Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा- ५ ) / Shri Devi Mahatmya Katha 5

श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय पाचवा 

 देवीदूत संवाद 


          जिने आपल्या करकमलात घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण धारण केले आहेत. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे जिची मनोहर कांती आहे, जी त्रैलोक्याची आधार असून शुंभ इत्यादी दैत्यांचा नाश करणारी आहे. जी गौरीच्या शरीरापासून प्रकट झाली आहे. त्या महासरस्वती देवीची मी सतत आराधना करतो.

||श्री गणेशाय नमः||श्री देव्यै नम:|| 

          मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “हे राजा! आता मी तुला महासरस्वतीचे आख्यान सांगतो. हा देवीचा तिसरा अवतार आहे. ते भगवतीचे चरित्र श्रोत्या वक्तांना पावन करणारे आहे. हे चरित्र पुन: पुन्हा श्रवण, पठाण करण्याची इच्छा होते. पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन दैत्य होते. ते अत्यंत पराक्रमी दुष्ट व क्रूर होते. त्यांनी खडतर तपश्चर्या करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. “मानव, मृग, पक्षी, देव इत्यादी योनीतील पुरुषांपासून आम्हाला मृत्यू न यावा. आम्ही अवध्य व्हावे” असा वर मागितला व ब्रह्मदेवाने “तथास्तु” म्हंटले. स्वतःच्या सामर्थ्याचा अतिशय गर्व असलेल्या दैत्यांनी इंद्राच्या हातून त्रैलोक्याचे राज्य हिरावून घेतले. त्यांनी देवांचे यज्ञभागही हिरावून घेतले. ते दोघेच सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरून यांचे अधिकार गाजवू लागले. वायू आणि अग्नी यांचेही कार्य ते दोघे दैत्यच करू लागले. त्या दैत्यांनी सर्व देवतांना अपमानित, राज्यभ्रष्ट, पराजित व अधिकारहीन करून स्वर्गातून घालून दिले. मग त्या देवतांनी अपराजिता देवीचे स्मरण केले व विचार केला. 

          “या देवीने पूर्वी आपल्याला वर दिला होता, की संकटकाळी तुम्ही माझे स्मरण करतात मी तुमच्यासाठी धावून येईन व तुमच्या सर्व संकटांचा नाश करीन.” देवीने दिलेला हा वर आठवताच सर्व देवदेवता पर्वतराज हिमालयवर गेल्या. सर्वांनी हात जोडले. साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. त्यांनी देवीची यथाविधी षोडशोपचारांनी पूजा केली. मग सर्व देव हात जोडून विष्णुमायादेवीचे स्तवन करू लागले. देवीला आमचा नमस्कार असो. महादेवी शिवादेवीला नमस्कार असो. सर्वांना उत्पन्न करणाऱ्या म्हणून प्रकृतीला, सर्वांचे कल्याण करणारी म्हणून भद्रादेवीला नमस्कार असो. आम्ही नित्यनेमाने जगदंबेला नमस्कार करतो. नित्या, गौरी, धात्री, ज्योत्स्ना, चंद्ररूपिणी, सुखस्वरूपा देवीला आमचा नमस्कार असो. शरणागतांचे कल्याण करणाऱ्या, रिद्धी-सिद्धीरुपी देवीला आम्ही वारंवार नमस्कार करतो. नैऋत्ती, राजलक्ष्मी शर्वाणी ( शिव पत्नी) जगदंबेला नमस्कार असो. दुर्गा, दुर्गपारा, सारा, सर्वकारिणी, ख्याती, कृष्णा, धुम्रादेवीला आमचा सदैव नमस्कार असो. अत्यंत सौम्य व अत्यंत रौद्र रूप देवीला आम्ही पुन:पुन्हा नमस्कार करतो. जगाच्या आधारभुता कृतीदेवीला आम्ही नमस्कार करतो. 

          जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी विष्णुमाया नावाने असते. त्या देवीला आमचा पुन:पुन्हा नमस्कार असो. ज्या देवीला सर्व भूतांच्या ठायी चेतना असे म्हणतात, जी जगदंबा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी बुद्धी रूपाने असते, तिला आमचा वारंवार नमस्कार असो. जी देवी भूतमात्रांत सदैव निद्रारूपाने असते, जी चंडीकादेवी सर्वांच्या ठिकाणी क्षुधारूपाने राहते, त्या देवीला आमचा सदैव नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांत छाया रूपाने असते, जी देवी सर्व प्राण्यांत शक्तीरूपाने असते तिला आमचा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांत तृष्णा रूपाने असते, जी देवी सर्व प्राण्यांत क्षांती (क्षमा) रुपाने वास्तव्य करते त्या देवीला आम्ही पुन:पुन्हा नमस्कार करतो. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठायी जातीरुपाने वास्तव्य करते, जी देवी सर्व प्राण्यांत लज्जारुपाने वास्तव्य करते तिला आमचा पुन:पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांत शांती रुपाने वास्तव्य करते, जी देवी सर्व प्राण्यात श्रद्धा रुपाने वास्तव्य करते तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांत कांती रूपाने आहे. जी देवी सर्वांठायी लक्ष्मी रुपाने वास्तव्य करते, तिला आम्ही पुन: पुन्हा नमस्कार करतो. जी देवी सर्व चराचरात वृत्तिरुपाने असते. जी देवी सर्वांच्या ठायी स्मृतीरूपाने असते तिला आमचा सदैव नमस्कार असो. जी देवी सर्वांच्या ठिकाणी दया रूपाने असते, जी सर्व भूतांत तुष्टी रूपाने आढळते, जी देवी सर्व भूतांत सदैव मातृरुपाने वास्तव्य करते तिला आमचा नमस्कार असो. ती सर्व प्राण्यांत भ्रांतीरुपाने राहिलेली आहे, जी देवी सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री आहे.

          सर्व प्राण्यांना व्यापून राहिली आहे या चित्ररूपी देवीला आम्ही नमस्कार करतो. पूर्वकाली ईस्ट प्राप्तीसाठी देव-देवतांनी जिचे स्तवन केले होते, त्याचप्रमाणे देवराज इंद्राने अनेक दिवस जिची सेवा केली होती ती कल्याणाचे साधनभूत असलेली ईश्वरी आमचे कल्याण करो. मंगल करो व आमच्या सर्व आपत्तींचा नाश करो. उन्मत्त दैत्यांनी पीडा दिलेल्या आम्ही सर्व देवता जिला या क्षणी नमस्कार करीत आहोत व भक्तीने विनम्र होऊन स्मरण करताच जी सर्व आपत्तींचा नाश करते ती जगदंबा आमचे संकट दूर करो. 

          मेधा ऋषी म्हणाले, “हे राजा! सर्व देव देवता देवीचे स्तवन करीत होते. त्यावेळी पार्वतीदेवी गंगाजलात स्नान करण्यासाठी तेथे आली. त्या भगवती देवीने देवतांना विचारले, “तुम्ही कुणाची स्तुती करीत आहात?” त्याच वेळी तिच्या शरीर कोशातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली (ही शिवादेवी म्हणजेच महासरस्वती) हे पार्वती, शुंभ दैत्यांने पीडा दिलेल्या व निशुंभ दैत्या कडून पराभूत झालेल्या या देवता येथे एकत्र जमून माझे स्तवन करीत आहेत.” पार्वतीच्या शरीर कोशातून अंबिका प्रकट झाली म्हणून तिला जगात “कौशिकी” असे म्हणतात. कौशिकी प्रकट होताच पार्वतीचे शरीर काळ्या रंगाचे झाले. म्हणून हिमालयावर राहणारी ती “कालिकादेवी” या नावाने प्रसिद्ध झाली. मग महासरस्वतीने दिव्य रूप धारण केले. तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या त्रैलोक्यात दुसरी नव्हती. ती रतीपेक्षाही कोटी गुणांनी अधिक सुंदर होती. त्याच वेळी शुंभ-निशुंभांचे सेवक चंड-मुंड दैत्य तेथे आले. 

          अत्यंत सुंदर रूप धारण केलेल्या अंबिका देवीला पाहताच ते शुंभा दैत्याकडे गेले आणि त्याला म्हणाले. “महाराज! आम्ही अत्यंत सौंदर्यसंपन्न स्त्रीरत्न पाहिले. मदनालाही मोह पाडील अशी ती आहे. ती आपल्या दिव्य कांतीने हिमालयाला प्रकाशित करीत आहे. अशी सुंदर आजपर्यंत कोणीही कोठेही पाहिली नसेल. त्रैलोक्यसुंदर अशा त्या स्त्रीला ताबडतोब आणून आपली पत्नी करा. महाराज, त्या स्त्रीरत्नाशिवाय तुमची इतर सर्व रत्ने व्यर्थ आहेत. ती स्त्री आता हिमालयावर आहे. दैत्यराज, त्रैलोक्यातील सर्व रत्ने, हत्ती, घोडे इत्यादी सर्व काही आपल्या घराची शोभा वाढवीत आहेत. महाराज, आपण इंद्राचा ऐरावत, पारिजात वृक्ष, सप्तमुखी अश्व ही रत्ने बलात्काराने हरण केली आहेत. हंस ध्वजाने युक्त, दिव्य, अद्भुत असे ब्रह्मदेवाचे विमान, कुबेराचा पद्म नावाचा निधी, वरुणाचे शुभ्र छत्र, वरुणाचा पाश इत्यादी सर्व आपण व आपल्या भावाने बलात्काराने हरण केले आहे. आपल्या भीतीने सागर कमलमालेसह नाना प्रकारची रत्ने आपणास दिली’ मृत्यूची शक्ती व यमाचा दंडही आपण जिंकलात. कामधेनूही आपण घेतली. मेनकादी अप्सराही आपणास वश झाल्या. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथही तुम्हाला मिळाला. अग्नीने शुद्ध आणि नित्यनूतन व अग्नीसारखी तेजस्वी दोन वस्त्रे आपणास दिली. अशा प्रकारे सर्व रत्ने आपल्याकडे असताना ते सुंदर स्त्रीरत्न आपण का बरे आणीत नाही?”

           मेधा ऋषी म्हणाले, “राजा! चंड मुंडाने असे सांगितले असता शुंभाने महादैत्य सुग्रीवाला दूत बनवून देवीकडे पाठवले व त्याला सांगितले. “तू माझ्या आज्ञेने त्या स्त्रीकडे जा व तू तिच्याशी असे बोल की ज्यामुळे ती मला वश होईल व मोठ्या प्रेमाने ती माझ्या कडे येईल.” असे सांगून शुंभाने सुग्रीवाला त्या देवीकडे पाठविले. शुंभाने असे सांगितले असता तो सुग्रीव दूत हिमालयाच्या रमणीय प्रदेशात गेला. तेथे देवी होती. तो अत्यंत मंजुळ व प्रेमळ शब्दात देवीला म्हणाला, हे सुंदरी, सौंदर्यसंपन्न व देवांचा शत्रू असलेल्या शुंभ राजा हा आता त्रैलोक्याचा अधिपती आहे. तो शूर असून सर्वांना अजिंक्य आहे. तुझ्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तो तुझ्यावर मोहित झाला आहे. त्याने मला तुझ्याकडे दूत म्हणून पाठविले आहे. त्याची आज्ञा सर्व देवता एकमुखाने मानतात. कोणीही त्याची आज्ञा मोडण्याचे धाडस करीत नाही. त्याने सर्व देवदेवतांना पराभूत केले आहे. त्याने तुला एक संदेश पाठविला आहे. तो ऐक. 

          हे सुंदरी, मी सर्व देवांनाही जिंकले आहे व त्रैलोक्याचे राज्य करीत आहे. मी सध्या देवांचे यज्ञभाग सुद्धा ग्रहण करीत असतो. त्रेलोक्यात  जेवढी म्हणून श्रेष्ठ रत्न आहे, ती सर्व माझ्या अधिकारात आहे. इंद्राचा श्रेष्ठ ऐरावत हत्ती मी हिरावून घेतला आहे. समुद्रमंथनातून अश्वरत्न, उच्चै:श्रवा प्रकट झाला, तो देवांनी मला अर्पण केला आहे. हे सुंदरी याशिवाय जेवढी म्हणून रत्ने देव, गंधर्व, नाग यांच्याजवळ होती ती सर्व माझ्याकडे आली आहेत. हे सुंदरी, मी तुला जगातील स्त्रीरत्न समजतो, म्हणून तू माझ्याकडे ये व माझा स्वीकार कर. आम्ही सर्व रत्नांचा उपभोग घेणारे आहोत. तू माझा स्वीकार करून अवघ्या त्रैलोक्याची स्वामिनी हो व सर्व विषयोपभोग यांचा उपभोग घे.  मी अवध्य असल्याने तु चिरकाल सौभाग्ययुक्त होशील. माझ्याप्रमाणेच माझा भाऊ निशुंभ ही मोठा पराक्रमी आहे. तू आमची सेवा कर. हे सुंदरी, नीट विचार करून तू माझी पट्टराणी हो. 

          मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, “हे राजा, दुताचे ते बोलणे ऐकून ती कल्याणमयी भगवती, दुर्गा देवी हसू लागली. मग ती देवी गंभीर स्वरात म्हणाली, “हे दुता, तू सांगितलेस ते सर्व सत्य आहे. त्यात असत्य काहीही नाही. शुंभ त्रैलोक्याचा स्वामी आहे व निशुंभ सुद्धा त्याच्या सारखा पराक्रमी आहे. तो शुंभ महापराक्रमी, शूर व मदनासारखा सुंदर आहे. परंतु विवाह संबंधी मी जी प्रतिज्ञा केली आहे, ती खोटी कशी करू? पूर्वी मी माझ्या सखीसह खेळत असता स्वतःच्या शरीर बलाच्या गर्वामुळे मी एक प्रतिज्ञा केली होती, ती अशी की- “जो माझ्यासारखा बलवान असेल व माझ्या बरोबर युद्ध करून मला जिंकेल, त्याच्याशीच विवाह करीन.” म्हणून महादैत्य शुंभाने किंवा निशुंभाने स्वतः यावे व युद्ध जिंकून माझे पाणिग्रहण करावे. यासाठी उशीर नको.” 

          देवीने असे सांगितले असता दूत म्हणाला, “हे देवी, तु मोठी अहंकारी दिसतेस. माझ्यासमोर असे तू बोलू नयेस. देवांना जिंकलेल्या शुंभाला  जिंकण्याची इच्छा तू कशी काय करतेस? शुंभाला जिंकेल असा त्रैलोक्यात कोणीही नाही. इतर दैत्यांच्या बरोबर सुद्धा देव युद्धात टिकू शकत नाही, मग तू एकटी स्त्री शुंभाशी युद्ध कशी करू शकशील? ज्या शुंभ निशुंभ यांच्यापुढे इंद्रादि देव सुद्धा उभे राहू शकत नाही, त्यांच्यापुढे तुझा निभाव कसा लागणार? म्हणून म्हणतो, तु माझ्याबरोबर चल व स्वतःचा सन्मान राख. नाही तर ते तुझे केस पकडून तुला फरफटत नेतील. तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल.” 

          देवी म्हणाली, “हे दुता, तू म्हणतोस ते ठीक आहे. शुंभ निशुंभ मोठे पराक्रमी आहेत. पण मी तरी काय करू? मी पूर्वीच विचार न करता प्रतिज्ञा करून बसले आहे. म्हणून आता तू परत जा. मी तुला जे काही सांगितले ते सर्व दैत्यराज शुंभाला सांग. मग त्यांना जे योग्य वाटेल ते ते करतील.” देवीने असे सांगितले असता आश्चर्यचकित झालेला दूत परत गेला.  

                    श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील देवी-दूत संवाद नावाचा पाचवा अध्याय समाप्त!

चौथा अध्याय⬅️

➡️ सहावा अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या