Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ६३ ते ७० || shri ganesh puran kathasar adhyay 63 to 70

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ६३ ते ७० 

२५. दूर्वा-माहात्म्य, चंडालिका, वृषभ आणि गर्दभाचा उद्धार


        ब्रह्मदेवाने कृतवीर्याच्या पित्यास चंद्राची कथा सांगितली. तेव्हा त्याने जिज्ञासेने विचारले, "हे विधाता, गणपतीला दूर्वा अतिशय प्रिय का आहेत? त्यामागे काही इतिहास आहे काय ?"

           ब्रह्मदेव म्हणाला, "हे राजा, फार पूर्वी दक्षिणेकडील जांचनगरात सुलभ नामक राजा राज्य करीत असे. तो न्याय, नीती व धमनि बागणारा होता. समुद्रा ही त्याची पत्नी. ती सुशील आणि पतिव्रता स्त्री होती. एके दिवशी मधुसूदन नामक गरीब ब्राह्मण राजाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला होता. त्याच्या अंगावरची फाटकी वस्त्रे पाहून राजाला हसू आले. तेव्हा ब्राह्मणाला राग आला. त्याने राजाला शाप दिला- "मी दीन, गरीब ब्राह्मण तुझ्यापाशी याचना करीत असताना माझ्याबद्दल तुझ्या मनात दया, करुणा आली नाही. मला बघून तू हसलास. या तुझ्या मूर्खपणाबद्दल तू बैल होऊन शेतामध्ये नांगर ओढशील. "

                       ही घटना घडली तेव्हा समुद्रा राणी तेथेच होती. क्षुल्लक अपराधाबद्दल या ब्राह्मणाने आपल्या पतीला फार मोठी शिक्षा केली याचा तिला राग आला. तिनेही त्याला प्रतिशाप दिला- “मूढा ! राजाला शाप देताना संपूर्ण राजव्यवस्थेवर त्याचे किती दूरगामी परिणाम होतील याचा जराही विचार न करता तू शाप दिलास, या प्रमादाबद्दल तू गाढव होशील. "

            ती शापवाणी ऐकून त्या विप्राला कमालीचा संताप आला. तो तिला म्हणाला, “हे राणी, तू मला भिक्षा तर घातली नाहीस उलट पतीची बाजू घेऊन मला शाप दिलास, म्हणून तूही दरिद्री चांडाळीण होशील.”त्यानंतर सुलभ राजा वृषभ झाला. मधुसूदन गर्दभ झाला. समुद्रा राणी चांडाळाची कन्या म्हणून जन्मास आली. ती अभक्ष्य भक्षण करीत असे. एके दिवशी खूपच पाऊस पडला. सर्वत्र पाणीचपाणी झाले. चांडाळणीची झोपडी कोलमडली. सोसाट्याच्या वाऱ्याने छप्परही उडून गेले. आश्रय शोधण्यासाठी ती वणवण भटकू लागली. फिरत-फिरत गावाबाहेरील गणपतिमंदिरापाशी आली. तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता. गणपतीच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता. भिजलेल्या चंडालिकेला थंडी सहन होईना. तिने सुकलेल्या काट्याकुट्या जमविल्या, कुठून तरी गवत आणले आणि शेकोटी पेटवून ती अंग शेकू लागली. काही वेळाने अग्नी थंड होऊ लागलेला पाहून शेकोटीत थोडे गवत सारून ती फुंकर घालू लागली. त्या फुंकरीने उडालेला एक दूर्वांकुर गाभाऱ्यातील गणेशमूर्तीवर जाऊन पडला. इतक्यात शापित बैल आणि गाढव तेथे आले. ते चंडालिकेने जमविलेली हरळ खाऊ लागले. हरळ खाताना एकमेकांच्या तोंडातील चारा ओढू लागले. त्या खेचाखेचित त्यांच्या मुखातून काही दूर्वा उडून गणपतीवर जाऊन पडल्या. अशा प्रकारे त्या तिघांकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस दूर्वांकुरांनी नकळत गणेशपूजन घडले. या त्यांच्या अल्पसेवेने गणपतीला संतोष वाटला.

                 रात्रसमयी कीर्तन संपल्यावर भक्तजन आपापल्या घरी गेले. काही दूरस्थ मंडळी सभामंडपात निद्राधीन झाली. तेव्हा काही खायला मिळेल या आशेने ती चांडाळीण गाभाऱ्यात प्रवेशली व देवापुढील नैवेद्य खाऊ लागली. वृषभ आणि गर्दभही तेथे आले. तेही हार व पाने खाऊ लागले. ते दोघे नैवेद्यात तोंड घालू लागले तेव्हा चांडाळणीला राग आला. ती त्यांना काठीने बदडू लागली. त्या फटक्यांच्या आवाजाने निद्रित मंडळी जागी झाली. गाभाऱ्यात चंडालिका आणि दोन पशूंना पाहून लोक काठ्या घेऊन धावले. त्यांचा मार चुकविण्यासाठी त्या तिघांनी बाहेर पळ काढला. या धावपळीत त्या तिघांनी मंदिराला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा घातली. विटाळ झाला म्हणून संतापलेल्या लोकांनी त्या तिघांना बेदम चोपले. मग त्यांनी स्नान केले. पहिली पूजा विसर्जित करून गणपतीची पुन्हा एकदा पूजा केली.

                 मार खाल्लेली चांडाळीण व ते दोन पशू वेदनांनी तडफडत होते. त्यांची अवस्था पाहून गणपतीला करुणा आली. 'या तिघांनी आपल्याला दूर्वा वाहिल्या, आपला प्रसाद भक्षण केला व प्रदक्षिणाही घातली आहे. यांच्यामुळेच आज आपल्याला दोनदा पूजा मिळाली. आपण या जडजिवांचा उद्धार केला पाहिजे,' असा विचार करून गणपतीने त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. तेवढ्यात एक देदीप्यमान विमान आले. त्यात गजाननाचे तेजस्वी गण होते. त्यांनी त्या तिघांना गणेशलोकी नेण्यासाठी सन्मानाने विमानात बसविले.

 ही घटना काही साधुजनांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी गणेशदूतांना विचारले, "हे श्रेष्ठ गणांनो! चांडाळीण, गर्दभ आणि वृषभ यांना कोणत्या पुण्याईने तुम्ही दिव्यलोकी नेत आहात ते सांगण्याची कृपा करा. "

                गणेशदूत म्हणाले, "या तिघांनी दूर्वा अर्पण केल्यामुळे आमचे स्वामी गणपती यांनी निजकृपेने यांचा उद्धार केला आहे. दूर्वांचे माहात्म्य फार थोर आहे. आम्ही तुम्हांला एक कथा सांगतो. म्हणजे तुम्हांला सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण होईल. ही कथा पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी इंद्राला सांगितली होती.

                      स्थावर नावाचे एक नगर होते. तेथे कौंडिण्य नावाचा एक ऋषी राहत असे. आश्रया ही त्याची पत्नी. त्याच्या आश्रमानिकट एक सरोवर होते. त्यापाशी एक गणेशमंदिर होते. कौंडिण्य ऋषी नित्यनेमाने दुर्वा बाहून गणेशमूर्तीची भक्तिभावाने पूजा करीत असे. एके दिवशी आश्रयाने त्याला विचारले, “स्वामी, तुम्ही गणपतीला रोज दूर्वा वाहता यामागे काय कारण आहे?” कौंडिण्य म्हणाला, "प्रिये, दूर्वांचे माहात्म्य फार थोर आहे. मी तुला त्याविषयक एक कथा सांगतो, ऐक.

                यमलोकात कसलातरी उत्सव होता. यमधर्माच्या निमंत्रणावरून 'देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्याच्या सभेमध्ये जमली होती. तेथे मनोरंजनार्थ तिलोत्तमा अप्सरेचे नृत्य आयोजिले होते. नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम कामप्रेरित झाला. त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला. त्याच्यापासून तिला एक राक्षसपुत्र झाला. त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी 'लागल्या. हजारो जिवांचा संहार झाला. त्याच्या गर्जनांनी त्रिखंडाला हादरे बसू लागले. त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढवले होते. याचे निवारण करायचे तरी कसे? असा देवांना प्रश्न पडला. ते विष्णूला शरण गेले. विष्णूने त्यांना गणपतीकडे पाठविले.

               देवांनी गणेशलोकी जाऊन गणपतीची अपार स्तुती केली. त्या भयंकर दैत्याच्या उत्पातांची त्याला कल्पना दिली आणि 'हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे,' अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांना दिलासा दिला. तो म्हणाला, "अग्निरूप असा तो राक्षस अनलासुर आहे. मी बालरूपाने लवकरच त्याचा वध करतो. तुम्ही काळजी करू नका.” तो असे बोलत असतानाच अनलासुर मोठमोठ्या गर्जना करीत तेथे आला. त्याला पाहून भयभीत झालेले देव दशदिशांना पांगले. तेव्हा संतापलेल्या गणपतीने बालरूप धारण करून अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे त्याच्या पोटात भयंकर आग भडकली. त्याच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून सर्व देवांनी गणपतीचा जयजयकार केला. ते त्वरेने त्याच्यापाशी धावले. अनलासुराला पोटात दडपल्यामुळे गणपतीला फार त्रास होत आहे हे पाहून सर्वांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे शीतलोपचार केले. इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला.

                  विष्णूने शीतल कमळ दिले. वरुणाने त्याच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला. शंकराने सहस्रफणी नाग त्याच्या स्थूल उदरावर बांधला. ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन मानसकन्या त्याला अर्पण केल्या 'व्यालबद्धोदर', त्या गणपतीला चवऱ्यांनी वारा घालू लागल्या. पण काहीही उपयोग झाला नाही. या उपचारांमुळे गणपती 'भालचंद्र', 'पद्मपाणी', 'सिद्धिविनायक', 'बुद्धिदाता' अशा नावांची प्रसिद्ध झाला. त्यानंतर अट्ट्याऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस दूर्वांची एकेक जुडी त्याच्या मस्तकावर वाहिली. त्या दूर्वांनी त्याच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे त्याला एकदम बरे वाटू लागले. तो शांत व स्वस्थचित्त झाला. मग प्रसन्न होऊन ऋषिजनांना म्हणाला, "यापुढे मला दूर्वा अतिशय प्रिय असतील. जो कोणी मला दूर्वा अर्पण करील त्याला सहस्र यागांचे, महादानांचे व तीर्थयात्रांचे पुण्यफळ मिळेल."

        त्यानंतर देवांनी गणपतीची स्तुती केली. 'कालानलप्रशमन' या नावाने त्याचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावला. देवांनी त्या ठिकाणी एक मनोहर देवालय बांधून त्यात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणेश 'विघ्नहर गणपती' म्हणून प्रसिद्ध झाला. '

             कौंडिण्य ऋषीने आपली पत्नी आश्रया हिला दूर्वांचे माहात्म्य विशद करताना आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, "प्रिये, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद गणपतीपाशी गेले. त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले व म्हणाला, "हे मुने, आपले येथे कसे आगमन झाले ?" नारद म्हणाले, "देवा, मिथिलेचा राजा जनक मोठा उदार आहे असे मी ऐकले होते. त्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्याच्याकडे गेलो होतो. मी त्याच्या औदार्याचा गौरव केला व म्हणालो, "राजा, तुझ्यावर गणपतीची कृपा आहे. तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तुझी कोठारे व कोषागारे भरून ठेवतो. म्हणूनच तू उदारहस्ते दानधर्म करू शकतोस असे मला वाटते." यावर तो म्हणाला, "हे विधिसुता, मी ब्रह्मज्ञ आहे. मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे. कर्ता, कारण, कर्म हे सर्व मीच आहे. म्हणून माझी कोठारे व खजिने नेहमी भरलेले असतात. "

            देवा! तो असे काही बोलेल याची मला अपेक्षाच नव्हती. मी त्याला म्हणालो, "जनका, हे तू काय बोलतो आहेस? या जगात एका ईश्वरावाचून कोणीही मोठा नाही. हे तुझे दर्पोक्तियुक्त बोलणे मला अजिबात आवडलेले नाही. तुझा गर्व खोटा आहे हे लवकरच तुझ्या लक्षात येईल." देवा, त्यानंतर मी सरळ तुझ्याकडेच आलो. आता जनकाचा गर्वपरिहार कसा करायचा ते तूच ठरव." त्यानंतर नारद वैकुंठास निघून गेले.

               काही दिवसांनी गणपती एका गरीब ब्राह्मणाच्या रूपाने जनकापाशी गेला व म्हणाला, “राजा, मी भुकेलेला आहे. मला खाऊ घातलेस, तर तुला शतयज्ञांचे पुण्य मिळेल." या ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी देव आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेला आहे हे जनकाच्या तत्काळ लक्षात आले, पण तो काहीही बोलला नाही. त्याने ब्राह्मणाला भोजनगृहात नेले व तेथील आचाऱ्यांना त्या अतिथीला पोटभर जेवू घालण्यास सांगितले.

                त्या समयी हजारो माणसे जेवतील एवढे अन्न भोजनगृहात तयार होते. ब्राह्मण भोजनास बसला. आचारी वाढत गेले व तो खातच गेला. बघता बघता सर्व स्वयंपाक त्याने फस्त केला. ती त्याची अचाट लीला पाहून आचारी व कर्मचारी घाबरले. हा सर्व प्रकार त्यांनी राजाच्या कानावर घातला. ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी राक्षसच आला असावा अशी शंकाही व्यक्त केली. तेव्हा 'भुकेल्या ब्राह्मणाला भोजन नाकारल्यास सत्त्वहानी होईल व दुष्कीर्ती पदरात पडेल' असा विचार करून जनकाने 'त्या विप्राला वाढतच राहा' असे आचाऱ्यांना सांगितले.

            त्यानंतर राजकर्मचाऱ्यांनी कोठारातील सर्व अन्न त्या विप्रास शिजवून घातले, पण त्याची तृप्ती होईना. शेवटी सर्व नगरातील अन्नही शिजवून घातले, तरीही तो खायला मागतच राहिला. तेव्हा मात्र जनकाने त्या ब्राह्मणासंमुख जाऊन दिलगिरी व्यक्त केली आणि लज्जेने मान खाली घालून उभा राहिला. तेव्हा विप्ररूप गणपतीने त्याच्या ऐश्वर्याचा व दातृत्त्वाचा धिक्कार केला आणि तेथून निघून गेला.

              मग तो त्रिशिर व विरोचना या दांपत्याच्या घरी गेला. ते दोघे गणपतीचे परम भक्त होते. ब्राह्मण त्यांना म्हणाला, "जनकाची दातृत्त्वकीर्ती फक्त कानांनीच ऐकावी ! तो माझ्यासारख्या भुकेलेल्या ब्राह्मणाला पोटभर जेवूही घालू शकत नाही. राजाची ही तन्हा तर नगरजनांची काय असेल ? भक्तीने कोणी कणभर जरी दिले तरी मी संतुष्ट होतो. पण उद्दामपणाने कोणी मणभर जरी दिले तरी मला त्याचे कौतुक नाही. बाबांनो! मी भुकेलेला आहे. घरात काही खायला असेल तर द्या."

            त्रिशिराने त्या अतिथीला हात जोडले व विनम्रतेने म्हणाला, "हे ब्राह्मणदेवता ! माझ्या घरात जेवढे अन्न होते ते मी राजाच्या अतिथीसाठी आधीच देऊन टाकले आहे. त्यामुळे तुम्हांला खाऊ घालण्यासाठी माझ्याकडे आत्ता काहीही नाही. मला क्षमा करा. पण हा ! सकाळी गणेशपूजनासाठी मी काही दूर्वा आणल्या होत्या, त्यांपैकी एक दूर्वांकुर शिल्लक आहे, तो मी तुम्हांला देतो. कृपा करून त्याचा स्वीकार करा.'

               त्रिशिराच्या मधुर बोलण्याने विप्ररूप गणपतीला संतोष वाटला. त्याने ती दूर्वा आवडीने खाल्ली व तृप्तीचा ढेकर दिला. मग त्याने निजस्वरूपात प्रकट होऊन त्या दोघांना दर्शन दिले व म्हणाला, "मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे, तरी इष्ट वरदान मागून घ्या." तेव्हा त्रिशिर आणि विरोचना म्हणाले, "देवा, तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. तू आमच्यावर प्रसन्न आहेस यातच सर्व आले. आणखी आम्हांला कसलीही अपेक्षा नाही. तथापि जन्मोजन्मी तुझीच भक्ती करता यावी एवढीच विनंती आहे." हे त्यांचे निःस्वार्थ बोलणे ऐकून गणपतीला फारच समाधान वाटले. ‘तथाऽस्तु!' असा आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला. "

             ही कथा सांगून कौंडिण्य आपल्या पत्नीला म्हणाला, “आश्रये, या सर्व दुसऱ्यांच्या अनुभूतीच्या कथा आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तसे आचरण केल्याने इतरांचेही कल्याण होते. पण स्वतःचा अनुभव केव्हाही श्रेष्ठच. म्हणून तू एक दूर्वा घेऊन इंद्राकडे जा व तिच्या भाराइतके सोने मागून आण.

         पतीच्या आज्ञेने आश्रया स्वर्गलोकी अमरावतीस गेली. तिने इंद्राला स्वतःचा परिचय दिला व आगमनाचा हेतू सांगितला. त्याने एका दूतासह तिला कुबेराकडे पाठविले. इंद्राच्या आज्ञेनुसार कुबेराने तिने आणलेल्या दूर्वेची तुला केली. ती दूर्वा एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यात

             किंचित सोने टाकले. पण पारडे खाली जाईना. त्याने सोने वाढवीत नेले. असे करता-करता स्वर्गलोकीचा सर्व कोषच रिकामा झाला. शेवटी कुबेर स्वतः त्या पारड्यात बसला. पण व्यर्थ! पारडे खाली जाईना. 'काय करावे?' कुबेराला मोठा प्रश्न पडला. त्याने इंद्राकडे जाऊन सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा इंद्रासहित तेथे उपस्थित असलेल्या हरिहरांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते सर्व जण कुबेरासमवेत तुलास्थानी आले. इंद्र ऐरावतासह पारड्यात चढला. विष्णू आणि शंकरही चढले! पण छे ! पारडे जागचे हालेना. हतबल झालेल्या देवांनी कौंडिण्य ऋषीची भेट घेतली. त्याला विनम्र अभिवादन केले व म्हणाले, "हे ऋषिश्रेष्ठा ! तू फार थोर आहेस. दूर्वेचे माहात्म्य आपल्या पत्नीला पटवून देण्यासाठी हा जो तू प्रयास केलेला आहेस त्यावरून गणपतीला प्रेमभावाने अर्पण केलेल्या एका दूर्वांकुराची कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही, हे आम्हांला प्रत्यक्ष कळून आले आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत." मग त्या सर्व देवांनी कौंडिण्याच्या आश्रमातील गणेशमूर्तीची दूर्वा अर्पण करून प्रेमपूर्वक पूजा केली आणि ते आपापल्या स्थानी परतले. " चंडालिका, वृषभ आणि गर्दभ यांना गणेशलोकी नेण्यासाठी आलेल्या गणपतीच्या दिव्य गणांनी दूर्वांचे माहात्म्य सांगणाऱ्या या कथा त्या पुण्यवान साधुजनांना कथन केल्या. तेव्हा त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी स्नाने केली. गणेश चतुर्थीच्या त्या पुण्यदिनी गणपतीची भक्तिभावाने पूजा केली. त्यास दूर्वा वाहिल्या. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यांचाही उद्धार केला. दिव्य विमानात बसून ती सर्व मंडळी गणेशलोकी गेली.

               ब्रह्मदेवाने कृतवीर्याच्या पित्याला गणेश चतुर्थीचे व्रत कसे करावे ? दूर्वांचे माहात्म्य काय आहे? या संदर्भात वरीलप्रमाणे विवेचन केले त्यामुळे त्या पित्याला मोठे समाधान वाटले. विधात्याचा निरोप घेऊन तो स्वर्गलोकी परतला. त्याने मरणासन्न अवस्थेत तपश्चर्या करणाऱ्या कृतवीर्याला स्वप्नदृष्टांत देऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. त्या स्वप्नाने कृतवीर्यास जाग आली. त्याने आवतीभोवती पाहिले. त्याला उशाशी संकष्टी चतुर्थी व्रताची एक हस्तलिखित पोथी सापडली. त्याला मोठे नवल वाटले. तपश्चर्येचे पारणे करून तो नगरात परतला. अत्री ऋषी हे त्याचे राजपुरोहित होते. त्याने त्यांच्याशी विचारविमर्श केला. अत्रींनी त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते पुढे म्हणाले, "राजा, गणपतीला दूर्वा वाहताना त्याच्या एकवीस नामांचा उच्चार करीत जा. ते नाममंत्र पुढीलप्रमाणे आहेत- १) ॐ गणाधिपाय नमः । २) ॐ उमापुत्राय नमः | ३ ॐ अभयप्रदाय नमः। ४) ॐ एकदंताय नमः । ५) ॐ इभवक्त्राय नमः । ६) ॐ मूषकवाहनाय नमः । ७) ॐ विनायकाय नमः। ८) ॐ ईशपुत्राय नमः । ९) ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः । १०) ॐ लंबोदराय नमः । ११) ॐ वक्रतुंडाय नमः । १२) ॐ अघनाशनाय नमः । १३) ॐ विघ्नसंहर्ताय नमः । १४) ॐ विश्ववंद्याय नमः । १५) ॐ अमरेश्वराय नमः । १६) ॐ गजवक्त्राय नमः । १७) ॐ  नागयज्ञोपवितिने नमः। १८) ॐ भालचंद्राय नमः । १९) ॐ परशुधारिणे नमः | २०) ॐ विघ्नाधिपाय नमः । २१) ॐ सर्वविद्याप्रदायकाय नमः । हे राजा! याप्रमाणे नाममंत्रोच्चार करून गणरायाला एकवीस दूर्वा अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होऊन भक्ताचे मनोरथ पूर्ण करतो.' " (टीप : गणपतीचे संकष्टी व्रत केल्याने कृतवीर्यास पुत्रलाभ झाला, हे कथानक आधीच सांगितलेले आहे.)

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या