।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:- ५२ ते ५६
१८. गणेश चतुर्थी व्रतमाहात्म्य-कथा
हिमालय पार्वतीला गणेशभक्तीच्या कथा सांगू लागला. तो म्हणाला, "पूर्वी कर्दम नामक एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो महापराक्रमी, सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होता. एके दिवशी महर्षी भृगू त्याच्या भेटीस गेले होते. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. उच्चासनी बसवून त्यांची पूजा केली. मग त्याने विचारले, "हे तपोनिधी ! मला कोणत्या पूर्वपुण्याईने या जन्मी एवढे विस्तृत राज्य व अपार ऐश्वर्य प्राप्त झाले ते सांगण्याची कृपा करा." ही कथा भृगू ऋषी स्वतःच सोमकांताला सांगत होते. ते म्हणाले, "राजा, या कथेच्या आरंभी ज्या भृगूंचा उल्लेख आलेला आहे तो मीच आहे. मी कर्दम राजाला त्याच्या पूर्वजन्मीचे वृत्त सांगितले होते. गणेशमाहात्म्य सांगताना हीच कथा पुढे शंकराने कार्तिकेयाला, हिमालयाने पार्वतीला च ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितली. आज तीच प्राचीन कथा माझ्या मुखातून ऐकण्याचे सद्भाग्य तुला लाभत आहे.
कर्दमाने मला त्याच्या सद्भाग्याचे रहस्य विचारले. तेव्हा मी उत्तर दिले - "राजा, पूर्वजन्मी तू परिस्थितीने गांजून गेलेला एक गरीब क्षत्रिय होतास. अपार कष्ट करूनही तुला आपल्या पत्नीचे व मुलाबाळांचे पालन-पोषण नीट करता येत नव्हते. याबद्दल तुझी पत्नी तुला नेहमीच दूषणे देत असे. शेवटी कंटाळून तू गृहत्याग केलास, निबिड अरण्यात निघून गेलास. तेथे भटकत असताना तुझी आणि सौभरी ऋषींची भेट झाली. त्यांना पाहताच तुला भडभडून आले. त्यांना वंदन करून तू ओकसाबोक्शी रडू लागलास. तुझी मनोवस्था पाहून सौभरींना दया आली. त्यांनी तुझी प्रेमाने विचारपूस केली आणि तुझे दैन्य दूर होण्यासाठी तुला गणेशवरदमंत्राचा जप करण्यास सांगितला. "
हे पूर्ववृत्त कर्दम राजा अगदी लक्षपूर्वक ऐकत होता तो म्हणाला, "हे मुने, हा गणेश कोण? त्याचे स्वरूप कसे आहे? त्याचे माहात्म्य काय? याविषयी जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे. तरी त्याविषयी सविस्तर सांगावे." मी म्हणालो, "राजा, सर्व चराचर विश्व ज्यापासून निर्माण झाले त्यालाच 'गणेश' म्हणतात. तोच सच्चिदानंदस्वरूप परमात्मा आहे, तोच ॐकाराचा जनक आहे, तोच बेदांचे उत्पत्तिस्थान आहे, तोच देवांचा देव आहे, तोच जगाचा आधार आहे, तोच सर्व भूतांचा स्वामी आहे. त्याच्या कृपाप्रसादानेच ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्याचे आणि विष्णूला तिचे पालन-पोषण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. या गणेशाचे माहात्म्य अचिंत्य आहे. त्याच्या विराट अस्तित्त्वाचा आणि अगाध लीलाकर्तृत्त्वाचा कोणालाही थांग लागत नाही. त्याच्याविषयी बोलताना वेदही निःशब्द झाले तेथे मी काय सांगणार? असो. सौभरींनी तुला त्यांच्या आश्रमात नेले. तेथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू वरद गणेश व्रत केलेस. सौभरींनी उपदेशीलेल्या मंत्राचा एकाग्रतेने जप केलास. या आराधनेच्या पुण्यप्रभावाने तुला त्या जन्मात सुख, संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर या जन्मात तू चक्रवर्ती सम्राट बनलास हे लक्षात घे."
स्वतःचे पूर्वजन्मवृत्त ऐकून कर्दम थक्क झाला. त्याच्या मनात गणेशभक्ती उत्पन्न झाली. त्याने माझ्याकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला, गणेशमंत्राचा उपदेशही घेतला. माझ्या मार्गदर्शनानुसार गणेशाची आराधना करून त्याने इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले. मृत्यूनंतर त्याला गणेशलोकी उत्तम गती मिळाली. "
भृगू पुढे म्हणाले, “सोमकांता, हिमालयाने ही कथा सांगून पार्वतीला गणेश चतुर्थी व्रत करण्यास प्रेरित केले. त्याने तिला नलराजा, चंद्रांगद व इंदुमती यांच्याही कथा सांगितल्या. त्या कथा मीही तुला आहे. सांगणार
पूर्वी मगध देशात नल नावाचा थोर राजा होऊन गेला. तो न्याय नीति-धर्माने राज्य करायचा. तो महाविद्वान होता. तो त्रैलोक्यात कुठेही संचार करीत असे. इंद्रालाही त्याचा धाक होता. नलराजाची पत्नी दमयंती ही सुशील, सुंदर व पतिव्रता स्त्री होती. त्याचा प्रधान पद्महस्त हाही उदारमतवादी, मुत्सद्दी, धोरणी आणि महाबुद्धिमान होता.
एके दिवशी नलराजा राजसभेत बसला होता. तेवढ्यात महातपस्वी गौतमांचे आगमन झाले. त्यांच्या दर्शनाने राजाला परमानंद झाला. त्याने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यांची पाद्यपूजा केली. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याच्या सेवेने गौतम अतिशय प्रसन्न झाले. तेव्हा नलाने त्यांची परवानगी घेऊन एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, “महाराज, आपण सर्वज्ञ आहात, भूत-भविष्य जाणता. मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात. या जन्मी मला उत्तम राजऐश्वर्य, सद्गुणी पत्नी, स्वामिनिष्ठ प्रधान, विनम्र सेवक यांचा लाभ झाला आहे. हे कोणत्या पुण्यप्रभावाने साध्य झाले ते सांगण्याची कृपा करा."
गौतम म्हणाले, "हे राजा, पूर्वजन्मात तू गरीब क्षत्रिय वीर होतास. गौड देशातील पिंपळपुरात तुझे वास्तव्य असे. दारिद्र्यामुळे तुला सर्वत्र अपमान सहन करावा लागे. तुझी बायकामुलेही तुला टाकून बोलत असत. या उपेक्षेला कंटाळून तू निघून गेलास. विमनस्क अवस्थेत अरण्यातून हिंडत असताना तुझी आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली. तू त्यांना शरण गेलास. त्यांना आपली व्यथा सांगितलीस. दयाळू कौशिकांनी तुला वरद चतुर्थीचे गणेशव्रत करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तू परम श्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेस. त्यामुळे गणपतीच्या
कृपेने तुला धनधान्य प्राप्त झाले. तू व तुझे कुटुंबीय सुखी झाले. त्याच व्रताच्या प्रभावाने तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला आहेस." गौतमांच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नलराजा धन्य-धन्य झाला. त्यानेही गणेश चतुर्थी व्रताचा विधी समजावून घेतला. त्या व्रताचरणाने त्याची अक्षय कीर्ती झाली. ' "
हिमालयाने पार्वतीला आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, "चंद्रांगद हा मालव देशाचा राजा. तो महाबलाढ्य होता. दानशूर म्हणून त्याची विशेष ख्याती होती. इंदुमती ही त्याची पत्नी. ती धार्मिक वृत्तीची पतिभक्तपरायण स्त्री होती. राजा-राणी दोघेही गो, ब्राह्मण, अतिथी आणि देवता यांची मनोभावे सेवा करीत असत. एके दिवशी अमात्यांच्या आग्रहावरून राजा मृगयेस गेला. त्याच्यासमवेत सैन्य आणि सेवकवर्गही होता. वन्य श्वापदांच्या मागे धावताना राजा निबिड अरण्यात प्रवेशला.
तेथे भयंकर दैत्यांनी त्यांना घेरले. ते भीषण संकट पाहून राजा व त्याचे सैनिक प्राणभयाने व्याकूळ झाले. राक्षसांनी काही सैनिकांना मारून खाल्ले तर काही सैनिक धडकी भरूनच मरण पावले. एका राक्षसकन्येचे चंद्रांगदाकडे लक्ष गेले. त्याचे रूपलावण्य पाहून ती मोहित झाली. कामवासना उद्दिपित होऊन तिने चंद्रांगदाला उचलून घेतले, त्याला छातीशी कवटाळले आणि चुंबन घेऊन त्याला खाली ठेवले. मग तिने राजाच्या सैनिकांवर हल्ला केला. ती संधी साधून राजाने पळ काढला आणि जवळच असलेल्या एका विस्तीर्ण तलावात प्राणरक्षणार्थ झेप घेतली. काही नागकन्या तेथे जलक्रीडेसाठी आल्या होत्या. त्यांनी त्याला पाताळात नेले. त्याचे राजबिंडे रूप पाहून त्याही मुग्ध झाल्या. त्यांनी त्याची चौकशी केली. तो मालव देशाचा सोमवंशी राजा चंद्रांगद आहे. हे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, "आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत. तू आमच्याशी विवाह कर. आम्ही तुला सर्व प्रकारचे सौख्य देऊ."
राजा त्यांना म्हणाला, "हे नागकन्यांनो! मला एकच पत्नी आहे. मी निषिद्ध व अन्यायकारक कर्मे करीत नाही. परद्रव्यहरण, परस्त्रीची लालसा आदी सर्व दुष्कर्मापासून मी आजपर्यंत दूरच राहिलो आहे. या क्षणी मी तुमचा अतिथी आहे. तुम्ही मला अधर्मास प्रवृत्त करू नका."
राजाचे बोलणे ऐकून नागकन्यांना राग आला. त्या म्हणाल्या, “तू आमचे मनोरथ धुळीला मिळवलेस. आमची उपेक्षा केलीस. तू आम्हांला प्राप्त होणार नसशील, तर तुझ्या पत्नीलाही तुझा सहवास लाभणार नाही.” त्यांनी राजाला कारागृहात डांबले.
इकडे राजाने तळ्यात उडी मारलेली पाहून ती राक्षसकन्या त्वरेने त्याच्यामागे धावली. तिने रागाने त्या तळ्यातील सर्व पाणीच पिऊन टाकले. त्या वेळी राक्षसांच्या तावडीतून पळून गेलेले काही राजसैनिक कसेबसे राजधानीत गेले. त्यांच्याकडून अरण्यातील वृत्तान्त कळताच इंदुमती राणीला मोठा धक्का बसला. ती एकदम मूर्च्छित पडली. नगरावर शोककळा पसरली. मान्यवरांनी राणींचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. तिने सौभाग्यलंकार काढून ठेवले. सर्व राजसुखांचा त्याग करून ती विधवेचे आयुष्य जगू लागली. अशी बारा वर्षे लोटली.
एकदा त्रिभुवनसंचारी नारद इंदुमतीच्या भेटीस आले होते. तिने त्यांची पूजा केली. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. नारदांनी तिचे क्षेमकुशल विचारले. तिने आपली दुःखद कहाणी त्यांना सांगितली. सर्वज्ञ नारदांनी चंद्रांगद राजा जिवंत आहे हे ओळखले. ते इंदुमतीला म्हणाले, "मुली, तुझा पती जिवंत आहे. त्याने, भेटावे म्हणून मी एक उपाय सांगतो. तू या वैधव्यलक्षणांचा त्याग करून सौभाग्यलंकार धारण करून ये.
ते ऐकून राणीला जो आनंद झाला तो वर्णनातीत आहे. तिने प्रधानांना ही सुखद वार्ता सांगितली. त्यांनी नगरात साखर वाटली. बघता बघता ही आनंदवार्ता संपूर्ण राज्यात पसरली. लोक आनंदाने नाचू लागले. राणीने सौभाग्यलंकार धारण केले. ती प्रसन्न मनाने नारदांच्या चरणी येऊन बसली. त्यांनी तिला गणेश चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. त्याचा सर्व विधीही सांगितला. त्यांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवून इंदुमतीने पूर्ण श्रद्धेने ते व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने नागकन्यांची मती पालटली. 'आपण राजाला सूडबुद्धीने उगाचच कारागृहात डांबले. त्याला व त्याच्या पत्नीला दुःख देऊन आपल्याला काही साध्य होणार नाही,' असा विचार करून त्यांनी चंद्रांगदाला बंधनमुक्त केले. त्याची क्षमा मागितली. त्याचा सन्मान करून परतीच्या प्रवासासाठी एक अश्वही दिला.
त्या अश्वावर आरूढ होऊन चंद्रांगद त्या तलावातून बाहेर आला. त्याने अश्व एका झाडाला बांधला आणि आपली नित्यकर्मे करू लागला. तेथे आलेल्या काही नागरिकांनी त्याला बरोबर ओळखले. ते आनंदाने त्याच्यापाशी धावले. राजाला उचलून घेऊन त्यांनी मोठा जल्लोष केला. त्यांच्यापैकी काहींनी राजधानीत जाऊन राजाच्या आगमनाचे वृत्त लोकांना सांगितले, तेव्हा पौरजनांनी त्याच्या स्वागताची उत्स्फूर्त तयारी केली. त्यांनी गुढ्यातोरणे उभारली, केशराचे सडे घातले, रस्तोरस्ती पताका लावल्या, चौकाचौकांत रांगोळ्या घातल्या. मंगल वाद्यांच्या निनादाने सारे नगर दणाणून गेले.
पतिसौख्यास अंतरलेल्या इंदुमतीची मनोवस्था काय वर्णन करावी ? तिने देवाजवळ दीप लावला, साखर ठेवली. मग राजाला आणण्यासाठी खास प्रधानांना पाठविले. त्यांनी आणि सर्व लोकांनी राजाला वाजत-गाजत मिरवणुकीने नगरात आणले. इंदुमतीने पंचारती ओवाळून त्याला औक्षण केले. दोघांनी एकमेकांना डोळे भरून पाहिले. परस्परांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. बारा वर्षे भोगलेली विरहव्यथा आज संपली होती! राजा-राणीने अंबारीत बसून राजवाड्यात प्रवेश केला. मग ते दोघेही गणेश चतुर्थीचे व्रताचरण करू लागले. श्रीगणपतीच्या कृपाप्रसादाने त्यांची उत्तरोत्तर भरभराट झाली. त्यांच्या राज्यातील लोक सुखी व समृद्ध झाले."
हिमालयाच्या मुखातून गणेशव्रतमाहात्म्यपर कथा ऐकून पार्वतीचे अंतःकरण भक्तिभावाने भरून गेले. तिने अत्यंत श्रद्धेने गणेशव्रताचे आचरण केले. त्रिपुरासुराचा वध झाल्यावर शंकराने त्रैलोक्याची घडी बसवली. इंद्रादी देव आपापल्या अधिकारानुसार कार्यरत झाले. हे देवकार्य संपन्न झाल्यावर शंकराला पार्वतीची प्रकर्षाने आठवण होऊ लागली. महानंदीवर बसून तो त्वरेने हिमालयाच्या घरी आला. त्या दिवशी गणेश चतुर्थीच होती. पार्वतीचे व्रताचरण त्याच दिवशी संपन्न झाले होते. शंकराचे आगमन ही त्या व्रताची फलश्रुतीच होती जणू! त्याला पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तिने त्याचे स्वागत केले. काही काळ तेथे वास्तव्य करून शिवभवानी आपल्या गणपरिवारासह कैलासावर परतले.'
अध्याय समाप्त

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.