Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा-१३ ) / Shri Devi Mahatmya Katha 13

श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय तेरावा 

 सुरथ आणि वैश्य यांना देवीचे वरदान 

          


उदयकालच्या सूर्याप्रमाणे जिची कांती आहे, जिला चार हात व तीन नेत्र आहेत, जिने आपल्या हातात पाश, अंकुश, वर व अभय मुद्रा धारण केली आहे, त्या शिवादेवीचे मी ध्यान करतो. 

|| श्रीगणेशाय नमः || श्री अंबिकायै नमः || 

          श्री पार्वतीची अंगभूत असलेल्या, सगळ्या जगाला सुख देणाऱ्या, हे देवी मी तुला भावभक्तीने वंदन करतो. मागील अध्यायात देवीच्या चरित्राचे माहात्म्य सांगितले. स्वतः देवीनेच त्याची फलश्रुती सांगितली. सज्जनहो! आता पुढील कथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे अपूर्व सुखाचा लाभ होईल. 

          मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, हे राजा, आतापर्यंत मी तुला भगवती देवीचे अत्यंत प्रभावी असे माहात्म्य सांगितले. ही विष्णुमाया भगवती अवघ्या विश्वाला धारण करते. ही देवीच विद्या म्हणजे ज्ञान उप्तन्न करते. भगवान विष्णूच्या मायास्वरूप त्या भगवतीने तुला, या समाधी वैश्याला व इतरही विचारी लोकांना मोहित केले आहे व पुढेही ती मोहित करील. हे राजा, तू त्या भगवती परमेश्वराला शरण जा. तिची आराधना केली असता ती सर्व प्रकारचे भोग, स्वर्ग, मोक्ष देते. ती आपल्या भक्तांना भुक्ती आणि मुक्तीही देते. 

          मार्कंडेय ऋषी शिष्याला म्हणाले, मेधा ऋषीने असे सांगितले असता सुरथ राजाने मेधा ऋषीला मोठ्या आदराने नमस्काकर केला. तो राजा राज्यहरण व ममत्त्व यामुळे अतिशय दुःखी झाला होता. परंतु मेधा ऋषींनी केलेल्या उपदेशाने उपरती झालेले राजा आणि समाधी वैश्य दोघेही तपाचरण करण्यासाठी निघाले व देवीचे दर्शन मिळावे यासाठी नदीच्या काठावर जाऊन तपश्चर्या करू लागले. 

          राजा आणि समाधी यांनी देवीची प्रतिमा तयार करून तिची स्थापना केली. ते दररोज देवीची यथासांग पूजा करु लागले. देवीसुक्ताचा पाठ सुरु केला. त्यांनी हळूहळू आहार कमी केला. मग ते पूर्ण निराहार राहून रात्रंदिन देवीची आराधना करु लागले. अत्यंत एकाग्रतेने ते देवीचे चिंतन करू लागले. त्यांनी आपले रक्त काढून त्याचा देवीला बळी दिला. अशा रीतीने त्यांनी तीन वर्ष देवीची मनोभावे आराधना केली. त्यांच्या या भक्तीने प्रसन्न झालेली देवी त्यांच्यापुढे प्रकट झाली व ती म्हणाली, 

          “राजा, मी तुम्हा दोघांवर संतुष्ट झाले आहे. तुम्हाला जे काही हवे असेल ते मला मागा. मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करीन.” 

          मार्कंडेय ऋषी म्हणाले, “देवी प्रसन्न झाली असता राजा तिला म्हणाला, “माते. माझे गेलेले राज्य याच जन्मी मला परत मिळावे. मला सामर्थ्य दे. म्हणजे मी माझ्या शत्रूंचा त्यांच्या सैन्यासह संहार करीन. पुढच्या जन्मी कधीही नष्ट न होणारे राज्य मला मिळावे. कोटीकल्प गेले तरी माझे राज्य कायम राहावे. मला अमरत्व प्राप्त व्हावे. माझी स्मृती कधीही नाहीशी होऊ नये. वार्धक्य आणि रोग माझ्या वाऱ्यालाही उभे राहू नयेत. मला अजर निरामय आयुष्य लाभावे.” समाधी वैश्याला पूर्ण वैराग्य प्राप्त झाले होते. तो देवीला म्हणाला, “माते, मला ज्ञान दे,भक्ती दे,वैराग्य दे, माझ्या ठिकाणी मी माझे असा भाव राहू नये. माझ्या ठिकाणी कसलीही आसक्ती राहू नये. मी निर्गुणब्रह्म व्हावे.

          राजा सुरथ आणि समाधी वैश्य यांनी देवीकडे असे वरदान मागितले असता देवी म्हणाली, “हे राजा, तू लवकरच तुझ्या शत्रूचा नाश करून गेलेले राज्य परत मिळवशील. तुला सर्व सुखे प्राप्त होतील. तू सार्वभौम राजा होशील. पुढे मृत्यू आल्यानंतर तू भगवान विवस्वानाच्या सूर्याच्या अंशाने जन्म घेशील. व या पृथ्वीवर “सावर्णिक” मनूच्या नावाने प्रसिद्ध होशील. तू अक्षयी राजा होशील.” 

          मग देवी समाधी वैश्याला म्हणाली, “तू जो वर मला मागितलास तो मी तुला देते. तुला श्रेष्ठ असे आत्मज्ञान प्राप्त होईल, तुझ्यातील अहंकार ममत्व नाहीसे होईल. तुला समाधी प्राप्त होऊन तू जीवनमुक्त होशील.” मार्कंडेय शिष्याला म्हणाले, सुरथ राजा आणि समाधी वैश्य या दोघांनी देवीकडे जे जे मागितले ते ते देवीने त्यांना दिले. त्या दोघांनी भक्तिभावाने केलेले स्तवन ऐकून देवी एकाएकी गुप्त झाली. ते दोघे देवीने दिलेल्या वरदानाने धन्य झाले. 

          देवीने दिलेल्या वरदानामुळे तो सुरथ राजा क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ असा सार्वभौम राजा झाला. त्याने सर्व राज्यसुखांचा उपभोग घेतला. पुढे मृत्यू आल्यानंतर तो देवीने दिलेल्या वराप्रमाणे सूर्यकुळात जन्मास येऊन सावर्णिक मनू नावाने प्रसिद्ध झाला. सर्व मन्वन्तरातील तो आठवा मनू होय.

          या तेराव्या अध्यायापर्यंत भगवतीदेवीचे अत्यंत अद्भूत देवीचरित्र मार्कंडेयांनी आपल्या शिष्यांना सांगितले. हेच चरित्र नैमिषारण्यात सूतांनी शौनकादिकांना सांगितले. तेच चरित्र मी तुम्हांला सांगितले. या अध्यायाचे श्रवण, पठण केले असता सर्व संकटे नाहीशी होतात. उत्तम ज्ञानप्राप्ती होते. सर्व संपदांची प्राप्ती होते. शेवटी उत्तम प्रगती प्राप्त होते. वेदव्यासांनी जसे सांगितले देवीने जसे बोलविले तसेच येथे वर्णिले आहे.

          श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील सुरथ आणि वैश्य यांना देवीचे वरदान  नावाचा तेरावा अध्याय समाप्त!

बारावा अध्याय⬅️

➡️ चौदावा  अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या