तिला म्हणाला, "मी वैरागी आहे. विषयभोग मला नको आहेत. धनसंपदा मला नको. एका वेळेस पोटापुरते मिळाले की झाले."
कलिंगा म्हणाली "ठिक आहे तेवढी गरज सहज भागेल. तू एक मात्र लक्षात ठेव. स्त्रीराज्यात तुला पुरूषवेषाने येता येणार नाही. तेथे पुरूष मरतात. मारूती भुभु:कार करतो. त्याचा प्रभावच असा आहे की त्यामुळे स्त्रिया गर्भ धारण करतात. पण मुलगा असला तर मरतो. मुलगीच फक्त जगते." गोरक्ष म्हणाला, "मारूतीचे भय मला नाही. तुम्ही चिंता नका करू. माझे योगबळ जास्त आहे." मग त्याने कलिंगा व इतर नर्तिका यांसह रथात बसून स्त्रीराज्यात प्रवेश केला. त्याने सीमेवरच वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांचा संरक्षक प्रयोग करून ठेवला. ती सर्वमंडळी व गोरक्ष यांनी चिनापट्टण या गावात पहिल्या रात्री वस्ती केली. एक प्रहर रात्र झाली, चंद्र उगवला.
चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असतांना मारुती स्त्रीराज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला तोच जास्त त्याच्या छातीवर आवळले. तो खाली पडला तोच स्पर्शास्त्रामुळे जमिनीत चिकटून राहिला. मोहनास्त्रामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला आणि नागास्त्राने हातापायांना विळखा पडून मारुतीचे प्राणही कासावीस झाले. तेव्हा "हा कोणी तरी महाप्रतापी योगीच आपला शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला रामप्रभूच आहे. दुसरा कोणी नाही. " असे स्मरण होऊन मारूती रामाचा धावा करू लागला.
तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम तेथे प्रकट झाले. त्यांनी इंद्रास्त्राने वज्रास्त्र निवारण केले, विष्णूच्या रुपाने मोहनास्त्र, गरुडास्त्राने नागास्त्र व विभक्तानाने स्पर्शास्त्र नाहिसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. मारुती व श्रीराम 'हे अस्त्रवळ कोणाचे? याचा विचार करू लागले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने जाणले की, नवनाथांपैकी हरि अवतार जो गोरक्ष त्याचेच हे कृत्य आहे. तो स्त्रीराज्यात आला आहे व चिनापट्टण गावात वस्तीला आहे. त्याने मारुतीला सांगितले. तेव्हा मारूती म्हणाला, "मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ परत घेऊन जाईल. तेच टाळावयाचे आहे.
तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळवा, माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकाच !" श्रीरामाने मान्य केले व दोघे शास्त्रे जाणणाऱ्या ब्राह्मणांची रुपे घेऊन चिनापट्टण गावात गेले. गोरक्ष निजला नव्हता. तो मच्छिंद्रनाथाचे स्मरण करीत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता. त्याच्यासमोर दोघे आले व त्याला नमस्कार करून बसले. मग गोरक्षाची श्रीरामाने प्रशंसा केली. त्याच्या दया, क्षमा, शांति, विरक्ति, विनय, निर्वैरीपणा आदि गुणांची फारच वाखाणणी केली. गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणाला, "मित्रहो, मी तर स्वतःच बैरागी. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा." ते म्हणाले, "आम्ही सांगू पण तू नाकारशील. आम्ही याचक ब्राह्मण, तू वचन दे, मग सांगतो." गोरक्ष मोठा सावध होता.
तो विचार करू लागला, "या स्त्रीराज्यात पुरुष कसा येईल? आला तर मरेल. बरे सीमेवर आपण अस्त्रे पेरली आहेत. कसा येईल? देवता सुद्धा त्यात अडकतील. मग रात्री-अपरात्री हे ब्राह्मण येथे येतात नि माझी प्रशंसा करतात. मी एकटाच यांना हवा आहे. यांचा हेतू तरी काय असेल ? हे कोणीतरी महान देवच असतील. मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे. ते सोडून दुसरे काहीही बोलणे यांनी काढले तरी चालेल.” मग तो मोठया विनयाने त्या ब्राह्मणांच्या पाया पडून म्हणाला, "स्त्रीराज्यात कोणीही पुरूष येणार नाही. मी पेरलेली अस्त्रे ओलांडून सुद्धा तुम्ही आलात, तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे. तुम्ही साक्षात विष्णू, महेश किंवा ब्रह्मदेव असाल.
माझ्याजवळ माझी नाथपंथाची सामग्री तेवढी आहे. तुम्हाला मी काय वचन देणार?" असे बोलून तो त्यांच्या पाया पडला. श्रीरामाने मारुतीला खुणेने असे दाखविले की, आता आपले खरे स्वरुप याला दाखविले पाहीजे. मग श्रीराम व मारुती तिथे स्वतःच्या रुपातच प्रकट झाले. श्रीरामाने गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हटले, "गोरक्षनाथ, मैनाकिनीने मारुतीकडून वरदान मिळवले आहे, वचन घेतले आहे व तुझे गुरु मच्छिंद्र यांना मागून घेतले आहे. तू इथे आला आहेस, पण मच्छिंद्रनाथांना तू परत नेऊ नयेस अशी मारुतीची इच्छा आहे. "
गोरक्ष म्हणाला, "तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने ठिक आहे. पण आम्ही नाथपंथी. मच्छिंद्राने स्त्रीविलासात रमून रहावे हा आमच्या पंथाला काळिमा आहे. मी त्याला घेऊन जाणारच. तुम्ही काहीही म्हणा. आकाश खाली कोसळले, मेरुमांदार फुटून त्याचे तुकडे झाले, पृथ्वीप्रलय झाला तरी यात बदल होणार नाही. सांगून ठेवतो." हे त्याचे निर्धाराचे वचन ऐकून मारुती फारच संतापला होता, पण श्रीराम त्याला म्हणाले, "वायुपुत्रा, हे नाथपंथी माझे प्रिय भक्त आहेत. तू पण माझा भक्त आहेस.
अरे, त्यांच्या कार्यात तू अडथळा आणणे योग्य नव्हे. राग आवर." श्रीराम मग गोरक्षाला म्हणाला, "गोरक्षनाथा, तुम्ही आपसात भांडू नका. मी आता स्वस्थानी जातो." तेव्हा गोरक्ष भावनेने भरून जाऊन म्हणाला, "प्रभू रामचंद्रा, मी अस्त्रे मंत्रून सीमेवर तुमच्या भक्ताला अडविले. तो माझा प्रमाद आहे. मला क्षमा करावी. माझी अस्त्रे काढून टाकण्यासाठी स्वतः रामप्रभुंना श्रम पडावे ? मला क्षमा करा." गोरक्षाचा विनयशील स्वभाव पाहून श्रीरामाने त्याला पुन्हा प्रेमाने पोटाशी धरले. त्याला निरोप देऊन तो आपल्या ठिकाणी गेला.
अध्याय फलश्रुती :- परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल.
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.