Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ३३ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 33

 ।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-३३ 

 गोरक्षनाथांनी माणिकाकडे अन्नदिक्षा व पाणी मागितले 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

               गोरक्ष तीर्थयात्रेला निघाला. गोदावरीच्या तीरातीराने तो जात असता पुढे एक मजेदार प्रसंग घडला. एका शेतात माणिक नावाचा एक शेतकरी मुलगा भेटला. गोरक्ष म्हणाला, "अरे बेटा, मी यात्री आहे तीर्थयात्रा करीत हिंडत आहे. मला तहान भूक लागली आहे. तू माझ्या पोटाची काही सोय कर." "हो हो, महाराज हे माझे जेवण आहे की! " असे म्हणून त्याने गोरक्षाला आपली भाकरी वाढली. त्याला पाणी प्यायला दिले. गोरक्षाचा अंतरात्मा तृप्त झाला, गोरक्ष म्हणाला, "अरे तू मला ऐन वेळी जेवायला दिलेस. मी प्रसन्न झालो आहे. तू मागशील ते मी देईन." "वा वा! तुम्ही गावोगाव भिक्षा मागता तुम्ही काय देणार मला?" तो मुलगा म्हणाला. 

                त्याचे बोलणे ऐकले व गोरक्षाला वाटले, "या अडाण्याला काय मागायचे तेही कळत नाही. आपणच त्याचे कल्याण केले तरच बरे आहे." तो त्या मुलाला म्हणाला, "एक मनाची गुपित गोष्ट सांगतो, ज्यावर तुझी इच्छा जाईल किंवा जे तुला करावेसे वाटेल तेच करू नको. एवढेच माझे मागणे आहे." माणिक म्हणाला, "एवढेच ना? तुमचे जसे सांगणे आहे तसे मी करीन. "गोरक्षनाथ मग तेथून पुढे निघून गेला आणि त्याला दिलेले वचन माणिकच्या डोक्यात जेव्हा खऱ्या अर्थाने शिरले, तेव्हा त्याचा पूर्ण गोंधळ उडाला. आता आपण घरी जावे असे त्याच्या मनात आले. तोच त्याला आठवले की मनाला करावेसे वाटले ते करावयाचे नाही.

               तेव्हा तो डोक्यावर जे सामान घेतले होते ते तसेच घेऊन शेताच्या बांधावर उभा राहिला. हळूहळू कोणताही विचार मनात येईनासा होऊन त्याची समाधी लागली. तो उभा तो उभाच होता. त्याचे शरीर कृश झाले, हरिचिंतनाशिवाय त्याला अन्य काहीच घडेना. गोरक्षनाथ तिथून निघाला. 'माणिक' शेतकऱ्याची काय अवस्था होईल याची त्याला पूर्ण कल्पना होती. तो पुन्हा चौरंगी जेथे होता त्या गुहेजवळ, बद्रिकाश्रमी गेला. गुहेवरील शिळा काढली. आत गेला. तेथे वारूळ दिसले ते त्याने फोडून पाहिले. 

                चौरंगीच्या देहात फक्त डोळे व कंठ यांत प्राण होते. हातपाय मात्र तपोबळाने नवीन आले होते. मंत्राचा जप तेवढा सुक्ष्मपणे चालला होता. गोरक्षनाथाने त्याला सावध केले. कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे चौरंगीच्या शरीरात पुन्हा बळ आले. गोरक्षाने त्याला बद्रिकाश्रमात शिवालयात आणले. शंकरांना जागृत केले. चौरंगीला त्यांचे दर्शन घडविले. तो सहा महिने तेथेच राहिला. चौरंगीला सर्व अस्त्रे, शस्त्रे आदी विद्या शिकविल्या. सर्व देवतांना बोलाविले, त्यांना तुष्ट केले. त्यांची वरदाने मिळविली.

                  मग चौरंगीला घेऊन गोरक्ष पुन्हा कौंडिण्यपुरास गेला. चौरंगीचे हातपाय ज्या शशांगर राजाने तोडले होते त्याच्यावर गोरक्ष रागावलेला होता. चौरंगीला त्याने त्या राजाचा सूड उगविण्यास सांगितले. चौरंगी म्हणाला. "ठीक आहे." मग चौरंगीने भस्म हाती घेतले. वातास्त्राचा जप केला. राजाच्या बागबगीचावर त्याची योजना केली. तेथे हजारो बागवान होते, ते वाऱ्याने वर उडाले. गरगर फिरू लागले. मग त्याने अस्त्र आवरून घेतले, तेव्हा से पटापट जमिनीवर पडले. कित्येक मेले, कित्येकांची हाडे मोडली, कित्येक झाडांत अडकले. कित्येक बेशुध्द पडले, तर कित्येक निसटले व राजाकडे गेले. त्यांनी राजाला सांगितले. "पाणवठपाजवळ दोन योगी बसले आहेत. त्यांच्या मुद्रा संतप्त आहेत." राजाला वाटले गोरक्ष व मच्छिंद्र आले असतील. त्यांचा मजवर राग असेल. लवकर त्यांचा सन्मान करावा. नाहीतर योगबळाने आपल्या राज्याचे वाटोळेच करतील.

              दुरून राजाची स्वारी येताना पाहिली. गोरक्षाने वातास्त्र मंत्रून भस्म फेकले. राजाच्या सैनिकासह घोडे, हत्ती, शिबिका आकाशात उडून गरगर फिरल्या. सगळे ओरडू लागले. चौरंगीला व गोरक्षाला गंमत वाटत होती. सर्व लोक हवालदिल झाले. "चौरंगी, त्यांना खाली उतरून घे." चौरंगीने पर्वतास्त्र सोडले. वातास्त्र अडले. पर्वतावर सैन्य अडकून पडले. मग चौरंगीने हात वर करून आज्ञा केली, "उतरा खाली. " लगेच सर्वजण जमिनीवर उतरले, राजा थरथर कापत समोर आला. चौरंगी पुढे झाला, म्हणाला "बाबा, मी तुमचा मुलगा कृष्णागर. मला ओळखले का ?" असे म्हणून पाया पडला. 

               राजा चकित झाला. आनंदाने त्याला त्याने मिठीच मारली. गोरक्षनाथाला पण त्याने ओळखले. कृष्णागराला नवे हातपाय फुटलेले पाहून राजा म्हणाला, "नाथा, तुम्ही याचा पुनर्जन्म केलात. आता राजवाड्यात चला." चौरंगी म्हणाला, " माझी सावत्र आई जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत मी राजवाड्यात येणार नाही. तिनेच दुष्टपणा करून मला शिक्षा करविली." असे म्हणून त्या दोघांनी राजाला तिचा सगळा दुष्टावा सांगितला. सारा काळाकुट्ट कपटीपणा आपल्या दुसऱ्या पत्नीचा होता, हे कळताच राजाला संताप आला. राजाने भुजावतीला राज्य सोडून निघून जाण्यास सांगितले. दोघांनी राजाचा राग शांत केला.

            चौरंगीसह गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत काशीला आले. पुजारिणीकडून मागील हकिकत कळताच घाईघाईने ते भुयारात उतरले. पुढे जाऊन पहाताच तो काय! भुयार रिकामे. गोरक्षाला सर्व भयानक घटना सांगितली. मच्छिंद्रांचे शरीर काही झाले तरी नष्ट होणारे नव्हे ते सूक्ष्म रूपात कोठेतरी असेल त्याचाच शोध करावा असे गोरक्षाला वाटले. त्यासाठी स्थूल देह सोडून सूक्ष्म देहाने शोध घ्यावा लागेल. तरी माझा स्थूल देह तू सांभाळ असे गोरक्षनाथ चौरंगीला म्हणाले. "बरे मी सांभाळतो" चौरंगी म्हणाला. पुजारिणीच्या देखतच गोरक्ष भुयारात निजला. योगबलाने सुक्ष्म देहाच्या साह्याने त्याने सप्तलोक शोधण्यास आरंभ केला. सप्तद्वीपे सप्तसागर शोधले. सप्त पाताळे शोधली. सर्व पर्वत शोधले. शेवटी तो कैलासावर गेला. 

               तेथे त्याला वीरभद्र व इतर गण यांच्या पहाऱ्यात मच्छिंद्राचा देह, अस्थी, मांस, केश, त्वचा इत्यादी कणकण एकत्र करून ठेवलेले असा दिसला. "गोरक्ष कोणत्याही रूपाने येईल. सावध राहा." असे त्यावेळी वीरभद्र गणांना सांगत होता. गोरक्ष लगेच तिथून निघाला. परत आपल्या शरीरात शिरला आणि उठून बसला. "चौरंगी चल, काम झाले. ऊठ आता येथे राहण्याचे कारण नाही." तो चौरंगीला म्हणाला. ते दोघे शिवालयातून बाहेर पडले. त्यांनी कैलासावर जाऊन मच्छिंद्राचे शरीर मिळविण्याचा प्रयत्न केला पण तो फुकट गेला. अष्ट भैरव, चामुंडा, वीरभद्र यांचे गोरक्ष आणि चौरंगी यांच्याशी युध्द झाले. अखेर विष्णूने मच्छिंद्राचा देह भुमीवर आणला व गोरक्षाला दिला.

अध्याय फलश्रुती:-  धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. 

   अध्याय समाप्त 

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या