Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २१ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 21

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२१ 

 गोरक्षनाथ, मच्छीन्द्रनाथ, मीननाथ यांची तीर्थयात्रा 

॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

                

मैनाकिनी गोरक्षाला प्रेमाने वागवी पण गोरक्षाचे तिकडे लक्ष नसे. तो मच्छिंद्राजवळ बोलणे काढी. "गुरूमहाराज, तुम्ही या देशात रहाता हे योग्य नाही. मसणवटीत श्रीलक्ष्मीची मूर्ती ठेवावी, तसे होते आहे हे. एकवीस स्वतले भोग तुम्ही तुच्छ मानलेत रोपही  काय पडलात? तुमचे 'अवतारकार्य काय आहे? तुम्हीच मोहात पडलात, तर लोकांचे डोळे कसे उघडणार? आता हे मोह सोडून परत मोकळे व्हा. माझा जीव कळवळतो म्हणून बोलतो. मी तुमच्यासाठीच केवळ आलो आहे, जागे व्हा !" तेव्हा मात्र "गोरक्षा, तू म्हणतोस ते खरे आहे. मी तुला वचन देतो. 

                मी हा देश सोडून तुझ्याबरोबर येईन." असे मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला व हातावर हात ठेवून त्याने आणाभाका घेतल्या. मच्छिंद्र आपल्याबरोबर येणार म्हणून गोरक्ष आनंदित झाला होता. त्या रात्री मच्छिंद्र मैनाकिनीला म्हणाला, "मैनाकिनी, गोरक्ष मला घेऊन जाईन म्हणतोय. पण तूच त्याला आग्रह करून पाहा." दुसरे दिवशी मैनाकिनी गोरक्षाला म्हणाली, "गोरक्षा तू मला मोठ्या मुलाप्रमाणे आहेस. तू व हेच नाथ मिळून हे राज्य सांभाळावे. आम्ही अबला स्त्रिया. मीननाथ तर लहानच आहे अजून. आम्ही तुझ्या आसऱ्याने अन्नवस्त्राएवढीच सत्ता ठेवून राहू. तू राज्य सांभाळ व मीननाथाला पण सांभाळ !"

              तिचे हे बोलणे ऐकून गोरक्षाचे मन विचलित झाले नाही. गुरूमच्छिंद्र यांना घेऊन तीर्थयात्रेला निघतो, असे त्याने सांगितले, मग मैनाकिनीने फारच आग्रह केला, तेव्हा त्या राज्यात सहा महिने आणखी राहून वर्ष पाडव्याला काहीही करून निघावयाचे असे ठरवून घेऊन गोरक्षनाथाने. तिच्या म्हणण्याला होकार दिला. मैनाकिनीने त्याला स्त्री, संपत्ती, खाद्यपेये, वस्त्रेप्रावरणे इत्यादिनी मोहविण्याचे हर प्रयत्न केले, पण कशाचाही काही परिणाम झाला नाही. एकदा तर एका चुणचुणीत तरुण सुंदर मुलीला त्याच्याकडे पाठविले. त्याच्याजवळ सोंगट्या खेळण्याचा हट्ट तिने धरला. त्याने सोंगट्यांच्या खेळात भाग घेतला. तिने शृंगारिक हावभाव, सलगी वगैरे करून भुलविण्याचा प्रयत्न केला पण त्याने कशाकडेही लक्ष दिले नाही. ही युवती फसली तरी तिने 'सर्व राज्य तुझेच आहे' असे वारंवार सांगून मीननाथाला त्याला लळा लागतो का ते पाहून अनेक प्रकारे त्याला गुंतविण्याचा प्रयत्न केला. पण सहा महिने उलटले, तरी गोरक्ष तसाच अलिप्त राहिला.

           गोरक्ष राहिल्याला एक वर्ष झाले. वर्ष पाउना आला. दरवर्षाप्रमाणे गुढ्यातोरणे उभारली. पण किलोतला दुःखी होती. मच्छिंद्रनाथ आज निघून जाणार. एवढी वर्षे त्याचा सहवास लाभला होता. मीननाथाचा जन्म झाला, तेव्हापासून तर किलोतला फारच आनंदात राहत होती. मच्छिंद्राचा 'मायामच्छिंद्र' करण्यात ती यशस्वी झाली होती. पण गोरक्षाची गुरूभक्ती तिच्या प्रेमाहून सरस ठरली होती. म्हणूनच तिचा आज विर झाला होता. गोरक्षाने मच्छिंद्रासमोर कुबडी, झोळया, फावडे, शिंगी आणून ठेवली व आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेवून म्हटले, "महाराज, चला हा वेष, ही सामग्री घ्या." किलोतला मच्छिंद्राजवळ बसलेली होती. तिने अश्रुपूर्ण डोळ्यांनी गोरक्षाला विनविले, "भोजन करून मग जा!" ते मान्य करून गोरक्ष, मच्छिंद्र, मीननाथ यांनी भोजन केले. भोजनानंतर मच्छिंद्राला ती म्हणाली, "मीननाथाला तुम्हीच बरोबर घेऊन जा." मच्छिंद्र मीननाथालाही नेण्याचे ठरविले आणि तिघेही निघाले, तेव्हा मैनाकिनी दुःखाने आक्रोश करू लागली.

             राजवाडा सोडून गोरक्षाने बाहेर पाय टाकला. तेवढ्यात गोरक्षाचा डोळा चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वीट गुपचूपपणे मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली, गोरक्षाला ते काही कळले नाही. मग गावातील स्त्रियांचे रुदन ऐकून त्याचा प्रभाव मच्छिंद्रावर पडू नये म्हणून गोरक्ष त्याला व मीननाथाला घेऊन बाहेर चालला. तेव्हा एका हाताने मीननाथाला कुरवाळीत व दुसऱ्या हाताने मच्छिंद्राचा हात ओढीत, कठोर गोरक्षनाथाच्या विनवण्या करीत मैनाकिनी रडत रडत त्यांच्यामागे निघाली. जास्तीत जास्त वेळ त्यांना डोळ्यांत साठवून घेण्याचा ती प्रयत्न करीत होती. पण गोरक्ष जरा त्वरेनेच निघाला. आपण जेवढा जास्त काळ थांबू तेवढा त्या राणीचा शोक वाढतच जाणार होता, हे त्याने ओळखले.

          मैनाकिनीला मागे वळून एक नमस्कार ठोकून गोरक्षनाथ म्हणाला, "मच्छिंद्रनाथ, चला या जंजाळातून लवकर बाहेर पड़ा. मैनाकिनी, उपरिचर वसू विमान घेऊन येतील, तोवर धीर धर." आणि तो अग्निसारखा तेजस्वी गोरक्षनाथ, गुरू व गुरूपुत्र यांना घेऊन त्या स्त्रीराज्यातून बाहेर पडला. सर्व स्त्रीराज्य त्या गुढीपाडव्याच्या दिवशी रडत होते. संसाराची माया दुस्तर असते. प्रत्यक्ष आपला गुरूच त्या मायेत सापडला. मारुतीच्या मैत्रीचे निमित्त आणि विरक्तीवर आसक्तीचा डाग, हे सर्व पाहून गोरक्षाने प्रयत्नांची शर्थ करून त्याला मोहपटलातून बाहेर काढले. शिष्य गुरूच्या उपयोगी पडला. धन्य गोरक्ष ! धन्य नाथपंथाचा रक्षणकर्ता !!

           मैनाकिनी शून्य मनाने रडून सुजलेल्या डोळ्यांनी मच्छिंद्रनाथ बसत असे त्या आसनाकडे टक लावून पाहात राहिली. त्याच्या ज्या ज्या वस्तू होत्या, त्या कवटाळून हंबरडा फोडून रडू लागली. तिचा आक्रोश गगनाला भिडला. सख्या व दासी तिचे सांत्वन करू शकल्याच नाहीत. उपरिचर वसूनं तो आक्रोश ऐकला. त्याने गगनातून जातांना आपले विमान खाली वळविले आणि अंगणात रडत असलेल्या मैनाकिनीला तो म्हणाला, "मी दिलेल्या शापातून तुझी सुटका झाली आहे. चल, सिंहलद्वीपात परत चल. मी तुला न्यायला आलो आहे." ती चकित होऊन पहातच राहिली.

अध्याय फलश्रुती :- गो- हत्येचे पातक संपेल व तपोलोकत प्रवेश होईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या