।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:- २८ ते ३५
१४. रुक्मांगदाची कथा, अहल्या-आख्यान
भृगू ऋषी सोमकांताला रुक्मांगदाची कथा सांगू लागले. ते म्हणाले, "भीम राजाचा पुत्र रुक्मांगद हा रूपवान व गुणवान होता. आपल्या सुशील स्वभावामुळे तो सर्वांना आवडत असे. राजाने त्याचे योग्य वेळी मौंजीबंधन केले आणि विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठविले. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या रुक्मांगदाने आपल्या आचार्यांकडून सर्व विद्या व क्षत्रियांना आवश्यक असलेले युद्धतंत्र लवकरच आत्मसात केले. तो घरी परतल्यावर राजाने आपल्या प्रधानांशी विचारविमर्श करून त्यास युवराजपद दिले.
रुक्मांगद आपल्या पित्याप्रमाणेच गणपतीची भक्ती करीत असे. भीम राजाने त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. या मंत्रोपदेशानंतर त्याची भक्ती इतकी दृढ झाली की, मंत्रजप करताना त्याला देहभानच राहत नसे.
एके दिवशी रुक्मांगद आपल्या सेवकांसह मृगयेसाठी घोर अरण्यात गेला होता. त्या वेळी झालेल्या धावपळीने तो अगदी थकून गेला. विश्रांतीसाठी चांगले ठिकाण शोधत तो एका आश्रमापाशी आला. तो वाचक्नवी ऋषींचा आश्रम होता. रुक्मांगद आश्रमात प्रवेशला. त्या वेळी ते ऋषी स्नानासाठी निघाले होते. राजपुत्राने त्यांना नमस्कार करून येण्याचा उद्देश सांगितला. ऋषींनी त्याला विश्रांती घेण्याची अनुमती दिली. आपली पत्नी मुकुंदा हिला त्याचे आदरातिथ्य करण्यास सांगितले.
रुक्मांगदाला खूपच तहान लागली होती. त्याने मुकुंदाला पाणी देण्याची विनंती केली. त्या वेळी त्याचे देखणे राजबिंडे रूप पाहून तिच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. त्याला पाणी देण्याचेही तिला भान राहिले नाही. ती हळुवार पावलांनी रुक्मांगदापाशी गेली आणि त्याच्याकडे अर्थपूर्ण मादक दृष्टी टाकून म्हणाली, "हे राजपुत्रा, माझे मन तुझ्यावर अनुरक्त झाले आहे. माझा देहाला कामाग्नीने पुरते व्यापून टाकले आहे. तू माझ्याशी सहवास करून मला तृप्त कर."
एका तपस्व्याच्या पत्नीच्या मुखातील ते विपरीत शब्द ऐकून रुक्मांगदाला आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले. तो तिला म्हणाला, "तू माझे अशा रितीने आदरातिथ्य करशील याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी मी येथे आलो नसतो. वाचक्नवी हे थोर ऋषी आहेत. त्यांची योग्यता फार मोठी आहे. तू त्यांची पत्नी असूनही व्यभिचार करू पाहतेस हे काही योग्य नाही. या तुझ्या मर्यादाहीन वर्तनाने मला तुझा रागच आला आहे. मी सुसंस्कृत आहे. माझे मन तुझ्यावर आसक्त होणे. कदापि शक्य नाही. मी तहानेने तडफडून मेलो तरी चालेल, पण येथे थांबणार नाही."
रुक्मांगद जाण्यासाठी वळला. तेव्हा मुकुंदा धावतच त्याच्यापाशी आली आणि त्याला बिलगून म्हणाली, "हे देखण्या वीरा, खीवर बलात्कार करणे हे महापाप आहे. त्या नराधमाला नरकवासच प्राप्त होणार. पण पुरुषावर अनुरक्त झालेली स्त्री स्वच्छेने त्याच्या स्वाधीन होत असेल, तर कर्तव्य म्हणून त्याने तिची कामेच्छा तृप्त करणे यात काहीच पाप नाही. कृत आणि त्रेतायुगात ब्रह्मदेवाने स्त्रियांना याबाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. माझ्यासारखी सुंदरी तुझी अपेक्षा धरते हा तुझा सन्मानच आहे. तू माझ्या भावनेचा अनादर करू नकोस, अन्यथा मी तुला शाप देईन."
मुकुंदाच्या निर्लज्ज बागण्याचा पापभीरू रुक्मांगदास खरोखरच राग आला. त्याने परखड शब्दांत तिची निंदा केली. तिला आपल्यापासून बलपूर्वक दूर केले. त्याने असे झिडकारल्यामुळे तिचा संताप अनावर झाला. ती क्रोधावेशाने म्हणाली, "दुष्टा! माझी अवहेलना केलीस ! मला धिक्कारलेस! आता तुलाही लोकांची उपेक्षा सहन करावी लागेल. तुझ्या सर्वांगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न होईल. "
ती शापवाणी ऐकून रुक्मांगद अतिशय व्यथित झाला. तो आश्रमाबाहेर आला तेव्हा त्याचे शरीर श्वेतकुष्ठाने पांढरे शुभ्र व कळाहीन झाले होते. स्वतःला असे विद्रूप पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो गजाननाला आर्ततेने आळवू लागला- "हे गजानना, तू सर्वसाक्षी सर्वेश्वर आहेस. भक्तवत्सल आहेस. कोणी दुराचारी आपल्या भक्तांना छळत असेल, तर धाव घेऊन त्या दुष्टाचे पारिपत्य करणारा आहेस. हे दयाघना! माझा काहीही अपराध नसताना मला हे दुःख का प्राप्त झाले ? ही कोणत्या दूषित पूर्वकर्माची तू मला शिक्षा देत आहेस? आता हे असे पांढरेपण घेऊन मी कोणत्या तोंडाने लोकांमध्ये जाऊ? ते माझा तिरस्कार करतील, माझी निंदा करतील. ही उपेक्षा मी कशी सहन करू ? मला शाप देणाऱ्या त्या निर्लज्ज कामपिपासू स्त्रीला तू जिवंत कसे ठेवलेस? तिने माझ्यावर अन्याय केला आणि तो तू उघड्या डोळ्यांनी पाहिलास. आता मला जगण्यात रुची नाही. मी प्राणत्यागच करतो." आमरण उपोषणाचा निश्चय करून रुक्मांगद निबिड अरण्यात प्रवेशला. त्याच्या सेवकांनी त्याला शोधण्यासाठी सर्व परिसर पिंजून काढला. पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
रुक्मांगदाने एका विस्तृत वटवृक्षाचा आश्रय घेतला. गजाननाचे नाव घेत निराहार राहून तो कालक्रमणा करू लागला. एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्या बनातून जात असताना हा राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडला. ते त्याच्याजवळ गेले. त्याची विचारपूस केली. रुक्मांगदाने त्यांना वंदन केले. त्यांना आपली दुर्दैवी हकिकत सांगितली. ती ऐकून नारदांनाही बाईट वाटले. मार्गदर्शनपर बोलताना ते त्याला म्हणाले, "राजपुत्रा, मी सर्वत्र संचार करतो हे तुला माहीतच आहे. नुकतीच एक विलक्षण घटना माझ्यासमोरच घडली. विदर्भातील कदंब नगरात चिंतामणी गणेशाचे प्राचीन आणि प्रसिद्ध असे मंदिर आहे, त्यासमोरील प्रांगणात एक पवित्र जलकुंड आहे. तेथे श्रीगणेशाची पावले उमटलेली आहेत. मी तेथे गेलो असताना एक शूद्र जातीचा वृद्ध तेथे आला. तो कुष्ठरोगाने गलितगात्र झाला होता. त्या कुंडातील जलाने त्याने स्नान केले. तर काय आश्चर्य! त्याच्या कुष्ठाचे समूळ निर्मुलन होऊन तो तेजस्वी दिसू लागला. त्याच वेळी एक दिव्य विमान प्रकट झाले. त्यातील गणेशदूतांनी त्या शूद्राला सन्मानाने विमानात बसविले आणि त्याला उत्तम लोकी नेले. तूही त्या ठिकाणी जावेस असे मला वाटते. त्या कुंडात स्नान करून तू संकटमुक्त होशील."
नारदांचे बोलणे ऐकून रुक्मांगदास हायसे वाटले. त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची त्याने इच्छा प्रकट केली. तेव्हा नारद म्हणाले, "रुक्मांगदा, मी एकदा इंद्राला भेटण्यासाठी अमरावतीस गेलो होतो. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्याने मला विचारले, "हे मुने! तुम्ही त्रैलोक्यसंचारी आहात. या अलीकडच्या काळात तुम्ही एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहिली असल्यास कृपा करून मला सांगा." मी म्हणालो, "हे देवेंद्रा, काही दिवसांपूर्वी मी गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. त्या वेळी ते आपल्या पत्नीशी अहल्येशी काही बोलत होते. तिचे अनुपम लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो. तिच्या सौंदर्यात इतके सामर्थ्य आहे की, तिला पाहताच कोणी श्रेष्ठ तपस्वी बा महान पुरुषही कामवासनेने पीडित होऊ शकतो. अगदी स्पष्टच बोलायचे झाले तर तुझ्या दरबारातील अप्सराही तिच्यासमोर निस्तेज ठरतील. त्रिभुवनातील कोणत्याही सौंदर्यवतीची तिच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. अहल्येच्या अस्तित्त्वामुळे गौतमांचा आश्रम वासंतिक सृष्टीप्रमाणे बहरलेला व आल्हाददायक वाटतो. त्यापुढे तुझी अमरावतीही तुच्छ आहे."
त्या माझ्या वर्णनानेच इंद्राच्या मनात अहल्येची अभिलाषा निर्माण झाली. तिची कल्पित मूर्ती एकसारखी त्याच्या दृष्टीसमोर येऊ लागली. तिची प्राप्ती कशी होईल या एकाच विचारात तो गढून गेला. त्याला क्षणभरही चैन पडेना. 'आता जे व्हायचे असेल ते होवो पण अहल्येचा उपभोग घ्यायचाच,' असा विचार करून तो भूलोकी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ आला. त्या वेळी ते ऋषिवर्य स्नानसंध्यादी नित्यकर्मासाठी नदीवर गेले होते. इंद्रासाठी ती एक सुसंधीच होती. त्याने गौतमांचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला. अहल्येच्या सौंदर्याने त्याचे मन ताब्यात राहिले नाही. त्याने तिला आलिंगन दिले व अंगसंगाची मागणी करू लागला. तेव्हा अहल्या म्हणाली, "स्वामी, तुमचे हे वागणे पाहून मला अगदी आश्चर्य वाटत आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हे माझे कर्तव्य असले तरी समागमासाठी ही वेळ योग्य नाही. अजून तुमचे स्नान व्हायचे आहे; पूजा, ध्यान, जप व यज्ञादी नित्यकर्मे व्हायची आहेत; हे सर्व सोडून भलतेच काय मागता ?"
तेव्हा गौतमरूपी इंद्र म्हणाला, "प्रिये, आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे. मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो. तेथे एक अप्सरा विवस्त्र स्नान करीत होती. तिला पाहून मी कामातुर झालो. मन अस्वस्थ झाल्याने मी त्वरेने परत आलो आहे. तू या क्षणी मला देहसंग दिला नाहीस, तर मदनबाणाने विद्व झालेल्या माझे प्राणही जातील किंवा मी तुला शाप देऊन संन्यास घेऊन निघून जाईन."
काय करावे? अहल्येला मोठा प्रश्न पडला. संयमी गौतमांचे असे बागणे तिला कधीच अपेक्षित नव्हते. तरीही पतिव्रतेचा धर्म म्हणून ती त्यांच्याशी रममाण झाली. इंद्राने त्या महान पतिव्रतेला अशा प्रकारे कपटाने शीलभ्रष्ट केले. सहवासानंतर त्याच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहल्येचे मन साशंकित झाले. या मायावी पुरुषांकडून आपली फसवणूक झाली आहे हे तिच्या तत्काळ लक्षात आले. ती संतापाने ओरडून म्हणाली, “अरे नराधमा, तू कोण आहेस? तू माझ्या पतीरूपात येऊन माझे पातिव्रत्य भंग केलेस. मुकाट्याने आपले मूळ स्वरूप प्रकट कर, अन्यथा मी तुला शापाने भस्मसात करीन."
अहल्येचे ते क्रोधावेशपूर्ण भाषण ऐकून इंद्र भयभीत झाला. निजस्वरूपात प्रकट होऊन तो तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, "हे सुंदरी, मी देवांचा अधिपती आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून माझ्या मनात तुझ्या देहाचा उपभोग घेण्याची अनिवार इच्छा उत्पन्न झाली. त्या वासनेनेच माझ्याकडून हे दुष्कृत्य घडले. प्रमाद घडला आहे खरा, पण मी तुझी उपेक्षा करू शकत नाही. तू मला जे सौख्य दिले आहेस त्याबद्दल मी तुला स्वर्गलोकी नेऊ इच्छितो. तेथील दिव्य सुखसाधनांचा तू नित्य यथेच्छ उपभोग घे. तुझ्यासारख्या सौंदर्यवतींसाठी स्वर्ग हेच उत्तम स्थान आहे."
इंद्राचे ते भाषण ऐकून अहल्या रागावलेली असली तरी तिला लाजही वाटत होती. “देवेंद्रा, तुझ्या करणीने तू स्वतःला आणि मला कोणत्या संकटात ढकलले आहेस याची तुला कल्पना नाही. आता आपल्या बाबतीत काय होणार आहे कोणास ठाऊक?" असे म्हणून ती रहू लागली. इंद्रही हतबल झाला होता. कलंकित आणि व्यथित झालेल्या अहल्येकडे पाहण्याचे त्याला धैर्य होईना. मदनाच्या सत्तेने त्याचा दारुण पराभव केला होता. त्याच वेळी गौतमांचे आश्रमात आगमन झाले. अहल्येने त्यांना बसण्यासाठी आसन मांडले नव्हते, ती त्यांना पाय धुण्यासाठी पाणीही घेऊन आली नव्हती. या सर्व गोष्टींचे त्यांना नवल वाटले. त्यांनी तिला हाक मारली. ती भयभीत होऊन त्यांच्यासंमुख आली. ती थरथर कापत होती. त्यांनी तिला विचारले, "मी येणार असल्याचे माहीत असूनही तू काहीच व्यवस्था केली नाहीस, हे कसे?" अहल्येने अपराधी भावनेने मान खाली घातली. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. तिची अवस्था पाहून 'गौतमांनी 'काय झाले?' अशी पृच्छा केली. तेव्हा ती स्फुंदत स्फुंदत त्यांच्या चरणांवर कोसळली. घडलेली सर्व हकिकत त्यांना कथन केली. ती ऐकून गौतमांना भयंकर संताप आला. त्यांनी अहल्येला शाप दिला- "कुलटे ! पतिव्रता ना तू? माझ्यासारख्या तपस्व्याची पत्नी असूनही तुला त्या दुष्ट इंद्राचे कपट ओळखता आले नाही? तुला काय म्हणावे ? तुझी बुद्धी दगडासारखी जड आहे म्हणून तू शिळा होऊन पडशील! तुला क्षमा करणे मला शक्य नाही. तथापि केवळच दयेपोटी मी तुला उःशाप देतो, रामावतारात श्रीहरीच्या पावन पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. आता मला तुझे तोंडही पाहायचे नाही." गौतमांसारख्या त्या महातपस्व्याच्या शापाने अहल्या क्षणार्धात शिळा होऊन पडली.
त्या वेळी इंद्र घरातच लपला होता. अहल्येची अवस्था पाहून आत्ता आपलीही धडगत नाही या विचाराने तो पुरता हादरून गेला. त्याने भीतीने मांजराचे रूप घेऊन आश्रमाबाहेर पलायन केले. अंतर्ज्ञानी गौतमांनी त्याला तत्काळ ओळखले. त्यांनी 'थांब' अशी आज्ञा करताच मार्जाररूपातील इंद्र जागेवरच खिळून राहिला. संतापलेल्या गौतमांनी त्यालाही शाप दिला. ते म्हणाले, "तू देवांचा अधिपती आहेस म्हणून मी तुझा नाश करीत नाही. पण तुझ्यासारख्या हीन कृत्य करणाऱ्याला शासन हे झालेच पाहिजे. म्हणून ज्या कामवासनेने प्रेरित होऊन तू माझ्या पत्नीला भ्रष्ट केलीस त्या पापाबद्दल तुझ्या सर्वांगावर सहस्र भगे पडतील."
गौतमांच्या शापाने इंद्राच्या सर्वांगावर खरोखरच सहस्र भगे पडली. तो विद्रूप दिसू लागला. त्याला पश्चात्ताप होत होता. 'हाय-हाय रे दुर्दैवा ! तू माझी ही काय अवस्था केलीस? मी देवांचा स्वामी, सर्व सामर्थ्यवान, असे असूनही मदनाने मला नागविले. माझा धिक्कार असो! आता मी काय करू? देवांपुढे कसा जाऊ? ते मला हसतील, माझी निंदा करतील. वृद्ध गुरूंनी मला केलेले सदाचाराचे उपदेश आज व्यर्थ ठरले. मी त्यांची बोधवचने विसरलो, दुष्कृत्यास प्रवृत्त झालो, म्हणून हे लाजिरवाणे जिणे नशिबी आले," अशा प्रकारे विचार करून तो एकसारखा रडत होता. मग 'इंद्रभोग' कीटकाचे रूप घेऊन तो कमळाच्या देठात लपून बसला. हे वृत्त कळताच मी त्वरेने अमरावतीस गेलो.
बृहस्पती आणि सर्व देवांना इंद्राच्या बाबतीत काय घडले आहे ते सर्व सांगितले. त्यामुळे देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली. ते सर्व जण गौतम ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी गौतमांना वंदन केले, त्यांची स्तुती केली. ऋषिवर्यांनी त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. देव म्हणाले, "हे मुने, आपण इंद्राला क्षमा करून त्याला उ:शाप द्यावा, अशी आमची विनंती आहे." गौतम म्हणाले, “भोगविलासी इंद्राने माझ्या पत्नीला कपटाने शीलभ्रष्ट केली. या त्याच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही. तथापि तुमच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो. इंद्राने गणपतीची आराधना करावी. तो आदिदेव आहे, सर्वांना पूज्य आहे, तो जगाचे कल्याण करणारा आहे. त्या देवाधिदेवाने कृपा केली तरच इंद्राला पूर्वस्वरूप प्राप्त होईल. मी तुम्हांला एक षडक्षरी मंत्र सांगतो. त्याचा तुम्ही इंद्राला उपदेश करा. श्रीगणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने या मंत्रानुष्ठानाने त्याची उपासना करावी. माझ्या शापामागे तपश्चर्येचे सामर्थ्य आहे. त्यामुळे शापाचा प्रभाव कमी होईल, पण समूळ नष्ट होणार नाही. त्याच्या अंगावर जेथे जेथे भगे पडली आहेत तेथे डोळे येतील. लोक त्याला 'सहस्राक्ष' म्हणून ओळखतील."
त्यानंतर देवांनी इंद्राची भेट घेतली. त्यांनी खूपच विनंती व आर्जवे केली. तेव्हा कोठे कीटकाच्या रूपाने कमळाच्या देठात लपून राहिलेला हताश इंद्र क्षतांनी भरलेले दुर्गंधीयुक्त शरीर घेऊन त्यांच्यासंमुख प्रकट झाला. त्या असह्य दुर्गंधीने सर्वांनी आपली नाके दाबून धरली. कोणीही त्याच्याजवळ जाण्यास तयार होईना. देवगुरूंच्या आज्ञेने इंद्र स्नान करून आला. बृहस्पतींनी त्याला गौतमांकडील सर्व वृत्तान्त सांगितला. त्याला 'गणेशाय नमः ।' या मंत्राचा उपदेश केला. पश्चात्तापाने पोळलेल्या इंद्राने दृढ श्रद्धेने व भावभक्तीने मंत्रानुष्ठान आरंभिले. तो एकाग्रतेने मंत्रजप करू लागला. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याच्या शरीरावरील भगे नाहीशी होऊन त्याला सहस्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला.
या चमत्काराने इंद्राची गणेशभक्ती अधिकच दृढ झाली. त्याने आपले उर्वरित जीवन गणपतीच्या आराधनेतच व्यतीत करण्याचा निश्चय केला. तो देवांना म्हणाला, "तुम्ही माझ्यासाठी गौतमांना विनंती केलीत, उःशाप मागून घेतलात याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. तुमचे आभार कसे मानावेत तेच मला कळत नाही. माझ्या हातून घडलेले नीच कृत्य क्षमायोग्य नव्हते. या प्रमादाबद्दल गौतमांनी मला भस्मसात करायला हवे होते, पण तसे काहीही न करता त्यांनी मला अशी शिक्षा दिली की ज्यायोगे मी गणपतीचा भक्त झालो. त्याच्या कृपाप्रसादाने आज मी शापमुक्त झालेलो असलो तरी गणेशभक्तीचा मार्ग सोडायचा नाहीं असा मी निश्चय केलेला आहे. म्हणून माझी तुम्हांला अशी विनंती आहे की, तुम्ही स्वस्थानीं जाऊन आपापली कर्तव्ये करीत राहावे. "
देव निघून गेले. इंद्र एका वृक्षाखाली बसून षडक्षरी गणेशमंत्राचा एकोभावे जप करू लागला. एकाग्रतेने त्याचे देहभान हरपले. अशी हजारो वर्षे लोटली. इंद्राचा देह वारुळाने व्यापून गेला. या त्याच्या तपश्चर्येने श्रीमहागणपती प्रसन्न झाला. तो इंद्रासंमुख प्रकट झाला. त्याची कोट्यवधी सूर्यांसमान तेजोदीप्ती पाहून इंद्र भयभीत झाला. त्याने आपले सहस्र नेत्र घट्ट मिटून घेतले. त्याची अवस्था पाहून भक्तवत्सल गणपतीने त्याला अभय दिले. तो म्हणाला, "हे इंद्रा ! घाबरू नकोस. तू ज्याची आराधना करीत आहेस तो मी गजानन तुझ्यासमोर प्रकट झालो आहे. तुझी सेवा मला पावली आहे. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तरी इष्ट बरदान मागून घे."
श्रीगणपतीच्या त्या आश्वासक मधुर स्वरांनी इंद्राला धीर आला. त्याची भीती नाहीशी झाली. त्याने डोळे उघडून पाहिले. आपल्या आराध्य दैवताची ती महन्मंगल प्रसन्नमूर्ती पाहून त्यास परमानंद झाला. अष्टसात्त्विक भावांनी त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला. त्याची भक्तिभावाने स्तुती आरंभिली- "हे दयाघना ! हे भक्तवत्सला ! हे शिवनंदना शक्तिसुता! तुझ्या दर्शनाने मी धन्य-धन्य झालो आहे. माझी तपश्चर्या फळास आली. मी तुझी काय स्तुती करू? तू ब्रह्मांडांचा स्वामी आहेस. समस्त विश्वाचा आधार आहेस. तू चारी जीवकोटींचा निर्माता आहेस. तू सर्व भूतांचा अधिपती आहेस. तू सगुण आहेस, निर्गुण आहेस. तू साकार आहेस, निराकार आहेस. तू विश्वाचे आदिकारण आहेस. तू विश्वाचा उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता आहेस. तूच कर्ता भर्ता, तूच दाता विधाता, तूच अंतर्बाह्य व्याप्त आहेस. तूच सनातन परब्रह्म आहेस. तू अप्रकट आहेस. तूच सृष्टिरूपाने नित्य प्रकट आहेस. तू अनादी आहेस, अनंत आहेस. सनकादिकांनाही तुझा पार लागत नाही. तुझ्याविषयी बोलताना वेदही निःशब्द होतात, तेथे माझ्यासारख्या पामराने तुझ्या सामर्थ्याचे काय वर्णन करावे ? तू अनंत ब्रह्मांडांचा अनभिषिक्त सम्राट आहेस. तू अष्टमहासिद्धींचे भांडार आहेस. तू आनंदाचा सागर आहेस. तू कृपेचा मेघ आहेस. तू निजकृपेने मला दर्शन दिलेस. मला वरदान देण्यास तू उत्सुक आहेस. मी तुझ्याकडे काय मागू? मला तुझे कधीही विस्मरण न होवो एवढीच प्रार्थना आहे. तुझ्या मनात मला काही द्यायचेच असेल तर माझे एवढेच सांगणे आहे की, ज्या कदंब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली तेथे आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे. ते 'कदंबनगर' म्हणून प्रख्यात व्हावे. ज्या सरोवरात स्नान करून मी देवगुरू बृहस्पतींकडून तुझ्या षडक्षरी नाममंत्राचा उपदेश घेतला ते 'चिंतामणी सरोवर' या नावाने प्रख्यात व्हावे आणि त्यात स्नान करून दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ट मनःकामना तुझ्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात.”
गणपतीने 'तथाऽस्तु!' म्हणून त्याला आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला, "देवेंद्रा, मी तुला आणखी एक बर देतो. संकटकाळात ज्या-ज्या वेळी तू माझे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी मी प्रत्यक्ष प्रकट होऊन तुला संकटमुक्त करीन.
त्या वरदानाने इंद्राला कृतकृत्य वाटले. त्याचे अंत:करण भरून आले. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने स्वर्गातील गंगेचे पाणी आणून गणपतीला विधियुक्त स्नान घातले. त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याच्या गणांचेही पूजन केले. त्याच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावला. इंद्राने त्या स्थानी एक सुरेख मंदिर बांधले. त्याच्या गाभान्यात गणपतीच्या मनोहर स्फटिक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मग तो सपरिवार स्वर्गलोकी गेला.
रुक्मांगदा, असे आहे चिंतामणी सरोवराचे माहात्म्य म्हणून तू कदंबनगरास जा. तेथील सरोवरात स्नान कर. त्या पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुझ्या श्वेतकुष्ठाचे निवारण होऊन तुला दिव्य देह प्राप्त होईल." रुक्मांगदाने नारदांचे आभार मानले. त्यांना साष्टांग नमस्कार केला. नारद संचारार्थ निघून गेले.
काही वेळाने रुक्मांगदाचा शोध घेत त्याचे सैनिक त्याच्यापाशी आले. तो सापडल्यामुळे त्यांना फारच आनंद झाला होता. तथापि श्वेतकुष्ठामुळे त्याला विरूप अवस्थेत पाहून त्यांना फारच दुःख झाले. रुक्मांगदाने त्यांची कशीबशी समजूत काढली. त्यांना आधीचे सर्व वृत्त सांगितले. नारदभेटीचे वर्तमानही सांगितले. त्याने कदंबनगरास चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्याच्यासमवेत जाण्यास निघाले. मजल दरमजल करीत रुक्मांगद चिंतामणी सरोवरापाशी गेला. गजाननाचे स्मरण करून सर्वांनी त्या तीर्थात स्नान केले. तर काय आश्चर्य! राजपुत्राच्या अंगावरील श्वेतकुष्ठ नाहीसे होऊन त्याची काया पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली. सैनिकांची शरीरेही उजळली. त्यामुळे सर्वांना फारच आनंद झाला. त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे गणपतीचा जयजयकार केला. मंदिरात जाऊन गणपतीच्या स्फटिक मूर्तीचे दर्शन घेतले. तिची पूजा केली. तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी विमान खाली आले. त्याच्या दिव्य प्रभेने सारा आसमंत भरून गेला. त्या विमानात गणेशदूत होते. रुक्मांगदाने त्या सर्वांना चंदन केले. तेव्हा दूत म्हणाले, "राजपुत्रा, तुम्ही सर्वांनी या पवित्र तीर्थात स्नान करून आमच्या स्वामींची म्हणजेच श्रीगणपतीची मनोभावे पूजा केली. त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत. तुमची श्रद्धाभक्ती पाहून आमचे स्वामी तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की, त्यांनी तुम्हां सर्वांना गणेशलोकी नेण्यासाठी हे विमान पाठविले आहे. तरी कृपा करून आमच्यासमवेत चला.
ते ऐकून रुक्मांगदास परमानंद झाला. तो गणेशदूतांना म्हणाला, "हे गणांनो, तुम्ही मला नेण्यासाठी येथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. पण मला क्षमा करा. या वेळी मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. घरी माझे आई-वडील आहेत. त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय तुमच्याबरोबर येणे मला शक्य नाही. घराबाहेर पडून मला आधीच बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे ते दोघे चिंतेत असतील. त्यांना तशाच अवस्थेत ठेवून निघणे मला प्रशस्त वाटत नाही.
रुक्मांगदाला मातापित्याविषयी असलेली आस्था पाहून दूतांना परम संतोष वाटला. ते म्हणाले, "हे राजपुत्रा, तू खरोखरच सद्गुणी आहेस. या तीर्थात तू पुन्हा स्नान कर. त्या स्नानाचे पुण्य तुझ्या मातापितरांना अर्पण कर. म्हणजे आम्ही तुझ्याबरोबर त्यांनाही गणेशलोकी घेऊन जाऊ." दूतांच्या सूचनेनुसार रुक्मांगदाने दर्भाच्या दोन प्रतिमा तयार केल्या. चिंतामणी सरोवरात स्नान करून त्याचे पुण्य आपली माता, पिता व सर्व पौरजनांना अर्पण केले. मग तो आपल्या सैनिकांसह विमानात बसून कौंडिण्य नगरास आला. त्याच्या स्नानपुण्यदानाने प्रसन्न झालेल्या श्रीगणपतीने आणखी अनेक विमाने तेथे पाठविली. रुक्मांगद आपले मातापिता, आप्तमित्र व सर्व नागरिकांसह त्या विमानांत बसून गणेशलोकी गेला. अशा प्रकारे श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने रुक्मांगदाचा, त्याच्या परिवाराचा व त्याच्या नागरिकांचा उद्धार झाला.
अध्याय समाप्त

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.