Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ७१ ते ७२ || shri ganesh puran kathasar adhyay 71 to 72

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ७१ ते ७२ 

२६. गणेश चतुर्थी व्रतोद्यापन



         भृगू ऋषी सोमकांताला म्हणाले, "हे राजा, ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश चतुर्थी व्रताचा विधी आणि माहात्म्य सांगितले. तेव्हा व्यासांनी विचारले, “विधाता, हे व्रत पूर्वी कोणी केले होते?" ब्रह्मदेव म्हणाला, "कार्तिकेयाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने हे व्रत केले होते. नंतरच्या काळात समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने, नलराजाचा शोध लागावा म्हणून दमयंतीने हे व्रत केले होते. शंबरासुराने प्रद्युम्नाला पळवून नेले होते. त्यामुळे रुक्मिणी फारच चिंतेत होती. 

          आपला पुत्र सुखरूप परत यावा म्हणून लोमेश ऋषींच्या सांगण्यावरून तिने चार संकष्टी चतुर्थ्या केल्या होत्या. अनिरुद्ध हा प्रद्युम्नाचा पुत्र, श्रीकृष्णाचा नातू, बाणासुराची कन्या उषा हिच्यासाठी चित्रलेखाने (उषेची सखी) त्याला पळवून नेले होते. तेव्हा रुक्मिणीच्या सांगण्यावरून प्रद्युम्नाने हे व्रत केले. बाणासुर महाबलाढ्य आणि अजिंक्य होता. त्याच्यावर विजय मिळविणे अत्यंत आवश्यक होते. तेव्हा उद्धवाने श्रीकृष्णाला हे व्रत करण्यास सांगितले. त्यामुळेच त्याला इष्ट कार्यात यश मिळाले. हे मुने, फार काय सांगू? या व्रताच्या पुण्यप्रभावामुळेच मला सृष्टिनिर्मितीचे अमोघ सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हे मुने! आत्ता या व्रताच्या उद्यापनाविषयी सांगतो. 

            उपासकाने संकल्पित चतुर्थी संख्या पूर्ण झाल्यावर त्यानंतरच्या संकष्टी चतुर्थीस व्रताचे उद्यापन करावे. उदाहरणार्थ चार संकष्टी चतुर्थ्या केल्यास पाचव्या संकष्टी चतुर्थीला व्रताचे उद्यापन करावे. त्या दिवशी आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी. महानैवेद्य दाखवावा. आचार्यांचीही पूजा करावी. एकवीस ब्राह्मणांकडून 'गणांना त्या गणपति हवामहे' या वैदिक मंत्राने दहा हजार आहुतींनी होम करावा. त्यानंतर एक हजार, पाचशे किंवा एकशे आठ दुर्गानी होम करावा. बलिदान करून पूर्णाहुती द्यावी. विप्रांना वंदन करावे. गणपतीला हात जोडून कल्याणार्थ प्रार्थना करावी. कार्यात यश मिळावे म्हणून विनंती करावी. व्रतसेवेत काही न्यून राहिले असल्यास देवाची क्षमा मागावी. अशा प्रकारे विधिवत उद्यापन केल्याने अश्वमेध यागाचे पुण्य लाभते."

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या