Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ३२ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 32

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-३२ 

  रेवतीने नाथदेहाचे तुकडे करविले  


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

               गोरक्ष व मच्छिंद्र दोघे गिरनार पर्वतावर गेले. श्री दत्तांच्या आज्ञेने ते दोघे यात्रेला निघाले आणि काशीक्षेत्रात गेले. काशी नगरात पुण्यशील, धार्मिक व लोकप्रिय राजा त्रिविक्रम मरण पावला होता. अत्यंत न्यायी म्हणून त्या राजाची कीर्ती होती. त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा हवालदिल झाली होती. मच्छिंद्राला गोरक्ष म्हणाला, "गुरूवर्य, हा राजा आपण पुन्हा जिवंत करू या." मच्छिंद्र म्हणाला, "नाही रे, गोरक्ष राजा ब्रह्मचैतन्यरूप झाला. आता तो कसला परत येतो!" ते दोघे दूर गंगाकिनारी एक शिवमंदिर होते तेथे गेले. जवळच स्मशान होते. तेथे ते थोडी विश्रांती घेतात तोच त्यांना त्रिविक्रम राजाची शवयात्रा येतांना दिसली. 

                   राजाच्या देहाला दाहसंस्कार करावयाचा होता ते प्रेत पाहून गोरक्षाने राजाला पुन्हा जिवंत करण्याचा आग्रह धरला, तेवढ्यात मच्छिंद्राला एक विलक्षण युक्ती सुचली. मच्छिंद्र म्हणाला, "गोरक्षा, मी राजाच्या देहात प्रवेश करतो. बारा वर्षे मी त्या राजाच्या देहामध्ये वावरेन, मग त्या देहाला सोडून पुन्हा या देहात येईन. तोपर्यंत माझा हा देह गुप्त जागी सांभाळून ठेव." गोरक्ष चकित झाला. आनंदित झाला. मच्छिंद्राने योगबळाने आपला देह निश्चेष्ट केला व तो स्मशानात राजाच्या शरीरात शिरला. "प्रेत हलले, अहो! राजेसाहेब जिवंत झाले. देवाची कृपा." सर्वजण म्हणू लागले. राजाच्या शरीरात चेतना येताच सर्वच रंग पालटला, प्रजाजन राजाला काशीत परत घेऊन गेले.

                     इकडे मच्छिंद्राच्या देहाचे रक्षण कसे करावे या विचारात गोरक्ष बसून राहिला होता. तेवढ्यात पुजारीण त्या देवालयात आली. तिने गोरक्षाला पाहिले. गोरक्षनाथाने पुजारिणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. तिच्या मदतीने मंदिराच्या मागील बाजूच्या भुयारात मच्छिंद्राचा देह नेऊन ठेवला. भुयाराच्या तोंडावर दगडाचा दरवाजा असा बेमालूम बसवला की बाहेरून कोणाला काही पत्ता लागणार नव्हता. पुजारीण म्हणाली, "हा देह बारा वर्षे टिकेल ?" गोरक्ष म्हणाला. "हो, तो चिरंजीव मच्छिंद्राचा देह आहे. मर्त्य माणसाचा नव्हे, पण तू ही गोष्ट कोणालाही सांगू नको." तिकडे राजवाड्यात मच्छिंद्र राजाच्या शरीरात वावरू लागल्यावर काय झाले ? कोणालाही संशय येणार नाही, इतके ज्ञान व खाणाखुणा मच्छिंद्राला अंतर्ज्ञानाने कळत होत्या. राजा पुन्हा जिवंत झाला आहे सर्वांना वाटले. रेवती राणीला सुध्दा काहीच शंका आली नाही. त्रिविक्रम राजा जसा शिवदर्शनासाठी यायचा तसाच राजाच्या देहात वावरणारा मच्छिंद्रही शिवालयात आला. त्याने गोरक्षाची चौकशी केली. 

                 एकान्त पाहून मच्छिंद्राने गोरक्षाला गुप्त भाषेत विचारले, "देह कुठे आहे? "गोरक्ष म्हणाला "भुयारात" मच्छिंद्र लगबगीने बाहेर गेला. सेवकांना त्याने "आपला एकान्त भंग करू नये. गोरक्षनाथाबरोबर योगचर्चा करायची आहे." असे सांगून देवळापासून दूर जायला सांगितले, मग दोघे भुयारात शिरले. देह जसाचा तसा होता. तो पाहून मच्छिंद्राचे समाधान झाले. मग तो निघून गेला. नंतर तीन महिन्यांनी मच्छिंद्राची अनुज्ञा घेऊन गोरक्ष तीर्थयात्रेला निघुन गेला. पुढे आणखी काही महिने गेले. रेवतीला संतान नव्हते. मच्छिंद्रापासून तिला दिवस गेले. नऊ मास पूर्ण झाले. तिला मुलगा झाला. बारसे झाले मुलाचे नाव धर्मनाथ ठेवले. मुलगा पाच वर्षांचा झाला. राजराणी शिवालयात मुलाला घेऊन गेली. शंकराच्या समोर राणी उभी राहिली. राजा बाहेर दूर उभा होता.

                पुजारीण राणीजवळ होती. राणी शंकराची प्रार्थना करू लागली, "हे शंकरा, माझी आता एकच इच्छा उरली आहे. माझे पती जिवंत असतानाच मला मरण येवो. सुवासिनी म्हणूनच मी मरावे!" तिची प्रार्थना ऐकून पुजारीण एकदम हसली. तेव्हा राणीला आश्चर्य वाटले. तिने पुजारिणीला त्या हसण्याचे कारण विचारले. तेवढ्यात राजा राणीला सांगून शिवालयातून मुलाला घेऊन निघून गेला. 'मी मागून येते' असे राणीने सांगितले. मग पुजारिणीने तिला अभय मागून खरा प्रकार सांगितला. मच्छिंद्राचा देह पण दाखविला. ती म्हणाली, "तुम्ही आधीच विधवा आहात असे पाहून मी हसले." राणीला अत्यंत वाईट वाटले. एकीकडे तिला मच्छिंद्राचा भयंकर राग आला. एकीकडे पातिव्रत्यभंगाचे अत्यंत दुःख झाले. एकीकडे सर्व गोष्टींचे नवल वाटले, एकीकडे पुत्रवात्सल्याने मन कासावीस झाले. तिला त्या धक्क्याने मुर्च्छाच आली.

                   पण लवकर मनावर ताबा ठेवून व पुजारिणीला न रागवता विश्वासात घेऊन ती उदासपणे परत गेली. "आणखी सात वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात शिरेल. त्या वेळी मी पुन्हा विधवा ती विधवाच होईन. त्यावर उपाय काय ? गुप्तपणे भुयारातला मच्छिंद्राचा देह नष्ट करून टाकला तर? तर मच्छिंद्राला राजाचा देह सोडून आधारच मिळणार नाही. असेच करावे." असा साहसी विचार करून राणीने आपल्या विश्वासातल्या सेवकांना घेऊन रात्रीबेरात्री शिवालयात जाऊन मच्छिंद्राचा देह भुयारातून काढला. आपल्या सेवकांना तिने आज्ञा दिली. "या दुष्ट गोसावड्याच्या शरीराचे तिळाएवढे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून द्या!"

               तिने स्वतः ते काम होईपर्यंत हजर राहून पुजारिणीला कोठेही काही न बोलण्याची शपथ घातली, आणि नंतर ती राजवाड्यात निघून गेली.. पण हे सर्व पार्वती पाहात होती. तिने शंकरांची समाधी भंग करून राणीचे कृत्य सांगितले. "तुमचा प्रिय शिष्य मच्छिंद्र पाहा त्याच्या शरीराचे तिळाएवढे तुकडे केले आणि तुम्ही समाधी लावून बसलात" ती म्हणाली. शंकरांना हे जेव्हा कळले तेव्हा फार वाईट वाटले. ते म्हणाले, "पार्वती, यक्षिणींना बोलावं आणि ते सर्व तुकडे एकत्र करायला आणि कैलासावर येथे ते आणून ठेवायला सांग!" पार्वतीने बोलावताच यक्षिणी आल्या. त्यांनी मच्छिंद्राच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र केले. "ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करा." पार्वतीने आज्ञा केली. चामुंडेच्या अधिकाराखाली सर्व यक्षिणी ते तुकडे घेऊन कैलासावर गेल्या. "वीरभद्र, हे मच्छिंद्राच्या देहाचे कणकण आहेत. त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती हिने हे कृत्य केले आहे." वीरभद्र म्हणाला, "काशीनरेश त्रिविक्रम ? होय! मला शंकरांनी सांगितले. 

                    चामुंडा म्हणाली, "याच मच्छिंद्राने आम्हाला नग्न करून आमची फजिती केली होती. अष्टभैरव व मारूती यांचा पराभव केला होता हा आमचा शत्रूच, आणि तुमचाही. त्याचा शिष्य गोरक्षनाथ, गुरूला सोडवून नेण्यासाठी येण्याचा संभव आहे. सावध राहा!" ते ऐकून वीरभद्राने चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण पहाऱ्यावर ठेवले. इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्र नित्य शिवालयात येत असे. पण भुयाराचे तोंडावरील दार यथास्थित पाहून त्याला खरा प्रकार काहीच कळला नाही. आपणांस सात वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे असा विचार मात्र मच्छिंद्राने सतत मनात बाळगला होता. पुढे तीही सात वर्षे भरत आली. एकुण बारा वर्षे होत आली. मात्र गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता.

अध्याय फलश्रुती:-  गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल. 

   अध्याय समाप्त 

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या