श्री देवी महात्म्य मराठी
Shri Devi Mahatmya Marathi
अध्याय सातवा
चंड मुंडाचा वध
जी रत्नखचित सिंहासनावर बसून शिकणाऱ्या पोपटाचे मधुर शब्द ऐकत आहे, जी श्यामल रंगाची आहे, जिने मला आपला एक पाय कमळावर ठेवला आहे व मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे, जिने कमल पुष्पांची माला धारण केली आहे व जी वीणा वाजवीत आहे, तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातांत शंखपात्र घेतले आहे, जिच्या कपाळावर कुंकूम टिळा शोभून दिसतो आहे अशा त्या मातंगी देवीचे ध्यान करतो.
|| श्री गणेशाय नमः || श्री देव्यै नमः ||
मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, राजा, जगदंबेची कथा एकाग्रचित्ताने व भक्तिभावाने श्रवण कर. ही कथा मार्कंडेयांनी शिष्याला सांगितली. सुतानी शौनकादिकांना सांगितली. तीच कथा मी तुला सांगतो. मागच्या अध्यायांत सांगितल्याप्रमाणें शुंभाने आज्ञा करतात चंड मुंडादी दैत्य शस्त्रास्त्रांनी सज्ज झाले व चतुरंगसेना घेऊन निघाले. ते पर्वतराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर आले. तेथे त्यांना सिंहावर आरूढ झालेली देवी दिसली. ती मंद स्मितहास्य करीत होती. प्रचंड क्रोधी म्हणून चंड व शत्रुचे खंड विखंड करणारा म्हणून मुंड. त्या अष्टभुजा देवीच्या हातात बाण, शंख, चक्र, शूळ, धनुष्य, घंटा व मुसळ अशी आठ आयुधे शोभून दिसत होती. ते देवीला म्हणाले, “हे सुंदरी, देवांचा पराभव करणाऱ्या शुंभाचे आणि इंद्राला जिंकणाऱ्या निशुंभाचे सामर्थ्य तुला माहित नाही काय? तू एकटीच असून कालिका व सिंह एवढेच तुझ्या मदतीला आहेत. मग तू शुंभ-निशुंभांचा याचा पराभव कसा करणार? म्हणून तू शुंभाची इच्छा पूर्ण कर. त्याचा पती म्हणून स्वीकार कर.”
चंड मुंडाचे हे बोलणे ऐकताच जगदंबिका क्रुद्ध होऊन म्हणाली, “अरे दुष्ट दैत्यांनो तुम्ही आलात तसे परत जा. नाही तर मरणाला तयार व्हा. मी सर्व भूतांची स्वामिनी आहे. मला पतीच करावयाचा नाही. तुमच्या शुंभ निशुंभासारखे खूप पाहिले आहेत. मूर्खांनो, हिंमत असेल तर माझ्याशी युद्ध करण्यास तयार व्हा. मी आता युद्ध करून तुम्हा दोघांचा रक्तबिजाचा व शुंभ निशुंभ या दैत्यांचा वध करूनच स्वस्थानी जाईल.”
जगदंबेचे ते शब्द ऐकताच चंड मुंड भयंकर खवळले. त्यांनी देवीला पकडून शुंभाकडे नेण्याचा निश्चय केला. त्यांनी देवीचे युद्ध सुरू केले. तिच्यावर बाणांचा वर्षाव सुरु केला. कित्येक दैत्य खड्ग घेऊन देवीवर धावून गेले. धरा धरा, मारा मारा, पकडा पकडा असे दैत्य ओरडत होते. दैत्यांनी देवीवर प्रचंड वृक्ष पाषाण फेकले पण देवीला ते फुलांसारखे वाटले. देवी अत्यंत क्रुद्ध झाली. तिने सर्व दैत्यांचा नाश करण्याचा निश्चय केला. क्रोधाने तिचे मुख काळे निळे झाले. तिचा चेहरा अत्यंत उग्र, भयानक दिसू लागला. तिचे नेत्र कर्दळीच्या फुलासारखे लालेलाल दिसत होते. त्यावेळी तिच्या कपाळापासून महाभयंकर कालीदेवी प्रकट झाली. त्या कालीचे मुख अत्यंत भयानक दिसत होते. तिने गळ्यात नरमुंडमाळ घातली होती. तिच्या हातात खड्ग, पाश, खट्वांग ही आयुधे होती. तिने व्याघ्रचर्म परिधान केले होते कालरात्रीप्रमाणे ती भयंकर दिसत होती. तिचा आवाज मेघांच्या गडगडाटासारखा होता. तिच्या विशाल तोंडात लांब जीभ वळवळत होती. तिने क्रोधाने गर्जना करताच त्या आवाजाने दाही दिशा दणाणून गेल्या.
अशी ती कालीदेवी अत्यंत वेगाने दैत्य सैन्यात शिरली. तिने दैत्यांचा संहार सुरू केला. सापडेल त्याला दैत्याला ती तोंडात टाकत होती. करालदाढांनी त्यांचे चूर्ण करीत होती. तिने घोड्यांसह दैत्यवीर,सारथ्यांसह रथ खाऊन टाकले. तिने अनेक हत्ती तोंडात टाकून खाऊन टाकले. दिसेल ते तोंडात घालण्याचा सपाटा सुरु केला. तिने कित्येक दैत्यांना पायाखाली रगडले. कित्येकांच्या छात्या फोडल्या. तिने असंख्य शस्त्रास्त्रे खाऊन टाकली.
देवीने सुरू केलेला दैत्यसंहार पाहून खवळलेल्या चंड मुंडांनी देवीवर बाणांचा वर्षाव सुरु केला. सूर्यासारखे तेजस्वी व सुदर्शन चक्राप्रमाणे असलेले चक्र त्यांनी घर सोडले. देवीने प्रचंड गर्जना करून बाणांनी त्या चक्राचे तुकडे-तुकडे केले. मग देवीने चंडावर झेप टाकून त्याचे केस पकडले व आपल्या खड्गाने त्याचे मस्तक उडवले. चंडाचा वध झालेला पाहताच मुंड देवीवर धावून गेला पण देवीने खड्गाच्या एकाच घावात मुंडाचे मुंडके उडवले. चंडा मुंडाचा वध होताच दैत्य सैन्यात हाहाकार झाला. उरलेसुरले सैन्य प्राणभयाने दाही दिशांना धावत सुटले. मग कालीदेवी चंदा मुंडाची मस्तके हातात घेऊन चंण्डिके जवळ आली व खदाखदा हसून म्हणाली. हे देवी मी रणयज्ञात चंड मुंड या दोन पशूंचा बळी दिला आहे. आता तू रणयज्ञात शुंभ निशुंभ या पशूंचा बळी देशील.
मेधा ऋषी म्हणाले. “हे राजा, चंद मुंडांची मस्तके पाहून चंडिका कालिका म्हणाली, तू चंड मुंडाची मस्तके घेऊन माझ्याकडे आलीस म्हणून जगात तु “चामुंडा” या नावाने प्रसिद्ध होशील. सर्व लोक तुझी आराधना करतील. असा वर प्राप्त झाल्याने आनंदीत झालेली काली जयजयकार करु लागली. अशाप्रकारे देवीने काली देवीला उत्पन्न करून चंडा-मुंडांचा नाश केला.
श्रोतेहो, भक्तिभावाने भगवती देवीचे स्मरण करतात त्यांच्या सर्व आपदा नाहीशा होतात अशी वेदव्यासांचीच वाणी आहे. त्यावर विश्वास ठेवावा. अनन्यभावाने देवीचे नुसते स्मरण करतात सर्व संकटे नाहीशी होतात.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील चंड-मुंड वध नावाचा सातवा अध्याय समाप्त!
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.