।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-३५
ब्राम्हणाला वटवृक्षाच्या पोकळीत बालक मिळाले
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
दत्तात्रेय निघुन गेल्यावर रेवणाने सिध्दीची प्रचीती पाहिली. त्याने दत्तांनी सांगितलेले मंत्रायन केले, तोच महिमासिध्दी श्रीरूपाने प्रकट झाली. रेवणाने तिला सांगितले, पलीकडे झाडाखाली मातीचे बीग आहेत ते सोन्याचे करून दाखव. महिमासिध्दीने ते कार्य लगेच केले. तेव्हा रेवण म्हणाला, "माते, अशाच माझ्या सर्व इच्छा पुर्ण करशील?" ती म्हणाली, "हो. पण मी अदृश्य राहून तुझे काम करीन." असे म्हणून तिने ते सोन्याचे ढीग अदृश्य केले व स्वत: ही अदृश्य झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवण शेतावर जाण्याऐवजी आळस करून झोपूनच राहिला. सहनसारूक त्याच्यावर ओरडला. तेव्हा तो म्हणाला, "नाही मी उठत! रोज रोज शेतात राबायचे. काय मिळणार त्याने?" सहनसारूक म्हणाला "अरे,काम केले नाहीस तर धान्य पिकणार नाही. मग खाशील तरी काय?" रेवण म्हणाला, "तुम्ही उगीच काळजी का करता?" "काय आहे घरात ? चल उठ जा शेतावर, नाहीतर उपाशी मरशील."
"बाबा, घरात जाऊन तरी बघा." रेवण म्हणाला. तेव्हा त्याचा बाबा घरात शिरला. तो काय! घरात धनधान्य, वस्त्रेभुषणे, सर्व भरलेले. तो आश्चर्याने चकित झाला. रेवण म्हणजे कुणीतरी सिध्द आहे. अशी त्याची खात्री झाली. तेव्हापासून तो त्याच्या सांगण्याप्रमाणे वागु लागला. त्या गावचे नाव होते बुधलगाव. रेवणाने सिध्दीच्या जोरावर गावातल्या लोकांना भरपुर मिष्टान्न देण्यास सुरूवात केली. लोकांची रीघ लागू लागली, सर्वांना इच्छा भोजन मिळू लागले. जो बेई तो तृप्त होऊन रेवणाचे यशोगान करीत जाई. रेवनाला लोक रेवणसिध्दनाथ म्हणू लागले.
मच्छिंद्रनाथ त्या गावात आला व धर्मशाळेत उतरला. त्याला तिथल्या लोकांनी रेवणाची माहिती सांगितली. "तो जेवायला घालील. त्याच्याकडे जा," असे सांगितले. मग त्याने अंतर्ज्ञानाने पाहीले. हा रेवण म्हणजे चमसनारायण असे त्याला कळले. मग मच्छिंद्राने योगबळाने पक्षी पशु, हिंख श्वापदे, नाना प्रकारचे प्राणी निर्माण केले. लोकांच्या देखत त्यांना खायला घातले. अंगाखांद्यावर खेळविले आणि मग त्यांना रानात किंवा आकाशात पाठवून दिले. त्याचा हा चमत्कार पाहून लोक अचंबा करू लागले. रेवणाला हा प्रकार कळला. तो मुद्दाम पाहायला आला. परस्परांचे वैरी पशुही मच्छिंद्राजवळ प्रेमाने बसत होते. खायचे पदार्थ खाऊन जात होते. मच्छिंद्र त्यांना अंगाखांद्यावर खेळवीत होता. रेवणाला फार आश्चर्य वाटले. त्याने परत येऊन एकांतस्थानी महिमासिध्दीला पाचारण केले. ती येताच म्हटले, "तो धर्मशाळेत एक नाथपंथी आलाय, त्याने पशुवर्गाला वश केले तसे मला आले पाहिजे, तू हे काम मजसाठी कर." ती म्हणाली, "ज्याला अद्वैताचा अनुभव असतो तो प्राणिमात्रात ऐक्य करू शकतो." तो म्हणाला, "मग तूच मला ब्रम्हदेवता कर की!" ती म्हणाली, "ते आमचे काम नाही. त्यासाठी तू दत्त गुरूंकडे जा."
रेवणाला वाटले, “पुरे झाली की अल्पसिध्दी दत्त जेथे प्रथम भेटले तेथेच जावे. तेच माझे समाधान करू शकतील" तो पुन्हा शेतात गेला दत्त भेटीसाठी तप करू लागला. रेवणाने अन्नपाणी सोडले. तो अगदी कृश झाला. मच्छिंद्राने पाहिले, त्याने सर्व सिध्दींना विचारले, "रेवणास कोणती सिध्दी आहे? त्यांचा गुरू कोण?" तेव्हा त्या म्हणाल्या, "ही महिमासिध्दी दत्तांनी त्याच्या सेवेस दिली आहे. त्या सिध्दीचा उपयोग करून तो जगावर उपकारच करतो" महिमासिध्दी स्वतः म्हणाली, "मी दत्ताज्ञेने त्याच्यासेवेत आहे." "म्हणजे हा गुरूबंधू आहे माझा. याला मी साह्य केलेच पाहिजे." मच्छिंद्राने मनाशी म्हटले. मच्छिंद्रवायुगतीने गिरनार पर्वतावर गेला. दत्तांना भेटला.
“तुमचा शिष्य व भक्त तिकडे बुंधलगावात तुमच्या भेटीसाठी प्राण कंठात आणून 'दत्त दत्त' असे आर्तपणे म्हणत आहे. गुरू महाराज, वायुवेगाने चला." अशी त्याने नाना प्रकारे विनवणी केली आणि दोघेही रेवणासमोर जाऊन उभे राहिले. रेवणाची दयनीय अवस्था पाहून दत्तांनी त्याला जवळ घेतले आईच्या मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि वज्रासारखी शक्ती प्रेरून त्याला बलवंत केले. पुढे गिरनार पर्वतावर राहून सर्व विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर गुरूंनी रेवणनाथाला म्हटले, "तू सिध्द झाला आहेस. ब्रह्मज्ञ झाला आहेस. तू आता तीर्थयात्रेला जा."
रेवण निघाला. होता होता माणदेशात विटे या गावी तो आला. तेथे सरस्वती नावाचा एक ब्राम्हण व त्याची पत्नी जान्हविका हे दांपत्य राहात होते. तो त्यांच्या घरी वस्तीस राहिला. त्या ब्राह्मणाचे सहा पुत्र अर्भकावस्थेतच एकामागुन एक मरण पावले होते. रेवण तेथे गेला, त्या रात्री ब्राह्मण त्याचे पाय चेपीत बसला होता. त्याचा सातवा पुत्र जन्मुन दहा बारा दिवस झाले होते व त्या दिवशीच बारसे झाले होते. पण रात्री अचानक त्या मुलाला बरे वाटेना. रात्रीतच त्या मुलाचे प्राण गेले. ती बाई स्फूंदुन रडू लागली. सकाळी रेवणनाथने बाईचे हुंदके ऐकले. रेवणनाथ ब्राह्मणाला घेऊन आत गेला. मुलगा आईच्या मांडीवर होता. प्राणपक्षी केव्हाच उडून गेला होता. रेवणनाथ हळहळला.
ब्राह्मण म्हणाला, “महाराज, आमचे दैवच फुटके, त्याला कोण काय करणार! हा माझा सातवा मुलगा. नशिबात पुत्रसुख नाही, दुसरे काय!" रेवणनाथला फारच कळवळा आला. तो म्हणाला, "मी या मुलांचे प्राण यमाकडे जाऊन परत आणतो. याचे शव तीन दिवस तसेच ठेवा. त्याचा नाश होणार नाही, असा मी उपाय करतो." असे म्हणून रेवणनाथाने अमरमंत्र जपून बाळाच्या कपाळी विभूती लावली व स्वतः तो योगाचा आश्रय करून यमपुरीत जाऊन दाखल झाला. यमाने त्याला पाहिले. 'चमसनारायण ?' त्याने ओळखळे. तो समोर आला. त्याने रेवणाचा सत्कार केला. पूजन केले.
रेवणनाथ म्हणाला, "मी विटे गावी काल रात्री वस्तीला होतो. त्यावेळी तुझ्या सेवकांनी त्या ब्राह्मणाचा पुत्र मारून त्याचे प्राण हरण केले. त्यांचे आणखी सहा मुलगे असेच अल्पायुषी असताना येथे आणले गेले आहेत." यम चपापला. तो म्हणाला, "नाथ, तुम्हांला एक गोष्ट ठाऊकच असेल. मी यम म्हणजे नियमाप्रमाणे कार्य करणारा. संहाराचे काम शंकर करतात. पोषणाचे काम हरी करतात. सृष्टी निर्माण करतो विधाता, तुम्ही कैलासावर जा! तुमचे हे काम सरळ शंकरांना विचारा." रेवणनाथाला त्याचे म्हणणे पटले. आपण सरळ-सरळ शंकरांना भेटावे असे त्याने ठरविले.
अध्याय फलश्रुती:- महासिद्धी प्राप्त होऊन, बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल .
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.