।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-२७
मुनिवेषधारी दत्तात्रेयाने तहानलेल्या भर्तरीसाठी अरण्यात सरोवर तयार केले
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
अवंती नगरात भर्तरी आणि विक्रम चौकीवर जकात वसुलीचे काम करीत असत. भर्तरी विक्रमाबरोबर त्याच्या घरीच जेवायला आणि रहायला असे. त्या काळी अवंती येथे शुभविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. राजा म्हणाला, "प्रधानजी, राजकन्या सुमेधा उपवर झाली आहे." सुमंत म्हणाला, "आपल्या परंपरेप्रमाणे हत्ती ज्याच्या गळ्यात माळा घालील त्याला आपण जावई करून घ्या." दुसऱ्या दिवशी शृंगारलेला गजराज मुख्य मार्गावरून वाजतगाजत निघाला. त्याच्या सोंडेत एक सुंदर पुण्यमाला होती. सुमेधावतीच्या मनात मोठीच खळबळ उडाली होती.
हत्ती अगदी वेशीपर्यंत गेला, आणि सोंड खाली करून त्याने विक्रमाच्या गळ्यात माळ घातली. सर्वत्र जयजयकार झाला. विक्रम तर भांबावून गेला. भर्तरीने त्याला प्रेमाने मिठी मारली. राजा व प्रधान आणि इतर मंत्री विक्रमाभोवती जमा झाले. राजाकडे पहाता पहाता विक्रमाने पटकन खाली वाकून राजाला नमस्कार केला. राजाने त्याचे नाव विचारले. तो म्हणाला. "विक्रम" मग मोठ्या समारंभाने विक्रमाला राजमंडपात नेण्यात आले. तिकडे भर्तरी धावतच घरी गेला व त्याने विक्रमाच्या आईला व वृद्ध झालेल्या कर्मठाला सर्व प्रकार सांगितला. आता आपल्याला राजवाड्यात जावे लागणार, असे ओळखून त्या बिचाऱ्या कुंभाराने जरा बऱ्यापैकी कपडे घातले. राजाने जेव्हा विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा कर्मठाने सांगितले, "महाराज, विक्रम माझा मुलगा नाही.
सत्यवती ही सत्यवर्मा महाराजांची कन्या - मथुरेची राजकन्या आहे. तीच त्याची आई!" "म्हणजे? विक्रम राजघराण्यातलाच आहे?" "होय. आणि सत्यवती यांचा विवाह होण्यास मीच निमित्त झालो. पण या सभेत हे सर्व सांगत न बसता-" असे म्हणून कुंभार क्षणभर थांबला. "आत चला, निवान्त बोलू" राजाने प्रधानास खुणावले. कर्मठाने त्या सज्जन कुंभाराने राजाला सर्व कथा स्पष्ट सांगितली. तेव्हा प्रजाजन आता काही संशय घेणार नाहीत, हे समजून राजाला हर्ष झाला. विक्रमालाच जावई करून घ्यायचे आता त्याने जाहीर करून टाकले. कर्मठासह शुभविक्रम व त्याचा सुमंत प्रधान मथुराधिपती सत्यवर्मा यांच्याकडे गेले.
सत्यवर्मा म्हणाला, "सत्यवती ही आपली मुलगी व विक्रम हाच आपला नातू आणि सुरोचन गंधर्व हाच त्याचा पिता हे सर्व त्याने शुभविक्रमाला सांगितले." त्यावेळी पूर्ण संशय फिटला. राजा अवंतीला परत निघाला. सत्यवर्माही अवंतीला आला. त्या दोघांनी सत्यवतीची भेट घेतली. तेव्हा सर्वांना आनंद झाला. मथुरानगरीचे राज्य सत्यवर्माने विक्रमाला दिले. विक्रमाचा राज्याभिषेक झाला आणि सुमेधावतीचा त्याच्याशी विवाह झाला. भर्तरीला विक्रम विसरला नाही. त्याने भर्तरीला युवराज पद दिले. मथुरा व अवंती या दोन्ही पुण्यनगरींवर विक्रम राज्य करू लागला. त्यानंतर काही दिवसांनी सुमंत प्रधानाला वाटले. विक्रमाचा भाऊ की मित्र भर्तरी मोठा गुणी तरुण आहे.
युवराजपदही त्याला मिळाले आहे. त्याला आपली स्वतः ची मुलगी पिंगला चावी आणि आपला जावई करून घ्यावा. हा बेत सर्वांना पसंत पडला. पण भर्तरीची जात कोणती हा प्रश्न उद्भवला. त्यावर भर्तरी म्हणाला, "मला जयसिंग व रेणुका या भाट दांपत्याने लहानाचे मोठे केले. पण माझा जन्म गुहेमध्ये भर्तरीपात्रात झाला आहे. मी कोणत्याही स्त्रीचा पुत्र नाही. माझा पिता मात्र सूर्य अर्थात् मित्र- वरुण हाच आहे. अगदी बालपणी मला हरिणीने वाढवले. मला पशुपक्ष्यांची भाषा येते. जयसिंह व रेणुका यांचा वाटेत चोरांनी घात केला.
त्यानंतर विक्रम मला घेऊन आला व मला भाऊ मानू लागला." आपली जन्मकथा खरी आहे हे सिद्ध करून दाखविण्यासाठी भर्तरी प्रासादाच्या अंगणात उभा राहिला. त्याने आवाहन केले, "हे मित्रा वरुणा, मी खरोखरच आपल्या पासून जन्मलेला असेन तर सुमंत प्रधानाला दर्शन देऊन खरे काय ते सांगा." तो हात जोडून डोळे मिटून ध्यान करीत उभाच राहिला. सूर्याला आपल्या पुत्राची हाक ऐकू आली. तो अंतराळापर्यंत खाली उतरला. त्याने सौम्य रुपाने प्रधानाला दर्शन दिले. तो दिसू लागताच सुखदायक वारे वाहू लागले. प्रधानाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
त्याला सूर्याचे प्रत्यक्ष मनुष्यरुपात दर्शन घडले होते. "सुमंता"" सूर्य बोलू लागला. “भर्तरीचा देह मीच माझ्या अंशापासून उत्पन्न केला आहे. याबाबत शंका घेऊ नकोस." प्रधान म्हणाला, "मी माझी कन्या पिंगला तुमच्या पुत्राला देत आहे. लग्नसोहळ्याला स्वतः आला तर लोकांच्या कुशंका उरणार नाहीत!" "छे सुमंता ! पृथ्वीवर माझी दाहकता कोणालाच सहन होणार नाही. सुरोचन गंधर्वाला लग्नासाठी पाठवीन आणि विवाह होतांना देवतांकडून पुष्पवृष्टी करवीन. त्यामुळे सर्वांची शंका फिटेल." असे प्रधानाचे समाधान करून सूर्य अंतर्धान पावला. पिंगलेचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला.
सुरोचन गंधर्व सीमांतपूजनापासून आला. मंगलाष्टके म्हणतांना आकाशातून पुष्पवृष्टी झाली. गंधर्व सत्यवतीला भेटला तेव्हा तिचा आनंद काय वर्णावा? भर्तरी व विक्रम हे दिव्य देहधारी महात्मे आहेत याचा प्रत्यय येऊन मथुरा व अवंती राज्यातील सर्व प्रजाजनांना आनंदाचे उधाण आले. पिंगला व भर्तरी परस्परांवर अनुरक्त होतीच. भर्तरीला पिंगलेशिवाय चैन पडत नसे. या मायामोहानेच त्याच्या मुख्य कार्याला मोठा व्यत्यय येत होता. सूर्यदेव याच गोष्टीचा विचार करू लागला.
भर्तरी एकदा अरण्यात शिकारीसाठी गेला असतांना त्याला पाहून सूर्य मनाशी म्हणू लागला, “माझा एक पुत्र अगस्ती आणि हा दुसरा भर्तरी, अगस्ती कुठे नि हा कुठे! त्याने साधना केली; पण हा भर्तरी मात्र विलासात गुंतला आहे. यासाठी काय उपाय करावा?" सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयांना आपली चिंता सांगितली. भगवान दत्तात्रेय म्हणाले, "मित्रा, योग्य वेळ येताच भर्तरीला त्याच्या कल्याणाचा व जगाचे कल्याण करण्याचा मार्ग दाखवीन. एकदा भर्तरी सैन्यासह अरण्यात गेला असता अकस्मात एक युक्ती करून भगवान दत्तात्रेयांनी भर्तरीला भेट दिली. त्याला योग्य तो बोध केल्यावर भर्तरीने बारा वर्षे संसार करायचा व मग संन्यास घ्यायचे कबूल केले. भर्तरीला आपण कोण आहोत याची त्यांनी जाणीव दिली.
अध्याय फलश्रुती :- हरवलेली वस्तू मिळेल, गेलेले अधिकार परत मिळतील.
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.