Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ३८ ते ४७ || shri ganesh puran kathasar adhyay 38 to 47

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ३८ ते ४७ 

१६. त्रिपुरासुराची कथा


            भृगू ऋषी सोमकांतास पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, "हे राजा, श्रीगणेशाच्या कृपेने गृत्समदाची पुढे थोर कीर्ती झाली. त्याला मंत्रद्रष्टा ऋषी म्हणून मान्यता मिळाली. एके दिवशी त्याला जोराची शिंक आली. तिच्या आवाजाने भूमी थरथरली, नभोमंडळ दणाणले. त्या शिकेतून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. त्याला पाहून गृत्समदास मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, "बालका, तू कोण आहेस?" तो म्हणाला, “हे मुने, आपण सर्वज्ञ असूनही असे का विचारता? तुमच्या शिंकेतून मी आत्ताच जन्माला आलो आहे. मी तुमचाच पुत्र आहे. मोठा झाल्यावर मी प्रचंड पराक्रम करणार आहे."

            बालकाचे ते बोलणे ऐकून गृत्समद थक्कच झाला. त्याला आपल्या मातेच्या, मुकुंदेच्या शापाचे स्मरण झाले. 'हा पुत्र दुष्ट व क्रूर तर नसेल?' या कुशंकेने त्याच्या मनात घर केले. तो भयभीत झाला, अस्वस्थ झाला. त्याने स्वतःची समजूत घातली. 'हा पुत्र आपल्याला लाभलेला आहे. आपण याच्यावर चांगलेच संस्कार घडवायचे,' असा त्याने मनोमन निश्चय केला. त्या पुत्राला त्याने गणेशभक्तीचे माहात्म्य सांगितले. त्याला 'गणानां त्वा' या गणेशमंत्राचा उपदेश केला.

पितृ आज्ञेने त्या बालकाने मंत्रानुष्ठानास सुरुवात केली. त्याने पाच हजार वर्षे तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला. ही त्याची खडतर साधना पाहून गणपती अतिशय प्रसन्न झाला. त्याने गृत्समदाच्या पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला. "बाळ, तू महान तपस्वी आहेस. तुझा भक्तिभाव आणि उपासनेवरची श्रद्धा पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे." तेव्हा तो म्हणाला, “हे परमेष्ठी ! तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तू महासमर्थ आणि सर्वशक्तिमान आहेस. तुला नमस्कार असो! तुझ्या मनात काही द्यायचेच असेल, तर चराचर सृष्टीसहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझे प्रभुत्व राहील असे वरदान दे. देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, विद्याधर, गंधर्व, ऋषिमुनी आणि समस्त प्राणिमात्रांनी माझ्या आज्ञेत राहावे. इंद्र, वरुण, यम, कुबेर आदी लोकपालांनी माझी सेवा करावी. माझ्या सर्व मन:कामना पूर्ण व्हाव्यात. मला सर्व प्रकारचे भोग व अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त व्हावे. अंती तुझ्या कृपेने माझा उद्धार व्हावा.

                             गणपतीने 'तथाऽस्तु!' म्हणून आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला,. "वत्सा, एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुप्याचे अशी तीन पुरे (विमाने) तुला प्राप्त होतील. त्यामुळे तू सर्वांना अजिंक्य होशील.  शंकराशिवाय कोणीही तुझा पराभव करू शकणार नाही. या तीन पुरांमुळे तू 'त्रिपुर' नावाने विख्यात होशील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या अंतसमयी शंकर ही तिन्ही पुरे एकाच बाणाने नष्ट करील. शिवाकडून मरण आल्यावर तू मुक्त होशील."

त्रिपुराला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावला. बंगाल प्रांतातील त्या पवित्र तपोभूमीत त्रिपुराने सुंदर गणेशमंदिर बांधले. तेथे 'गणेशपूर' नावाचे नगर वसविले. त्यानंतर त्याने सैन्याची जमवाजमव केली. तो दिग्विजयास निघाला. बघता बघता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. भूलोकीचे सर्व श्रेष्ठ राजे त्याचे मांडलिक झाले. पुढे त्याने पाताळावर स्वारी केली. तेथेही आपली सत्ता कायम केली. मग त्याने आपल्या अतिविराट सैन्याचे तीन भाग केले. त्यांपैकी एका भागावर भीमकाय आणि दुसऱ्या भागावर वज्रदंष्ट्र या दोन महाबलाढ्य सेनापतींना नियुक्त केले. भीमकाय याच्याकडे पृथ्वीची आणि वज्रदंष्ट्र याच्याकडे पाताळाची शासनव्यवस्था सोपविली.

तिसरा सैन्यविभाग स्वतःकडे घेऊन त्रिपुराने स्वर्गावर चढाई केली.. नंदनवनाचा प्रचंड विध्वंस करून त्याने इंद्राला युद्धासाठी उद्युक्त केले.. उभयपक्षी युद्धास तोंड फुटले. प्रचंड रणधुमाळी माजली. वीरांच्या गर्जना, रणवाद्यांचे निनाद, आव्हाने -प्रतिआव्हाने, शस्त्रास्त्रांचा खणखणाट यांनी दाही दिशा व्यापून टाकल्या. निकराची लढाई झाली. देवांनी प्रखर प्रतिकार केला. त्यापुढे त्रिपुराचे सैन्य टिकले नाही. त्याची पिछेहाट पाहून त्रिपुराने इंद्रावर चढाई केली. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. तो संग्राम पाहून बलाढ्य वीरांच्या छातीत धडकी भरली. संधी मिळताच त्रिपुराने खड्गाचा प्रहार करून इंद्राच्या हातातील वज्र खाली पाडले. तेच वज्र उचलून त्याने प्रचंड त्वेषाने ऐरावताच्या मस्तकावर आघात केला. तो भयंकर चीत्कार करीत मागे-मागे सरकू लागला. निःशस्त्र इंद्राने त्यावरून खाली उतरून त्रिपुराशी मल्लयुद्ध आरंभिले. 

                           दोघेही निष्ठुरपणे एकमेकांच्या वर्मावर आघात करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे डावपेच पाहून दोन्ही पक्षांतील बीर थक्क झाले. त्रिपुराने मल्लविद्येचे कौशल्य पणाला लावून इंद्राला खाली पाडले. त्याच्या पायाला धरून वेगाने गरगरा फिरवून दूर भिरकावून दिले. देवांनी त्याचा खूप शोध घेतला. तो एका पर्वताच्या कपारीत मूर्च्छित आढळला. देवांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. त्या अणीबाणीच्या युद्धात देवांचा दारुण पराभव झाला. त्यांनी पलायन केले आणि हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांचा आश्रय घेतला.

त्रिपुराने इंद्राच्या राजधानीवर, अमरावतीवर ताबा मिळवला. देवांचे सर्व अधिकार दैत्यांना देऊन तो स्वतः इंद्राच्या सिंहासनावर आरूढ झाला. स्वर्गातील अनुपम सुखांचा आस्वाद घेत तो त्रिखंडावर राज्य करू लागला.

त्रिपुराचा पराक्रम विलक्षण होता. त्याच्या भीतीने देव दिवाभीताचे जिणे जगू लागले, लपूनछपून कालक्रमणा करू लागले. विष्णूने क्षीरसागरात दडी मारली. ब्रह्मदेव कमळात लपला. चंड व प्रचंड हे त्रिपुराचे मानसपुत्र. त्या दोघांना त्याने वैकुंठ आणि सत्यलोकाचे अधिपती केले. मग त्याने कैलासावर स्वारी केली. आपल्या सर्व सामर्थ्यानिशी कैलासाला धडका दिल्या. त्या हादऱ्यांनी ब्रह्मांड हिंदकळले, पार्वती भयभीत झाली, शिवाचा गणपरिवार व्याकूळ झाला. त्रिपुराचा तो पराक्रम पाहून शंकर सुप्रसन्न झाला. त्याने त्याचे कौतुक केले, बक्षीस म्हणून कैलासच त्याच्या स्वाधीन केला. पार्वती, नंदी आणि आपल्या गणांसह तो मंदार पर्वतावर निघून गेला.

                   भीमकाय हा त्रिपुरासुराचा सेनापती. भूलोकीची सत्ता हाती आल्यावर त्याने मोठाच उत्पात मांडला. त्याने ऋषींचे आश्रम, त्यांच्या गोशाळा, त्यांची तपःस्थाने व यज्ञशाळा उद्ध्वस्त केल्या. त्यांना कारागृहात डांबून त्यांचे हाल केले. देवालये पाडली. देवभक्तांवर जरब निर्माण केली. धर्मकर्मे बंद करण्यासाठी त्याने खूपच अत्याचार केले. वज्रदंष्ट्रानेही पाताळ आतंकित केला. त्याने शेष, बासुकी, तक्षक आदी सर्व श्रेष्ठ नागांना आपल्या अंकित केले. त्यांचे सर्व ऐश्वर्य, धनसंपत्ती व त्यांच्या स्त्रिया यांचे हरण करून त्यांना आपल्या स्वामीच्या सेवेसाठी पाठवून दिले.

अशा प्रकारे सर्वत्र आपला अंमल प्रस्थापित करून त्रिपुरासुराने प्रदीर्घ काळ निष्कंटक राज्योपभोग घेतला. हिमालयाच्या आश्रयार्थ गेलेले इंद्रादी सर्व देव त्रिपुराच्या वधाचा उपाय शोधत होते. त्यांची दुरावस्था पाहून नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "हे देवांनो, गणपतीच्या कृपाप्रसादानेच त्रिपुरासुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली आहे. त्याने हजारो वर्षे गणपतीची एकनिष्ठेने आराधना केली म्हणूनच त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तुम्हांला त्रिपुरासुराचा बंदोबस्त करायचाच असेल तर तुम्ही गजाननाला शरण जा. त्याला प्रसन्न करून घ्या." नारदांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि ते विश्वसंचारार्थ निघून गेले.

                    नंतरच्या काळात सर्व देवांनी एकाक्षर मंत्राचा जप करून प्रदीर्घ तपश्चर्या केली. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीने देवकार्यासाठी स्वतःला प्रकट केले. त्याच्या दर्शनाने देवांना फार आनंद झाला. त्यांनी आठ श्लोकी संस्कृत स्तोत्राने त्याची स्तुती केली. हे स्तोत्र 'संकटनाशक स्तोत्र' म्हणून प्रसिद्ध आहे. 'जो भाविक नित्यनेमाने या स्तोत्राचा प्रेमभक्तीपूर्वक पाठ करील त्याची सर्व संकटे मी दूर करीन,' असा त्या स्तोत्राला गणपतीचा आशीर्वाद आहे. देवांनी केलेल्या या स्तुतीने गणपतीला संतोष वाटला. देवांनी त्याला आपली व्यथा सांगितली. 'त्रिपुरासुराच्या जाचातून आमच्यासहित सर्व प्राणिमात्रांची तू सुटका कर. आम्ही तुला शरण आहोत,' अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांचे मधुर शब्दांनी सांत्वन केले. त्यांना धीर दिला. तो म्हणाला, "भगवान शंकर त्रिपुराचा पराभव करतील. त्या संदर्भात सर्व व्यवस्था करून मी लवकरच तुम्हां सर्वांना पूर्वीचे पद व ऐश्वर्य प्राप्त करून देईन. आता निश्चित असा." ते आश्वासक बोलणे ऐकून देव समाधान पावले.

मग गजाननाने एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. तो अमरावतीस त्रिपुराच्या राजसभेत प्रवेशला, त्रिपुरासुराने त्याचे स्वागत केले. त्याचे क्षेमकुशल विचारले. तो ब्राह्मण म्हणाला, "दैत्यराज, मी कलाधर आहे. तुझी कीर्ती आणि ऐश्वर्य याविषयी ऐकून मुद्दाम तुझ्या भेटीस आलो आहे. येथे येऊन मला आनंद झाला." त्रिपुरासुराने त्याच्या विद्वत्तेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो म्हणाला, "मी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत आहे." ते ऐकून त्रिपुरासुराला मोठे नवल वाटले, तो म्हणाला, "हे विप्रा, तू मला स्वतःच्याच एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक दाखव."

                               ते म्हणणे मान्य करून कलाधररूपी गणपतीने त्याच्यासमक्षच स्वकौशल्याने तीन विमाने तयार केली. तो त्रिपुरास म्हणाला, "दैत्यराज, या विमानांच्या साहाय्याने तू क्षणार्धात कोठेही जाऊ शकशील. तू जे मनात आणशील ते तुला त्वरित प्राप्त होईल. या विमानांचा कोणीही भेद करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शंकराने जर एकाच बाणात या तिन्ही पुरांचा अर्थात विमानांचा भेद केला तर तुला त्याच क्षणी मृत्यू येईल."

अशा प्रकारे कलाधराने त्रिपुरासुराला त्याच्या मृत्यूचे रहस्य आधीच सांगून टाकले. त्याच्यासाठी ही धोक्याची सूचनाच होती. पण त्रिपुरासुराने त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले नाही. ती. कलाधरनिर्मित विमाने आपल्याच मृत्यूचे कारण आहेत हे त्याने जाणले नाही. ती विमाने पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो कलाधरास म्हणाला, "हे विप्रश्रेष्ठा, तू खरोखरच गुणवान आहेस. तुझे कलाकौशल्य प्रशंसनीय आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तरी निःशंक मनाने जे हवे ते मागून घे." कलाधर म्हणाला, “हे दैत्याधिपती, पूर्वी मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तेथे चिंतामणी गणेशाची फारच मनोहर मूर्ती पाहिली. ती मला खूपच आवडली होती. ती माझ्यापाशी असावी, अशी माझी उत्कट इच्छा आहे. म्हणून मला काही द्यायचेच असेल तर ती गणेशमूर्ती आणून दे."

त्रिपुर म्हणाला, "एवढेच ना! मी तुझी इच्छा लवकरच पूर्ण करतो. माझ्या पराक्रमावर प्रसन्न होऊन शंकराने त्याचे निवासस्थान असलेला कैलास पर्वतच मला देऊन टाकला आणि तो स्वतः मंदार पर्वतावर निघून गेला आहे." तेव्हा कलाधर म्हणाला, "याचा अर्थ चिंतामणी गणेशाची ती मूर्ती आत्ता मंदारावर शंकराकडेच असणार. तेव्हा तूही तेथेच जा. " त्रिपुरासुराला कलाधराचे म्हणणे पटले. 'ती मूर्ती मी लवकरच तुझ्या स्वाधीन करतो,' असे आश्वासन देऊन त्याने विप्ररूपी गणपतीचा थोर सन्मान केला. त्याची षोडशोपचारे पूजा करून दिव्य भेटवस्तू त्याला अर्पण केल्या. कार्य साधून गणपती निघून गेला. त्रिपुरासुराने दूत पाठवून शंकराकडे चिंतामणी गणेशमूर्तीची मागणी केली. ती त्याने साफ धुडकावून लावली. दूत निराश होऊन रिकाम्या हाताने परतला. ते पाहून त्रिपुराला प्रचंड संताप आला. त्याने बलाढ्य दैत्यसेनेसह मंदार पर्वतावर चढाई केली. 

                     त्रिपुरासुर युद्धाला ठाकलेला पाहून शंकरानेही आपल्या सर्व गणांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले. त्या वेळी गणपतीचे पूजन न करताच तो युद्धासाठी निघून गेला. बघता-बघता दोन्हीकडचे बीर एकमेकांवर चढाई करून गेले. रणवाद्यांच्या आणि सैन्यांच्या गर्जनांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला. तुंबळ युद्ध सुरू झाले. तुल्यबळ योद्धे परस्परांना भिडले. नंदी आणि चंड, कार्तिकेय आणि प्रचंड, पुष्पदंत आणि भीमकाय, वीरभद्र आणि वज्रदंष्ट्र, इंद्र आणि त्रिपुरासुराचा प्रधान, जयंत आणि त्रिपुरपुत्र यांच्यात हातघाईची लढाई सुरू झाली. आव्हाने -प्रतिआव्हाने देत ते बलाढ्य योद्धे एकमेकांचा घात करण्यासाठी। भयंकर शस्त्रास्त्रांचा मारा करू लागले. एकच रणधुमाळी माजली. प्रेतांचे खच पडू लागले. मंदार पर्वतावर रक्ताच्या नद्या उगम पावल्या. त्यांत वीरांची मस्तके, त्यांची धडे व भग्न अवयव वाहताना दिसू लागले. शिवगणांनी पराक्रमाची शर्थ करून त्रिपुराच्या बलाढ्य दैत्यसेनेला पुरते जर्जर केले. हार पत्करून ती दशदिशांना पळू लागली. ते पाहून संतापलेल्या त्रिपुराने देवसेनेवर भयंकर अग्न्यस्त्राचा प्रयोग केला. त्यातून उसळलेली प्रचंड अग्निज्वाला देवांना भस्मसात करू लागली. त्याच ज्वालेतून एक अतिविराट भयानक पुरुष उत्पन्न झाला. तो आपल्या अकराळविकराळ जबड्याने देवसैन्याला गिळंकृत करू लागला. भयभीत झालेले देव आणि शिवगण शंकराच्या आश्रयास धावले. तेव्हा संतापलेल्या शिवाने त्या ज्वालोत्पन्न पुरुषावर भयंकर विनाशकारी अखांचे प्रयोग केले. त्या अस्त्रांच्या प्रहाराने तो खाली पडायचा मग पुन्हा उठून हाहाकार माजवायचा. त्यामुळे देवसैन्य आणि शिवगण हतबल झाले. अवसान गळालेले, बिथरलेले असे ते सर्व जण प्राणरक्षणार्थं वाट फुटेल तेथे पळून गेले. शंकरानेही युद्धभूमीवरून काढता पाय घेतला. या विजयाच्या उन्मादात त्रिपुरासुराने पार्वतीचे हरण करण्याचा निश्चय केला. हे वृत्त कळताच पार्वती भयभीत झाली. ती सूक्ष्मरूपाने आपल्या पित्याकडे, हिमालयाकडे निघून गेली. त्याने तिला अत्यंत दुर्गम आणि गुप्त स्थानी लपविली.

                        त्रिपुरासुराने मंदार पर्वतावर पार्वतीचा कसून शोध घेतला, पण ती हाती लागली नाही. चिंतामणी गणेशमूर्ती मात्र सापडली. जिच्यासाठी शंकराशी युद्ध करावे लागले ती मूर्ती सापडल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना. ती मूर्ती खरोखरच अप्रतिम होती, देदीप्यमान व दिव्य रत्नांनी मंडित अशी होती. त्याने ती मूर्ती कलाधरास देण्यासाठी आपल्याबरोबर घेतली आणि तो माघारी वळला. तेवढ्यात ती अदृश्य झाली. या घटनेचे त्रिपुरासुराला मोठे आश्चर्य वाटले. तसेच आपण आपला शब्द पूर्ण करू शकणार नाही याचे वैषम्यही वाटले. देवांसहित प्रत्यक्ष शंकराचा आपण पराभव केला म्हणून

त्रिपुरासुराला फारच उन्माद चढला. त्याने त्रिखंडात उच्छाद मांडला. ऋषी, मुनी, देवभक्त, शिवभक्त, सज्जन, सदाचारी माणसे यांचा फारच छळ केला. त्याच्या अत्याचारांनी समस्त सृष्टी 'त्राहि त्राहि' करू लागली. सर्वत्र भीषण अवकळा पसरली. प्रजा संत्रस्त झाली. देव हतबल होऊन हा सर्व प्रकार पाहत होते. त्या वेळी नारदांनी शंकराची भेट घेतली. ते म्हणाले, “महादेवा, आपण चिंतामणी गणेशाची पूजा न करताच त्रिपुराशी युद्ध केलेत म्हणून ही पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. श्रीगणपतीच्या वरदानानेच त्रिपुराला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे लक्षात घ्या. त्याचा युद्धात पराभव करायचा असेल, तर तुम्हांलाही गणपतीची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्यावे लागेल. त्यानंतरच तुम्ही त्रिपुरासुराशी युद्ध करा म्हणजे यश तुम्हांलाच मिळेल. "

                       शंकरालाही त्यांचे म्हणणे पटले. तो म्हणाला, "हे ब्रह्मर्षी, मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही मला योग्य वेळी योग्य सूचना दिलीत. पूर्वी गणपतीने मला एकाक्षर व षडक्षर मंत्राचे माहात्म्य सांगून संकटसमयी त्या मंत्रांचा जप करण्यास सांगितले होते. त्रिपुराशी युद्धास जाताना मला या गोष्टीचे विस्मरण झाले. मी चिंतामणी गणेशाचे पूजनही केले नाही म्हणून माझा पराभव झाला हे स्पष्ट आहे. त्यानंतर शंकराने दंडकारण्यातील एकांतात दहा वर्षे एकाग्रतेने श्रीगणेशाची आराधना केली. तेव्हा त्याच्याच मुखातून दिव्य आणि विलक्षण रूपात श्रीगजानन प्रकट झाला. पाच मुखे, दहा हात, मस्तकावर चंद्र, गळ्यात रुंडमाळा, अंगावर नागांची भूषणे अशा स्वरूपात तो शंकरही दिसत होता आणि गणपतीही दिसत होता. शंकराने त्या दिव्य गणपतीला नमस्कार केला. त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तेव्हा गणपती म्हणाला, "हे महादेवा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. यापुढे संकटसमयी तू ज्या-ज्या वेळी माझे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी मी त्या संकटाचे निवारण करीन. युद्धप्रसंगी माझ्या बीजमंत्राने अभिमंत्रित केलेला बाण तू त्रिपुरासुराच्या विमानांवर सोड. ती तिन्ही पुरे एकाच वेळी नष्ट करण्यासाठी हाच एकमात्र उपाय आहे. ही तिन्ही पुरे नष्ट झाल्याबरोबर त्रिपुरासुर सामर्थ्यहीन होईल. मग त्याचा नाश करणे तुला अशक्य नाही. आता मी तुला माझे 'सहस्रनामस्तोत्र' सांगतो. या सहस्र नामावलीच्या नित्य श्रवण-पठणाने माझ्या भक्तांच्या सर्व इष्ट मनःकामना पूर्ण होतील. त्यांना जय आणि यश मिळेल. त्यांच्या शत्रूंचा नाश होईल. " गणपतीने शंकराला आपली सहस्रनामे सांगितली. त्याने देवांना व शिवगणांनाही दर्शन दिले. त्यांना आशीर्वाद देऊन तो अदृश्य झाला. शंकराने त्या तपश्चर्येच्या स्थानी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे मनोहर देवालय बांधले. त्या परिसरात 'मणिपूर' नामक नगर वसविले. "

                              कथेच्या ओघात सोमकांत राजाला 'श्रीगणेशसहस्रनाम स्तोत्राचे' माहात्म्य सांगावे असे भृगू ऋषींना वाटले. ते म्हणाले, "हे राजा, गणेशसहस्रनामावलीच्या अद्भुत प्रभावाची अनुभूती आल्यानंतर शंकराने ती ब्रह्मदेवास सांगितली. ब्रह्मदेवाने ती व्यासांना सांगितली आणि व्यासांकडून ती लोककल्याणार्थ जगात प्रकट झाली. श्रीगणेशसहस्रनामस्तोत्राची 'गणपती' ही देवता, 'गं' हे बीज, 'पुष्कल' हा छंद, 'तुडे' ही शक्ती आणि 'स्वाहा' हे कीलक आहे. 'गणेश्वरः', 'गणक्रीडः' अशा नामांनी या स्तोत्राचा प्रारंभ होतो आणि 'अनंतनामः', 'अनंतश्रीः' 'अनंतोमुनिसंस्थितः' अशा नामांनी ते पूर्ण होते. पहाटेस ब्राह्ममुहूर्तावर या स्तोत्राचा शांत चित्ताने, एकाग्रतेने व भक्तिभावाने नित्य पाठ करणाऱ्या उपासकाला जगातील सर्व प्रकारची सुखे व सर्व प्रकारची दैवी संपत्ती प्राप्त होईल; तो सर्व सद्गुणांनी युक्त होईल; त्याचे इहपर कल्याण होईल; असा श्रीगजाननाचा या स्तोत्राला आशीर्वाद आहे. ज्या देशातील लोक या स्तोत्राचे नित्यनेमाने श्रवण-पठण करतील तो देश सुखी व संपन्न होईल. जो धनहीन मनुष्य या स्तोत्राचा पूर्ण श्रद्धेने चार महिने पाठ करील, त्याचे दारिद्र्य जाऊन त्याला उत्पन्नाचे सात्त्विक मार्ग उपलब्ध होतील, असे श्रीगजाननाचे वरदान आहे. ज्या कोणाला मनात असूनही कामाधंद्याच्या व्यवसायाच्या व्यापामुळे वा अडचणींमुळे सहस्रनामस्तोत्राचे पठण करता येत नाही त्यांनी गजाननास अत्यंत प्रिय असलेल्या एकवीस नामांचा जप केल्यास त्यांना सहस्रनामजपाचे पुण्य लाभेल, असेही त्याने सांगितलेले आहे. गणपतीची ती परम सिद्धिदायक आणि पवित्र नामे अशी आहेत- गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, प्रसादन, अमोघसिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, आशापूर, बीज, बरद, शिव, कश्यपानंद, वाचासिद्ध आणि ढुंढिविनायक. "

                         श्रीगणेशसहस्रनामावलीचे माहात्म्य सांगून भृगू ऋषी मूळ कथेकडे वळले. ते म्हणाले, “राजा, श्रीगणपतीकडून त्रिपुरासुराच्या बधाचे रहस्य आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे शंकराला खूपच आनंद झाला. त्याने सुंदर नृत्य केले. मग सर्व देवांना बोलावून युद्धाची सिद्धता करण्यास सांगितले. हे वृत्त कळताच त्रिपुरासुरानेही युद्धाची जय्यत तयारी केली आणि तो देवांवर चढाई करून गेला. उभयपक्षी तुंबळ लढाई झाली. या अटीतटीच्या युद्धात देवसेनेला पुन्हा एकदा भयंकर हानी सोसावी लागली. तिचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला. हजारो देवगण जायबंदी झाले. तेव्हा संतापलेल्या इंद्राने त्रिपुरासुराच्या सैन्यात घुसून वज्रप्रहाराने मोठी कत्तल केली. त्याच्यापुढे कोणाचेच काही चालेना. असुरांकडील महावीरही हतबल झाले. ते दृश्य पाहून त्रिपुरासुराने एक अभिमंत्रित बाण सोडला. त्या बाणातून सहस्रावधी बाण उत्पन्न झाले. त्यांनी सारा आसमंत व्यापून टाकला. इंद्र निष्प्रभ झाला. देवसैन्य दशदिशांना पळू लागले. पुन्हा एकदा पराजय पदरात पडतो की काय अशी देवांना धास्ती वाटली.

                          तेव्हा शंकराने त्रिपुरासुराचा वध करायचाच असा निश्चय केला. त्याने पृथ्वीचा रथ केला, त्याला सूर्य व चंद्र ही दोन चाके जोडली. ब्रह्मदेव हा त्या रथाचा सारथी झाला. अश्विनीकुमार हे रथाश्व झाले. शंकराने मेरू पर्वताचे धनुष्य केले. बाण म्हणून श्रीविष्णूची योजना केली. मग आचमन, प्राणायाम, गणेशस्मरण करून श्रीगणेशसहस्रनामावलीचा पाठ केला. एकाग्र चित्ताने एकाक्षर मंत्राचा जप केला. विष्णुरूपी बाणाची विधिवत पूजा करून त्यास अभिमंत्रित केले. मग तो पृथ्वीरूपी दिव्य स्थावर आरूढ होऊन समरांगणात आला. त्याने त्रिपुरासुराला युद्धाचे आव्हान दिले. त्याला पाहून देवसेनेतही उत्साह संचरला. रणवाद्यांच्या निनादात दोन्ही सैन्ये एकमेकांवर लोटली. प्रचंड रणधुमाळी माजली. त्रिपुरासुर आणि शंकर मोठ्या त्वेषाने परस्परांवर शस्त्रास्त्रांचे प्रहार करीत होते. दोघेही महाबलाढ्य, तेथे कोणी कोणाला हार जावे ? त्रिपुर आवरत नाही हे पाहून शंकराने अभिमंत्रित विष्णुवाण धनुष्यावर चढविला. तो त्रिपुराच्या दिशेने सोडला. त्या बाणाच्या दिव्य प्रभेने दशदिशा उजळून निघाल्या. प्रलयकाळच्या विजांप्रमाणे प्रचंड कडकडाट झाला. त्या आवाजाने ब्रह्मांडाला हादरे बसले. सृष्टीमध्ये मोठे उत्पात झाले. त्या महातेजस्वी बाणाने त्रिपुरासुराची तिन्ही पुरे एकाच वेळी भेदली. ती जळून भस्मसात झाली. त्या बाणाने मूर्च्छित झालेला त्रिपुर पुन्हा उठलाच नाही. त्याच्या देहातून निघालेली प्राणज्योत शिवाच्या शरीरात प्रविष्ट झाली. त्या वेळी 'त्रिपुर मुक्त झाला!' अशी आकाशवाणी झाली. त्रिपुराच्या वधानंतर उरल्यासुरल्या असुरांना देवगणांनी ठार केले. देवांना मोठा विजय प्राप्त झाला. 

त्रिपुराच्या वधाने संपूर्ण त्रिखंडात आनंदाला उधाण आले. देवतांनी शंकरावर पुष्पवृष्टी करून त्याची अपार स्तुती केली. असुरांच्या ताब्यातून मुक्त झालेली अमरावती त्यांना पुन्हा प्राप्त झाली. इंद्र सिंहासनारूढ झाला. देवता आपापल्या अधिकारानुसार पुन्हा कार्यरत झाल्या. सृष्टिचक्र पूर्वपदावर आले.

                           शंकराने कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे शंकराला 'त्रिपुरारी' व त्या तिथीला 'त्रिपुरारी पौर्णिमा' असे नाव पडले, या प्रसंगाचे स्मरण म्हणून घरोघरी दीपोत्सव करण्याची प्रथा रूढ झाली. कार्तिक मासातील उपासनांचे महत्त्व फार आहे. या मासात स्नान, दान, जप, तप, होमादी धर्मकृत्ये केल्याने त्यांचे अपार (बहुल) पुण्य मिळते. म्हणून कार्तिक मासास 'बहुलमास' आणि कार्तिक पौर्णिमेस 'बहुली पौर्णिमा' असे म्हणतात. कार्तिक पौर्णिमेस प्रातः समयी शिवपूजन केल्याने रात्री घडलेली पापे नष्ट होतात. मध्यान्ही शिवपूजन केल्याने जन्मभरात घडलेली पातके भस्मसात होतात आणि सायंकाळी प्रदोष समयी शिवपूजन केल्याने सप्तजन्मकृत सर्व पापांचे निवारण होते. या दिवशी दीपोत्सव केल्याने शिवाची प्रसन्नता लाभून सर्व कार्ये यशस्वी होतात. मनुष्याला सुख, शांती व समाधान प्राप्त होते. त्रिपुरारी पौर्णिमचे माहात्म्य हे असे आहे.

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या