।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-३८
नारदांनी चर्पटाला सत्यश्रावाच्या स्वाधीन केले
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
सामान्य माणसासारखे नवनाथांचे जन्म झाले नाहीत, पिप्पलायन ऋषीचा जन्म ही असाच निसर्गात होऊन ते गवताच्या बेटात राहिले. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्याकरीता तेथे आला. दर्भ काढतांना त्याला तो बालक दिसला. बालकाचे काय करावे या विचारात तो असतांनाच देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी सुरू केली. तेव्हा ही भुताटकी आहे असा धसका घेऊन तो ब्राह्मण पळू लागला. देवांच्या सांगण्यावरून नारदाने ब्राह्मणाचे रूप घेतले व पळणाऱ्या सत्यश्रवा ब्राह्मणाला गाठले. त्याचा सर्व संशय दूर केला व स्वतःते बालक उचलून सत्यश्रवाच्या हाती दिला व त्याला "या मुलाचे नाव 'चर्पटी' ठेव!" असे सांगितले.
त्या मुलाचे ब्राह्मणाने चांगले संगोपन केले. सातव्या वर्षी त्याची मुंज केली. तो बारा वर्षांचा झाला. नारदाला त्याचे स्मरण झाले. तो गुप्तपणे ब्राह्मणाच्या घराजवळ उभा राहून पाहू लागला. बारा वर्षांचा तो तेजस्वी चर्पटी पाहून बंधुत्वाच्या नात्याने नारदाच्या मनात प्रेमाची ऊर्मी उत्पन्न झाली. कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसाच चपटी, मग नारद बद्रिकाश्रमात गेला. तेथे मच्छिंद्र दत्तात्रेय व शंकर यांच्या समवेत नारदमुनी प्रेमाने बोलत बसले. ते असे बसले असता, नारदाने चर्पटीची सगळी कथा सांगितली. तेव्हा शंकर दत्तात्रेयांना म्हणाले, "अनिसुता, नवनारायणांना तू पूर्ण सिध्द करण्याचे मनावर घेतलेले आहेत ना? मच्छिंद्रानंतर गोरक्ष, जालंदर, भर्तरी, कानिफ चौरंगी, अडबंग, रेवण, नागनाथ, एवढेच काय, त्यांचे काही शिष्यही तू धन्य केले आहेस. आता चर्पटीला सर्व विद्या शिकविणार ना?" दत्तात्रेय म्हणाले, "महादेवा, अनुताप झाल्याशिवाय योगविद्या व निवृत्ती यांचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही, म्हणून त्याला दीक्षा द्यायला अजून वेळ आहे. "
नारदाने चर्पटीच्या वयाच्याच एका विप्र मुलासारखे रूप घेऊन सत्यश्रव्याचे दार ठोठावले. दार उघडून सत्यश्रवा पाहतो तो त्याला एक बारा तेरा वर्षाचा मुलगा बाहेर उभा दिसला. तो म्हणाला, "मी कुलंब नावाचा गरीब ब्राह्मण मुलगा आहे. मला विद्यार्थी म्हणून आपण शिकवाल का?" “तू शिकणार ?” “हो, मी घरातली कामे करीन आणि शिकेन." "बरे तर, आमच्या चर्पटीबरोबर शिकायला बसत जा!" मग रोज कुलंब, नारद व चर्पटी एकत्र अभ्यास करू लागले. काहीतरी करून चर्पटी व सत्यश्रवा यांचे भांडण झाले पाहिजे. काही दिवसांनी त्या गावातल्या एका यजमानाने ओटीभरण्याच्या कार्यासाठी सत्यश्रवाला बोलावले. तेव्हा तो पूजा करीत होता, म्हणून त्याने चर्पटीला व कुलंबला पाठविले. चर्पटीने सर्व धर्मकार्य पूर्ण केले. मग यजमान आला व त्याने दक्षिणा म्हणून अगदी थोडे पैसे दिले. ते पाहताच चर्पटी संतापला.
तो म्हणाला, "हे काय?" "अहो भटजी ही दक्षिणा गोड मानून घ्यावी!" "एवढीशी दक्षिणा कार्य केवरे आणि दक्षिणा किती? काही विचार तरी करावा!" अशा तऱ्हेने शब्दाने शब्द वाढत गेला. तेवढ्यात कुलंब तिथून एकटाच निघाला व घरी येऊन एकदम म्हणाला, "घोटाळा झाला. घोटाळा झाला." त्याचे बोलणे ऐकताच सत्यश्रवा विचारू लागला, "अरे, काय झाले? चर्पटीने भांडण केले की काय?" "दक्षिणा कमी दिली म्हणून भांडतोय पाहा चर्पटी.” सत्यश्रवा लगेच संतापला. “चल चल, मी येतो; पूंजा झाली माझी. पाहू या आपण." असे म्हणून सत्यश्रवा त्या यजमानाकडे गेला. तिथे भांडण अगदी रंगात आले होते. सत्यश्रवा पटकन पुढे झाला. त्याने चर्पटीला खसकन मागे ओढले आणि त्याच्या कानफटात एक जोराने लगावली.
त्यासरशी चर्पटी चरफडत, तिरीमिरीने तिथून निघून गेला. देवीचे एक देऊळ होते तिथे तो जाऊन बसला. एकटा, मुसमुसत, हुंदके देत. कुलंब सत्यश्रवाचा डोळा चुकवून आणि वेष पालटून दुसऱ्या मार्गाने दूर गेला. सत्यश्रवा घरी गेला. नारदाने देवीच्या देवळात जाऊन त्याची विचारपूस केली. नारदाने ती संधी साधून सत्यश्रवाच्या कठोरपणाची निंदा केली. चर्पटीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, "अरे, त्या ब्राह्मणाचा स्वभाव काही ठिक नाही: गुरू भेटायचा असला तर कुठेही भेटेल." मग चर्पटी व कुलंब यांनी भगवतीदेवीला साष्टांग दंडवत घातले आणि हातात हात घालून ते गाव सोडून निघाले.
क्षेत्रामागून क्षेत्र पहाता पहाता चर्पटी व कुलंब केदारेश्वराच्या मंदिरात ध्यान करीत बसले. ध्यान करता करता कुलंबाने हळूच त्याला हलविले. "चर्पटी, समोर पहा." चर्पटीने नेत्र उघडले. एक तेजस्वी ऋषी पुढे उभे होते. दोघा मुलांकडे कौतुकाने पाहात होते. चर्पटीने सहजच हात जोडले. नारदाने कुलंबाचे रूप टाकले. "नारद! अरे, कुलंब कुठे आहे?" चर्पटीने चकित होऊन विचारले. "बाळ, मीच तो कुलंब आणि हे मच्छिंद्रनाथ." नारद म्हणाला. तोच तेथे दत्तगुरू प्रगट झाले. चर्पटीने दत्तांना व मच्छिंद्रांना नमस्कार घातला.
दत्तांना नारद म्हणाला, "मी चर्पटीला आपल्या पायांपाशी आणला आहे. अनुतापाने पोळलेला. याला आता सांभाळा. नवनाथांची संख्या चर्पटीनेच पूर्ण होत आहे." चर्पटी म्हणाला, “महाराज, मला ब्रह्मज्ञानी करा." नारद, अवधूत व मच्छिंद्र एकमेकांकडे पाहू लागले. दत्तात्रेयांनी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. चर्पटीला तत्काळ ब्रह्मसाक्षात्कार झाला. अवधूत, नारद व मच्छिंद्र त्याला तेजोराशीसारखे दिसू लागले, आणि त्यांच्यामागे कैलासनाथही प्रकट झाले. चर्पटी धन्य झाला. नंतर शंकरांनी त्याला प्रेमाने जवळ घेऊन दत्तांना सांगितले. 'याला सर्व विद्या द्या.' मग दत्तांनी चर्पटीला चौदा विद्या, चौसष्ट कला, वेद, शास्त्रे, पुराणे, योग, कर्म आदि सर्व विद्या व सिध्दी शिकविल्या, नंतर चर्पटीनाथ शंकराच्या व दत्तांच्या आज्ञेने तीर्थाटन करू लागला त्याने आपला शिष्यसंप्रदाय वाढविला.
अध्याय फलश्रुती:- हिवताप, नवज्वर व इतर तापे नाहीसे होतील .
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.