।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-२०
चलो मच्छीन्द्र गोरख आए
श्रीराम आपल्या स्थानी परत गेले. मारुती मैनाकिनी जेथे होती त्या गावी गेला. त्याला पाहताच मैनाकिनीने नमस्कार केला. मारुती तिला म्हणाला, "मैनाकिनी, तुला मी वचन दिले त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचा व तुझा संग घडवून आणला आहे. तुम्हांला मीननाथ हा मुलगाही झाला आहे. आता मात्र मच्छिंद्राला हे राज्य सोडावे लागणार असे दिसते. त्याचा शिष्य गोरक्ष मोठा सिद्ध प्रतापी आहे. तो येथे आला आहे. त्याने माझाही पराभव केला. मच्छिंद्राला येथून घेऊन जायचा त्याचा निर्धार आहे. तू काहीही करून, गोड बोलून, त्याला येथेच रमव. नाहीतर मच्छिंद्रनाथ गेलाच म्हणून समज!" मारुतीने हे सांगितले तेव्हा मैनाकिनी घाबरून गेली.
मैनाकिनी पूर्वी सिंहलद्वीपात रहात असे. तेथे ती सर्वांत सुंदर होती, म्हणून तिला पश्चिमी असे नाव पडले होते. एकदा सिंहलद्वीपात ती आपल्या महालात स्नान करून उंच सौधातलावर शुभ्र वस्त्र नेसून उभी होती. आकाशात सहज तिची दृष्टी वळली. त्याच वेळी आकाशात उपरिचर वसू विमानातून जात होता. वाऱ्याने त्याचे वस्त्र दूर होऊन त्याचे गुप्त अंग तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा ती पटकन हसली, बसूला ते ऐकू आले व ती का हसली तेही त्याच्या लक्षात आले. तो रागावला. त्याने शाप दिला, "तुझ्या मनात मजविषयी कामविकार उठला. तू हसलीस, तुला स्त्रीराज्यात रहावे लागेल. तिथे तुला कोणीही पुरुष दिसणार नाही." तिने त्यांची प्रार्थना करुन उःशाप मागितला.
तेव्हा तो म्हणाला, "स्त्रीराज्यात कीलोतला नावाची राणी आहे. तिचा मृत्यु झाल्यावर तेथे तूच राणी होशील. मारुतीची तू आराधना कर. मग तो प्रसन्न होईल. तू त्याला सांग, "आमच्या स्त्रीराज्यात केवळ तुमच्या भुभुःकाराने संतती होते व स्त्रीसंतती जगते. पुरुष जन्मालाच येत नाही. तुमचा प्रत्यक्ष अंगसंग मिळावा. ते सुख मला मिळावे." मारुती वचनात गुंतेल तो सांगेल, "नवनाथांचा मुख्य मच्छिंद्रनाथ येथे येऊन राहील. त्यापासून तुला सुख मिळेल. मैनाकिनी, तुझ्या मनात माझ्याबद्दल आसक्ती उपजली आहे, म्हणून मच्छिंद्रनाथ हा माझाच अंश तुझ्याशी संसार करील व मीननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईन. मग तू पुन्हा परत स्वस्थानी येशील. "
तो शाप मिळताच मैनाकिनी स्वतःचा विसर पडून आपला देश सोडून भटकत स्त्रीराज्यात गेली. तिथे किलोतला नावाची राणी होती. ती वृद्ध झाली होती. तिने आपल्या मागून राणी कोणाला करावे हे ठरविण्यासाठी एक हत्तीण गावात फिरवली. तिने मैनाकिनीच्याच गळ्यात माळ घातली. मग त्या राणीनंतर सर्व स्त्रियांनी मैनाकिनीच्याच गळ्यात माळ घातली. मग त्या राणीनंतर सर्व स्त्रियांनी मैनाकिनीलाच राणी केले. मग तिने मारुतीची आराधना केली व त्याने वर दिला त्याप्रमाणेच मच्छिंद्रनाथ तिथे आला व संसारात रमला. त्या दोघांचा मीननाथ हा मुलगा म्हणे उपरिचर वसूच होता. मैनाकिनी राणी होताच तिला कीलोतला असेही नाव पडले होते.
गोरक्षनाथ व कलिंगा त्यांच्यासह नर्तनकुशल स्त्रियांचा जथा शृंगमुरूड गावात आला. आपण आल्याची वर्दी कलिंगाने राणीकडे पाठविली. गोरक्षनाथ कलिंगेला म्हणाला, "मला मृदुंग वाजवण्याचे काम दे." कलिंगा म्हणाली, "तुमचा हा पुरुषयेष तिथे उपयोगी नाही. तिथे तुम्हाला आत घेणार कोण?" गोरक्षनाथ म्हणाला, "मी स्त्रीरूप घेतो." त्याने तत्काळ मंत्र म्हणून स्वतःचे रुपांतर स्त्रीमध्ये करून घेतले. कलिंगेला तो ओळखूही येईना. गोरक्ष म्हणाला, "आता पहा." कलिंगा व तिच्याबरोबरच्या स्त्रिया म्हणाल्या, "वा!" अप्सरेसारखे तुमचे हे रूप पाहून कोणीही भुलेल.' कलिंगासुद्धा त्याच्यापुढे फिकी पडली. मग गोरक्षाने मृदुंग घेतला. सर्वजणी त्या दिवशी सभामंडपात गेल्या. मुख्यस्थानी मच्छिंद्रनाथ बसला होता. त्याच्याजवळ मैनाकिनी व त्यांच्या मधल्या सिंहासनावर मीननाथ बसला होता.
कलिंगा व तिच्या सख्या पैंजण बांधून नर्तन करू लागल्या. वाद्ये वाजू लागली. मृदंगावर गोरक्षाने असे काही ताल व बोल वाजवून दाखविले की सभेतील सर्व स्त्रिया थक्क झाल्या. त्यावेळी गोरक्षाने मृदंगाच्या साह्याने असे बोल काढले की, ऐकतांना "चलोss मच्छिंदर गोऽऽरख आऽयाऽऽ" असा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज हुबेहूब माणसासारखा येत होता. तो ऐकताच मच्छिंद्रनाथ दचकला. कलिंगा तर संचार झाल्यासारखी नाचत होती. गोरक्षाला गंधर्वच अनुकूल होते. त्यामुळे संगीत, नृत्य, हावभाव, ताल, ताना, सगळे काही अलौकिकामधून गोरक्षाच्या मृदुंगातून शब्द उमटत होते. "चलोऽऽ मच्छिंदर गोरख आडयाऽऽ!!" आणि मच्छिंद्रनाथाची मुद्रा तर लाजेने काळवंडली. किलोतला जवळ बसली होती. तिने काळजीने त्याला विचारले. तो म्हणाला, "काय सांगू? 'गोरख आया' असे शब्द मृदुंगातून निघतात. काय भुताटकी आहे कळत नाही. गोरक्ष आला तर मला जावेच लागेल!"
तेव्हा मैनाकिनीने मृदंगधारी तरुणीला एकीकडे बोलावून सरळच विचारले, ती तरुणी म्हणाली. "मला काही माहीत नाही. इतर वाद्ये वाजवून पाहा." मग मैनाकिनीने इतर वाद्ये वाजविण्यास सांगितली. कलिंगा व इतर स्त्रिया यांनी ती वाद्ये घेतली व स्वर काढले, तरी त्यातूनही "चलोड मच्छिंदर गोऽरख आयाऽऽ" असेच स्वर निघू लागले. राणी समजून चुकली, गोरक्ष याच मंडळीत आहे. तिने मृदंगधारी स्त्रीला पुन्हा विचारले, "तुला तुझ्या गुरूची शपथ आहे. खरे काय ते बोल. तू कोण आहेस?" तेव्हा मात्र गोरक्ष म्हणाला, "माई, मी खरोखरी स्त्री नाही. मी गोरक्षच, मच्छिंद्रनाथांचा आवडता शिष्य आहे. मी स्त्रीरूप घेतले आहे. मच्छिंद्रनाथांना घेऊन जायलाच मी आलो आहे!"
तेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला पुन्हा पुरुषरूप धारण करण्यास सांगितले. तो मूळ रुपात दिसू लागला. तेव्हा मच्छिंद्राने पटकन उठून गोरक्षाला मिठी मारली. ती गुरूशिष्यांची भेट काय वर्णावी? दोघांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा चालल्या होत्या. किती बोलू, असे झाले होते. त्याने गोरक्षाला सर्व वृत्त विचारले. त्यानेही "बदरिकाश्रमात बारा वर्षे तप केले, मग तुमचा शोध घेत हिंडत राहिलो. कानिफनाथकडून माहिती कळाली. शोधता शोधता येथे आपले दर्शन झाले." असे सांगितले. मग मच्छिंद्रनाथाने प्रेमाने एका मांडीवर गोरक्षाला व दुसऱ्या मांडीवर मीननाथाला बसविले. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला आपल्या हाताने सुग्रास अन्न भरविले. रात्रभर त्यांच्या गोष्टी संपेनात.
अध्याय फलश्रुती :- मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल.
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.