Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा-१० ) / Shri Devi Mahatmya Katha 10

श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय दहावा 

 शुंभ वध 


          तप्त सुवर्णाप्रमाणे जिची शरीरकांती आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे जिचे तीन नेत्र आहेत. जिने आपल्या सुंदर हातात धनुष्यबाण, अंकुश, पाश व शुल धारण केला आहे. जिने मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे. त्या शिवशक्ती स्वरुप भगवती कामेश्वरीचे मी हृदयात चिंतन करतो. 

|| श्री गणेशाय नमः || श्री देव्यै नमः ||

          हे भवानीदेवी, तुला माझा नमस्कार असो. तू अवघ्या त्रैलोक्याची जननी आहेस. तू तुझ्या केवळ इच्छेने ब्रम्हा-विष्णू-महेशादींना कार्य करायला लावतेस व या विश्वाचे कार्य चालवतेस. हे जगन्माते तुला माझा नमस्कार असो. 

          यापूर्वीच्या अध्यायात श्री महासरस्वतीचे आख्यान सांगितले. निशुंभ दैत्याच्या वधाची कथा सांगितली. कमलपुष्पावर भ्रमर जसा लुब्ध होतो त्याप्रमाणे श्रोतेहो! आता पुढील इतिहास शांत चित्ताने ऐका. 

          मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, राजा, तू आता एकाग्र चित्ताने ऐक. आपला प्राणप्रिय भाऊ निशुंभ युद्धात मारला गेला हे समजताच व दैत्यसेनेचा पूर्ण विध्वंस झाल्याचे कळताच शुंभ दैत्य अत्यंत क्रुद्ध झाला. तो देवीला म्हणाला, हे दुष्ट दुर्गे, तुला स्वतःच्या सामर्थ्याचा मोठा गर्व झालेला दिसतो आहे. तू इतरांच्या मदतीने युद्ध करीत आहेस हे योग्य नाही.

          देवी म्हणाली, “अरे दुष्टा, मी एकटीच आहे. या जगात माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. या सर्व शक्ती माझ्यात विभूती आहेत. म्हणून यांनी माझ्यात प्रवेश केला आहे.” देवीने असे सांगितले असता ब्राह्मणी इत्यादी सर्व शक्तीदेवींनी अंबिकेच्या शरीरात प्रवेश केला. त्यावेळी फक्त अंबिकादेवीच दिसत होती. देवी म्हणाली, “अरे दैत्या, मी ऐश्वर्या शक्तीने अनेक रूपात येथे उपस्थित होते. आता त्या सर्व शक्ती माझ्यात लय पावल्या आहेत. आता युद्धभूमीवर मी एकटीच आहे. माझ्याशी युद्ध कर. 

          मेधा ऋषी म्हणाले, “राजा, त्यानंतर देवी आणि शुंभ यांच्यात घनघोर युद्ध झाले. दोघे एकमेकांवर बाणांचा वर्षाव करीत होते. अत्यंत दाहक अशा शस्त्रास्त्रांचा आघात करीत होते. ते युद्ध पाहून सगळे विश्व भयभीत झाले. देवीने सोडलेली अनेक दिव्य अस्त्रे शुंभाने आपल्या निवारक अस्त्रांनी तोडून टाकली. त्याचप्रमाणे शुंभाने सोडलेली भयंकर अस्त्रे देवीने नुसत्या हुंकाराने नष्ट केली. शुंभाने असंख्य बाणांनी देवीला झाकून टाकले. तेव्हा क्रुद्ध झालेल्या देवीने बाण मारून शुंभाचे धनुष्य तोडून टाकले. धनुष्य तुटून पडताच शुंभाने हातात शक्ती घेतली. पण देवीने आपल्या चक्राने त्या शक्तीचे तुकडे-तुकडे केले. मग शुंभाने चंद्र-सूर्य कोरलेले तेजस्वी ढाल व तलवार घेऊन देवीवर हल्ला केला. तेव्हा देवीने आपल्या तीक्ष्ण बाणांनी ढाल-तलवार तोडून टाकली. खवळलेल्या देवीने शुंभाचा रथ मोडून टाकला. घोडे आणि सारथी यांना ठार मारले. क्रुध्द झालेल्या शुंभाने मोठी गदा घेऊन देवीच्या दोन्ही भुजांच्या मध्यभागी प्रहार केला. पण देवीने तो प्रहार चुकवून खड्गाने शुंभाचा उजवा हात शस्त्रासह तोडला. 

          शुंभाने देवीच्या छातीवर जोराने ठोसा मारला तेंव्हा देवीनेही त्याच्या छातीवर जोराने ठोसा मारून त्याला जमिनीवर पाडले. तशाही स्थितीत षुंभ उठुन उभा राहीला. त्याने देवीला पकडून आकाशात झेप घेतली. देवी आणि शुंभ यांचे आकाशात युद्ध सुरू झाले. त्या वेळी ऋषीमुनी, सिध्दादी देवगण देवीचा विजय व्हावा अशी मनोमन प्रार्थना करीत होते. देवीने आता निकराचे युद्ध सुरू केले. तिने शुंभाला पकडून आकाशात गरागरा फिरवले. मग त्याचे पाय पकडून भिंगरीसारखे घुमवून जमिनीवर फेकले. 

         त्या वेळी पृथ्वीचा थरकाप उडाला. धरणीकंप होतो आहे की काय असे वाटू लागले. सगळीकडे हाहाकार झाला. सप्तसमुद्र, सप्तद्वीपे कंप पावली. पर्वत डळमळू लागले. शुंभ तसाच उठला व देवीला लाथ मारण्यासाठी धावला. तेव्हा देवीने खड्गाचा प्रहार करून त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. तो सरपटत देवीकडे येऊ लागला. तेव्हा देवीने खड्गाने त्याचे मस्तक तोडले. त्यातून धबधबा रक्त वाहू लागले. तो पर्वतप्राय शुंभ ठार झाला. 

          शुंभ दैत्याचा वध होताच सर्व विश्व शांत झाले. आकाश स्वच्छ झाले. पूर्वी उल्कापात मेघ उत्पात होत होते, ते सर्व शांत झाले. शुंभाचा वध झाल्याने त्रैलोक्य आनंदित झाले. देवांचा आनंद गगनात मावेना. देवांनी आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी केली. सर्व ऋषी-मुनी आनंदाने देवीचे स्तवन करू लागले. जयवाद्य घुमु लागली. गंधर्वांनी गायन सुरू केले. अप्सरा नृत्य करू लागल्या. मंद सुगंधित वारा वाहू लागला. अग्नी शांत होऊन यज्ञकुंडात प्रकाशू लागला. नद्या स्वच्छ पाण्याने वाहू लागल्या. सूर्य तेजाने चमकू लागला. शुंभाचा वध झाल्याने चराचर सृष्टीला खूप खूप आनंद झाला. 

          हे महासरस्वतीचे आख्यान जे भक्तिभावाने श्रवण पठन करतील, त्यांचे सगळे मनोरथ सिद्दीला जातील. युद्धात विजय मिळेल, शत्रूचा पराभव होईल. या देवी महात्म्याच्या पठणाने सर्व दुःखांचा नाश होईल. असे स्वतः वेद व्यासांनी सांगितले आहे, म्हणून ते सत्य आहे. हे श्री अंबिका देवी मी तुला पुन: पुन: नमस्कार करतो. 

          श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील शुंभ वध नावाचा दहावा अध्याय समाप्त!

नववा अध्याय⬅️

➡️  अकरावा अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या