Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ३६ ते ३७ || shri ganesh puran kathasar adhyay 36 to 37

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ३६ ते ३७ 

१५. गृत्समदाची कथा 



               भृगू ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, "राजन, ब्रह्मदेव व्यासांना गणेशपुराण सांगत होता. रुक्मांगदाची कथा सांगून तो थोडा वेळ स्वस्थ बसला. पण व्यासांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी विचारले, "हे विधाता ! जिने रुक्मांगदाकडे देहसुखाची मागणी केली त्या वाचक्नवी ऋषींच्या पत्नीचे म्हणजेच मुकुंदेचे पुढे काय झाले?"

              ब्रह्मदेव म्हणाला, "हे मुने, रुक्मांगद निघून गेल्यावर प्रणयातुर मुकुंदेस जराही चैन पडेना. कामाग्नीने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. काही केल्या रुक्मांगदाचे राजबिंडे देखणे रूप तिच्या डोळ्यांसमोरून दूर होईना. तिला अहोरात्र त्याचाच ध्यास लागला. ती सतत त्याचेच चिंतन करीत असे. आपण त्याला अकारण शाप दिला याचीही तिच्या मनात रुखरुख होती. एके दिवशी ती अरण्यातील एकांतात रुक्मांगदाची आठवण काढत बसली होती. इंद्राने तिची मनोवस्था ओळखली. ती आपल्या प्रियकराच्या विचारांच्या तंद्रीत आहे हे जाणून त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला. हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदेच्या मनात इंद्राबद्दल कधीच संशय आला नाही. या प्रसंगानंतर ती गर्भवती राहिली. वाचक्नवी ऋर्षीना या गोष्टीची काहीच माहिती नव्हती. प्रसूतिकाल पूर्ण होताच मुकुंदेने एका पुत्राला जन्म दिला. वाचक्नवींना पुत्रप्राप्तीचा फारच आनंद झाला. तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्यांनी त्याचे जातककर्म केले. त्याचे 'गृत्समद' असे नामकरण केले.

                     गृत्समद तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होता. वाचक्नवी ने पाचव्या वर्षी त्याचे मौंजीबंधन केले. त्याला वेदाभ्यास शिकविण्यास प्रारंभ केला. उपासनेसाठी 'गणानां त्वा०' या मंत्राचा उपदेश केला. 'या मंत्राने आराधना केल्यावर गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल. तो तुझ्या इष्ट कामना पूर्ण करील,' असा त्याला आशीर्वाद दिला. सर्व मगध राजा महापराक्रमी, सर्वगुणसंपन्न व ज्ञानी होता. त्याने पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलावून घेतले होते. अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र असे प्रख्यात ऋषी तेथे उपस्थित होते. त्यांत गृत्समदही होता. श्राद्धकर्म झाले, भोजने झाली, ऋषिमंडळी मंडपात बसून शास्त्रचर्चा करू लागली. त्या विद्वज्जनांत गृत्समदाने काही सिद्धांतांवर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. तेव्हा अत्री ऋषींनी त्याचा निषेध केला. ते म्हणाले, "गृत्समदा, तुझ्यासारख्याने आमच्यासमोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही. तू बाचक्नवींचा औरस पुत्र नाहीस, रुक्मांगद नावाच्या एका राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे. ऋषिपुत्र नसल्यामुळे तू येथून निघून जावे हेच बरे."

                     अत्री ऋषींचे बोलणे ऐकून गृत्समदाला मोठा धक्का बसला. त्याला त्यांचा मनस्वी राग आला. त्याची क्रुद्ध मुद्रा पाहून अनेक ऋषींनी त्या मंडपातून काढता पाय घेतला. गृत्समद अत्रींना म्हणाला, “तुम्ही माझा सर्वांदेखत जो अपमान केलात तो मी कधीही विसरणार नाही. तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हांला भस्म करीन." अत्रींनी त्याला काहीच उत्तर दिले नाही. 

                    गृत्समद संतापाने जळफळत त्या मंडपातून बाहेर पडला. घरी गेल्यावर मातेला पाहताच त्याचा क्रोध अधिकच उफाळला. त्याने मुकुंदेला जाब विचारला. तो म्हणाला, “आज तुझ्यामुळे माझ्यावर घोर अपमानास्पद प्रसंग ओढवला. अत्रींनी तुझ्या चारित्र्यावर आक्षेप घेतला. त्यांनी मी ऋषिपुत्र नसून कुणा रुक्मांगदाचा पुत्र आहे, असे ठामपणे सांगितले. त्यामुळे मला स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झाली आहे. मुकाट्याने माझा खरा पिता कोण आहे ते सांग, अन्यथा मी तुला शाप देऊन भस्मसात करीन."

                      तेजस्वी गृत्समद अनिवार संतापाने थरथरत होता. त्याला पाहून मुकुंदेला कापरेच भरले. तिने अर्धवट शुद्धीत तिला पडलेल्या स्वप्नाची हकिकत सांगितली. ते ऐकून गृत्समद म्हणाला, “कोणी परका पुरुष तुझ्याशी सहवास करून जातो त्याला तू स्वप्न म्हणतेस ? हा तर व्यभिचार झाला. तू आपल्या चारित्र्यहीनतेने माझ्या पित्याची फसवणूक केलीच आहेस आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवायची जागा ठेवली नाहीस. या पापाचे फळ तुला भोगायलाच हवे. तू काटेरी बोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ  फळे येतील, पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही. " ते शापवचन ऐकून मुकुंदेलाही संताप आला. तिनेही गृत्समदाला शाप दिला- "मी पापिणी आहे असे तुला वाटत असले तरी मी तुझी आई आहे. हे तू विसरलास. मी किती कष्ट सोसून तुला वाढविले हेही तू विसरलास. बरे पांग फेडलेस! तू पाषाणहृदयी आहेस म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. तू दुष्ट आहेस, म्हणून तुझ्या पोटीही त्रैलोक्याला तापदायक ठरेल असा क्रूर, दुरात्मा पुत्र जन्माला येईल."

                 त्या दोघांनी एकमेकांना असे शाप दिले. त्या वेळी आकाशवाणी झाली- 'गृत्समद हा इंद्राचा पुत्र आहे.' ते ऐकून मुकुंदा स्तंभित झाली. हा काय प्रकार आहे हेच तिला कळेना. तेवढ्यात तिचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले. गृत्समदही लज्जित झाला होता. काय करावे हेच त्याला सुचेना. तो आश्रमस्थान सोडून निघाला. फिरत-फिरत पुष्पक नामक अरण्यात प्रवेशला. तेथील मनोहर सृष्टिसौंदर्याने त्याला आल्हाद वाटला. त्याने तेथेच तपश्चर्या करण्याचे ठरविले. त्याच्या पित्याने 'गणानां त्वा' या मंत्राचे माहात्म्य त्याला आधीच सांगितले होते. पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्याने एकाग्र चित्ताने या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने एक हजार वर्षे श्रीगणपतीची आराधना केली. या तपश्चर्येत मग्न असताना एके दिवशी त्याने सहजच डोळे उघडले. त्या वेळी त्याच्या तेजस्वी दृष्टीतून निर्माण झालेला अग्नी त्रैलोक्य जाळून टाकतो की काय अशी देवांना भीती वाटली. त्यानंतरची पाच हजार वर्षे तो तपोमग्नच होता. त्या अवधीत तो झाडांची पाने खाऊन राहायचा. ही त्याची दृढ तपःसाधना पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याच्यासमोर प्रकट होऊन तो म्हणाला, " गृत्समदा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मी तुला वरदान देऊ इच्छितो. तरी इष्ट ते मागून घे."

                    गृत्समदाने डोळे उघडले. समोर आपले आराध्य दैवत साक्षात उभे आहे हे पाहून त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, "हे गणपती! हे कृपाळू महाप्रभो! तुझ्या कृपाप्रसादाने मला चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये सर्वश्रेष्ठ असा मनुष्यजन्म लाभला आहे. मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो. ब्राह्मणांपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ असतो. ज्ञानिजनांपेक्षा ब्रह्मवेत्ता सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून हे देवा, तू मला ब्रह्मज्ञान दे. मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे, तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी, अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनात तू नित्य वास करावास आणि तुझ्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेस असे मला वाटते." 

                तेव्हा गणपती म्हणाला, “गृत्समदा, आजपासून मी तुला ब्राह्मणत्व दिले आहे. तू ब्रह्मज्ञानी होशील. 'गणाना त्वा' या मंत्राचा तूच द्रष्टा ऋषी म्हणून प्रख्यात होशील. वेदज्ञ ऋषींमध्ये तुझी गणना होईल. माझ्या स्मरणापूर्वी सर्व लोक तुझ्या नावाचा उच्चार करतील. तुला एक महापराक्रमी व युद्धनिपुण पुत्र होईल. शंकराशिवाय तो सर्वांना अजिंक्य असेल. हे पवित्र क्षेत्र चारही युगांमध्ये विख्यात होईल. हे वन कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापरयुगात मानक व कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल. या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्यांच्या सर्व इष्ट मन:कामना पूर्ण होतील. "

                    गणपती अंतर्धान पावला. गृत्समदाने तेथे गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे एक सुंदर मंदिर बांधले. तो गणपती 'चरद 'विनायक' म्हणून प्रसिद्ध आहे."

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या