Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा-११ ) / Shri Devi Mahatmya Katha 11

श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय अकरावा 

 नारायणी स्तुती व देवीचे वरदान 


          जिच्या शरीराची कांती प्रभातकालच्या सूर्याप्रमाणे आहे, जिच्या मस्तकावर चंद्राचा मुकुट आहे, उंच स्तन व तीन नेत्र असलेल्या जिच्या मुखावर मंद स्मितहास्य आहे, जिच्या हातावर वरद अंकुश, पाश व अभयमुद्रा शोभून दिसते आहे त्या भुवनेश्वरी देवीचे मी ध्यान करतो. 

|| श्री गणेशाय नमः || श्री महासरस्वतै नमः || श्री देव्यै नमः || 

          संसार दुःख नाहीसे करणाऱ्या हे देवी तुझा जयजयकार असो. हे देवी, तू आपल्या भक्तांचे पालन करणारी व दुष्ट शक्तींचा विनाश करणारी आहेस. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व नाश हि तिन्ही कार्य तूच करतेस, हे अंबिके तुझा जयजयकार असो. मी तुला नमस्कार करतो. हे देवीमाते, तू अनंत अवतार धारण करून दुष्ट दुर्जनांचा नाश करतेस व आपल्या संत सज्जन भक्तांचे रक्षण करून, त्यांना आनंदित करतेस. 

          श्रोतेहो! आता सावध चित्ताने श्रवण करा. मागील अध्यायांचे सिंहावलोकन करा. देवीने शुंभ दैत्याला ठार मारल्याने सर्व देवांना आनंद झाला, ही कथा तुम्हाला सांगितली. मेधा ऋषींनी सुरथ राजाला जे सांगितले, तेच मी तुम्हाला सांगतो. ऋषी म्हणाले, “हे राजा, देवीने शुंभनिशुंभादी दैत्यांचा संहार केला असता इंद्रादी देव, अष्टदिक्पाल देवीचे स्तवन करू लागले. इष्ट लाभणे प्रसन्नमुख झालेल्या सर्व देवदेवता कात्यायनी देवीचे स्तवन करू लागल्या. 

          देवदेवता म्हणाला, “हे देवी, जे तुला शरण येतात त्यांच्या सर्व दुःखांचा तु नाश करतेस. तू आमच्यावर प्रसन्न हो, आम्ही तुला शरण आलो आहोत. तू सकल विश्वााची माता आहेस, चराचर जगावर केवळ तुझीच सत्ता चालते, तू आमच्यावर प्रसन्न हो, आमचे रक्षण कर. तूच या जगाची आधार आहेस, तु वैष्णवी शक्ती असून तुझ्या पराक्रमाला अंतच नाही. हे माते, तुच जलरूपाने सर्व जगाला तृप्त करतेस. बलसंपन्न वैष्णवी शक्ती असलेली तू या विश्वाची कारणीभूत महामाया आहेस. 

          हे देवी, तू या संपूर्ण जगाला मोहित केले आहेस. तु आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन, या पृथ्वीवरच मोक्ष मुक्ती मिळवून देतेस. हे देवी, सर्व विद्या तुझीच वेगवेगळी रूपे आहेत. जगातील सर्व स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत. तू एकटीनेच या विश्वाला व्यापले आहे. तुझी स्तुती काय आणि कशी करणार? तू स्तवन करण्यास योग्य असलेल्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ परावाणी आहेस. सर्व भूतांच्या ठायी असलेल्या भुक्ती आणि मुक्ती देणाऱ्या तुझ्या स्तवनासाठी आमची वाणी सदैव तत्पर असो. बुद्धी रूपाने सर्वांच्या हृदयात असलेल्या स्वर्ग, मोक्ष देणाऱ्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. 

          नारायणाची पत्नी म्हणून नारायणी असे तुझे नाव वेदरुपी नारायणानेच ठेवले आहे. कला काष्टादी रूपाने तू विश्वाचा परिणाम म्हणजे परिवर्तन करतेस. या विश्वाचा संहार करण्यास समर्थ असलेल्या हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. हे नारायणी तू सर्व मंगलांचे मंगल आहेस. तूच कल्याणकारी शिवा आहेस. सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारी, शरणागत वत्सल त्रिनेत्रधारी, हे गौरी तुला आमचा नमस्कार असो. हे देवी, तूच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व विनाश करणारी अनादिशक्ती आहेस. सर्व गुणांचा आधार असलेल्या सर्व गुणमयी नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. तुला शरण आलेल्या दिन दुर्बलांचे रक्षण करणारी, सर्वांच्या सर्व पीडा दूर करणारी, हे नारायणी तुला मी नमस्कार करतो. 

          हे नारायणी, तु ब्राह्मणी शक्तीचे रूप धारण करतेस व हंस विमानावर आरूढ होऊन, कुशमिश्रित जल शिंपडून दुष्ट शक्तींचा नाश करतेस. हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. माहेश्वरी रूपाने प्रकट होऊन त्रिशूल, चंद्र व सर्प धारण करणाऱ्या व नंदीवर आरूढ होणाऱ्या, हे नारायणी देवी तुला आमचा नमस्कार असो. हे नारायणी, तु कौमारी रूप धारण करतेस, मोर व कोंबड्यांचे पालन करतेस. हातात शक्ती धारण करतेस, तुला आमचा नमस्कार असो. शंख, चक्र, गदा व धनुष्य ही उत्तम शस्त्र धारण करणाऱ्या वैष्णवी शक्तिरूप असलेल्या हे नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो, तुला आमचा नमस्कार असो. 

          हातात महाभयानक महाचक्र घेतलेल्या, आपल्या दाढेवर पृथ्वीला धारण करणाऱ्या, वाराही शक्तीरूप धारण करणाऱ्या, कल्याणकारी नारायणी तुला आम्ही वंदन करतो. भयंकर अशा नृसिंहरूपाने दैत्यांचा वध करणाऱ्या व त्रिभुवनाचे रक्षण करणाऱ्या, हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. मस्तकावर किरीट व हातात महावज्र धारण करणाऱ्या, वृत्रासुराचे प्राण घेणार्याअ, सहस्रनेत्र इंद्रशक्तीचे रूप धारण करणाऱ्या, हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. शिवदूती रूपाने दैत्यांच्या विशाल सेनेचा संहार करणार्यात, भयंकर रूप धारण करून प्रचंड गर्जना करणाऱ्या, हे नारायणी तुला मी नमस्कार करतो. 

          विक्राल मूख असलेल्या, गळ्यात नरमुंडमाला धारण करणाऱ्या, मुंड दैत्याचा वध करणाऱ्या, चामुंडा रूप असलेल्या, हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, रचधा, ध्रुवा, महारात्री व महाअविद्यारूप असलेल्या नारायणी तुला आमचा नमस्कार असो. मेधा, सरस्वती, वरा(श्रेष्ठ), भूती(ऐश्वर्य), बाभ्रवी(दुर्गा), तापसी(महाकाली), नियता(संयमी) व इशा स्वरूपी नारायणी तुला नमस्कार असो. सर्वस्वरूपी, सर्वेश्वरी त्याचप्रमाणे सर्व शक्तीसंपन्न दिव्यरूपा दुर्गामाते, सर्व भयापासून आमचे रक्षण कर, तुला आमचा नमस्कार असो. 

          हे कात्यायनी, तीन नेत्रांनी विभूषित असे तुझे सौम्यमुख, सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर, तुला आमचा नमस्कार असो. हे भद्रकाली, तुला आमचा नमस्कार असो. भद्र म्हणजे कल्याण, भक्तांचे कल्याण कालाही पासून होते, म्हणून तुला भद्रकाली असे म्हणतात. हे देवी, जी आपल्या ध्वनीने सर्व जगाला व्यापून टाकते व दैत्यांचे तेज नष्ट करते, ती तुझी घंटा, आई जशी पुत्राचे वाईट कर्मापासून रक्षण करते त्याचप्रमाणे आमचे पापापासून रक्षण करो. हे चण्डिके, दैत्यांच्या रक्ताने व मांसाने माखलेले तुझ्या हातातील खड्ग आमचे कल्याण करो, आम्ही तुला नमस्कार करतो. 

          हे देवी, तु प्रसन्न झाली असता सर्व रोगांचा नाश करतेस, व तु कोपली असता सर्व मनोकामनांचा नाश करतेस. जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर कोणतेही संकट येत नाही. तुला शरण गेलेल्या लोकांना इतर लोक शरण जातात. हे देवी, हे अंबिके, तू आपले स्वरूप अनेक भागात विभागून नानारूपांनी धर्मद्रोही महादैत्यांचा संहार केलास, ते कार्य दुसरे कोण बरे करू शकेल? कोणीही नाही. सर्व विद्यांमध्ये, ज्ञान प्रकाशित करणाऱ्या शास्त्रांमध्ये व वेदांमध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे वर्णन आले आहे? 

          ममत्व, अज्ञानरुपी महाअंध:काराने भरलेल्या विहिरीत सगळे विश्व भटकत असते. त्या विहिरीत महाविषारी सर्प आहेत, शत्रू, चोर, लुटारू आहेत, तेथे आणि संसार सागरात भटकनाऱ्याचे तूच रक्षण करतेस. हे विश्वेश्वरी, तू अवघ्या विश्वाचे पालन करतेस. तू विश्वरूप आहेस म्हणून संपूर्ण विश्वाला तु धारण करतेस. तू भगवान शंकराला ही वंदनीय आहेस. जे लोक भक्तीभावाने तुझ्यापुढे नतमस्तक होतात, ते संपूर्ण विश्वाला आश्रय देणारे होतात. हे देवी, प्रसन्न हो. तू सर्व दैत्यांचा वध करून आमचे रक्षण केलेस, त्याचप्रमाणे तू सदैव आमचे शत्रूभयापासून रक्षण करावे. 

          तू सर्व जगातील पाप नाहीसे कर व पापांचे फळ म्हणून प्राप्त होणारे महामारी सारखे रोग, भूकंप, उत्पात यांसारख्या मोठ्या पीडा दूर कर. विश्वाचे पीडा नाहीशी करणाऱ्या हे देवी, आम्ही तुला शरण आलो आहोत. आमच्यावर प्रसन्न हो. त्रैलोक्याला पूजनीय असलेल्या हे परमेश्वरी, तू सर्वांना वरदान दे. 

          सर्व देवदेवतांनी अशी प्रार्थना केली असता, प्रसन्न झालेली देवी म्हणाली, “हे देवतांना, मी वर देण्यास तयार आहे. तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा. जगाला उपकारक ठरणारा वर मी नक्की देईन.” देवीने असे आश्वासन दिले असता देवता म्हणाल्या, “हे सर्वेश्वरी, तू तिन्ही लोकातील सर्व पीडा नाहीशा कर व आमच्या शत्रुंचा नाश कर.” देवी म्हणाली, “हे देवतांनो, वैवस्वत मन्वंतराच्या अठ्ठावीसाव्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन महादैत्य पुन्हा उत्पन्न होतील. त्यावेळी मी नंद गोपाच्या घरी, त्याची पत्नी यशोदा हिच्या पोटी अवतीर्ण होऊन विंध्य पर्वतात जाऊन राहिल व त्या दोन दैत्यांचा नाश करीन. मी जेव्हा यशोदेच्या पोटी जन्म घेईल, तेव्हा वासुदेव कृष्णाला घेऊन येईल. त्याला यशोदेच्या जवळ ठेवून, मला मथुरेला देवकीकडे घेऊन जाईल. कंसाला हे समजताच, तो मला दगडावर आपटेल. त्याक्षणी मी आकाशात जाईन. कंस भयभीत होईल त्यावेळी देव, गंधर्व माझे स्तवन करतील.

         ‘ हे जगदंबे, निशुंभ शुंभ पुन्हा उत्पन्न होतील. त्यांचा तू वध करावास.’ देवांनी अशी प्रार्थना केली असता, मी विंध्य पर्वतावर येऊन शुंभनिशुंभ यांना ठार मारीन. त्यावेळी *नंदा* नावाने प्रसिद्ध होईल. नंतर अत्यंत भयंकर रूप धारण करून, मी पृथ्वीवर अवतार घेईल व वैप्रचित्त नावाच्या दैत्याचा नाश करीन. त्या भयंकर त्यांचे भक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलासारखे लाल होतील, त्यावेळी स्वर्गातील देवता व पृथ्वीवरील मानव माझी स्तुती करताना मला रक्तदन्तिका असे म्हणतील. 

          नंतर जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे अवर्षण निर्माण होईल, लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही, त्यावेळी ऋषिमुनींनी माझ्या स्तवन केले असता मी अयोनिज रुपात प्रकट होईल व शंभर नेत्रांनी ऋषींना पाहीन. त्यावेळी लोक माझे शताक्षी नावाने स्तवन करतील. देव-देवतांनो त्यावेळी मी माझ्या शरीरापासून निर्माण झालेल्या शाकान्नाने सर्व जगाचे भरण-पोषण करीन. जो पर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत त्या शाकान्नाने मी प्राण्यांचे रक्षण करीन. त्यामुळे मी पृथ्वीवर शाकंभरी नावाने प्रसिद्ध होईल.     

          त्याच अवतारात मी दुर्गम नावाच्या दैत्याचा वध करी,न त्यावेळी मी दुर्गादेवी नावाने प्रसिद्ध होईल. नंतर जेव्हा मी भीमरूप धारण करून ऋषीमुनींच्या रक्षणासाठी हिमालयातील दैत्यांचे भक्षण करील, तेव्हा मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल. अरुण नावाचा दैत्य त्रैलोक्याला पीडा देईल, तेव्हा त्रैलोक्याची पीडा नाहीशी करण्यासाठी मी सहा पाय असलेल्या असंख्य भ्रमरांचे रूप धारण करून, त्या महादैत्याचा वध करील. त्या वेळी सगळे लोक माझी भ्रामरी नावाने स्तुती करतील. 

          देवतांनो अशाप्रकारे त्रैलोक्याच्या कल्याणासाठी मी वेळोवेळी अवतार घेईन. मी तुम्हाला माझी आठ अवतार सांगितले. हे देवतांनो, जेव्हा जेव्हा तुमच्यावर दैत्यांचे संकट येईल, धर्माचा लोप  होऊ लागेल, संत सज्जनांचा छळ सुरु होईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा नाश करीन. मी प्रत्येक वेळी कार्यानुसार अवतार घेत असते. 

          सज्जन श्रोतेहो! देवीने आपले अवतार कथन केले असता सर्व देवांना अतिशय आनंद झाला. आता देवी स्वतः देवांना आपले महात्म्य सांगेल. या अध्यायाचे श्रवण, पठन केले असता सर्व संकटांचा नाश होतो. जेथे देवी महात्म्याचे पठण चालू असते, तेथे देवी श्रवण करण्यासाठी येते. वेदव्यासांनी असे वर्णिले व देवीने जसे सांगितले तसेच येथे सांगितले आहे. 

          श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील नारायणी स्तुती व देवीचे वरदान  नावाचा अकरावा अध्याय समाप्त!

दहावा अध्याय⬅️

➡️ बारावा अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या