Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २५ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 25

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२५ 

 सुरोचनास गर्दभदेह प्राप्त 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

            इंद्राच्या समेत मेनका सुंदर नृत्य करीत होती. सुरोपन नावाचा गंधर्व त्यावेळी तेथे होता. त्याने असभ्य वर्तन केल्यामुळे इंद्राने त्याला शाप दिला. “सुरोचना, तू गाढवासारखा वागलास ! जा!! मृत्युलोकात गाढवाचा जन्म घेऊन खुशाल वाटेल तसा वाग!" सुरोचनाने इंद्राची क्षमा मागितली. इंद्र म्हणाला, "मथुरा नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याबरोबर लग्न होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. मग तू येथे परत येशील." इंद्राच्या शापाप्रमाणे मथुरेच्या जवळ तो गाढव होऊन चरत राहिला. रानातल्या गाढवांबरोबर तो कर्मठ नावाच्या कुंभाराच्या घरी गेला. पुढे त्या कुंभाराने सर्व गाढवे विकून टाकली. पण सुरोचनाला, त्या नव्या गाढवाला मात्र योगायोगाने ठेवून घेतले. रात्री गाढव दाराबाहेर बांधून ठेवलेला असे. रात्री तो गाढव दाराबाहेरून माणसाच्या आवाजात म्हणे, "कुंभारा, मधुरेचा राजा सत्यवर्मा याची सुंदर कन्या माझी बायको म्हणून आणून दे!"

           कुंभार घाबरला, "हा गाढव, असे काही भलते सलते बोलला नि ते राजाच्या कानापर्यंत गेले, तर आपली शंभरीच भरेल. याचे तोंड बंद केले पाहिजे." असा विचार करून तो कुंभार गाढवावर रागावला. सकाळ झाली. कुंभाराने व त्याच्या बायकोने घरात होते नव्हते ते सगळे सामान त्याच गाढवावर लादले. मुकाट्याने ते जोडपे गाढवाला लहानशा काटकीने हाकलीत नगरवेशीजवळ आले. पहारेकऱ्यांनी कुंभाराला नगर सोडण्याचे कारण विचारले. पण दोघेही गप्पच राहिले. 

             तेव्हा पहारेकऱ्यांनी गाढव मागे फिरवून कुंभाराला त्याच्या सामानासकट राजवाड्याकडे आणले. राजाने विचारले "तू हे नगर सोडून जाण्याचे कारण काय? मला सत्य सांग." कुंभाराने म्हटले, "राजेसाहेब, आपण प्रजेचे पालन करीत नाही असे कोण म्हणेल? पण मी का जातो ते फक्त एकान्तात तुम्हाला सांगेन." राजाने त्याला अभय वचन दिले. तेव्हा कुंभार म्हणाला, “महाराज, मी खरे सांगतो. रात्रीबेरात्री रोज गाढव मला सांगतो, "सत्यवर्मा राजाची मुलगी सत्यवती हिचे माझ्याशी लग्न करून दे!" महाराज हे गाढवाचे बोलणे ऐकून ऐकून भी भ्रमिष्ट झालो म्हणा ना! वाटल्यास तुम्ही गाढवाची परीक्षा करावी. तो कोणीतरी देवही असेल."

                राजा फार विचारी होता. त्याने कुंभाराला म्हटले, "बरे तर तू आता घरी जा. रात्री जर तो गाढव पुन्हा तुला तसेच म्हणाला तर तू त्याला उलट सांग, "मी तुझे म्हणणे राजाच्या कानावर घातले. तो असे म्हणतो की, सर्व मथुरा नगरी जर तू तांब्याची करून दिलीस तर सत्यवतीचे लग्न तुझ्याशी करून देईन. जा! खरा कोण आहे त्याची परीक्षा युक्तीने करता येईल. आता न भीता घरी जा." मग तो कुंभार बायकोला व त्या गाढवाला घेऊन आपल्या घरी परत गेला. 

                    रात्र झाली कुंभार निजण्यासाठी अंथरुणावर पडला. तोच दाराच्या बाहेर गाढव पुन्हा म्हणाला, "कुंभारा, अरे सत्यवतीचे माझ्याशी लग्न करून दे रे राजाशी काही बोललास तरी?" कुंभार बाहेर गेला आणि गाढवाला म्हणाला, "तुझे म्हणणे सत्यवर्मा महाराजांच्या कानावर घातले आहे. ते म्हणतात की तू जर सर्व मथुरानगर तांब्याचे करून दिलेस तर ते तुला सत्यवती देतील!"

               अरे अरे! मागून मागावयाचे ते रत्नांचे, सोन्याचे नगर तरी मागायचे. मला काय कठीण आहे! उद्या सकाळीच राजाला त्याचे सर्व नगर ताम्र धातूचे झालेले दिसेल. तू आता रात्रीच जा आणि राजाला सांग, सत्यवतीच्या लग्नाची तयारीच कर. उद्या सकाळी पहाच. सारे नगर तांब्याचे!" 

                    कुंभाराला नवल वाटले. त्याने रात्रीच राजाला भेटून पुन्हा एकान्तात जाऊन ते सांगितले. राजा म्हणाला, “ठीक आहे." कुंभार घरी आला. गाढवाने मग विश्वकर्म्याला आवाहन केले. म्हटले, "विश्वकर्मा, माझा दिव्य देह हा तुझाच वंश आहे. म्हणून तुला बोलावले आहे. ही मथुरा नगरी. सत्यवर्मा येथील राजा. तुझ्या एका कृपादृष्टीने ही नगरी तांब्याची करून दे." "एवढेच ना? मी करतो." असे म्हणून विश्वकर्म्याने आपल्या दृष्टीने एकदा गगनातून सर्व नगरीकडे पाहिले. त्याबरोबर सर्व नगरी, घरे, सज्जे, मार्ग वाटिका, प्रासाद सर्व पृथ्वीरूप पदार्थ तांब्याचे झाले. पण इतर मुल्यवान धातू मात्र तसेच राहिले. सकाळी उठून सारे पाहतात तो काय, सगळीकडे चकचकाट. तांबूस प्रकाशात मथुरानगर जसे न्हाऊन निघाले होते. पहाटेस भाटाची गाणी ऐकत जागा झालेला राजा सर्वत्र ताम्र धातूच्या वस्तू व प्रासाद पाहून थक्क झाला. नगरातले लोक मार्गामार्गातून अचंबा करीत हिंडत होते.

                  कुंभाराला राजाने बोलावणे पाठविले. तो आला, तेव्हा राजाने त्याची भेट घेतली व म्हटले, "तो गाढव कोणीतरी मोठा देव आहे हे खास. मी त्याला कन्या देण्यास तयार आहे. सत्यवतीला तुझ्या हवाली करतो. तिला घेऊन तू या नगरातून कुठेतरी दूरदेशी जाऊन राहा." कुंभार रात्र पडल्यावर राजाकडे गेला व त्याला म्हणाला. "मी नगर सोडणार आहे. सत्यवतीला माझ्या स्वाधीन करा." राजाने आपली कन्या सत्यवतीला आधीच सर्व सांगून ठेवले होते. "गाढवाच्या रुपाने कोणीतरी शापभ्रष्ट देवचं येथे आलेला आहे. तोच तुझा पती मी ठरविला आहे. तो पशू म्हणून त्याचा अपमान करू नको. तुझे त्यातच कल्याण आहे!" सत्यवतीने राजाच्या इच्छेला मान दिला. तिच्या आज्ञाधारकपणाला तुलनाच नव्हती. 

                    जेव्हा तिला घेऊन राजा कुंभारासमोर आला, तेव्हा मात्र माहेर सोडतांना सत्यवती रडू लागली. राजा तिला म्हणाला, "तू जर युक्ती करून पुण्यबळाने त्याला गर्दभ देहातून मुक्त केलेस, तर तुला चांगलेच भाग्य लाभेल." त्यावेळी गाढव मनुष्यवाणीने राजाला म्हणाला, "सत्यवर्मा, मी सुरोचन नावाचा श्रेष्ठ गंधर्व आहे. मी इंद्राच्या शापामुळे गर्दभाच्या जन्माला आलो आहे. मला उ:शापही मिळाला आहे. योग्य वेळ येताच मी धारण करीन." ते ऐकून राजा आनंदित झाला. त्याने कुंभाराला नगर सोडून रात्रीच जाण्यास सांगितले. रात्रीच ते सर्वजण मथुरा सोडून अवंती नगराकडे निघाले.

अध्याय फलश्रुती :- शाप लागणार नाही, मनुष्यजन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या