।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-३४
गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने विरभद्राला जिवंत केले
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
राक्षसांच्या संगतीमुळे वीरभद्राचे शरीर जळाले. शंकर शोक करू लागले. गोरक्षाला त्यामुळे दुःख वाटले. शंकरानेच आपली बद्रिकाश्रमात केवढी काळजी घेतली आणि आपण मात्र वीरभद्राला मारले. त्याने शंकराची क्षमा मागितली. "वीरभद्राच्या अस्थी सापडल्या तर त्याला जिवंत करीन." असे सांगितले. मग ते दोघे रणांगणात गेले. वीरभद्राच्या अस्थीतून सुध्दा शंकराच्या नावाचा जप चालला होता, त्यावरून अस्थी ओळखल्या. गोरक्षाने संजीवनी मंत्र म्हटला. वीरभद्र जिवंत झाला. लगेच संतापाने "माझे खड्ग कोठे आहे?" असे विचारू लागला. शंकराने त्याची समजूत काढली.
गोरक्षाचे व त्याचे सख्य करून दिले. मग गोरक्षाने मच्छिंद्राच्या देहातील अस्थी, चर्म इत्यादींचे कण घेऊन काशीक्षेत्रात शिवालयांमध्ये प्रवेश केला. त्रिविक्रम शिवालयात आला. त्याला गोरक्ष भेटला. तो गोरक्षाला म्हणाला, "अजून थोडे दिवस थांब धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो." त्रिविक्रम म्हणजे मच्छिंद्र आता पुन्हा मूळदेहामध्ये येण्यासाठी उत्सुक होता. त्याने योग्य वेळी प्रधानाजवळ गोष्ट काढली, धर्मनाथाला युवराजपदाचा अभिषेक झाला. रेवतीराणी फार आनंदात होती. काशीनगर उत्साहाने भरले होते. एक दिवस त्रिविक्रम राजाच्या मृत्यूची बातमी नगरभर पसरली. धर्मनाथ रडू लागला.
मच्छिंद्र सूक्ष्मरूपाने शिवालयात गेला. त्याचवेळी शंकराच्या पिंडीसमोर त्याचा देह ठेवून गोरक्ष संजीवनी मंत्र म्हणत होता. त्यामुळे ते सर्व तुकडे एक होऊन देह पहिल्यासारखा झाला. मच्छिंद्राने त्यात प्रवेश केला. गोरक्षाला आलिंगन दिले. पुजारिणीला दर्शन दिले. तिकडे रेवतीने धर्मनाथाला खरा सर्व प्रकार सांगितला. "जीवदृष्टीने मच्छिंद्रनाथ हाच तुझा पिता आहे. शिवालयात चल. तो तिथे आहे." असे सांगून तिने धर्मनाथाला मंदिरात नेले. त्याला मच्छिंद्राच्या व शंकराच्या पुढे दंडवत घालावयास सांगितले.
आता मच्छिंद्राला रेवतीने राजवाड्यात नेले. गोरक्ष व चौरंगीसह तो तेथे महिनाभर राहिला. मग ते तिघे यती तीर्थयात्रेला निघाले. धर्मनाथ रडू लागला. त्यांच्याबरोबर जायला निघाला. मच्छिंद्र त्याला म्हणाला, 'आम्ही बारा वर्षांनी परत येऊ, तेव्हा तुला गोरक्ष दिक्षा देईल. आता आईची सेवा कर आणि राज्याचा उपभोग घे" असे सांगून ते तीर्थयात्रेला निघाले. गोरक्ष जेव्हा गोदातीरी भामानगराकडे आला, तेव्हा वाटेत मच्छिंद्राला म्हणाला, "गुरूमहाराज, तो पाहा, त्या शेताच्या बांधावर एक अस्थिपंजर मनुष्य उभा आहे. तोच माणिक." त्याची गोष्ट आधीच त्याने गुरूला सांगितली होती. मग ते दोघे त्याच्याजवळ आले. चौरंगीनाथसुध्दा बरोबर होता, "माणिक, तुझं तप पूर्ण कर." मच्छिंद्र त्यास म्हणाला, "तुम्हांला काय करायचे आहे. तुम्ही चालू लागा. खोटी करू नका." माणिक असे म्हणाला. तेव्हा तिघे चूप झाले.
गोरक्षनाथ म्हणाला, मी त्याला युक्तीने ताळ्यावर आणतो." मग तो एकटाच त्याच्याजवळ गेला. "वाहवा ! धन्य हा तपस्वी जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर याचा शिष्य व्हावे" असे मोठ्याने म्हणू लागला. तेव्हा माणिक पटकन म्हणाला, "तूच माझा गुरू हो, दे मला उपदेश!" "जशी तुझी इच्छा!" असे म्हणून गोरक्षाने लगेच त्याला कानमंत्र दिला. त्याचे अज्ञानपटल दुर झाले. ती ब्रह्मज्ञ झाला. लगेच गोरक्षाने शक्तिमंत्र म्हणून त्याच्या शरीरात बळ उत्पन्न केले. माणिक गोरक्षाच्या व मच्छिंद्राच्या पाया पडला. "आडमुठ्या मुला, तुला माणिकनाव शोभत नाही. तुला दीक्षा देतो, तुझे नाव आता अडबंगनाथ असे ठेवू" मच्छिंद्र म्हणाला आणि त्याने यथाविधी दिक्षा दिली. झोळी, कुबडी इत्यादी दिली. अडबंगनाथ असे नाव ठेवले. चौरंगीनाथाच्या संगतीने तोही सर्व विद्यांत निपुण झाला.
यानंतर बारा वर्षे गेली. तीर्थयात्रा आटोपून चौघे काशीला आले. धर्मनाथ मोठा झाला होता. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव पण त्रिविक्रम ठेवले होते. धर्मनाथने चौघांना राजवाड्यात नेउन सन्मान केला, आणि म्हटले. "गोरक्षनाथ, मला दीक्षा देणार आहात ना? मी बारा वर्षे वाट पहात आहे." गोरक्षनाथ, म्हणाला, "तुझ्या मुलाला राज्याभिषेक कर " मग धर्मनाथाने त्रिविक्रमास राज्यावर बसविले. माघातील शुध्द द्वितीयेच्या दिवशी धर्मनाथास दीक्षा दिली. या तिथीला 'धर्मनाथबीज' असे नाव दिले. जो कोणी दरवर्षी या बीजेच्या दिवशी लोकांना भोजन देऊन हे व्रत आचरेल त्या गृहस्थाच्या घरी लक्ष्मी नांदेल असे गोरक्षनाथाने अभिवचन दिले. नंतर धर्मनाथाने राज्यत्याग केला आणि मग पाचही नाथ तीर्थयात्रा करीत हिंडत निघाले.
पूर्वी या ग्रंथात सांगितलेच होते की ब्रह्मदेवाच्या तेजापासून अट्ट्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झाले. त्या वेळी त्याचे तेज थोडेसे त्या नदीच्या काठी पडले होते. नवनारायणांपैकी 'चमस नारायण यांना अवतार घ्यायचा होता. त्यांनी त्या तेजात जीव घातला. तेव्हा या तीरावर एक बालक उत्पन्न झाला. त्याचे रडणे वाटेने सहनसारूक नावाचा एक कुणबी जात होता त्याने ऐकले. त्याने त्या बालकाला उचलून घेतले. घरी नेले, पत्नीला सर्व सांगितले, तिने त्या मुलाला स्नान घालून पाळण्यात निजविले. त्या जोडप्याला स्वतःचा एक मुलगा होताच रेवातीरी हा जो नवा मुलगा सापडला त्याचे नाव त्यांनी रेवण' असे ठेवले. मुलगा हळूहळू मोठा झाला. रेवण बारा वर्षांचा झाला तोपर्यंत त्याला शेतीची कामे येऊ लागली.
एकदा काय झाले, पहाटे रेवणाने बैल घेऊन रानात चरावयास नेले. तेवढ्यात गिरनार पर्वताकडे चाललेले अत्रिनंदन दत्तात्रेय त्याला अचानक भेटले. पायी खडावा, हातात कमंडलू, अक्षमाला, झोळी, शुभ्र कोपीन, अंगाला लपेटून एक वत्त्र, शिरी पिंगट जटा, दाढीमिशा ही पिंगट, सोन्यासारखी कांती. त्यावेळी असे झाले की, दत्तात्रेय वायुवेगाने जात होते. त्यांना त्या मोठ्या बैलाच्या आड असलेला बारा वर्षाचा मुलगा काही दिसला नाही. बैल अचानक बुजला व पुढे पळाला आणि रेवण नेमका दत्तात्रेयांच्या अंगावर आदळला. रेवण हा अडाणी शेतकरी मुलगा, पण दत्तस्पर्श होताच त्याच्या मनावरील मायेचे आवरण दूर झाले.
त्याला आपण चमस नारायण असून भूमीवर कशाला आलो याचे ज्ञान प्राप्त झाले. दत्ताने विचारले, "तू कोण आहेस?" तेव्हा त्याने नमस्कार करून म्हटले, "सत्व, रज, तम याची मूर्ती म्हणजेच तुम्ही. त्यातील सत्वगुणांचा जो अंश तोच मी या देहामध्ये वावरतो. आता मजवर कृपा करा" असे म्हणून त्याने दत्तचरणांना घट्ट मिठी मारली. दत्तांनी त्याला जवळ बसवून त्याच्या डोक्यावर हात ठेवला दत्तांनी त्याला फक्त एक सहस्रांशा दिली. त्यामुळे रेवणाला जी सिध्दी मिळाली तेवढ्यावरच त्याचे समाधान केले रेवण त्यांच्या पाया पडला. मग दत्तांनी त्याला आशीर्वाद देऊन तेथून प्रयाण केले.
अध्याय फलश्रुती :- सर्व कर्मसिद्धी होऊन,जीवन यशस्वी होईल .
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.