जिच्या शरीराचा रंग लाल आहे, जिच्या नेत्रात करुणा आहे, जिने आपल्या हातात पाश, अंकुश, बाण व धनुष्य धारण केले आहे. त्या अणिमादी सिद्धीच्या किरणांनी व्यापलेल्या भवानी मातेचे मी ध्यान करतो.
|| श्री गणेशाय नमः || श्री महासरस्वत्यै नमः ||
मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “हे राजा, मार्कंडेयांनी शिष्याला व सूतांनी शौनकादिकांना सांगितलेली देवीची चरित्रकथा मी तुला सांगतो, ती एकाग्र चित्ताने श्रवण कर. देवीने चंडा-मुंडाचा वध केला असता उरलेसुरले दैत्य शुंभाकडे धावत आले व रडत रडत म्हणाले, “महाराज, आमचे रक्षण करा. कालिका देवीने सर्व दैत्यांना खाऊन टाकले. चंडा-मुंडाचा वध झाला. देवांना अतिशय आनंद झाला आहे. आता ती क्रुद्ध झालेली देवी सगळ्यांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. त्या देवीचा सिंह हि दैत्यांना ठार मारीत आहे.”
दैत्यांनी सांगितलेली ही बातमी ऐकताच, शुंभ-निशुंभ दैत्यराज भयंकर संतापले. शुंभ-निशुंभ महाप्रतापी होते. काळ सुद्धा त्यांच्यापुढे चळाचळा कापत असे. मग शुंभाने आपल्या संपूर्ण दैत्यसेनेला युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले. तो म्हणाला, “आजच्या आज उदायुध नावाच्या दैत्य सेनापतींनी आपले सैन्य घेऊन युद्धास निघावे. कंबू नावाचे सेनानायक यांनीही आपल्या दलभारा सह निघावे व चंडिकेशी युद्ध करावे. त्याचप्रमाणे पन्नास कोटीवीर्य कुळातील व शंभर ध्रौम कुळातील दैत्य सेनापती यांनी आपल्या सेनेसह युद्धास निघावे.कालक, दौहृद, मौर्य आणि कालकेय यांनीही ताबडतोब युद्धास निघावे.
शुंभाने रक्तबीज नावाच्या महादैत्यालाही प्रचंड सेना देऊन रणभूमीवर पाठवले. त्यावेळी रक्तबीज शुंभाला म्हणाला, “महाराज, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी त्या कालीचा वध करून अंबिकेला धरून आणतो.” शुंभाने आज्ञा करताच दैत्यांची प्रचंड सेना युद्धासाठी निघाली. कृतांतालाहि ज्याची भीती वाटत असे, तो दैत्यराज शुंभ ही युद्धाला निघाला. शुंभ अगणित सेना घेऊन युध्दासाठी आला आहे, हे पाहताच चंडिकेने आपल्या धनुष्याचा प्रचंड टणत्कार केला. तो आवाज पृथ्वी आणि आकाशात घुमू लागला. देवीच्या सिंहाने प्रचंड गर्जना सुरू केली. जगदंबेने घंटानाद केला.
धनुष्याचा टणत्कार, सिंहाची गर्जना व घंटेचा आवाज यांनी सर्व दिशा दणाणून गेल्या. त्या वेळी कालीने (चामुंडा देवीने) आपले विक्राळ, भयानक मुख अधिक विशाल केले व दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले. त्या आवाजाने चौदा भुवने भयभीत झाली. दिग्गज, शेषनाग, काळ, समुद्र घाबरून आपल्या मर्यादा सोडू लागले. दैत्य ही गर्जना करू लागले. त्यांनी चंडीकादेवी, सिंह व कालीदेवी यांना सर्व बाजूंनी घेरले. दैत्यांनी देवीवर बाणांचा वर्षाव सुरू केला असता, दैत्यांचा नाश व्हावा व देवीला विजय मिळावा यासाठी ब्रम्हा, शिव, कार्तिकेय, विष्णू, इंद्रादी देवांच्या अत्यंत पराक्रमी व बलशाली शक्ती त्यांच्या शरीरातून बाहेर पडल्या व त्यांचीच रूपे धारण करून चंडीकादेवीकडे आल्या.
ब्रह्मणी शक्ती हातात स्पटिक माला व कमंडलू घेऊन हंसावरून आली. एका हातात त्रिशूळ घेतलेली माहेश्वरी शक्ती नंदीवर आरूढ झाली होती. सहा मुखे असलेली कुमार कार्तिकेय शक्ती हाती शक्ती घेऊन मोरावरून आली. शंख, चक्र, गदा, धनुष्य व खड्ग धारण केलेली वैष्णवी शक्ती गरुडावर आरूढ झाली होती. यज्ञ वराहाचे रूप धारण केलेली वाराही शक्ती शत्रुच्या नाशासाठी आली. नृसिंहाची नारसिंही शक्ती आपल्या जटांनी नक्षत्रांना झोडपीत निघाली. तिच्या तेजाने विजाही कडाडु लागल्या. दैत्यसैन्य जळू लागले. दाही दिशांना पळू लागले. हाती वज्र घेतलेली इंद्रशक्ती ऐरावतावर आरूढ होऊन निघाली. त्याचप्रमाणे महिषावर आरूढ होऊन हाती दंड घेतलेली यमाची याम्याशक्ती, वरुणाची वारुणी, कुबेराची कौबेरीशक्ती या शक्तीही आल्या. अशा प्रकारे विविध रूपे धारण करून आलेल्या या शक्तींना पाहून देवीला अतिशय आनंद झाला.
याच वेळी भगवान शंकर तेथे आले व चंडीकेला म्हणाले, “देवी, आता लवकरात लवकर दैत्यांचा वध कर व देव कार्य सिद्धिला ने. सर्व देवांच्या शक्तीही येथे आल्या आहेत. आता शुंभ-निशुंभ यासह सर्व दैत्यांचा वध करून देवांना निर्भय कर.” शंकरांनी असे सांगताच चंडिकेच्या शरीरातून एक अद्भुत शक्ती बाहेर पडली. ती प्रचंड गर्जना करू लागली. अत्यंत भयंकर अशी ती शक्ती शंकरांना म्हणाली, “हे देवाधिदेव, तुम्ही दैत्यराजाकडे जा व आमचे दुतत्व करा. त्या उन्मत्त शुंभनिशुंभ यांना सांगा की, तुम्ही स्वर्ग सोडून पाताळात जा. देवांचा स्वर्ग देवांना मिळू दे. तुम्ही जर बळाने उन्मत्त झाला असाल, तर युद्धासाठी तयार व्हा. तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा असेल तर पाताळात जा, नाहीतर तुम्हा सर्वांचा मृत्यू निश्चित आहे.”
देवीने शिवाला दूत म्हणून पाठवले, म्हणून ती शिवदूती नावाने प्रसिद्ध झाली. शंकरांनी दैत्यराजाकडे जाऊन त्याला देवीचा निरोप सांगितला. देवीचा निरोप ऐकताच दैत्यसैन्य खवळले. ते चिलखते घालून व हातात शस्त्रे घेऊन रणांगणात आले. त्यांनी शूल, परशु,चक्र, गदा, शक्ती, बाण यांचा देवीवर वर्षाव सुरू केला. ते गुप्त, प्रकट होऊन अनेक रूपे धारण करून युद्ध करू लागले. मग कालिकादेवी शूल व गदा घेऊन दैत्यांचा संहार करीत रणांगणावर धावू लागली.
ब्रह्मणी शक्तीने कमंडलूतील पाणी शिंपडून अनेक दैत्यांना ठार मारले. रुद्रशक्तीने त्रिशुळाने दैत्यसंहार सुरू केला. वैष्णवी शक्तीने आपल्या चक्राने असंख्य दैत्यांची मुंडकी तोडली. कौमारी शक्तीने शक्ती फेकून, इंद्रशक्तीने वज्रप्रहार करून दैत्यसेनेचा संहार सुरू केला. सगळीकडे रक्ताचे पाट वाहू लागले. वाराही शक्तीने आपल्या दाढानी, नारसिंही शक्तीने आपल्या नखप्रहारांनी असंख्य दैत्यांना यमलोकात पाठविले. नृसिंह शक्तीच्या गर्जनेने अनेक दैत्यांनी प्राण सोडले. शिवदूती खदाखदा हसु लागली. त्या आवाजाने भयभीत झालेले दैत्य जमिनीवर कोसळले. शिवदूतीने त्या सर्वांना खाऊन टाकले.
क्रुद्ध झालेल्या शक्ती नाना उपायांनी दैत्यांचा संहार करू लागल्या. त्यामुळे दैत्यसैन्याची पळापळ सुरू झाली. त्या सैन्याची पळापळ सुरू झाल्याचे पाहून, रक्तबीज नावाचा महादैत्य भयंकर खवळला. या रक्तबीजाला पूर्वी शंकरांनी वर दिला होता कि, ‘तुझ्या प्रत्येक रक्तबिंदूतून दैत्य निर्माण होतील. तसेच त्यांच्या रक्तबिंदूपासून पुन्हा अनेक दैत्य उत्पन्न होतील.’ या वरामुळे रक्तबीज अत्यंत उन्मत्त झाला होता. असा तो रक्तबीज महादैत्य अत्यंत क्रुद्ध झाला. तो देवतांवर अनेक आयुधांनी प्रहार करू लागला. पण चण्डिकेने तीक्ष्ण बाणांनी त्याची आयुधे तोडून टाकली. त्याच्या देहातून रक्त वाहू लागले. त्या रक्तातूनच असंख्य दैत्य निर्माण झाले. ते शस्त्र घेऊन युद्ध करू लागले. इंद्रशक्तीतने वज्रप्रहार करून त्या दैत्यांना ठार मारले, पण त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून असंख्य, अगणित दैत्य निर्माण झाले.
ते असंख्य रक्तबीज पाहून भयभीत झालेले देव आपापसात म्हणाले, “ हे हजारो रक्तबीज उत्पन्न होत आहेत, पण येथे ही काली, ही चंडी व इतर देवता एकट्याच आहेत. या रक्तबीजांच्या मदतीसाठी जर शुंभनिशुंभ आले तर आपला निभाव लागणे कठीण आहे.” सगळे देव मोठ्या चिंतेत पडलेले पाहून चंडिका कालीला म्हणाली, “तू तुझे मुख आणखी विशाल कर. माझ्या शस्त्रप्रहाराने बाहेर पडणारे रक्त तू पिऊन टाक. त्यांच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडणार नाही असे कर. म्हणजे हे दैत्य निर्माण होणार नाहीत.” असे सांगून देवी रक्तबिजावर प्रहार करू लागली. त्याच्या जखमातुन निघणारे रक्त काली घटाघट पिऊ लागली. देवी खड्ग व मुसळे यांचे प्रहार करून कृत्रिम रक्तबीजांचा संहार करू लागली. वध केलेल्या दैत्यांना काली खाऊ लागली. त्यामुळे नवीन दैत्य निर्माण होण्याचे बंद झाले.
आता तो श्रेष्ठ रक्तबीजच तेवढा शिल्लक राहिला. मग देवीने रक्तबीजावर शस्त्रप्रहार केला. त्याच्या शरीरातून निघालेले रक्त कालीने पिऊन टाकले. कालीच्या मुखात पडलेल्या रक्तबीजाच्या रक्तापासून दैत्य निर्माण झाले, पण देवीने त्या सर्वांना चावून चावून खाल्ले. शेवटी देवीने रक्तबीजाला ठार मारले. रक्तबीजाचा वध होताच आनंदित झालेल्या देवांनी देवीचा जयजयकार केला. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. अशारीतीने रक्तबीजाचा वध झाला.
या अध्यायाचे श्रवण पठन केले असता सर्व संकटे नाहीशी होतात. जेथे या अध्यायाचे पठण चालू असते, तेथे देवी भक्ताजवळ बसून श्रवण करते. त्या चंडिका देवीला नमस्कार असो.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील रक्तबीज वध नावाचा आठवा अध्याय समाप्त!
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.