Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा- ४ ) / Shri Devi Mahatmya Katha 4

श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय चौथा 

 इंद्रादिदेवतांद्वारा देवीची स्तुती 


          सिद्धीच्या प्राप्तीसाठी भक्तजन जिची आराधना करतात, सर्व देवदेवता जिच्या भोवती हात जोडून उभ्या असतात, जिच्या शरीराची कांती नीलमेघाप्रमाणे आहे, जी आपल्या केवळ कटाक्षाने शत्रुंना भयभीत करते, जिच्या मस्तकावर चंद्ररेखा शोभून दिसते, जिने आपल्या हातात शंख, चक्र, कृपान व त्रिशूल धारण केला आहे, जी त्रिनेत्रधारी आहे, जी सिंहावर आरूढ होऊन आपल्या तेजाने त्रैलोक्य भरून टाकते, त्या जया नावाच्या दुर्गा देवी चे ध्यान करावे. 

||श्री गणेशाय नमः||श्री देव्यै नम:|| 

          मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “राजा, मी तुला देवीची कथा सांगतो. ती मोठ्या श्रद्धेने श्रवण कर. हीच कथा सूतांनी शौनकादिकांना सांगितली होती. मार्कंडेयांनी शिष्यांना सांगितली होती. देवीने मोठा पराक्रम करून महिषासुराला ठार मारले. त्यामुळे अतिशय आनंदित झालेले इंद्रादी देव जगदंबेची स्तुती करू लागले. त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. देवीला साष्टांग नमस्कार घालून ते म्हणाले, “सर्व देवतांच्या शक्तीचा समुदाय जिचे स्वरूप आहे, जिने आपल्या शक्तीने सर्व जगाला व्यापले आहे, सर्व देवता व ऋषी महर्षी जिची पूजा करतात, त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो.” 

          तिने आमचे कल्याण करावे. जिचा प्रभाव व सामर्थ्य यांचे वर्णन करण्यास सहस्त्रमुखांचा शेषनागही समर्थ नाही, ब्रह्मादि देवही तिचे सामर्थ्य जाणू शकत नाही, त्या भगवती चण्डिकेने सर्व जगाचे पालन करावे व अशुभाचा नाश करावा. जी पुण्यवंतांच्या घरी स्वतः लक्ष्मी रूपाने, पापी लोकांच्या ठिकाणी दारिद्र्य रूपाने, पवित्र अंत:करण असलेल्यांच्या हृदयात बुद्धी रूपाने, सत्पुरुषांच्या ठिकाणी श्रद्धा रूपाने व कुलीन लोकांच्या ठिकाणी लज्जा रुपाने वास्तव्य करते, त्या भगवती दुर्गादेवीला आमचा नमस्कार असो. 

          हे देवी, तू सर्व जगाचा सांभाळ कर. हे देवी, तुझ्या रूपाचे, तुझ्या पराक्रमाचे, तुझ्या अवधूत चरित्राचे वर्णन आम्ही कसे बरे करणार? सत्व, रज, तम हे तीन गुण तुझ्या ठिकाणी आहेत. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करतेस. ब्रह्मादि देवांनाही तुझा पार लागत नाही. तूच सर्वांचे आश्रयस्थान आहे. सर्व विश्व तुझे अंशभूत आहेत. सुवर्ण आणि अलंकार, घट आणि मृत्तिका, पट आणि तंतू यात जसा भेद नाही, त्याप्रमाणे तू आणि चराचर विश्व यात काहीच भेद नाही. तूच विश्वस्वरूप आहेस. तूच आदीभूत, पराप्रकृती आहेस. 

          हे देवी, तू सर्वांना पूज्य, वंदनीय आहेस. आम्ही तुला भक्तिभावाने नमस्कार करतो. हे जगदंबे, तू आमचे कल्याण कर. हे माते, या विश्वाचे पालन करण्याची आम्हाला बुद्धी दे. अशुभाचा नाश करण्याची आम्हाला बुद्धी दे. तु पुण्यवंताच्या घरात लक्ष्मी रूपाने, पापी लोकांच्या घरी दारिद्र रूपाने व साधु-संतांच्या घरी श्रद्धा रूपाने राहतेस. हे देवी, तू कुलवंतांच्या घरी लज्जा रूपाने राहतेस. त्यांचे तू कल्याण करतेस. हे विश्वपालके, तुला आमचा नमस्कार असो. 

          हे देवी, या जगात कीर्ती, मती, स्मृती, गती, करुणा, दया, श्रद्धा, धृती, वसुधा, कमला, पुष्टी, कला, विजया, गिरिजा, जया, दृष्टी, प्रभा, बुद्धी, कांती, मेधा इत्यादी सर्व काही तूच आहेस. सर्वांचा आश्रय असलेली तू अपार आहेस. तुला अंतपार नाही. तूच स्वाहा, स्वधा आहेस. तूच सर्व वेदांची शब्दशक्ती आहेस. या विश्वाचे पालन, पोषण करणारी तूच आहेस. हे अंबिके, तु या संसार सागरातील नौका आहेस. मधु-कैटभारी विष्णूच्या हृदयात लक्ष्मी रुपाने वास्तव्य करतेस. 

          तूच शिवाची अर्धांगी गौरी पार्वती आहेस. हे माते, तुझे मुख मंद स्मिताने सुशोभित, निर्मल, पूर्ण चंद्रबिंबा सारखे व सुवर्णकांती असलेले आहे. असे असतानाही हे पाहून महिषासुराला क्रोध आला. त्याने त्यावर प्रहार केला, हे मोठे आश्चर्य आहे! हे देवी, आणि तेच तुझे मुख क्रोधाने लाल झालेले ते पाहून महिषासुराने प्राण सोडले नाही, हे त्याहून मोठे आश्चर्य होय! कारण यमराजाला पाहून कोण बरे जिवंत राहू शकेल? हे देवी, तू प्रसन्न हो. तू प्रसन्न झालीस की जगाचे कल्याण होते व तु कोपलीस की कुळाचा नाश होतो. याचा अनुभव आत्ताच आला. कारण तू क्रुद्ध होताच महिषासुराच्या विशाल सेनेचा एका क्षणात नाश झाला. 

          सदैव कल्याण करणारी तू, ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्याचा आपल्या देशात सन्मान होतो. त्याला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते. त्याचे सर्व प्रकारचे दैन्य नाहीसे होते. जो पुण्यवंत असतो, सत्कर्माचे आचरण करतो, तो तुझ्या कृपेने स्वर्गलोकाला जातो. तू तिन्ही लोकात इच्छित फळ देणारी आहेस. माते, दुर्गे असे नुसते स्मरण करताच तू जीवांच्या सर्व भय व्यथा नाहीशा करतेस. जे आत्म सुखात असतात, जे स्वस्थ चित्ताने तुझे स्मरण करतात, त्यांना तू परम कल्याणकारी बुद्धी देतेस. दुःख, दारिद्र्य व भय नाहीसे करणारी हे देवी, तू सर्वांवर दया करणारी आहेस. 

          अशाप्रकारे सर्व देवगण भगवती देवीचे स्तवन करीत होते. देवीने महिषासुरादी दैत्यांचा वध केला होता, म्हणून सर्वांना अतिशय आनंद झाला होता. सर्व देवगण देवीला म्हणाले, “हे माते, सर्व असूर महापापी होते. पण तू त्यांना स्वतःच्या हाताने मारून स्वर्गप्राप्ती करून दिलीस. अशी तू मोठी कृपाळू, दयाळू आहेस. तू शत्रूंना केवळ दृष्टीपाताने जाळून भस्म केले नाहीस कारण दुष्ट दुर्जनानाही स्वर्गप्राप्ती व्हावी यासाठी तू त्यांच्यावर शस्त्र चालवले व शस्त्रांनी त्यांना पावन करून स्वर्ग मिळवून दिलास. शत्रूंनी तुझ्या मुखाकडे पाहिले, त्यामुळे तुझ्या खडक पाशाच्या तेजाने त्यांची दृष्टी गेली नाही. अशी तू उदार, मायाळू, कृपाळू आहेस. 

          हे देवी, तुझ्या पराक्रमाला दुसरी उपमाच नाही. तू वैऱ्यावर सुद्धा दया करतेस. तू शत्रूंचा संहार करून अवघ्या त्रैलोक्याचे रक्षण केलेस. हृदयात कृपा व युद्धात निष्ठुरता या गोष्टी फक्त तुझ्याच ठिकाणी आहेत. हे देवी, तुला आमचा नमस्कार असो. हे अंबिके, तू तुझ्या आशीर्वादाने आमचे रक्षण कर. हे माते, तुझ्या खडगाने, घंटेच्या नादाने, धनुष्याच्या टणत्काराने तू आमचे रक्षण कर. हे चण्डिके, तू तुझ्या त्रिशूळाने आमचे सर्व दिशांकडून रक्षण कर. त्रैलोक्यात संचार करणारे तुझे परम सुंदर, सौम्य रूप व अत्यंत भयंकर रूप आमचे रक्षण करो. हे देवी, तू तुझ्या सर्व शस्त्रांनी आमचे रक्षण कर. 

          मेधा ऋषी म्हणाले, “हे राजा, सर्व देवदेवतांनी जगदंबेची अशी स्तुती केली. तिची दिव्य, गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादी उपचारांनी मनोभावे पूजा केली. तिला साष्टांग नमस्कार घातला. त्यामुळे प्रसन्न झालेली देवी सर्व देवतांना म्हणाली, “हे देव-देवतांनो, मी तुमच्यावर पूर्ण प्रसन्न झाले आहे. तुमची इच्छा असेल ते सांगा. तुम्हाला हवे असेल ते सर्व काही मी देईन.” भगवतीने असे आश्वासन दिले असता आनंदित झालेले सर्व देव म्हणाले, “हे भगवती, तू आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. आमचा शत्रू जो महिषासुर, त्याचा तू संहार केला आहेस. आता आम्ही आणखी काय मागणार? तथापि हे महेश्वरी, तू जर आम्हाला आणखी वर देऊ इच्छित असेल तर, “हे माते, आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू, तेव्हा तेव्हा आम्हाला दर्शन देऊन आमचे संकट नाहीसे कर. त्याचप्रमाणे हे अंबिके, जे लोक या स्तोत्राने तुझे स्तवन करतील त्यांना धन-धान्य, समृद्धी, वैभव दे व त्यांना धन, स्त्री, संपत्ती देण्यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत.” 

          मेधा ऋषी म्हणाले, “हे राजा! सर्व देवांनी जगाच्या कल्याणासाठी देवीला असे वरदान मागितले. तेव्हा प्रसन्न झालेली देवी “तथास्तु” म्हणून गुप्त झाली. अशा प्रकारे सर्व देवांच्या शरीरापासून प्रकट झालेल्या महालक्ष्मीचे चरित्र तीन अध्यायात सांगितले. हे राजा, आता देवांवर उपकार करणारी ती देवी शुंभ-निशुंभादी  दैत्यांच्या संहारासाठी व सर्व लोकांचे रक्षण करण्यासाठी गौरी देवीच्या शरीरातून कशी प्रकट झाली ती कथा तुला सांगतो. 

          श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील इंद्रादिस्तुती नावाचा चौथा अध्याय समाप्त!

तिसरा अध्याय⬅️

➡️ पाचवा अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या