श्री देवी महात्म्य मराठी
Shri Devi Mahatmya Marathi
अध्याय बारावा
देवी चरित्राच्या पठणाचे माहात्म्य
जिची अंगकांती विद्युल्लतेप्रमाण आहे, सिंहावर आरूढ झालेली जी भीतीदायक वाटते, हातात ढाल-तलवार घेतलेल्या अनेक कन्या जिची सेवा करताहेत, जिने आपल्या हातात चक्र, गदा, तलवार, ढाल, बाण,धनुष्य व पाश हि आयुधे धारण केले आहेत, जिने तर्जनी मुद्रा धारण केली आहे, जिचे स्वरूप अग्नीसारखे आहे, जिने आपल्या मस्तकावर चंद्राचा मुकुट घातला आहे, त्या तीन नेत्र असलेल्या दुर्गादेवीचे मी ध्यान करतो.
|| श्रीगणेशाय नमः || श्री देव्यै नमः ||
शंकर प्रिये हे अंबिके तुझा जयजयकार असो. हे महामाये, तू विश्वाची मूळ प्रकृती आहेस. तुझ्या नामस्मरणाने सगळी संकटे जळून भस्म होतात, अशा तुझ्या पवित्र नामाचे आम्ही सदैव स्मरण करत असतो. हे माते, आता या संसार दुःखातून तू आम्हाला मोक्षपदाला ने. ह्या चरित्राच्या श्रवण पठणाने अवघे त्रैलोक्य पवित्र होते. देवी म्हणाली, “हे देवतांना, जो मनुष्य दररोज एकाग्रचित्ताने व भावपूर्ण श्रद्धेने माझ्या महात्म्याचे पठण श्रवण करील, त्याची सर्व संकटे मी दूर करील. जो कोणी मधु-कैटभाचा नाश, महिषासुराचा वध त्याचप्रमाणे शुंभनिशुंभ यांच्या संहाराच्या कथा यांचे पठण श्रवण करील, त्याचप्रमाणे कोणतीही अष्टमी, चतुर्दशी व नवमी या दिवशी जो एकाग्रचित्ताने व भक्तिभावाने माझे हे महात्म्य पठण श्रवण करील, त्याला कोणतेही पाप स्पर्शही करणार नाही. त्यांच्यावर पापजनित संकटे येणार नाही. त्याच्या घरी कधीहि दारिद्र राहणार नाही. त्याला ऐश्वर्य प्राप्त होईल. त्याला प्रिय व्यक्तींच्या वियोगाचे दुःख भोगावे लागणार नाही. इतकेच काय पण त्याला शत्रू, लुटारू, राजा (राज्यकर्ते), शस्त्र, अग्नी त्याचप्रमाणे पाणी यांच्यापासून भीती राहणार नाही. यासाठी सर्वांनी एकाग्रचित्ताने व भक्तिभावाने माझ्या या महात्म्याचे सदैव पठण श्रवण करावे.
हे महात्म्य परम कल्याणकारक आहे. माझे हे महात्म्य महामारीजनीत सर्व त्रास त्याचप्रमाणे अध्यात्मिक (मानसिक), आधिभौतिक (प्राण्यांपासून होणारे), आधिदैविक (देवकृत) इत्यादी त्रिविध ताप नाहीसे करणारे आहेत. जेथे दररोज माझ्या या महात्म्याचे विधिपूर्वक पठण चालू असते, ते स्थान मी कधीही सोडत नाही. तेथे माझे कायमचे वास्तव्य असते. बलिदान, पूजा, होम त्याप्रमाणे नवरात्र महोत्सव याप्रसंगी माझ्या या महात्म्याचे पूर्ण पठण श्रवण करावे. असे केल्याने मनुष्य विधी, जाणता किंवा अजाणता माझ्यासाठी पूजा, होम इत्यादी जे काही करील, त्याचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करीन.
शरद ऋतूत जी वार्षिक पूजा(नवरात्र पूजा) केली जाते, त्यावेळी माझ्या या महात्म्याचे मोठ्या भक्तिभावाने पठण श्रवण करणारा मनुष्य माझ्या कृपेने सर्व संकटातून मुक्त होतो. तो धनधान्य, संपत्ती, संतती यांनी संपन्न होतो यात जराही शंका नाही. माझे हे महात्म्य, माझ्या अवतार कथा व युद्धात मी केलेले पराक्रम ऐकणारा मनुष्य पूर्ण निर्भय होतो. माझे हे महात्म्य श्रवण करणार्यानचे शत्रू नष्ट होतात. त्याचे सर्वत्र कल्याण होते. त्याच्या घरात आनंद समाधान नांदतो. काही वाईट स्वप्ने दिसली किंवा पीडा निर्माण झाली तर माझे महात्म्य श्रवण करावे. त्यामुळे सर्व संकटे नाहीशी होतात. अशुभ स्वप्ने शुभ स्वप्ने होतात. लहान मुलांना बालग्रह पीडा झाली तर या महात्म्य पठणाने त्याची शांती होते.
अश्विन शुक्ल प्रतिपदेला यथाविधी कलश स्थापन करावा. शक्य असेल तर उपास करावा किंवा एकभुक्त रहावे. नवमीला विसर्जन करून पारणे करावे. नऊ दिवस देवीची भक्तिभावाने पूजा करावी. तिला सर्व राजोपचार अर्पण करावे. अशौच, आजारपण व मासिक अडचण असल्यास मानसिक पूजा करावी. चांगल्या माणसाकडून जप, पाठ, पूजा इत्यादी करून घ्यावे.सर्व अडचणी नाहीशा झाल्यावर ब्राह्मणभोजन व कुमारिका पूजन करावे. दोन ते दहा वर्षे वयाच्या मुलींना कुमारिका असे म्हणतात. नऊ कुमारिकांचे पूजन करावे. या नवरात्र काळात देवीच्या नाममंत्राचा जप करावा. दररोज देवीची पूजा करावी व देवी महात्म्याचे पठण करावे. देवी महात्म्यचा ग्रंथ हातात घेऊन वाचू नये. ग्रंथाखाली काहीतरी आधार असावा.
लंकाधिपती रावण अत्यंत उन्मत झाला होता. त्याने इंद्रादी सर्व देव-देवतांना बंदिवासात टाकले. सर्व देवदेवता रावणाच्या घरी सेवाचाकरी करू लागल्या. रावण गो-ब्राह्मणांचा, ऋषीमुनींचा भयंकर छळ करीत होता. त्यांच्या नाशासाठी भगवान विष्णूंनी राम अवतार धारण केला. रावणाला अमरत्वाचा वर असल्याने तो अवध्य होता. म्हणून ब्रह्मदेवांनी महामायेला जागृत केले. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी जागृत झाली. श्रीरामाला विजय प्राप्त होईल असा देवीने वर दिला. सर्व देवांनी, ऋषींनी रावणाचा वध होईपर्यंत जगदंबेची आराधना करण्याचा निश्चय केला.
सर्वांनी कलश स्थापना करून नऊ दिवस देवीची पूजा अर्चा केली. चंडीपाठ सुरू केला. श्री राम आणि रावण यांचे प्रचंड युद्ध सुरू झाले. अष्टमीच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला. त्यावेळी सर्व योगिनीसह जगदंबा प्रकट झाली. बंधमुक्त झालेल्या सर्व देवतांनी देवीची यथासांग पूजा करून तिचे स्तवन केले. नवमीच्या दिवशी देवी पूजनाचे फळ फार मोठे आहे. या पूजनाने ऐहिक, पारलौकिक सर्व प्रकारचे ऐश्वर्य, सुख, समाधान, यश, कीर्ती मिळते. देवीच्या कृपेने शेवटी देवीलोकांची प्राप्ती होते.
देवी म्हणाली, “देवतांनो, माझ्या या महात्म्य पठण श्रवणाने दृष्ट दुर्जनांच्या सामर्थ्याचा नाश होतो. या महात्म्य पठणाने भूत, प्रेत, पिशाच्च, राक्षस यांचा नाश होतो. माझे महात्म्य पठण करणाऱ्याला माझा सहवास प्राप्त होतो. पुष्प, अर्घ्य, धूप, दीप, गंध इत्यादींनी माझी पूजा केली असता, ब्राह्मण भोजन घातले असता, अभिषेक केला असता, उत्तमोत्तम पदार्थांचा मला नैवेद्य अर्पण केले असता, दान दिले असता, मी प्रसन्न होते. यातले काहीही न करता केवळ माझे महात्म्य पठण श्रवण केले असताही मी भक्तांवर प्रसन्न होते. या महात्मे पठणाने पातकांचा नाश होतो. उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते. माझ्या अवतारांचे कीर्तन केले असता सर्व प्राण्यांचे रक्षण होते. माझे युद्धविषयक चरित्र दृष्ट दैत्यांचा संहार करते. या महात्म्य श्रवणाने मनुष्याला शत्रूचे भय राहात नाही.
हे देवतांनो, तुम्ही आणि ऋषींनी माझे जे स्तवन केले आहे त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने माझे जे स्तवन केले आहे, ते सर्व प्रकारची कल्याणकारक बुद्धी देणारे आहे. रानावनात निर्जन स्थानी, सभोवती वनवा पेटला असता, लुटारूंच्या तावडीत सापडला असता, शत्रूने पकडले असता, जंगलात वाघ-सिंह आदी प्राणी मागे लागले असता, कोपलेल्या राजाने वधाची किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असता, महासागरातून प्रवास करीत असता, प्रचंड वादळाने नाव डळमळू लागली असता, युद्धात शस्त्रप्रहार झाला असता अथवा कोणतेही भयंकर संकट आले असता जे माझ्या या महात्म्याचे स्मरण करतो तो सर्व संकटातून मुक्त होतो. माझ्या चरित्र प्रभावाने सिंहादी हिंसक प्राणी नष्ट होतात. त्याचप्रमाणे शत्रू किंवा लुटारू माझ्या चरित्राचे स्मरण करणाऱ्या पासून दूर पळून जातात.
मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “हे राजा, असे बोलुन ती महापराक्रमी भगवती चंडिका सर्व देवतांच्या देखत एकाएकी गुप्त झाली. मग सर्व देवताही सर्व शत्रूंचा नाश झाल्याने निश्चिंत झाल्या. त्या पूर्वीप्रमाणेच यज्ञभागांचा उपभोग घेत आपापल्या अधिकारांचे पालन करू लागल्या. अवघ्या जगाचा विध्वंस करणारे महाभयंकर व महापराक्रमी देवशत्रू शुंभ-निशुंभ युद्धात मारले गेले असता, उरलेसुरले दैत्य पाताळ लोकात पळून गेले. हे राजा, देवी तत्वतः जन्ममृत्यू रहित असली तरी, ती पुन्हा पुन्हा अवतार धारण करून जगाचे रक्षण करीत असते. ती भगवतीदेवीच या जगाला मोहित करते. तीच विश्वाला निर्माण करते व तिची प्रार्थना केली असता संतुष्ट होऊन विज्ञान व समृद्धी देते.
हे राजा, महाप्रलयाच्या वेळी महामारीचे स्वरूप धारण करणाऱ्या त्या महाकालीनेच अवघे ब्रम्हांड व्यापले आहे. ती महाकालीच वेळोवेळी महामारी होते व ती स्वतः अजन्म म्हणजे जन्मरहित असतानाही सृष्टी रूपाने प्रकट होते. ती अनादी देवी वेळोवेळी सर्व प्राण्यांचे रक्षण करीत असते. मनुष्याच्या उत्कर्षाच्या वेळी ती भगवतीच घरात लक्ष्मीरुपाने वास्तव्य करते व भक्तांची उन्नती करते, भरभराट करते व तीच विनाशकारी अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता बनवून विनाश करते.
गंध, पुष्प, दीप, नैवेद्य इत्यादींनी त्या देवीची पूजा करून तिचे स्तवन केले असता ती धनधान्य, उत्तम संतती, धार्मिक बुद्धी देते व शेवटी उत्तम गती म्हणजेच मोक्ष देते. प्रसन्न झालेली ती भगवती ज्याला जे हवे असेल ते सर्व काही देते. या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व बाधा नाहीशा होतात. स्वतः देवी भक्ताजवळ बसून महात्म्य श्रवण करते.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील देवी चरित्राच्या पठणाचे महात्म्य नावाचा बारावा अध्याय समाप्त!

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.