श्री देवी महात्म्य मराठी
Shri Devi Mahatmya Marathi
अध्याय सहावा
धुम्रलोचन वध
जी नागराजाच्या आसनावर बसली आहे, नागाच्या फण्यावरील शोभून दिसणाऱ्या रत्नहाराने जिचा देह शोभून दिसत आहे, जिने आपल्या हातात माला, कुंभ, कपाल व कमल धारण केले आहे, जिच्या मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट शोभून दिसतो आहे, त्या सर्वे त्या सर्वज्ञेश्वर भैरवाच्या मांडीवर निवास करणाऱ्या पद्मावती देवीचे मी चिंतन करतो.
|| श्री गणेशाय नमः || श्री देव्यै नमः ||
मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “हे राजा, महासरस्वतीची ती प्रतिज्ञा ऐकून सुग्रीव नावाच्या त्या दूताला अतिशय राग आला. त्याने शुंभ दैत्याकडे जाऊन त्याला सगळी हकीकत सविस्तर सांगितली. दूत म्हणाला, “महाराज, मी त्या देवीला भेटून तुमचे ऐश्वर्य, तुमचा पराक्रम तिला सांगितला परंतु ती तुम्हाला मुळीच जुमानीत नाही. तिला तुमच्याशी युद्ध करावयाचे आहे.” दूताने सांगितलेली हकीकत ऐकताच दैत्यराज शुंभ अत्यंत क्रुद्ध झाला. तो दैत्य सेनापती धुम्रलोचनास म्हणाला, “तू आजच सैनिक घेऊन त्या उद्धट स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये. ती सरळ बोलाने आली नाही तर तिचे केस पकडून तिला फरफटत घेऊन ये. वेळ पडल्यास तिच्या यक्ष, गंधर्व, देवता इत्यादी रक्षकांना ठार मार. त्या स्त्रीचा मात्र वध न करता तिला माझ्याकडे घेऊन ये.”
मेधा ऋषी म्हणाले, “हे राजा, शुंभाने अशी आज्ञा करतात धूम्रलोचन साठ हजार दैत्य सेना घेऊन निघाला. तो हिमालयाच्या त्या रमणीय प्रदेशात आला. त्याने हिमालयाला सैन्याचा वेढा घातला. त्या वेळी एकच हल्लकल्लोळ झाला. आता काय होणार? म्हणून देव आकाशातून पाहत होते. इंद्रादी सर्व देवगण गुप्त राहून आता देवी काय करते ते पाहू लागले. धूम्रलोचन देवीला म्हणाला, “हे सुंदरी, तू लवकरात लवकर माझ्याबरोबर चल व दैत्यराज शुंभ-निशुंभ यांचा स्वीकार कर. तू बऱ्या बोलाने आली नाहीस तर मी तुला पकडून नेईल.” देवी म्हणाली, “तुला दैत्यराजाने पाठवले आहे. तू मोठा बलवान आहेस. तुझ्याबरोबर मोठे सैन्य आहे. अशा परिस्थितीत तु मला जबरदस्तीने नेलेस तर मी तुझे काय करणार?”
मेधा ऋषी म्हणाले, “राजा, चंडिकादेवी असे म्हणाली असता धूम्रलोचन देवीला पकडण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा देवीने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला जाळून भस्म केले. हे पाहताच देवांनी आकाशातून देवीचा जयजयकार केला. देवीने धूम्रलोचनास जाळून भस्म केले हे पाहून दैत्यसेना भयंकर खवळली. साठ हजार दैत्य सैन्य गर्जना करत देवीवर धावून गेले. देवी आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध झाले. ‘हाणा-मारा-पकडा’ अशी गर्जना करीत देवीवर वृक्ष पाषाण फेकू लागले. त्यावेळी अत्यंत क्रुद्ध झालेल्या देवीने अत्यंत धारदार बाण मारून दैत्यांची शस्त्रास्त्रे, वृक्ष पाषाण यांचे मधल्यामध्येच तुकडे-तुकडे केले.
देवीने आपल्या शस्त्रास्त्रांनी दैत्यांचे मुंडके फोडून त्यांना जमिनीवर पाडले. जिकडेतिकडे प्रेतांचा खच पडला. त्याच वेळी देवीचा सिंह आपली आयाळ पिंजारून दैत्य सैन्यात शिरला. त्याने गर्जना करीत अनेक दैत्यांना फाडून ठार मारले. आपल्या धारदार नखांनी कित्येक दैत्यांची पोटे फाडली. मस्तके तोडली. जिकडेतिकडे रक्ताचे पाट वाहू लागले. बघता बघता दैत्य सैन्याचा नाश झाला. देवीने प्रचंड शंखध्वनी केला. देवांनी देवीचा जयजयकार सुरु केला. उरले सुरले दैत्य सैन्य जीवांच्या आकांताने पळत सुटले.
दैत्य शुंभाकडे आले व त्याला म्हणाले, “महाराज, त्या देवीने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला जाळून भस्म केले. देवीने दैत्यसैन्याचा संहार केला. ऐका तो शंखनाद. तो त्या अंबिकेचाच आहे. देव आनंदाने आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी करीत आहेत. आम्ही प्राणभयाने पळून आलो. ती देवी एकटीच आपल्या सैन्याविरुद्ध रणात उभी आहे. ती अत्यंत निर्भय व बलशाली आहे. आता पुढे काय करायचे ते आपणच ठरवा?”
देवीने धूम्रलोचनाचा वध केला, देवीच्या सिंहाने दैत्यसैन्याला फाडून ठार मारले हे ऐकताच शुंभाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या डोळ्यातून क्रोधाग्नी बाहेर पडू लागला. संतापाने त्याचे ओठ थरथरू लागले. त्याने चंड आणि मुंड नावाच्या महादैत्यांना आज्ञा केली. तुम्ही आत्ताच्या आत्ता प्रचंड सेना घेऊन हिमालयाकडे जा व त्या देवीचे केस पकडून तिला फरपटत माझ्याकडे आणा. प्रसंग आलाच तर तिच्याशी युद्ध करा व तिला ठार मारा. त्या देवीचे वाहन असलेल्या सिंहालाही ठार मारा. तुमच्याबरोबर प्रचंड सेना आहे व ती देवी एकटीच आहे, ती काहीही करू शकणार नाही. त्या देवीला धरा किंवा मारा पण तिला माझ्याकडे आणा. जिने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला ठार मारले आहे, तिचा देह कसा आहे हे मला पहावयाचे आहे.
या अध्यायाचे श्रवण पठन केले असता, सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. या अध्यायाचे परम श्रद्धेने पठण केले असता, सर्व सिद्धी प्राप्त होतात. अंती मोक्षप्राप्ती हि होते याविषयी संशय बाळगू नका.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील धूम्रलोचनवध नावाचा साहवा अध्याय समाप्त!
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.