Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा-९ ) / Shri Devi Mahatmya Katha 9

 श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय नववा 

 निशुंभ वध 


          ज्याचा वर्ण सुपारीचे फुल व सुवर्ण यांच्याप्रमाणे रक्तपीत मिश्रित आहे, ज्याने आपल्या बाहूवर सुंदर रुद्राक्षमाला, पाश, अंकुश, व वरदमुद्रा धारण केली आहे. अर्धचंद्र ज्याचे भूषण आहे व जो तीन नेत्रांनी शोभून दिसतो त्या अर्धनारीश्वराचा मी सदैव आश्रय घेतो. 

|| श्री गणेशाय नमः || श्री चंडिकायै नमः ||

          सुरथ राजा मेधा ऋषींना म्हणाला, “ऋषिवर्य, देवीचे अद्भुत चरित्र तुम्ही आम्हाला सांगितले. रक्तबीजाचा वध कसा झाला ते आम्ही लक्षपूर्वक ऐकले. आता आम्हाला आणखी काही ऐकण्याची इच्छा आहे. रक्तवीज याचा वध झाल्यानंतर पुढे काय झाले? महादैत्य शुंभ आणि निशुंभ यांनी काय केले? त्यांनी युद्ध कसे केले? हे सगळे आम्हाला विस्ताराने सांगा. मेधा ऋषी म्हणाले, “राजा, रक्तबीजाचा वध होताच उरलेसुरले दैत्य पळत सुटले. शुंभ निशुंभाकडे येऊन ते म्हणाले, “महाराज, रक्तबीजाचा वध झाला. त्याच्या रक्तातून उत्पन्न झालेल्या दैत्यांना चामुंडेने खाऊन टाकले. आता आम्ही थोडेच उरलो आहोत. महाराज, अंबिका सर्वांना अवध्य आहे. सर्व देवांच्या शक्ती तिला मदत करीत आहेत. ती आदिशक्ती देवकार्य सिद्धीस नेणारी आहे. आता काय करावयाचे, ते तुम्हीच ठरवा.” 

          युद्धात रक्तबीज व इतर दैत्य मारले गेले, हे ऐकताच शुंभ निशुंभ क्रोधाने पेटून उठले. ते प्रचंड सैन्य घेऊन देवीबरोबर युद्ध करण्यासाठी निघाले. त्यांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना मोठे मोठे दैत्य होते. त्यांचे ओठ क्रोधाने थरथरत होते. त्यांनी देवीला ठार मारण्याचा निश्चयच केला. शुंभ निशुंभ आणि देवी यांचे घनघोर युद्ध सुरु झाले. ते दोघे मेघांप्रमाणे देवीवर बाणांचा वर्षाव करू लागले. देवीने आपल्या बाणाने त्या दैत्यांचे बाण मधल्यामध्येच तोडून टाकले. मग देवीने आपल्या शस्त्रप्रहारांनी शुंभ निशुंभांना जखमी केले. रक्ताचे पाट वाहू लागले. शत्रूचे हत्ती, घोडे, रथ, पायदळ त्या रक्तातुन वाहत जाऊ लागले. असंख्य दैत्यांचा संहार झाला. 

          निशुंभाने धारदार तलवार घेऊन देवीचे वाहन असलेल्या सिंहावर प्रहार केला. आपल्या सिंहाला जखमी केलेले पाहून देवीने क्षुरप्र नावाचा बाण मारून निशुंभाच्या तलवारीचे तुकडे-तुकडे केले. ढाल-तलवार तुटून पडताच निशुंभाने देवीवर शक्ती फेकली. परंतु देवीने समोरून येणार्याि त्या शक्तीचे आपल्या चक्राने दोन तुकडे केले. क्रोधाने भडकलेल्या निशुंभाने देवीला ठार मारण्यासाठी तिच्यावर त्रिशूळ फेकले. परंतु देवीने आपल्या मुष्टीप्रहाराने त्या शुळाचे पीठ केले. मग त्या दैत्याने देवी वर गदा फेकली. पण देवीने आपल्या त्रिशुळाने ती तोडून भस्म केली. मग परशु घेऊन धावत येणाऱ्या त्या निशुंभ दैत्याला देवीने धारदार बाण मारून मारून बेशुद्ध पाडले. 

          आपला भाऊ निशुंभ जमिनीवर बेशुद्ध पडलेला पाहून अत्यंत क्रुद्ध झालेला शुंभ रथावर आरूढ होऊन देवीला ठार मारण्यासाठी धावून आला. त्याला पाहताच देवीने शंखध्वनी केला. धनुष्याची प्रत्यंचा ताणून तिने प्रचंड टणत्कार केला. घंटेचा निनाद सुरू झाला. त्या आवाजांनी दशदिशा दणाणून गेल्या. सिंहानेही प्रचंड गर्जना सुरू केली. मग कालीने आकाशात उडी घेऊन आपल्या दोन्ही हातांनी पृथ्वीवर आघात केला. त्या आघाताने इतर सर्व आवाज बंद पडले. मग शिवदुतीने अशुभसूचक प्रचंड हास्य केले. तो आवाज ऐकताच सर्व दैत्यांचा थरकाप उडाला. शुंभ मात्र भयंकर खवळला. 

          देवी शुंभाला उद्देशून म्हणाली, “अरे मुर्खा, उभा रहा.” त्या वेळी आकाशातील देवांनी देवीचा जयजयकार केला. शुंभाने देवीवर एक अतिभयंकर ज्वालायुक्त शक्ती फेकली परंतु देवीने त्रिशूल मारुन ती शक्ती जाळून भस्म केली. त्यावेळी शुंभाने सिंहनाद केला. त्या आवाजाचे त्रैलोक्यात प्रतिध्वनी उमटले. शुंभाने देवीवर मारलेल्या बाणांचे  देवीने व  देवीने मारलेल्या बाणांचे शुंभाने आपल्या बाणांने तुकडे-तुकडे केले. मग देवीने एक शूळ फेकून शुंभाला जमिनीवर बेशुद्ध पाडले. 

          ईकडे बेशुद्ध पडलेला निशुंभ सावध झाला. आपला भाऊ शुंभ बेशुद्ध पडल्याचे समजताच तो गदा घेऊन अत्यंत क्रोधाने देवीवर धावून गेला. त्याने गदेचा प्रहार करून सिंहाला घायाळ केले. मग त्याने आपल्या ठिकाणी एक हजार हात निर्माण करून चक्रांच्या प्रहारांनी चंडीकेला झाकून टाकले. क्रुद्ध झालेल्या दुर्गादेवीने असंख्य बाण मारून ती सर्व चक्रे नष्ट केली. मग निशुंभ देवीला ठार मारण्यासाठी हातात गदा घेऊन देवीवर धावून गेला. परंतु देवीने धारदार तलवारीने ती गदा तोडून टाकली. 

          मग मी निशुंभांने हातात शूळ घेतला, ते पाहून देवीने आपल्या शूळाने निशुंभाची छाती फोडली. त्याच छातीतुन एक दुसरा एक महाबली, महापराक्रमी पुरुष ‘थांब थांब’ असे म्हणत बाहेर पडला. त्या पुरुषाला पाहून देवी हसू लागली. तिने खड्गाने त्याचे मुंडके उडवले. निशुंभ जमिनीवर मरून पडला. तशाही स्थितीत निशुंभाचे धड हातात गदा घेऊन युद्ध करू लागले. देवीने तीक्ष्ण बाण मारून त्या धडाचे हात-पाय तोडले. तेव्हा पर्वतप्राय निशुंभ ठार झाला. 

          निशुंभ मरून पडताच सिंह अनेक दैत्यांना ठार मारून खाऊ लागला. ते दृश्य भयंकर होते. काली व शिवदूती अनेक दैत्यांना खाऊ लागल्या. कौमारीच्या शक्तीने अनेक महादैत्य ठार झाले. ब्रह्मणीने मंत्रपूत जलाने अनेक दैत्य नष्ट केले. माहेश्वरीच्या त्रिशुळाने असंख्य दैत्य जळून भस्म झाले. वाराहीने आपल्या दाढानी व वैष्णवीने आपल्या चक्राने दैत्यांचे तुकडे-तुकडे केले. इंद्रशक्तीने वज्राने, नृसिंह शक्तीच्या नुसत्या दृष्टिक्षेपाने असंख्य दैत्य नष्ट झाले. कित्येकांना कालीने व सिंहाने खाऊन टाकले. अशाप्रकारे निशुंभासह दैत्यांचा संहार झाला. सर्व देवांना व मातृगणांना आनंद झाला. 

          हे राजा, तुला सांगितलेले हे महासरस्वतीहे  आख्यान अत्यंत पवित्र असून श्रोत्या वक्त्यांना पावन करणारे आहे. यांच्या श्रवण , पठणाने देवी संतुष्ट होते.  

                    श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील निशुंभ वध नावाचा नववा अध्याय समाप्त!

आठवा अध्याय⬅️

➡️ अध्याय दहावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या