।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:- ४८ ते ५१
१७. गणेश व्रतांची माहिती, गणेश पूजनाची फलश्रुती
त्रिपुरासुराची कथा सांगून झाल्यावर भृगू ऋषी सोमकांतास म्हणाले, "हे राजा! आधीच्या युद्धात शंकर रणांगणातून निघून गेल्यावर त्रिपुरासुर पार्वतीचे हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेला होता. पण तत्पूर्वीच ती आपल्या पित्याकडे, हिमालयाकडे निघून गेली होती. त्याने तिला एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपवून ठेवली. हा वृत्तान्त मी तुला आधीच सर्व सांगितला आहे. त्यानंतर काय झाले ऐक.
त्रिपुरासुर मंदार पर्वतावरून चितामणी गणेशाची मूर्ती घेऊन गेला. त्यानंतर त्याने पार्वतीचा शोध घेतला नाही. तो निघून गेल्यावर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आली. तिने शंकराचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा पत्ता लागला नाही. तिला रडू कोसळले. शंकराला व हिमालयाला हाका मारीत ती रानोमाळ भटकू लागली. अरण्यातील एका कोळ्याने तिचे रुदन ऐकले. तो शिवभक्त होता. पार्वतीच्या मुखातून शिवनाम ऐकून त्याला मोठे नवल वाटले. 'कोणीतरी शिवभक्त स्त्री संकटात सापडली आहे. आपण तिला मदत केली पाहिजे,' असा विचार करून तो त्वरेने हिमालयापाशी गेला व म्हणाला, "हे गिरिराज, दिव्य वस्त्राभूषणे धारण केलेली कोणीतरी एक अनुपम सुंदर स्त्री तुमच्या व शिवाच्या नावाने हाका मारीत मंदार पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतून हिंडत आहे."
तो वृत्तान्त ऐकून हिमालय त्वरेने पार्वतीपाशी आला. त्याने तिचे प्रेमपूर्वक सांत्वन केले. तो म्हणाला, "पार्वती, तू शिवाची शक्ती आहेस.. तुम्हां दोघांचा वियोग होणे कदापि शक्य नाही. तू स्वतःला सावर. मी तुमची लवकरच भेट घडवीन." त्याने तिला आपल्या घरी आणले. शंकराचे कुशलवृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती. तिला धीर निघवेना. ती पित्याला म्हणाली, "बाबा, मला शंकरांची खूप आठवण येते आहे. त्यांचा विरह मला जराही सहन होत नाही. तरी ज्यायोगे त्यांची व माझी भेट होईल असा एखादा उपाय सांगा.” हिमालय म्हणाला, “मुली, तुझी मनोव्यथा मी जाणतो. तू गणपतीची आराधना कर म्हणजे तुझे मनोरथ लवकर पूर्ण होतील. आत्ता ही आराधना कशी करावी ते ऐक. भल्या पहाटे उठून नैर्ऋत्येस जावे. बनातील पालापाचोळा पडलेल्या जागेवर शौच करावे. घरी यावे, हात-पाय धुवावे, दात घासावे, जीभ स्वच्छ करावी. मग विहीर, नदी, तलाव अशा ठिकाणी स्नान करावे. मग मंत्रोक्त स्नान करावे. शरीर कोरडे करून धुतलेली वस्त्रे नेसावीत. घरी यावे. भाळी कुंकुम किंवा भस्मतिलक लावावा. चांगल्या जागेतील चिकट माती आणावी. तीत पाणी घालून ती मळावी. त्या मातीपासून एक चतुर्भुज गणेशमूर्ती घडवावी. तिच्या दोन हातांमध्ये पाश व परशू, एका हातात मोदक आणि एका हातात वरदमुद्रा असावी.
मृत्तिकेची ही गणेशमूर्ती पाटावर किंवा चौरंगावर वन अंथरून त्यावर ठेवावी. हात स्वच्छ धुवावेत. पूजेची उपकरणे, पूजाद्रव्ये यांची सिद्धता करावी. पूजासाहित्यामध्ये पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, जास्वंदीची फुले, एकशे-आठ दुर्वा यांचा समावेश असावा. नैवेद्यासाठी माव्याचे किंवा उकडीचे मोदक, लाडू, खीर, घारगे आदी गोड पदार्थ असावेत. पूजासिद्धता झाल्यावर मृगांजिनावर, दर्भासनावर किंवा स्वच्छ बनाच्या आसनावर पद्मासन घालून बसावे. आचमन, प्राणायाम, गायत्री मंत्रोच्चार, देवादिकांना वंदन, देशकालादी उच्चार, संकल्प, गणपतीस्मरण, आसनशुद्धी, षडंगन्यास इत्यादी प्रारंभिक क्रिया झाल्यावर श्रीगणपतीच्या सुंदर मूर्तीचे 'हे देवा! हे एकदंता शूर्पकर्णा ! हे लंबोदरा ! तू भक्तांच्या सर्व मन:कामना पूर्ण करतोस. ऋद्धि-सिद्धी व बुद्धी या तुझ्याच परिचारिका आहेत. हे परमेश्वरा सर्व देव नित्य तुझेच ध्यान करतात,' अशा अर्थाच्या मंत्राने ध्यान करावे. त्यानंतर हे जगदाधारा! हे अनाथनाथा ! हे कृपावंता दीनबंधो! तू येथे येऊन मी करीत असलेल्या या पूजारूपी सेवेचा स्वीकार कर,' अशा अर्थाच्या मंत्राने आवाहन करावे. मग चौरंगावरील मूर्तीची भक्तिभावाने पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. गणपतिस्तोत्र, गणेशसूक्त किंवा गणेशसहस्रनामावलीचा पाठ करावा. हात जोडून देवाची प्रार्थना करावी- 'हे गणनायका, गणाधीशा ! तुला नमस्कार असो. तू त्रैलोक्याचा अधिपती आहेस. भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेस. तू संकटाचे निवारण करतोस. दीनपतितांचा कैवार घेतोस. हे प्रभो! मी यथाविधि यथामति, यथाशक्ति तुझी पूजा केलेली आहे. या माझ्या सेवेचा तू स्वीकार कर पूजा करीत असताना दुर्लक्ष्यादी अपराधांबद्दल मला क्षमा कर. तू मोठा उदार आहेस, अल्प सेवेने संतुष्ट होणारा आहेस. तू माझ्या सर्व इष्ट मन:कामना पूर्ण कर. तू माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेव. माझ्या पाठीशी राहा.' या प्रार्थनेनंतर गणपतीला साष्टांग नमस्कार करावा, सर्वसिद्धिदायक विनायकमंत्राचा एकाग्र चित्ताने जप करावा. "
पार्वती हिमालयास म्हणाली, "तात, गजाननाच्या कोणत्या मंत्राचा जप करावा ते मला माहीत नाही. कृपा करून त्याविषयी सविस्तर सांगा.
हिमालय म्हणाला, “मुली, तसे पाहता गणपतीचे अनेक मंत्र आहेत. त्यापैकी 'ॐ' व 'गं' हे एकाक्षर मंत्र विशेषत्वाने प्रसिद्ध व अनुभवसिद्ध आहेत. 'गणेशाय नमः।' हा षडक्षरी मंत्रही अत्यंत उपयुक्त आहे. यांपैकी कोणत्याही मंत्राचा लक्ष वा दशलक्ष संख्येत जप करावा. जपानुष्ठानास विनायकी चतुर्थीस प्रारंभ करावा. अशा प्रकारे महिनाभर आराधना करावी. या उपासनेने गणपतीची प्रसन्नता लाभून शंकराच्या भेटीची तुझी मनःकामना लवकर पूर्ण होईल.
आता मी तुला पार्थिव मूर्तीपूजनाची फलश्रुती सांगतो. एका मूर्तीची पूजा केल्याने धनधान्याची संपन्नता येते, पुत्रप्राप्ती होते, पशुवृद्धी होते. दोन मूर्तीची पूजा केल्याने असाध्य कार्यही साध्य होते. तीन मूर्तीची पूजा केल्याने मौल्यवान रत्ने व राज्यपद प्राप्त होते. चार मूर्तीची पूजा केल्याने धर्मादी चारी पुरुषार्थ सिद्ध होतात. पाच मूर्तीच्या पूजनाने सार्वभौम राज्य लाभते. सहा मूर्तीच्या पूजनाने सृष्टीच्या उत्पत्तीचे सामर्थ्य प्राप्त होते. सात, आठ व नऊ मूर्तीच्या पूजनाने सर्वज्ञता व त्रिकालज्ञान प्राप्त होते. दहा मूर्तीच्या पूजनाने सर्व देवता व सनकादिक ऋषी वश होतात. अकरा मूर्तीच्या पूजनाने अकरा रुद्रांचे 'ब बारा मूर्तीच्या पूजनाने बारा आदित्यांचे स्वामित्व प्राप्त होते. पूजकाने संकटाच्या व्याप्तीनुसार मूर्तीसंख्या वाढवून त्यांची पूजा करावी. नित्य एकशे आठ मूर्तीची पूजा केल्याने कधीही कोणतेही संकट येत नाही. एक लक्ष मूर्तीची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती होते. पाच मूर्तीची तीन किंवा सात दिवस श्रद्धेने पूजा केल्यास बंदिवासातून सुटका होते. सात मूर्तीची पाच वर्षे भक्तिभावाने नित्य पूजा केल्याने महापातके नष्ट होतात. या सर्व उपासनांमध्ये आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. फलश्रुतीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे उपासना करून त्याची अनुभूती घ्यावी लागते. भाविकांना आपापल्या श्रद्धेनुसार अनुभव येत राहतात. लोकांच्या मनात संशयच जास्त असतो. विश्वास नसल्यामुळे त्यांना फलप्राप्ती होत नाही. गणपती सर्वसाक्षी, सर्वेश्वर आहे. त्याचे माहात्म्य अगाध आहे. आपल्या भक्तांवर त्याची नेहमी कृपादृष्टी असते. जो भक्त आजन्म एकाच गणेशमूर्तीची पूजा करतो तो अंतीं गजाननस्वरूपीच होतो. त्याच्या दर्शनाने अन्य जनांची दुःखसंकटे दूर होतात. त्याची पूजा केल्यास ती गणपतीला पोहोचते. तीन गणेशमूर्तीची नऊ दिवस संकल्पपूर्वक पूजा केल्याने रोगमुक्ती होऊन आरोग्य लाभते. स्वर्ण, चांदी, तांबे, कांसे किंवा प्रवाळाच्या मूर्तीची पूजा केल्याने उपासनेच्या प्रभावाने आणि गणेशकृपेने अल्पावधीत सिद्धी प्राप्त होतात.
भाद्रपदात शुद्ध चतुर्थीला गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे प्रसन्न मनाने च भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते. त्या दिवशी प्रातःकाळी शुर्चिभूत व्हावे. पूजनस्थळ सुशोभित करावे, रंगमाळा काढाव्यात, दीपांची आरास करावी, गणेशमूर्तीची उत्तम पूजा करावी. होम करावा. पूर्णाहुती द्यावी. ब्राह्मणाचे पूजन करून त्याला द्रव्य आणि चत्र द्यावे. ज्याला शक्य आहे त्याने गोदान, भूमीदान करावे. होमाच्या दशांश संख्येत तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन. द्यावे. दांपत्य भोजनास बोलवावे. त्यांचे पूजन करावे. त्यांना दक्षिणा आणि वस्त्र द्यावे. मग यजमानाने सहपरिवार आनंदाने भोजन करावे. त्या दिनी उत्सव करावा. गायन, वादनादी कार्यक्रम ठेवावा. कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करावे. दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेशमूर्तीची उत्तरपूजा करावी. ती गणेशमूर्ती सजविलेल्या पालखीत किंवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत-गाजत जलाशयापर्यंत न्यावी. तेथे तिचे विधिपूर्वक विसर्जन करावे. असे हे गणेश चतुर्थी व्रत पुण्यवर्धक, इष्टफलदायक आणि विघ्ननाशक आहे.
पार्वती आत्ता मी तुला गणेश चतुर्थीच्या माहात्म्याविषयी एक प्राचीन कथा सांगतो, ऐक. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह कैलासावर बसले होते. त्या वेळी त्यांनी कार्तिकस्वामीला अनेक व्रतांची माहिती सांगितली. तेव्हा कुमार म्हणाला, "पिताश्री, या सर्व व्रतांमध्ये आचरण्यास सुलभ आणि शीघ्र फलप्राप्ती करून देणारे एखादे व्रत असल्यास त्याविषयी सांगावे." तेव्हा शंकर म्हणाले, “कुमारा, गणेश चतुर्थीचे व्रत हे आचरण्यास सोपे, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याला 'सिद्धिविनायक व्रत' असेही म्हणतात. या व्रताचे दोन प्रकार आहेत.
पहिल्या प्रकारात भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते. दुसऱ्या प्रकाराबद्दल थोडे विस्ताराने सांगतो. यात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत एक महिनाभर उपवास करावा. त्या काळात स्वतःच्या सामर्थ्याला अनुसरून एकभुक्त राहावे, नक्तभोजन करावे, अयाचित वृत्तीने राहावे किंवा सायंकाळी हविष्यान्न भक्षण करावे. नित्य शुचिर्भूत असावे. गणपतीची पूजा करावी. ब्रह्मचर्य पाळावे. गणेशमंत्राचा पन्नास हजार, एक लक्ष किंवा दशलक्ष संख्येत जप करावा. श्रीगणपतीचे एकाग्र चित्ताने ध्यान करावे. दोन किंवा चार तोळे वजनाची मूषकारूढ किंवा मयूरारूढ अशी सुवर्णाची गणेशमूर्ती बनवून घ्यावी. सजविलेल्या मखरात धान्य पसरून त्यावर शुद्ध धातूचा कलश ठेवावा. त्यावर त्याच धातूचे पूर्णपात्र ठेवावे. त्या पात्रात पाच पाने व पाच रत्ने घालून कलशाला शुभ्र वस्त्राने गुंडाळून पीठपूजा करावी. पूर्णपात्रात गणेशमूर्ती ठेवून तिची विधिवत पूजा करावी. आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीगणपतीप्रीत्यर्थ हविर्द्रव्यांच्या आहुती देऊन होम करावा. आचार्यांचे पूजन करून त्यांना यथाशक्ति द्रव्यदक्षिणा द्यावी; वस्त्र द्यावे; गाय, भूमी, सुवर्ण यांचे दान देऊन त्यांना संतुष्ट करावे.. एकवीस किंवा एकशे आठ ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी. त्यांचे आशीर्वाद घ्यावे. गोरगरीबांना, मुक्या जिवांना, अतिथींना भोजन द्यावे. मग कुटुंबीयांसमवेत आनंदाने भोजन करावे. भोजन समयी उपासकाने मौन पाळावे. हे गणेश चतुर्थीचे व्रत उत्तम फलदायी असून भोग, मोक्ष, ऐश्वर्य, समृद्धी व यश मिळवून देणारे आहे.
पहिल्या प्रकारात सांगितलेले गणेश चतुर्थीचे पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचे व्रतही आचार्यांकडून मंत्र आणि व्रतोपदेश घेऊन संकल्पपूर्वक करावे. हे व्रतही सर्वसिद्धिदायक आहे. या व्रताला 'वरद गणेश व्रत' किंवा 'गणेश चतुर्थी व्रत' अशी अन्य नावे आहेत."
हिमालयाने पार्वतीला गणेश व्रतांची माहिती सांगितली. तेव्हा तिच्या मनात त्या व्रतांविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली. ती म्हणाली, "पिताश्री, शंकरांचा विरह मला सहन होत नाही. त्यांच्या भेटीसाठी मी अगदी व्याकूळ झाली आहे. मी गणपतीची मनःपूर्वक आराधना करणार आहे. तुम्ही मला या गणेश व्रतांचे आचरण पूर्वी कोणी केले, त्यापासून त्यांना काय लाभ झाला, याविषयीचा सविस्तर इतिहास सांगावा. "
हिमालय म्हणाला, "पार्वती, तुझी उत्कंठा पाहून मला खरोखरच आनंद झाला आहे. तुझ्याप्रमाणे कार्तिकेयालाही त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. तेव्हा शंकरांनी त्याला कथारूपाने गणेश व्रतांचे माहात्म्य सांगितले. त्याच कथा मी तुला सांगणार आहे, त्या लक्षपूर्वक ऐक.
अध्याय समाप्त
मागील अध्याय ⬅️

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.