Subscribe Us

श्री देवी महात्म्य कथा-१४ / Shri Devi Mahatmya Katha 14

 श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय चौदावा 

 प्राधानिक रहस्य वर्णन 


          आपल्या भक्तांना सर्व पुरुषार्थ देणाऱ्या हे भगवती, तुझा जयजयकार असो. तुझे नामस्मरण केले असता सर्व विघ्ने नाहीशी होतात, सर्व मनोरथ पूर्ण होतात. तुझी सतत मनोभावे भक्ती करणाऱ्या तुझ्या भक्तांची थोरवी मी काय बरे सांगणार? हे देवी, तुझे माहात्म्य वेदांनाही पूर्णपणे कळत नाही. म्हणून तर स्वतः ब्रह्मदेव तुझ्या चरणी नतमस्तक झाले. अशा परिस्थितीत माझी प्रौढी काय बरे? तुझ्या गुणनिधीच्या पैलथडी जाण्यासाठी तूच आपल्या भक्तांच्या मुखे कथा वदवीत असतेस. 

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्री देव्यै नमः ॥ 

         मागील अध्यायात देवीने सुरथ राजा व समाधी वैश्य यांना वरदान दिल्याची कथा सांगितली. आता प्राधानिक रहस्या सांगतो. “सुरथ राजा व समाधी वैश्य यांनी देवीची तीन वर्षे मनोभावे आराधना केली. प्रसन्न झालेल्या देवीने सुरथाला राज्य दिले व वैश्याला परम ज्ञान दिले. त्यामुळे ते दोघे धन्य झाले.” असे बोलून शौनकादिक ऋषी सूतांना म्हणाले, ‘ही कथा, आम्ही ऐकले आहे. तरीसुद्धा देवीची आराधना कशी करावी ही शंका आमच्या मनात आहेच. म्हणून कृपा करून आमची शंका दूर करावी.” शौनकादिकांनी असे विचारले असता सूत म्हणाले, “अशीच शंका पूर्वी सुरथाने मेधा ऋषींनी विचारली होती.”

          सुरथ राजा म्हणाला, “ऋषिवर्य, आपण चंडिकेच्या आठ अवतारांच्या कथा सांगितल्या. आता या अवतारांच्या प्रधान प्रकृतीचे निरूपण करावे. मी आपल्या चरणी शरणागत आहे. देवीच्या ज्या स्वरुपाची ज्या विधीने आराधना करावयास हवी ते सर्व मला सविस्तर सांगावे.” मेधा ऋषी म्हणाले, “राजा, हे रहस्य अगदी गोपनीय आहे. कुणालाही कधीही ते सांगू नये. परंतु तू माझा भक्त आहेस म्हणून तुला सांगू नये, तुझ्या पासून लपवून ठेवावे, असे माझ्याजवळ काहीही नाही.” 

          “हे राजा, प्रथम रहस्यात पराशक्ती महालक्ष्मीच्या स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे. महालक्ष्मीच देवीच्या सर्व विकृतींची प्रधान प्रकृती आहे. म्हणूनच याला प्राकृतिक किंवा प्राधानिक रहस्य असे म्हणतात. हे राजा, त्रिगुणात्मक परमेश्वरी महालक्ष्मी सर्वांचे आदिकारण आहे. तिने दृश्य किंवा अदृश्य रुपाने संपूर्ण विश्वाला व्यापले आहे. हे राजा, तिने आपल्या चार हातात महाळुंग, गदा, खेट(ढाल)  व पानपात्र धारण केले असून आपल्या मस्तकावर नाग, लिंग व योनी या वस्तू धारण केल्या आहेत. 

          तिची कांती तप्त सुवर्णाप्रमाणे असून तिचे अलंकारही तप्त सुवर्णाचे आहेत. तिने आपल्या तेजाने शून्य जग परिपूर्ण केले आहे. सगळे जग शून्य आहे. असे पाहून या महालक्ष्मीने केवळ तमोगुणरूप उपाधीने दुसरे एक उत्कृष्ट रूप धारण केले. ते रूप एका स्त्रीच्या रूपात प्रकट झाले. तिच्या शरीराची कांती काजळासारखी काळ्या रंगाची होती. तिचे मुख दाढांनी सुशोभित होते. डोळे मोठे व कंबर बारीक होती. तिच्या चारही हातात ढाल, तलवार, पानपात्र व मुंडके होते. तिने आपल्या छातीवर कबंधमाला (हलणाऱ्या धडांची माला) व मस्तकावर नररुंडमाला धारण केली होती. अशा स्वरुपात प्रकट झालेली ती तामसी देवी महालक्ष्मीला म्हणाली, “माते, तुला माझा नमस्कार असो. तू मला माझे नाव सांग व मी काय करावे म्हणजे माझे कर्म कोणते ते मला सांग.” 

           महालक्ष्मी म्हणाली, “मी तुला तुझे नाव सांगते व तू कोणकोणते कार्य करावयाचे आहे तेही सांगते. महामाया, महाकाली, महामारी, क्षुधा, तृष्णा(हाव), निद्रा, तृष्णा (तहान), एकविरा, कालरात्री व दुरत्यया ही तुझी दहा नावे आहेत. ही तुझी नावे जगात कर्माने स्पष्ट होतील. ही तुझी नामकर्मे जाणून जो त्याचा पाठ करील त्याला सुखांची प्राप्ती होईल. 

          मेधा ऋषी म्हणाले, “हे राजा, महालक्ष्मीने महाकालीला असे सांगुन अत्यंत शुद्ध अशा सत्वगुणांनी दुसरे एक रूप धारण केले. ते चंद्रासारखे गोरे होते. त्या श्रेष्ठ स्त्रीने आपल्या हातात रुद्राक्षमाला, अंकुश, वीणा व पुस्तक धारण केले होते. महालक्ष्मीने तिचे नावे सांगितली. ती तिला म्हणाली, “महाविद्या, महावाणी, भारती, वाक्, सरस्वती, आर्या, ब्राम्ही, कामधेनु, वेदगर्भा व धीश्वरी (बुद्धीची स्वामिनी) ही तुझी दहा नावे आहेत.” मग महालक्ष्मी महाकालीला व महासरस्वतीला म्हणाली, “देवींनो, तुम्ही दोघी आपआपल्या गुणांना योग्य असे कन्या-पुत्र निर्माण करा.” 

          महालक्ष्मीने त्या दोघींना असे सांगून प्रथम स्वतःच स्त्री-पुरुषाची एक जोडी (कन्या-पुत्र) उत्पन्न केली. मग महालक्ष्मीने पुरुषाला ब्रम्हा, विधी, विरिंची व धाता ही नावे ठेवली. स्त्रीला श्री, पद्मा, कमला, लक्ष्मी अशी नावे ठेवली. मग महाकालीने व महासरस्वतीनेही एक-एक कन्या पुत्र जोडी उत्पन्न केली. त्यांचे रूप व नावेही सांगतो. महाकालीने नीलकंठ, लालभुजा, धवल शरीर व मस्तकावर मुकुट धारण करणारा पुरुष (म्हणजे शंकर) व गौर रंगाची स्त्री (म्हणजे सरस्वती ) यांना जन्म दिला. तो पुरुष रुद्र, शंकर, स्थाणू, कपर्दी व त्रिलोचन या नावांनी प्रसिद्ध झाला. स्त्री त्रयी,विद्या, कामधेनु, भाषा, अक्षरा व स्वरा या नावाने प्रसिद्ध झाली. 

          हे राजा, महासरस्वतीने गौर रंगाची स्त्री व शाम रंगाचा पुरुष यांना उत्पन्न केले. त्या दोघांची नावे सांगतो. त्यातील पुरुषाला विष्णु, कृष्ण, ऋषिकेश, वासुदेव व जनार्दन ही नावे मिळाली. त्याच प्रमाणे स्त्री उमा, गौरी, सती, चंडी, सुंदरी, सुभगा व शिवा या नावाने प्रसिद्ध झाली. मग त्या तीन स्त्रियांना तत्काल पुरुषरूप प्राप्त झाले. हे रहस्य फक्त ज्ञानी लोकांना समजते. अज्ञानी लोकांना हे समजत नाही. 

          हे राजा, महालक्ष्मीने त्रयीविद्यारूप, सरस्वती ब्रह्मदेवाला पत्नी म्हणून अर्पण केली. रुद्राला वरदायिनी पार्वती (गौरी) दिली व भगवान वासुदेवाला लक्ष्मी पत्नी म्हणून अर्पण केली. तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय करण्याचे सामर्थ्य दिले. मग ब्रह्मदेव सरस्वतीसह सुखाने राहू लागले. त्यांनी सरस्वतीसह चराचर ब्रह्मांड निर्माण केले. महादेव गौरीसह संयुक्त होऊन अवघ्या ब्रम्हांडाचा प्रलय करू लागला. ब्रह्मांडामध्ये जे जे स्थावर-जंगम निर्माण झाले, त्या सर्वांचे पालन लक्ष्मीसह नारायण वासुदेव करू लागला. 

          हे राजा, महालक्ष्मीच सर्व सत्वमयी असून सगळ्यांची ईश्वरी, महामाया जगदंबा आहे.  तीच मूळ प्रकृती आहे. ती साकार, निराकार राहून अनेक प्रकारची नावे धारण करते. जे जे दिसते, ऐकू येते, मनात निर्माण होते ते ते सर्व माया रूप आहे. नामरूपात्मक असे जे जे आहे, ते ते सर्व मायेचे स्वरूप आहे. ब्रह्मा-विष्णु-महेश हे मायापुत्रच आहेत. महालक्ष्मी या एकाच नावाने किंवा इतर प्रत्यक्षादी प्रमाणांनी महालक्ष्मीचे वर्णन होऊ शकत नाही. अशा या परमश्रेष्ठ महालक्ष्मीची अत्यंत भक्तिभावाने आराधना करावी. या अध्यायाचे भक्तिभावाने श्रवण पठन केले असता, सर्व पीडा नाहीशा होतात. सर्व संकटातून त्वरित सुटका होते.

          श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील प्राधानिक रहस्य नावाचा चौदावा अध्याय समाप्त!

तेरावा अध्याय⬅️

➡️ पंधरावा अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या