।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-२६
राक्षसधारी चित्रवर्मा गंधर्वाचा वध व स्वर्गारोहण
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
तो कर्मठ नावाचा कुंभार, त्याची पत्नी सत्यवती व तो सुरोचन नावाचा गंधर्व (गाढव) अशी मंडळी मुक्काम करीत करीत अवंती नगराला पोहोचली व तेथे राहू लागली. एकदा सत्यवतीने म्हटले, "माझ्या बाबांनी ज्या गर्दभराजांना आपले जावई मानले आहे. ते माझ्याजवळ बोलत का नाहीत?" मग कर्मठ गुसपणे गाढवाला बोलला "गंधर्वराज! सत्यवती ही तुझी पत्नी आहे. तुम्ही पशू नि ती सुलक्षणी मानवदेहधारी स्त्री. तुमची जोडी कशी काय जमणार ?" गाढव म्हणाला, "सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला की मला येऊन सांगा. मग मी माझ्या गंधर्वरुपाने सत्यवतीची इच्छा पूर्ण करीन." "म्हणजे तुला गंधर्वरुप घेता येईल." "अर्थात! पण त्यावेळेपर्यंत नाही. तसा शापच आहे ना!" एके दिवशी कर्मठाने गाढवाला सांगितले, "गंधर्वराज, सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला आहे.'
रात्रीची वेळ होती. गाढवाने कर्मठाच्या देखत दिव्य गंधर्वरुप धारण केले. मग एकान्तात सत्यवती आणि गंधर्व सुरोचन यांचा राक्षसविधीने विवाह केला. सत्यवती गंधर्वांचे तेजस्वी रूप पाहून फारच आनंदित झाली. त्यांचे मीलन झाले. तो तिला म्हणाला, "प्रिये, ज्यावेळी तुला पुत्र 'होईल व त्याला मी पाहीन. त्यावेळी मी पृथ्वी सोडून स्वर्गात जाईन. तुझा पुत्र राजा होईल. विक्रमादित्य असे त्याचे नाव असेल. तो शककर्ता पराक्रमी राजा होईल. मी पुन्हा गर्दभरूप घेणार आहे. तू चिंता करू नकोस!" सत्यवतीची समजूत घालून गंधर्वाने पुन्हा गर्दभरुप घेतले. पुढे सत्यवतीने एका सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे बारसे झाले. कर्मठाने मुलाचे नाव 'विक्रम' ठेवले. पाळणा सजवलेला होता. रात्री गंधर्व प्रकट झाला. त्याने पुत्राचे मुख पाहिले आणि गंधर्वाचा शाप संपला. इंद्राने मातली या आपल्या सारथ्याला दिव्य विमान देऊन खाली पाठविले. विमान भूमीवर उतरले. मातली घरात शिरला. तो सुरोचनाला म्हणाला, "गंधर्वराज, चलावे, विमान तयार आहे!"
गंधर्व म्हणाला, "सत्यवती मुलाला सांभाळ, मी जातो!" "नाथ, तुम्ही बाळाला आणि मला टाकून जाता? मी एकटी कशी हो राहू? माझे बाबा- त्यांनी माझा विवाह करून दिल्यावर त्यांचा माझा ऋणानुबंध संपला आणि तुम्ही पण चाललात. नका हो जाऊ!" असे म्हणून सत्यवती रडू लागली. तिचे नेत्र पुसून तिच्या रडवेल्या मुद्रेकडे निरखून पाहात सुरोचनाने म्हटले, "प्रिये! रडू नको. मी जरी येथून गेलो तरी तुझाच आहे. तू माझी आठवण केलीस की लगेच मी प्रकट होईन. माझी शापातून सुटका झाली, हे केवढे चांगले झाले! मी आहेच असे समज. डोळे पूस हास पाहू एकदा!" त्याने सत्यवतीचे असे सांत्वन केले. मग कर्मठाला म्हटले, “कर्मठा, तू या मुलाचा सांभाळ कर. मला तू भार वाहायला लावलास त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. मी आता जातो!" मातली पुढे झाला. गंधर्व त्याच्यामागोमाग गंधर्व लोकात गेला.
कुंभाराच्या घरी विक्रम लहानाचा मोठा झाला. त्याला अनेक विद्या प्राप्त झाल्या. तो सर्वांच्या ओळखीचा झाला. कुंभाराच्या ओळखीचे कित्येक राजसेवक होते, त्यांच्या ओळखीने विक्रमासही जकातवसुलीचे काम मिळाले. विक्रम मधूनमधून पहारे चौकीवर बसे. अशा वेळीच पूर्वीच्या व्यापाऱ्यांच्या व भर्तरीच्या गोष्टी चालल्या होत्या. त्या विक्रमाने गुप्तपणे ऐकल्या होत्या. त्याने चोरांची धाड आलेली आणि व्यापाऱ्यांनी ती परतवून लावलेली पाहिली होती. तरुण तेजस्वी भर्तरी काय सांगत होता, ते त्याने खरे झालेले पाहिले होते. चित्रमा गंधर्व राक्षस झाला असून तो उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यावेळी जात होता. गंधर्वच आहे व शापाने राक्षस झाला आहे ही गोष्ट भर्तरीलाही माहीत नव्हती, पण भर्तरीच्या मुखाने विक्रमाने एवढे मात्र ऐकले होते की, "जो त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळावर आणि नगरद्वारावर लावील तो राजपद मिळवील.
राक्षसाजवळ चार रत्ने आहेत, हे पण त्याने ऐकले होते. भर्तरीचे बोलणे ऐकून विक्रम तत्काळ उत्तरेला अरण्यात गेला. वाटेत त्याला राक्षस दिसला. विक्रमाने खड्गाने त्या राक्षसाला लपूनछपून एकदम घाव घालून मारले. त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावला तेव्हा त्या राक्षसाच्या शरीरातून चित्रमा गंधर्व बाहेर पडला आणि विमानात बसून आकाशमार्गे निघाला. शाप मिळाल्याची कथा विक्रमाने त्याच्याकडून समजून घेतली.
गंधर्व निघून गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले. तो त्याच्या हातात चिंतामणी, कामद, वैडूर्य, हिरा अशी चार रत्ने सापडली. विक्रम लगेच परत आला. नगरद्वारावर त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला. मग तो त्या व्यापाऱ्यांच्या घोळक्यात शिरला. तो म्हणाला, "माझे नाव विक्रम. पण चोर येणार हे तुम्हाला कसे समजले ?" "हा मुलगा आहे ना? त्याने कोल्हेकुई ऐकली. त्यावरून त्याने सांगितले, आम्हाला तो वाटेत सापडला. भर्तरी असे तो आपले नाव सांगतो. त्याला पशुपक्ष्यांचीही भाषा समजते." "वा!" विक्रम भर्तरीकडे न्याहाळून पाहात म्हणाला. भर्तरीनेही त्याच्याकडे पाहिले. दोघांना मनोमन ओळख पटली. एकमेकांविषयी ओढ वाटली. ते एकाच वयाचे होते.
तेथून विक्रम चौकीवर गेला. जरा वेळाने एक जकात वसूल करणारा बाहेर जात होता. त्याला विक्रमाने एकीकडे गाठले. भर्तरीला आपल्या संगतीत ठेवण्यासाठी विक्रमाने एक युक्ती केली. "अरे मित्रा, माझे एक काम करशील का? ते पलीकडे व्यापारी तंबू ठोकून बसले आहेत, त्यात माझा एक भाऊ आहे. त्याचे नाव भर्तरी आहे, पण ते त्याला काही माहीत नाही. तू त्या व्यापाऱ्याकडे जा. त्यांना सांग, "आम्ही तुमच्या मालावर जकात घेणार नाही. पण तुमच्याबरोबर तो तरुण आहे त्याला आमच्याकडे काही दिवस ठेवा." जकातीचे पैसे मात्र किती होतात ते हिशेब करून मला सांग. मी ते भरीन!" तो जकात अधिकारी समजला. विक्रमाने त्यालाही द्रव्य देण्याचे कबूल केले. व्यापाऱ्यांने त्याने विक्रमाने पढविल्याप्रमाणे विचारले. व्यापाऱ्यांनी मान्यता दिली. भर्तरीने चौकीदारांजवळ काम करावे. भर्तरीची हरकत नव्हती. व्यापारी जकात न भरता निघून गेले.
विक्रमाला जकात अधिकाऱ्याने बोलावून घेतले. "ही पहा, जकातीची रकम एवढी झाली आहे." "ठिक आहे. मी पैसे देईन, सध्या त्या ऐवजी ही रत्ने गहाण ठेवा." विक्रमाने चार रत्नांपैकी एक त्याला दिले. ते पाहून तो खूप झाला. विक्रम भर्तरीला घेऊन आपल्या घरी आला. तो आईला म्हणाला, "आई, हा भर्तरी म्हणून एक मुलगा आहे. मी याला भाऊ मानलाय. आई, काय सांगू, याला कोणी नाही गं! एवढा गुणी आहे! पण त्याची आई व बाबा या जगात नाहीत. पण आई, सगळी गोष्ट मी मग सांगेन. आधी जेवायला वाढ आता हा आपल्याकडेच रहाणार आहे." आईनेही संमती दिली. कुंभार, सत्यवती, विक्रम व भर्तरी एकत्र राहू लागले.
अध्याय फलश्रुती :- गो-हत्तेचा दोष संपेल, व मुले शत्रूतुल्य होणार नाहीत.
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.