Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २४ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 24

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२४ 

भर्तरीचे हरणीने संगोपन केले


 ।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

          एकदा काय झाले, ऊर्वशी विमानात बसून जात होती. संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण अस्ताला जात होता. त्याने ऊर्वशीला पाहिले. ऊर्वशीला पाहताच सूर्याचे तेज जे पडले ते आकाशात दोन भागांत वेगळे होऊन त्यातला एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमात एका घटामध्ये पडला व त्यापासून अगस्त्य ऋषींचा जन्म झाला. दुसरा भाग कौलिक ऋषीने भिक्षापात्र अंगणात ठेवले होते व ते आश्रमाचे दार बंद करण्यासाठी मागे वळले होते. तेवढ्यात त्या भिक्षापात्रात सूर्याचे तेज सूक्ष्मरुपाने शिरले. कौलिकाने दार बंद करून अंगणात येऊन भिक्षापात्र उचलले. त्याला कोठेतरी बाहेर जायचे होते. ते पात्र म्हणजेच भर्तरी. त्याने ते उचलले, तो त्याला त्यात काय दिसले? सूर्याचे तेजच त्यात सामावले होते. कौलिकाने पुष्कळ वर्षे ती भर्तरी आश्रमात जपून ठेवली. पुढे कलियुग आले. तेव्हा तो ती भर्तरी घेऊन मंदारपर्वतावर गेला. त्याने एका गुहेत ती ठेवली. अगदी सुरक्षित आणि तो निघून गेला.

             वर्षामागून वर्षे जात होती. त्या गुहेत मधमाशांनी त्या भर्तरीतच आपले पोळे केले. योग्य काळ आला. तेव्हा त्या सूर्यतेजात द्रुमिलाने प्रवेश केला. काही काळाने तो एवढा मोठा झाला की, भिक्षापात्रात तो मावेना. ते पात्र दगडाने फुटले आणि तो बालक घरंगळत बाहेरच्या बाजूला कुरणावर आला व मोठमोठ्याने रडू लागला. तेवढ्यात काही हरिणी चरत चरत तिथे आल्या. त्यातल्या एका हरिणीने दोन पिल्लांना तेथेच जन्म दिला. मग त्या गवतात ती दोन पिल्ले व हा बालक जवळ जवळ असल्यामुळे हरिणीला असे वाटले की, आपल्याला तीन पिल्ले झाली आहेत. तिने पिल्लांना पाजण्याचा यत्न केला. तेव्हा तिची जी दोन पिल्ले होती, ती तिच्या अंगावर पिऊ लागली पण या बालकाला काही ते येईना. मग त्या हरिणीने आपल्या या तिसऱ्या पिल्लाला कळत नाही असे समजून मुद्दाम त्याच्या तोंडात आचळे घालून त्याला दूध पिण्यास शिकविले. जिभेने आपल्या पिल्लांना ती ज्या मायेने चाटून पुसून स्वच्छ करी त्याच मायेने भर्तरीला पण स्वच्छ करी. असे होता होता तो बालक दोन वर्षांचा झाला. त्याने तेवढ्या काळात बनातल्या पशुपक्ष्यांचीच फक्त भाषा ऐकली होती. तो चालू लागला व बोलू लागला, ते सर्व पशूंप्रमाणेच.

              सर्व पशुपक्ष्यांची भाषा त्याला कळू लागली. त्या त्या पशूंना किंवा पक्ष्यांना तो त्यांच्याच आवाजात उत्तरे देऊ लागला. तो त्या हरिणीमातेच्या मागोमाग मात्र सारखा असे. जेथे ती जाई तेथे मागोमाग तो जाई. एकदा वनातल्या वाटेने ती हरिणी जात असता त्याच वाटेने एक स्त्री व एक पुरूष जात होते. ते भाट होते. त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या पत्नीचे नाव रेणुका असे होते. जयसिंगाला तो चालक वाटेतच दिसला. त्याचे रूप माणसासारखे, तेज देवासारखे, पण चालणे हरिणीसारखे होते. एवढा तेजस्वी मानवी पशू! त्याला फार नवल वाटले. तो पुढे झाला व पत्नीला म्हणाला "रेणुके, हा पोरगा कोणाचा? कसा ग चुकला? कोण त्याची आई असेल ? चल, आपण त्याची व त्याच्या आईची भेट ." असे म्हणून जयसिंग पुढे झाला व पटकन त्या बालकाजवळ गेला. त्याला पाहताच हरिणी आर्त आवाजाने ओरडू लागली. तो हरिणीकडे करवू." चारी पायांनी धावू लागला, पण त्यांपेक्षा वेगाने धावत जाऊन जयसिंगाने त्याला पकडले' आणि त्याला उचलून दोन पायांवर उभा करून म्हणू लागला. "बाळा कोण तू? तुझे नाव काय? तुझी आई कुठे आहे? चल, मी तुला आईकडे नेतो." त्याचे मोठे कळवळ्याचे बोलणे त्या हरिणमानव बालकाला कसे कळणार? तो आपला हरणासारखे आर्त नाद करू लागला.

           त्यावेळी त्या हरिणीची अवस्था फारच केविलवाणी झाली, पण माणसे पाहून तीही भ्याली व जवळ येण्यास धजली नाही. जयसिंगाला वाटले, "हा मुलगा अज्ञानी आहे." मग तो खुणा करून विचारू लागला. पण त्या बालकाचे आपले हरिणासारखे ओरडणे चालूच होते. "आपण याला आपल्या वस्तीवर तर नेऊ या. मग त्याची आई सापडली तर तिच्या हवाली करू या!" असा विचार करून त्या भाटाने त्याला आपल्या खांद्यावर घेतले व तो पत्नीसह चालू लागला. तो काय? ती हरिणी ओरडत त्याच्या भोवताली फिरू लागली. ते पाहून जयसिंगाला वाटले, ही हरिणी तिचे पाडस चुकले म्हणून आकान्त करीत असावी. त्याने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तेव्हा ती हरिणी निराश होऊन पुन्हा वनात शिरली. जयसिंगाने आपल्या घरी गेल्यावर त्या बालकाला बायकोच्या ताब्यात दिले.

           बालक माणसांमध्ये राहू लागला व हळूहळू माणसांची भाषा शिकत शब्द बोलू लागला. जयसिंग व त्याची पत्नीही त्या बाळाला घेऊन तीर्थयात्रेला निघाली. जाता जाता ती काशीला गेली. जयसिंगाने विश्वेश्वराच्या मंदिरात त्या मुलाला शंकराच्या पिंडीसमोर नेऊन दंडवत घातले तेव्हा असा चमत्कार झाला की त्या पिंडीतून भगवान शंकर बोलले, "या भरतरीनाथ, अवतरलात म्हणायचे भूलोकात!" ते शंकराचे शब्द जयसिंगाने ऐकले तेव्हा त्याला फार नवल वाटले. "हा मुलगा अवतारी? म्हणजे आपले मोठेच भाग्य!" त्याने आनंदाने घरी जाऊन बायकोला ते सांगितले. शंकराने याला भर्तरी अशी हाक मारली. तेव्हा त्यांनी भर्तरी असेच त्याचे नाव ठेवले. त्यानंतर भर्तरीच्या वयाच्या सोळाव्या वर्षी एक अघटित घटना घडली. जयसिंग व रेणुका हे परत आपल्या घरी जाण्यास निघाले. वाटेत निबिड दऱ्याखोऱ्यातून जातांना जयसिंगाला चोरांनी गाठले व त्याचे सर्व धन लुटून त्याला ठार मारून ते पळून गेले. दैवयोग असा की, कित्येक वंजारी व्यापार करण्याकरिता अवंती नगरीकडे त्याच मार्गाने जात होते, त्यांनी त्याचे सांत्वन केले व त्याचे मन वळवून त्याला आपल्याबरोबर घेतले. तो त्या व्यापारी लोकांची लहान मोठी कामेही करू लागला. तो मधुर बोलणारा, देखणा व उद्योगी होता. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला होता. पुढे काही दिवसांनी काही गावातून मुक्काम करीत ते व्यापारी धान्य व इतर चीजवस्तू घेऊन अवंतिकानगरीकडे निघाले.

अध्याय फलश्रुती :- बालहत्या दोष संपेल, मुले सुखी होतील.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या