।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:- ५७
१९. शूरसेन व इंद्राची भेट
ब्रह्मदेव व्यासांना श्रीगणपतीचे माहात्म्य सांगत होता. तो म्हणाला, "मी तुला गणेशभक्तिपर आणखी काही कथा सांगणार आहे. त्या लक्षपूर्वक ऐक.
मध्य प्रांतात सहस्रपूर नामक नगर होते. तेथे शूरसेन नावाचा राजा राज्य करीत असे. तो न्यायप्रिय होता. तो आपल्या प्रजेची पुत्रवत काळजी घेत असे. त्याची पत्नीही सुशील, साध्वी व धर्मानुगामी होती.
एके दिवशी शूरसेन राजसभेत बसून नित्याचे कामकाज करीत होता. अकस्मात सर्वत्र दिव्य प्रकाश पडला, सुश्राव्य संगीत ऐकू येऊ लागले. त्या चमत्काराने समस्त राजसभाच स्तंभित झाली. राजासह सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. दूतांनी बाहेर जाऊन पाहिले. त्यांना एक अतिभव्य तेजस्वी विमान आकाशमार्गाने जाताना दिसले. त्या विमानातून दिव्य संगीत ऐकू येत होते. श्वेतकुष्ठ झालेल्या एका दूताची त्यावर दृष्टी पडली. तेव्हा ते विमान जागेवरच थांबले आणि खाली उतरले. हे वृत्त कळताच राजा त्वरेने बाहेर आला. तो त्या विमानापाशी गेला. त्यामध्ये देवराज इंद्राला पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने विनम्रतेने नमस्कार केला आणि म्हणाला, “महाराज आज मोठ्या भाग्याने तुमचे दर्शन झाले. मी धन्य-धन्य झालो! आपण कोठे जात होतात? अचानक येथे कसे काय उतरलात ?"
इंद्र म्हणाला, “नारदांनी मला भृशुंडी ऋषीची कथा सांगितली. त्याने गणपतीची इतकी उत्कट आराधना केली की, तो त्याच्यासारखाच दिसू लागला. ते नवल पाहण्यासाठी मी स्वतः भृशुंडीच्या दर्शनास गेलो होतो. त्याच्या आश्रमातून मी अमरावतीकडेच निघालो होतो. तेवढ्यात तुझ्याएका कुष्ठी दूताची माझ्या विमानावर दृष्टी पडली. त्यामुळे त्याची गती कुंठित होऊन ते खाली उतरले. "
ते ऐकून शूरसेनास मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "देवा तुम्ही भृशुंडीचे दर्शन घेऊन आलेले आहात. तो ऋषी तपोबलाने आपल्या आराध्य दैवतासारखाच झाला ही त्रैलोक्यात अलौकिक अशीच घटना आहे. माझ्या मनात त्या थोर गणेशभक्ताविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. तरी त्याच्याविषयी काही सांगा.
अध्याय समाप्त

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.