Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ३१ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 31

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-३१ 

 चामुंडदेवता रोज चौरंगी पुढे फळे ठेवी 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

           दासी भुजावतीला म्हणाली, "तू भिऊ नको. ईश्वराची करणी अघटित असते. मी तुला सांगते असे कर. तू आता रूसून झोपून राहा राजा आला तरी उठू नको. 'काय झाले? रडतेस का?' असे तो विचारील, मग अधिकच रड. मग राजाला सांग, 'तुम्ही गेलात ती संधी साधून तुमचा मुलगा माझ्या महालात शिरला. त्याने मला धरले. मी त्याला दुर लोटून दिले. त्याने दंगा मस्ती करून मला बाहेर ओढीत नेले. पण पुन्हा हिसडा देऊन मी पळाले. आता या राजवाड्यात कशी जिवंत राहू, मी मेले तर सुटेन एकदाची!' पाहा, तू असे उलटेच आळ घेतलेस की राजा संतापेल. राजा कृष्णागराला क्षमा करणारच नाही. मग तू सुखाने राहा. "

                   दासीचा विचार भुजावतीला पटला. ती शय्येवर झोपून राहिली. राजा आला, सैन्य नगरात परत आले. राजा राजवाड्यात आला, भुजावतीने त्या वेळी जसे तिला दासीने सांगितले होते तसेच नाटक केले व ती राजाच्या कुशीत तोंड लपवून रडू लागली. राजा तावातावाने बाहेर पडला. त्याने सेवकांना कृष्णागराला पकडून त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा फर्माविली. कृष्णागराला एका चौरंगावर बांधण्यात आले. त्याचे हातपाय निर्दयपणे तोडण्यात आले. त्याला चौकात टाकून देण्यात आले. तो दुःख सहन न होऊन विव्हळू लागला. त्याच्या तोंडाला फेस आला. डोळ्यापुढे अंधार पसरला. नागरिक ते भयंकर दृश्य पाहायला येत होते. कोणी म्हणत होते, "राजा फार निर्दय आहे?" दुसरे म्हणत होते, "अहो राजा उतारवयाचा. तरणीताठी बायको. हा सुंदर तरूण मुलगा घरात. भुजावतीशी त्याने काहीतरी लगट केली असेल!" हजारो लोक हळहळत होते. गोरक्ष व मच्छिंद्र हे सर्व पाहात होते. 

              मच्छिंद्रनाथ गोरक्षला म्हणाले, "आपण राजाकडून याला घेऊन जाऊ. या कृष्णागराला चौरंगीनाथ करू या. हा चौरंगी सिध्द झाला की त्याच्या हातून राजा व भुजावती यांना अद्दल घडवू." असे ठरवून ते दोघे राजाकडे निघाले मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ दोघेही राजसभेत शिरले त्यांना जो राग आलेला होता, तो बाहेर मुळीच दिसत नव्हता. राजाने त्यांचे फार आदराने स्वागत केले. मग राजाने त्यांना विचारले, "काय हेतूनं येणे केलंत?” मच्छिंद्र म्हणाला, "राजा, एक लहानसे काम आहे. तू आमचा शब्द मानणार असलास तर सांगतो!"

                  राजाने ते पत्कारले. मग मच्छिंद्र म्हणाला, "आज तुमच्या या कौंडिण्यापुरात भर चौकात आम्ही एक विलक्षण दृश्य पाहिले. कृष्णागर हा तुमचाच पुत्र हातपाय तोडलेल्या अवस्थेत तिथे एका चौरंगाला बांधून ठेवला आहे.” “नाथ महाराज, त्याचे काय?" राजाने विचारले. मच्छिंद्र म्हणाला, "तो आम्हाला दे, आम्ही तो घेऊन जातो." ते ऐकताच राजाची सुप्त भीती नाहीशी झाली. तो खदखदा हसून म्हणाला, "पण तो तुमच्या काय उपयोगाचा? हातपाय नाहीत त्याला. त्याची तुम्ही सेवा करणार की तो तुमची सेवा करणार?" "ती पंचाईत तुला नको." चढ्या सुरात मच्छिंद्र म्हणाला. राजा शहाणा होता. कृष्णागर दृष्टीआड झाला तर त्याच्या दृष्टीने चांगलेच झाले असते. तो म्हणाला, "बरं तर, तुम्ही काहीही करा. तुम्ही कृष्णागराला घेऊनच जा काही हरकत नाही!” "त्याचे पुढे काय झाले, त्याला कुठे नेला, ही चौकशी पण तू करू नकोस. आम्ही काय ते योग्यच करू." गोरक्ष उठत म्हणाला.

                 राजाने सेवकांना त्यांच्याबरोबर जाण्याची आज्ञा दिली. ते दोघे चौकात आले सेवकांनी चौरंगावरून दोऱ्या सोडून कृष्णागराला सोडविले भोवती शेकडो लोकांची गर्दी झाली होती. राजा आपल्या मुलाला गोसाव्याच्या ताब्यात देतोय हे पाहून लोक जे तोंडाला येईल ते बोलत होते. पण त्या दोघांनी कृष्णागराला उचलले आणि हळूहळू नगर सोडून ते बाहेर गेले. प्रथम त्याच्या हातापायांच्या वाहत्या जखमांवर त्यांनी झाडपाल्यांचा पट्ट्या बांधल्या. त्याचे तोंड धुतले. गोरक्षाने मायेने त्याला फळे खायला घातली. तो भरवू लागला, तेव्हा कृष्णागराच्या हृदयात कालवाकालव होऊन तो रडू लागला.

                  दोन-चार दिवसांतच या नव्या सहवासाची गोडी चौरंगीला लागली. हे योगी आहेत, सिध्द आहेत, पण सामान्य माणसापेक्षा किती सरळ, निष्कपट, प्रेमळ आहेत, याचा अनुभव घेऊन तो तशा पराधीन अवस्थेतही सुखावला. आपण कपटी माणसाच्या दुष्ट सहवासातुनही एवढाच सुटलो असेच त्याला वाटू लागले. त्याचे हातपाय गोरक्ष नवेही फुटवू शकला असता, पण त्याच्या त्या स्थितीमुळेच दुसरे काहीतरी कार्य करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याचे शरीर तसेच राहिले. पुढे त्यांनी चौरंगीला बद्रिकाश्रमात शिवमंदिरात जरा वेळ ठेवले आणि दोघांनी एक गुहा शोधून काढली. 

                            ती गुहा वरून खाली खोल होती. या गुहेत चौरंगीची परीक्षा घ्यावी असे ठरवून चौरंगीला दोघांनी उचलले, गुहेत ठेवले. वर शिळा ठेवली. त्याला सांगितले, "तू जोपर्यंत या शिळेवर कायम नजर रोखून ठेवशील तोपर्यंत तुझ्या खाण्याची व्यवस्था करून जातो. मी एक मंत्र सांगतो तो म्हणत राहा. मंत्राचा अर्थ लक्षात घे. जप कर, भूक भागविण्यासाठी फळे खा. जीव जगवण्यासाठी दृष्टी अविचलित ठेव." हे सर्व गोरक्षाने सांगितले. त्याच्या कानांत मंत्र सांगितला. मग दोघे गुहेच्या बाहेर पडले. 'आम्ही तीर्थे पाहून लवकर येतो' असे त्यांनी त्याला सांगितले होते. मग गोरक्षाने चामुंडेला आवाहन करून, रोज चौरंगासमोर मधुर फळे ठेव असे सांगितले. ते निघून गेले व गिरनार पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांना भेटले.

              इकडे गुहेत चौरंगीची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. चामुंडा फळे आणून ठेवी पण तो शिळेवर लावलेली दृष्टी काही दूर करू शकत नव्हता. न जाणो, शिळा सुटली नि आपण मेलो तर? त्या भीतीने त्याने फळे खाल्लीच नाहीत. स्वतःला हात नव्हते तेव्हा खाली वाकून तोंडानेच फळे खावी लागणार. ते करावे तर शिळा डोक्यात पडणार त्यामुळे तो बिचारा पूर्ण उपाशीच राहिला. जप मात्र अखंड चालला होता. 

                आपले चित्त, बुध्दी व अंत:करण त्याने विचलित होऊच दिले नाही. त्याचे रक्त आटले, रस गेला, मांस बाळत गेले, हाडे व त्याचा तेबी राहिली. चामुंडा सुक्ष्म रूपात येऊन जात असे पण ती आज्ञेशिवाय त्याला फळे भरवू शकत नव्हती. चौरंगी अतिशयच क्षीण झाला. त्याच्या शरीराभोवती वारूळ झाले. पण जपध्वनी चित्तात उदय पावत होता. तेवढ्याच धुगधुगीवर तो सतत त्या मंत्राचा सुक्ष्म जप करीत राहिला. शरीर काष्ठवत झाले होते, पण तरीही शिळेवरची दृष्टी, चित्तात जप हे चालूच होते. 

अध्याय फलश्रुती:-शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या