Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ३० (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 30

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-३० 

   शशांगराच्या ओंजळीतील पाण्याचा पुत्र बनला 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

                    गिरनार पर्वताच्या गुहेत दत्तात्रेय आपले शिष्य भर्तरी व गोरक्ष यांच्यासमवेत योगांतील गहन गोष्टी बोलत बसले होते. ते बोलणे पूर्ण झाल्यावर त्यांनी गोरक्षाला मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे गोरक्ष निघाला. भर्तरीला दत्तात्रेयांनी सर्व सिध्दीचे ज्ञान देण्यास प्रारंभ केला. अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर दत्तांनी भर्तरीला चिरंजीवपद प्राप्त करून दिले. इकडे गोरक्ष गर्भाद्रि पर्वतावर जाऊन मच्छिंद्राला भेटला. त्याला दत्तात्रेयांच्या भेटीसाठी बरोबर घेऊन परत निघाला. वाटेत त्यांना कौडिण्यापूर लागले. मिक्षा मागण्यासाठी ते दोघे नगरात गेले तो तेथे भर चौकात एक राजबिंडा तरुण हातपाय तुटलेल्या स्थितीत विव्हळत असलेला दिसला. कौंडिण्यपुराचा राजा शशांगर याने स्वतः चा मुलगा कृष्णागर यावर संतापून त्यांचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकले होते. त्याचा पूर्वेतिहास फारच चमत्कारीक होता.

संपुर्ण श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ

             हा शशांगर राजा पुष्कळ वर्षे निपुत्रिक होता. त्याची पत्नी मंदाकिनी त्याची समजूत काढी. "भाग्यात नसेल तर मनाला क्लेश करून कशाला घ्यायचे! " असे म्हणे. होता होता त्याने मंत्र्यांवर राज्य सोपवून दक्षिणेस रामेश्वरास जाण्याचे ठरविले. रामेश्वराची आराधना करावी म्हणजे शंकर प्रसन्न होऊन पुत्र देईल असा विश्वास धरून तो थोडेसे सेवक घेऊन मंदाकिनीसह दक्षिण दिशेस जात असता वाटेत कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या संगमावर एका गावी राहिला तेथे रात्री स्वप्नात भगवान शंकराचे पाच मुखे व दहा हात अशा स्वरूपात त्याला दर्शन झाले. शंकर त्याला म्हणाले, "याच संगमावर अपर्णेसह माझी लिंगरूप मूर्ती आहे, तिथी नित्य अर्चना कर. म्हणजे संतान प्राप्त होऊन तुझी चिंता मिटेल." सकाळी राजा जागा झाला. 

               त्याला स्वप्न आठवले. तो संगमावर दोन्ही नद्यांच्या मध्ये गेला. तेथे राजाला एक जुने शिवलींग व पार्वतीची मूर्ती सापडली. राजाने लोकांना सर्व सांगून त्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. नवे मंदीर बांधून दिले. लोक 'संगमेश्वर' असे त्या स्थानाला म्हणू लागले. राजा तेथेच आणि राहून हाच आपला रामेश्वर अशी श्रध्दा आराधना करू लागला. तो तेथे त्याला पुत्र मिळाला. पण त्या आधीची एक कथा अशी :

                 त्या संगमावर मित्राचार्य नावाचा एक मोठा ब्राह्मण रहात होता. त्याची स्त्री शरयू नावाची होती. त्यांनाही संतान नव्हते. पुढे असे झाले की, शंकर आपल्या गणांसह कैलासावर बसले असता, गणांच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला बोलावून नृत्य करण्यास सांगितले ती नृत्य करीत असता तिच्या मनात शंकराविषयी कामवासना उत्पन्न झाली. नृत्य करतांना ती चुकू लागली. तेव्हा शंकरांच्या लक्षात हा प्रकार आला. ते मनाशी म्हणाले, "हिचे मन असे विचलित झाले हे योग्य नाही.” ते पटकन तिला नृत्य थांबविण्यास सांगून म्हणाले, "तुझ्या मनात भलतेच विचार आले तर तू पृथ्वीवर जन्म घे तुंगभद्रेच्या व कृष्णेच्या संगमावर जे गाव आहे, तिथे मित्राचार्य व शरयू हे ब्राह्मण दांपत्य आहे. त्यांची कन्या म्हणून तू जन्म घे." अप्सरा दुःखी झाली, तिने उ:शाप मागितला, तेव्हा शंकर म्हणाले, "तू माझी आराधना कर मी तुला प्रत्यक्ष रूप घेऊन स्पर्श करीन. माझा तुला स्पर्श होताच तू तिथून मुक्त होऊन पुन्हा अप्सरा होशील.” 

                      उ:शाप मिळताच ती अप्सरा त्या शरयू नावाच्या स्त्रीची कन्या म्हणून जन्माला आली. तिचे नाव कदंबा असे ठेवले. पुढे ती स्वरूपसुंदर कन्या जरी लग्नाच्या वयाची झाली तरी आईबापांबरोबर शंकराच्या देवळात जात असे आणि तीच गोडी लागून ती शिवाची आराधना व जप करीत बसे. तिला लग्नच करायचे नव्हते. पुढे एकदा ती शिवलिंगाची पूजा करून परत फिरणार तोच लिंगातून श्री शंकर प्रकट झाले. गाभाऱ्यात तेज दिसले. तिने मागे पाहिले तो दिव्य देहधारी शंकर तिच्या मागे येऊ लागले. ती घाबरून नदीच्या संगमावरून घराकडे पळू लागली. तेवढ्यात शंकरांनी तिला गाठले व तिचा हात धरला. त्यांचा स्पर्श होताच तिचे शरीर नष्ट झाले. ती तात्काळ मूळ रूपास प्राप्त होऊन स्वर्गात गेली.

               शंकरांनी आपले वचन पूर्ण केले. पण त्यांचे तेज कृष्णानदीच्या पात्रात पडून वाहू लागले. शंकरांनी शशांगर राजाला पुत्रप्राप्ती होईल असा दृष्टांत दिला होता. तोही त्या रूद्रवीर्याने पूर्ण झाला. त्याच वेळी शशांगर राजा स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभा होता. त्याने ओंजळीत पाणी घेण्यासाठी नदीत ओंजळ बुडविली तोच ते शिवतेज प्रवाहाबरोबर वाहत आलेले त्याच्या ओंजळीत आले आणि आश्चर्य असे की मानवी शरीराचा तेवढा जरी स्पर्श झाला तरीही त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत अत्यंत दैदीप्यमान सुंदर बालक उत्पन्न झाला. राजा थक्क झाला. हा अयोनिसंभव बालक कोण? हा शंकराचा अवतार! हाच तो त्यांनी दृष्टांत सांगितलेला पुत्र. शंकरा, केवढी तुझी कृपा! " त्याने मंदाकिनीला सर्व काही सांगितले व बालक तिच्या हाती दिला. पुत्रवात्सल्याने तिच्या स्तनांतून दूध पाझरू लागले, राजा व राणी नंतर कौंडिण्यपुरास आले. कृष्णेत तो पुत्र सापडला म्हणून त्याचे नाव 'कृष्णागर' ठेवण्यात आले.

                पुढे कृष्णागराला तेरावे वर्ष लागले. त्याच्यासाठी राजाने मुली पाहण्यास प्रारंभ केला. तो इतका रूपवान होता की त्याला जोडीदारीण मिळणेच दुरापास्त झाले. राजा निराश झाला. पुढे काही वर्षांनी मंदाकिनी राणी मरण पावली. चित्रकुटाचा राजा भुजाध्वज याची रूपवती कन्या भुजावती हिच्याशी शशांगर याचा विवाह ठरला एका सुमूहूर्तावर राजा शशांगर व भुजावती यांचा विवाह झाला. त्यावेळी भुजावती तेरा वर्षाची होती आणि कृष्णागर राजपुत्र सतरा वर्षाचा होता. त्याने तिला आपली माता म्हणून राजाच्या विवाहात पाहिले होते. त्यानंतर घडलेली एक घटना कृष्णागराच्या जीवनाची वाताहत करणारी ठरली.

                      राजा शिकारीला गेला होता. कृष्णागर एका मोकळ्या जागी पतंग उडवीत होता. त्याला भुजावतीने पाहिले. तिचे मन त्याकडे आकृष्ट झाले. दासीला सांगून तिने त्याला बोलावून घेतले. पतंगाचा दोरा मित्राच्या हाती देऊन तिला भेटण्यासाठी तो आला. तिने दासीला दूर जायला खुणेने सांगितले स्वतः ती महालात शिरली. 'कशासाठी बोलावले मला?' असे विचारीत कृष्णागर आत आला. ती काहीच न बोलता कावरीबावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडे टक लावून पाहू लागली.

                   तो जरासा चमकला आत एकान्त आहे असे पाहून भुजावतीने कृष्णागराजवळ आपला मनोविकार उघड केला व प्रेमयाचना केली. " हे काय आई, हे पाप आहे. तू माझी माता म्हणून, या राज्याची स्वामीनी म्हणून या राजवाड्यात आली आहेस. छे छे काय अधःपात हा! " असे म्हणून कृष्णागर तडकाफडकी तेथून गेला. तो आपला सावत्र मुलगा आहे, हे तिला आधी माहीत नव्हते. ते कळले तेव्हा भुजावती घाबरली. तेव्हा दासीने भुजावतीची समजुत काढली व तिला एक युक्ती सांगितली.

अध्याय फलश्रुती :- चोराची दृष्टी नाहीशी होईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या